युवकांनो तुम्ही ख्रिस्ती निष्ठेच्या परिक्षेत यशस्वी होणार का?
“अनैतिक आचरणास बेईमानपणा समजू नका. तुम्ही तर मजा लुटीत असता. हे खरे की तुमच्या पालकांना किंवा वडीलधाऱ्यांना ही गोष्ट कळली तर
त्यामुळे मोठी निराशा पदरी पडेल व पुष्कळ समस्या येतील. पण तुम्ही मजा म्हणून या गोष्टी आचरता तेव्हा या सर्व गोष्टींना मनातून काढून टाकले पाहिजे.”
वर नमूद केलेले वक्तव्य करणारा एक युवक गुप्तपणे व्यभिचार आचरीत होता. तो दुहेरी जीवन जगत होता व याद्वारे आपले पालक व ख्रिस्ती मंडळी यांना फसवीत होता. त्यावेळी, आपण ख्रिस्ती निष्ठावंतपणाच्या कसोटीत पराजित होत आहोत हे त्याला तितके कळू शकले नाही.
अशा या निष्ठावंतपणाच्या कसोटीत हजारो ख्रिस्ती युवक बळी पडले आहेत. यात तितके आश्चर्य नाही! कारण दियाबल सैतान देवाच्या लोकांविरुद्ध ‘लढाई करीत’ आहे व त्यांची सचोटी भंगविण्यासाठी करता येईल ते सर्व करीत आहे. (प्रकटीकरण १२:१७) त्याने खासपणे युवकांना आपल्या “कुयुक्त्यां”चे निशाण बनवले आहे. (इफिसकर ६:११, किंग्डम इंटरलिनियर) या कारणास्तव निष्ठावंत राहण्यास खरा प्रयत्न आणि दृढ निश्चय लागतो.
पण, निष्ठावंतपणा म्हणजे काय? इब्री शास्त्रवचनात मूळ भाषेत “निष्ठावंतपणा” याला जो शब्द आहे तो कोणा माणसासोबत विशिष्ठ उद्देश राखून प्रेमळ आवड राखणे असे सुचवितो. (स्तोत्रसंहिता १८:२५) ते काही सहजपणे तुटणारे कमकुवत बंध नव्हेत, तर त्या व्यक्तीशी राखलेले उद्देश पूर्ण होईपर्यंत अतूट प्रेम राखणे हा त्यात अर्थ आहे. ग्रीक शास्त्रवचनात, मूळ भाषेत “निष्ठावंतपणा” या शब्दामध्ये पवित्रता, नीतीमत्ता किंवा पूज्यता याचा विचार आहे.
अशाप्रकारे निष्ठावंतपणामध्ये देवासोबतच्या योग्य नातेसंबंधाचा समावेश आहे. इफिसकर ४:२४ आम्हास सांगतेः “धार्मिकता व सत्याची पवित्रता [“निष्ठा,” न्यू.व.] यांनी युक्त असा . . . नवा मनुष्य धारण करावा.” तुम्हाला यहोवाशी निष्ठावंत रहायचे आहे का? तर तुम्हाला त्याच्याशी अतूट सलोखा, न तुटणारे बंध, निर्माण करता आले पाहिजे; आपल्या सर्व मार्गात त्याला संतुष्ट करण्याचा निश्चय असला पाहिजे. तुम्हाला यहोवाच्या नीतीमान दर्जांशी, इतर काहीही करण्याचा मोह सामोरा आला तरी चिकटून राहिले पाहिजे.
बेईमान होण्याचा दबाव
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये बहुतेक युवक निष्ठावंत राहण्याची शिकस्त करीत आहेत हे प्रशंसनीय आहे व यामुळे ते शुद्ध विवेकाचा अनुभव घेत आहेत. तरीही, प्रेषित पौलाने हे भाकित केले होते की, “शेवटल्या काळी” सर्वसाधारण लोकांमध्ये बेईमानपणाची लक्षणे दिसून येतील. (२ तीमथ्य ३:१, २) काही ख्रिस्ती युवकांनी या बेईमान जगाला ‘त्याच्या साच्यात पिळवटून टाकण्यासाठी’ अनुमति देण्याची खडतर गोष्ट केली. (रोमकर १२:२, फिलिप्स) हे सैतानाने कसे साध्य केले?
सोबत्यांचा दबाव हे सैतानाचे शक्तीशाली माध्यम आहे. आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे असे पुष्कळांची किंवा बहुतेकांची इच्छा असते, आणि या स्वाभाविक इच्छेशी कसे खेळावे ते सैतानाला माहीत आहे. आपल्याला सर्वसाधारण असे गणले जावे यासाठी काही ख्रिस्ती युवकांनी अहितकारी संभाषण, अनैतिक वागणूक, धुम्रपान, मद्यपान, इतकेच काय पण मादक द्रव्यांचे सेवन करण्यात देखील सहभाग घेतला. हे सर्व काही आपल्या सोबत्यांकडून आपणाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी हे केले.
आपण ‘दैहिक वासनांस अनुरुपसे वागावे, देहाच्या इच्छेप्रमाणे करावे,’ अशी सैतानाची इच्छा आहे. (इफिसकर २:३) “उपवर” किंवा “तारुण्याचा बहर” असताना लैंगिक ओढ किती जबरदस्त असते हे सैतानाला माहीत आहे. (१ करिंथकर ७:३६) आणि या इच्छेच्या आहारी तुम्ही जावे अशी त्याची इच्छा असते. अश्लील प्रकाशने चाळणे, तसे चित्रपट किंवा व्हिडीओ बघणे किंवा हस्तमैथुन आचरुन काही ख्रिस्ती युवकांनी स्वतःला त्याच्या हातात खेळणे म्हणून देऊ केले. या गोष्टी पुढे बेईमानपणाची गंभीर कृत्ये आचरण्यात परिणामित होतात. तर मग, यापैकीच्या काही प्रकारांद्वारे सैतानी जगाने तुम्हाला ‘त्याच्या साच्यात पिळवटून टाकले आहे’ का?
दुहेरी जीवन जगणे
व्यभिचारासारखे अत्यंत वाईट कृत्य आचरणे हे मूलतः अत्यंत गंभीर पातक असले तरी काही युवकांनी आपल्या अडचणींना दुप्पट केले आहे. ते स्तोत्रसंहिता २६:४ मधील “अधम लोक” बनवून स्वतःला “कपटी” केले. असे युवक दुहेरी जीवन जगतात. ते पालकांच्या किंवा इतर प्रौढ ख्रिश्चनांच्या सहवासात असताना एका प्रकारचे तर आपल्या सोबत्यांसोबत असताना दुसऱ्याच प्रकारचे जीवन जगतात.
तथापि, दुहेरी स्वरुपाचे जीवन जगणे हे अर्थातच स्व-घातक व धोक्याचे आहे. लक्षात न येणारी दुष्कृत्ये दुसऱ्या चुकीच्या कृत्याकडे जातात. सुरवातीला विवेकाला त्रास होतो पण एखादा जितक्या अधिकपणे या चुकीच्या कृत्यात अधिक खोल जात राहतो तितक्या अधिकपणे त्याचा विवेक कमी संवेदनाशील होत जातो. चुकीची कृत्ये आचरीत राहिल्यामुळे तो अक्षरशः “बधिर” होतो.—इफिसकर ४:१९, किंग्डम इंटरलिनियर.
अशा वेळी आपली चुकीची कृत्ये कबूल करणे व आवश्यक ती मदत मिळवणे अगदीच जड बनते. आणि जेथे इतर ख्रिस्ती युवकांचा अशा चुकीच्या कृत्यात समावेश असतो तेथे तर हे खासपणे होत असते. अशावेळी निष्ठेचा चुकीचा अर्थ लक्षात घेतला जातो. सुरवातीला ज्या युवकाबद्दल सांगण्यात आले त्याने असे म्हटलेः “आपण काय करतो हे आपल्याला कळते; ते चुकीचे आहे हे देखील आपल्याला माहीत होते. पण इतरांवर यामुळे त्रास ओढवला जाऊ नये याखातर तुम्ही ते कोणालाही न सांगण्याची प्रतिज्ञा करता.”
आपले पालक किंवा मंडळी यापासून एखादा ‘कपट’वृत्ती आचरू शकेल, पण तो आपले हे कृत्य यहोवापासून लपवून ठेवू शकत नाही. “त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तु नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे [“ज्याला आपल्याला जाब द्यावायाचा आहे,” न्यू.व.], त्याच्या दृष्टीला सर्व उघडेवाघडे आहे.” (इब्रीयांस ४:१३) पवित्र शास्त्र हे खात्रीने सांगतेः “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही.” (नीतीसूत्रे २८:१३) काही काळातच ते चुकीचे कृत्य उघड होईल; कोणाला यहोवाला फसवता येणार नाही. नीतीसूत्रे ३:७ म्हणतेः “तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको. परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.” शिवाय हेही लक्षात ठेवा की, “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] नेत्र सर्वत्र आहेत; ते बरेवाईट पाहात असतात.”—नीतीसूत्रे १५:३.
आधी सांगण्यात आलेला युवक तसेच त्याचे इतर सोबत चुकीच्या कृत्यात धरले गेले आणि त्याला व त्याच्या सोबत्यांना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. त्यांनी नंतर आपली आध्यात्मिक सुधारणा घडवून आणली आणि मंडळीत परतले. असे असेल तरी, निष्ठावंतपणाचा अर्थ शिकून घेण्याचा हा केवढा खडतर मार्ग बनला!
देवाशी ‘आपली प्रकरणे मिटवणे’
समजा, एखाद्याने आधीच वाईट कर्मे आचरुन तो कोणत्या ना कोणत्या प्रकाराने तरी बेईमान झालेला आहे तर काय? स्वतःची फसवणूक करुन घेणे आणि आपले प्रकरण सुधारण्याचे नाकरणे सोपे वाटते. व्यभिचार गुप्तपणे आचरणारा एक युवक म्हणालाः “मी माझे क्षेत्रकार्य वाढवले, आणि असा विचार केला की, यामुळे माझ्या वाईट कृत्यावर पडदा पडेल.” भटकलेल्या इस्राएल राष्ट्राने देखील यहोवाला अर्पणे आणून संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण अशा ढोंगी भक्तीचा यहोवाने निषेध केला. त्याने त्यांना म्हटलेः “आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा.” त्यांनी ‘त्याच्यासोबत आपली प्रकरणे मिटवल्यावरच’ यहोवा त्यांच्या यज्ञार्पणांचा स्वीकार करणार होता. हेच, आज जो कोणी पापकर्मात गुंतला आहे त्याच्याबद्दलही खरे आहे.—यशया १:११, १५-१८.
आपल्या सोबत्यांवर विसंबून राहून कोणालाही यहोवासोबत आपले प्रकरण मिटवता येणार नाही. कारण एक गोष्ट म्हणजे, सोबती सहसा चांगली मदत देऊ शकत नाही; ते स्वतःच जीवनात कमअनुभवी असतात. महत्त्वाचे ते हे की, ते तुमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. केवळ देवच ते करू शकतो. यास्तव, त्याच्यापुढे “आपले मन [“अंतःकरण,” न्यू.व.] मोकळे करा” व आपले पाप कबूल करा. (स्तोत्रसंहिता ६२:८) तुम्हाला तुमच्या वागणूकीबद्दल खूप लाज वाटत असली तरी, यहोवा “भरपूर क्षमा” करू शकतो याची खात्री असू द्या.—यशया ५५:७.
तुम्हाला अधिक साहाय्याची गरज भासेल. ज्याला अशा मदतीचा लाभ मिळाला तो युवक म्हणतोः “ताबडतोब, सुरवातीला प्रथम तुमच्या पालकांना, मंडळीतील वडीलांना ते कळवा.” होय, तुमचे पालक तुम्हाला मदत करण्याच्या योग्य स्थितीत आहेत. त्यांना “आपले चित्त” देऊन तुमच्या समस्येची पूर्ण समज द्या. (नीतीसूत्रे २३:२६) ते, जरुर आहे तर मंडळीतील वडीलांपासून तुम्हाला अधिक मदत मिळवून देण्याची योजना करतील.—याकोब ५:१४, १५.
खरा निष्ठावंतपणा दाखविणे—कसा?
अर्थातच, सुरवातीलाच बेईमानी वृत्ती न जोपासणे हे सर्वात चांगले आहे. स्तोत्रसंहिता १८:२५ आम्हास सांगतेः “दयाळू [“निष्ठावंत,” न्यू.व.] जनांशी तू [यहोवा] दयेने [“निष्ठेने,” न्यू.व.] वागतोस. सात्त्विकांशी सात्त्विकतेने वागतोस.” वागणूकीचा उच्चतम दर्जा निष्ठावंतपणे जोपासणाऱ्यांना यहोवा समृद्धपणे आशीर्वादित करीत असतो.
तरीपण, आणखी इतर मार्गाद्वारे तुमच्या निष्ठावंतपणाला कसोटीस लावले जाईल. उदाहरणार्थ, तुमच्या कोणी एका मित्राने विपरीत मार्ग धरला आहे. तर मग, तुम्हाला त्या मित्राबद्दल वाटणारा जिव्हाळा यहोवास तुम्ही दाखवीत असलेल्या निष्ठावंतपणाला अभ्राच्छादित करू द्याल का? या कारणास्तव, प्रेमळ गोष्ट ही ठरेल की, त्या मित्राला त्याच्या पालकांकडे जाऊन या विपरीत मार्गाची कल्पना देण्यास सांगावे किंवा त्याला वडीलांना भेटण्यास सांगावे. तुमच्या मित्राला हे सांगा की, त्याने जर विशिष्ट वेळेपर्यंत हे केले नाही तर तुम्हाला स्वतःला ते कळवावे लागेल. नीतीसूत्रे २७:५ म्हणतेः “झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्दताडण बरे.” तुमच्या मित्राची या पद्धतीने मदत केल्यामुळे तुम्ही केवळ मित्रत्वाचा अस्सलपणाच दाखवीत नसता तर यहोवाबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या निष्ठावंतपणाची खोलीही प्रदर्शित करीत असता.
परिक्षा कसलीही असली तरी निष्ठावंतपणा दाखवण्याची शक्ती ही यहोवासोबत बळकट असे व्यक्तीगत नातेसंबंध उभारण्यामुळे मिळत असते. अशा या नातेसंबंधाचा लाभ मिळवावयाचा आहे तर अर्थभरीत प्रार्थना तसेच परिश्रमी स्वरुपाचा व्यक्तीगत अभ्यास जरुरीचा आहे. वाईट कर्मे आचरलेल्या ज्या युवकांचा आधी उल्लेख केला होता त्यांनी हे कबूल केले की, त्यांच्या प्रार्थना व व्यक्तीगत अभ्यासाच्या सवया एक निव्वळ प्रघात बनला होता व काही काळाने तो संपला. यहोवा त्यांना खरे वाटेनासा झाला व यामुळे अशुद्ध आचरणाचा लगेच संसर्ग जडला. तर मग, तुम्ही आपली प्रार्थना तसेच व्यक्तीगत अभ्यास याद्वारे, निष्ठावंत राहता यावे म्हणून यहोवासोबत आपले नाते दृढ करीत आहात का?
हे खरे की, कधी कधी तुमच्या मनात विचार येईल की, आपल्याला मौजमजा मिळत नाही. “जगातील लोक खूपच मजा करतात असे आपल्याला वाटू लागते,” असे एका युवतीने म्हटले. “पण जेव्हा का तुम्ही संकटात अडकला तेव्हा ती मजा मुळीच नसते हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागते.” ती आपल्या स्वानुभवावरुन बोलत होती, कारण तिने लैंगिक अनैतिकता आचरली होती व यामुळे गर्भधारणा व गर्भपात या गोष्टी घडल्या गेल्या. “सत्यामध्ये असणे हे संरक्षण आहे,” असे ती आता म्हणते—हा धडा तिला मोठ्या कष्टाने शिकायला मिळाला. स्तोत्रसंहिता ११९:१६५ आम्हाला स्मरण देते की, देवाचे “शास्त्र [“नियम,” न्यू.व.] प्रिय मानणाऱ्यांस फार शांती असते.”
या कारणास्तव, निष्ठावंत राहण्यासाठी होईल तितके करा. यहोवासोबत टिकाऊ नातेसंबंध उभारण्यासाठी परिश्रम घेत राहा. जे वाईट त्याचा वीट माना आणि बऱ्याला चिकटून राहा. (रोमकर १२:९) स्तोत्रसंहिता ९७:१० म्हणतेः “अहो परमेश्वरावर [यहोवा, न्यू.व.] प्रीती करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा. तोआपल्या भक्तांचा [“निष्ठावंतांचा,” न्यू.व.] प्राण रक्षितो. तो त्यांस दुर्जनांच्या हातातून सोडवितो.” होय, तुम्हाला ख्रिस्ती युवक या नात्याने यहोवाकडील संरक्षणाचा लाभ मिळवता येईल ख्रिस्ती निष्ठेची परिक्षा यशस्वीरित्या पार पडल्यावर तुम्हाला अनंतकालिक जीवनाचा आनंद अनुभवता येईल.