वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१५ पृ. १०-१४
  • ते एकनिष्ठ जन पहा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते एकनिष्ठ जन पहा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकनिष्ठा ही काहीतरी विशेष आहे
  • यहोवा, सर्वश्रेष्ठ निष्ठावंत
  • एकनिष्ठ पुत्र, येशू ख्रिस्त
  • एकनिष्ठ राहिलेले अपरिपूर्ण मानव
  • आधुनिक काळातील एकनिष्ठा
  • एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • निष्ठा कोणत्या किंमतीवर?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही कोणाला एकनिष्ठ असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठेने सेवा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१५ पृ. १०-१४

ते एकनिष्ठ जन पहा!

“हे प्रभो [यहोवा, NW] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र [एकनिष्ठ] आहेस.”—प्रकटीकरण १५:४.

१. माजी अध्यक्ष, सी. टी. रस्सेल यांच्या एकनिष्ठेविषयी, जे. एफ. रदरफोर्ड यांनी कोणती साक्ष दिली?

सी.टी. रस्सेल नंतर, १९१७ मध्ये वॉच टावर संस्थेचे नियुक्‍त झालेले अध्यक्ष, जोसफ एफ. रदरफोर्ड यांनी रस्सेल यांच्या दफन विधीची सुरवात असे म्हणून केली: “चार्ल्स टेझ रस्सेल देवाशी, ख्रिस्त येशूशी आणि मशिही राज्याच्या उद्देशाप्रती एकनिष्ठ होते. ते पूर्णपणे—होय, अगदी मृत्यूपर्यंत एकनिष्ठ होते.” खरोखरच, यहोवा देवाच्या एखाद्या विश्‍वासू सेवकाला वाहिलेली ही उत्तम आदरांजली होती. कोणाही व्यक्‍तीला, तिने निष्ठेची परीक्षा पार पाडली, ती निष्ठावान राहिली—अगदी शेवटपर्यंत निष्ठावान राहिली असे म्हणण्याशिवाय तिला इतर कोणतीही मोठी आदरांजली आपण देऊ शकत नाही.

२, ३. (अ) एकनिष्ठा एक आव्हान सामोरे का आणते? (ब) एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांविरुद्ध आणखी कोण व्यूह रचत आहेत?

२ एकनिष्ठ असणे इतके सोपे नाही. का बरे? कारण स्वार्थीपणा आणि एकनिष्ठा परस्परविरोधी आहेत. देवाशी बेइमान असलेल्यांमध्ये ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक हे प्रमुख आहेत. शिवाय, अशा प्रकारची बेइमानी आज वैवाहिक नातेसंबंधात ज्याप्रकारे दिसून येते त्याप्रकारे पूर्वी कधीच नव्हती. व्यभिचार सर्वसामान्य आहे. व्यापार जगात देखील बेइमानी बोकाळत आहे. याविषयी आपल्याला असे सांगितले जाते: “अनेक व्यवस्थापक आणि पेशेवाईक . . . असा विश्‍वास बाळगतात, की आज केवळ मूर्ख व भोळे लोकच त्यांच्या कंपन्यांशी एकनिष्ठ असतात.” जे लोक “अति एकनिष्ठ” आहेत अशांकडे तुच्छतेने पाहिले जाते. “तुम्ही तुमची प्रथम आणि एकमात्र एकनिष्ठा, स्वतःला दाखवली पाहिजे,” असे व्यवस्थापन संमंत्रक आणि कार्यकारी शोध संस्थेच्या एका अध्यक्षांनी म्हटले. स्वतःशी एकनिष्ठ राहणे म्हणजे त्या शब्दाला भ्रष्ट करणे होय. यावरून आपल्याला मीखा ७:२ मध्ये जे म्हटले आहे त्याची आठवण होते की, “भक्‍त [एकनिष्ठ] पृथ्वीवर नाहीसा झाला आहे.”

३ एका अभूतपूर्व प्रमाणावर सैतान आणि त्याचे दुरात्मे आपल्या विरुद्ध व्यूह रचत आहेत, आपल्याला देवाशी बेइमान करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चालला आहे. म्हणूनच तर ख्रिश्‍चनांना इफिसकर ६:१२ मध्ये असे सांगितले आहे: “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशांतल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” होय, आपण, “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखे कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले पाहिजे.—१ पेत्र ५:८.

४. कोणत्या प्रवृत्ती, एकनिष्ठ असणे इतके कठीण बनवतात?

४ तसेच उत्पत्ति ८:२१ मध्ये, “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट”—व स्वार्थी—“असतात,” असे जे लिहिले आहे त्यानुसार आपल्या पालकांकडून वारसाने मिळालेल्या स्वार्थी प्रवृत्तींमुळे सुद्धा एकनिष्ठ राहणे कठीण जाते. “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो,” ही समस्या प्रेषित पौलाला असल्याची त्याने कबुली दिली आणि आपल्या सर्वांची देखील तीच समस्या आहे.—रोमकर ७:१९.

एकनिष्ठा ही काहीतरी विशेष आहे

५, ६. एकनिष्ठा काय आहे याबद्दल काय म्हटले जाऊ शकते व त्याची व्याख्या कशी दिली आहे?

५ “एकनिष्ठा” हा एक असाधारण शब्द आहे. यास्तव, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) हे पुस्तक अशाप्रकारे म्हणते: “हिब्रू आणि ग्रीक शब्दांचा अचूक अर्थ देणारे इंग्रजी शब्द नाहीत, पण देव आणि त्याच्या सेवेच्या संबंधाने भक्‍ती आणि विश्‍वासूपणाच्या भावार्थासह ‘एकनिष्ठा’ वापरल्यास तो अदमासे अर्थ देतो.”a “एकनिष्ठा” या शब्दाविषयी टेहळणी बुरूज नियतकालिकाने एकदा म्हटले: “विश्‍वासूपणा, बंधन, प्रीती, कर्तव्य, निष्ठा. या सर्व शब्दांमध्ये कोणती गोष्ट सामान्य आहे? ते एकनिष्ठेचे विविध पैलू आहेत.” होय, असे अनेक सद्‌गुण आहेत जे खरोखरच एकनिष्ठेचे विविध पैलू आहेत. शास्त्रवचनांमध्ये कित्येक वेळा एकनिष्ठा आणि धार्मिकता यांचा मेळ घातला आहे, ही गोष्ट खरोखरच उल्लेखनीय आहे.

६ पुढील व्याख्या देखील मदतदायी आहेत जसे की: ‘एकनिष्ठा, निरंतर, भरवसा ठेवण्यालायक विश्‍वास व एकनिष्ठा, अस्थिरता किंवा मोह यांच्यापासून सुरक्षित याला देखील सूचित करू शकते.’ ‘एकनिष्ठा, एखाद्याच्या प्रतिज्ञेशी विश्‍वासूपणा किंवा संस्थेशी अथवा एखाद्याला नैतिकरीत्या जबाबदार असल्यामुळे वाटणाऱ्‍या तत्त्वांना निरंतर अधीनता यास सूचित करते; ही संज्ञा, केवळ चिकटून राहणेच नव्हे तर त्या चिकटून राहण्यापासून भुलवले आणि परावृत्त केले जाण्यास प्रतिकार करणे देखील सुचवते.’ यास्तव, जे लोक परीक्षा, विरोध आणि छळ यांमध्ये विश्‍वासूपणे टिकून राहतात ते “एकनिष्ठ” संबोधण्यास पात्र आहेत.

७. एकनिष्ठा आणि विश्‍वासूपणा यात कोणता फरक करता येऊ शकतो?

७ परंतु या संदर्भात, एकनिष्ठा आणि विश्‍वासूपणा यांच्यातील फरक दाखवण्यासाठी उदाहरण देणे उत्तम असेल. पश्‍चिमेकडील संयुक्‍त संस्थानांमध्ये, एक गरम पाण्याचा झरा आहे जो सुमारे प्रत्येक तासाला बाहेर पडतो. त्या झऱ्‍याच्या पाण्याचे बाहेर पडणे इतक्या नियमाने आहे की त्याला ओल्ड फेथफुल म्हटले जाते. बायबल चंद्रासारख्या अमूर्त गोष्टींविषयी बोलते, की तो अवलंबण्यायोग्य असल्यामुळे विश्‍वासू आहे. स्तोत्र ८९:३७ चंद्राविषयी म्हणते, की “आकाशातील साक्षीदार विश्‍वसनीय आहे.” देवाची वचने विश्‍वासू आहेत असे म्हटले जाते. प्रकटीकरण २१:५ म्हणते: “तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो. तो म्हणाला लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.” ही सर्व उदाहरणे विश्‍वसनीय, अवलंबण्यायोग्य आहेत, पण त्यांच्यामध्ये एकनिष्ठेप्रमाणे कोणत्याही जिव्हाळ्याची किंवा नैतिक गुणांची क्षमता नाही.

यहोवा, सर्वश्रेष्ठ निष्ठावंत

८. कोणता शास्त्रवचनीय पुरावा एकनिष्ठेच्या सर्वोत्तम उदाहरणाची ओळख करून देतो?

८ यहोवा देव एकनिष्ठेचे सर्वोत्तम उदाहरण आहे यात काहीच शंका नाही. यहोवा देव मानवजातीसोबत निष्ठावान राहिला आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याने आपल्या पुत्राला देखील पाठवले. (योहान ३:१६) यिर्मया ३:१२ मध्ये आपण वाचतो: “इस्राएले, मागे फीर, असे परमेश्‍वर [यहोवा] म्हणतो; मी तुजकडे रागाने पाहाणार नाही, कारण मी कृपाळू आहे; मी सदा क्रोधयुक्‍त राहणार नाही.” पुढे यहोवाच्या एकनिष्ठेचा पुरावा देणारे शब्द प्रकटीकरण १६:५ येथे लिहून ठेवले आहेत: “जो तू आहेस व होतास, जो तू पवित्र [एकनिष्ठ] आहेस, . . . तू न्यायी आहेस.” मग पुन्हा एकदा आपल्याला स्तोत्र १४५:१७ येथे सांगण्यात येते: “परमेश्‍वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू [एकनिष्ठ] आहे.” वास्तविक पाहता, यहोवा त्याच्या एकनिष्ठेत इतका उल्लेखनीय आहे की प्रकटीकरण १५:४ त्याच्याविषयी म्हणते: “हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र [एकनिष्ठ] आहेस.” यहोवा देव परमोच्च प्रमाणात एकनिष्ठ आहे.

९, १०. यहोवाने इस्राएल राष्ट्रासोबतच्या त्याच्या व्यवहारांमध्ये एकनिष्ठेचा कोणता अभिलेख स्थापित केला आहे?

९ विशेषतः इस्राएल राष्ट्राच्या इतिहासात यहोवा त्याच्या लोकांसोबत एकनिष्ठ राहिल्याचा विपुल पुरावा आहे. शास्त्यांच्या काळामध्ये इस्राएल राष्ट्र वारंवार खऱ्‍या उपासनेपासून दूर गेले पण यहोवाला पुन्हापुन्हा त्यांच्याबद्दल वाईट वाटले आणि त्याने त्यांना वाचवले. (शास्ते २:१५-२२) इस्राएलमध्ये राजे शासन करीत असलेल्या सर्व पाच शतकांमध्ये यहोवाने त्या राष्ट्राला त्याची एकनिष्ठा प्रदर्शित केली.

१० यहोवाच्या एकनिष्ठेमुळे तो त्याच्या लोकांसोबत सहनशील झाला. त्याबद्दल २ इतिहास ३६:१५, १६ असे म्हणते: “त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्‍वर [यहोवा] मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांस आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्‍वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.”

११. यहोवाची एकनिष्ठा आपल्याला कोणती खात्री किंवा सांत्वन देते?

११ यहोवा सर्वोत्कृष्टपणे एकनिष्ठ असल्यामुळे प्रेषित पौल, रोमकर ८:३८, ३९ मधील शब्दांप्रमाणे लिहू शकला: “कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही.” होय, यहोवा आपल्याला अशाप्रकारे खात्री देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्रीयांस १३:५) यहोवा देव नेहमीच एकनिष्ठ आहे हे माहीत असणे खरोखरच सांत्वनदायक आहे!

एकनिष्ठ पुत्र, येशू ख्रिस्त

१२, १३. देवाच्या पुत्राच्या एकनिष्ठेचा कोणता पुरावा आपल्याजवळ आहे?

१२ येशू ख्रिस्त, एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यात यहोवाचे हुबेहूब अनुकरण करत होता व अजूनही करत आहे. प्रेषित पेत्र अगदी उचितपणे स्तोत्र १६:१० उद्धृत करून प्रेषितांची कृत्ये २:२७ मध्ये येशू ख्रिस्ताला ते लागू करू शकला की: “कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र [एकनिष्ठ] पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.” येशू ख्रिस्ताला ‘पवित्र [एकनिष्ठ] पुरुष’ अशी जी पदवी बहाल केली आहे त्यास तो खरोखरच पात्र आहे. तो त्याच्या पित्याशी आणि देवाच्या वचनयुक्‍त राज्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे. सैतानाने पहिल्यांदा मोहपाश, स्वार्थीपणाच्या आकर्षणांचा उपयोग करून येशूच्या सचोटीचा भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याला अपयश आल्यावर, त्याने त्याचा छळ करण्यास सुरवात केली आणि सरतेशेवटी वधस्तंभावर येशूला ठार मारले. येशू कधीही त्याच्या स्वर्गीय पिता, यहोवाशी असलेल्या त्याच्या एकनिष्ठेपासून परावृत्त झाला नाही.—मत्तय ४:१-११.

१३ “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे,” या मत्तय २८:२० वचनात लिहिलेल्या अभिवचनाप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांसोबत एकनिष्ठ राहिला आहे. त्या अभिवचनाच्या पूर्णतेत तो, सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून सद्य काळापर्यंत एकनिष्ठेने त्याच्या मंडळीवर मस्तकपद गाजवत आहे.

एकनिष्ठ राहिलेले अपरिपूर्ण मानव

१४. ईयोबाने एकनिष्ठेचे कोणते उदाहरण मांडले?

१४ पण, अपरिपूर्ण मानवांबद्दल काय? ते देवाशी एकनिष्ठ राहू शकतात का? आपल्याजवळ ईयोबाचे उल्लेखनीय उदाहरण आहे. सैतानाने त्याच्या बाबतीत हा वादविषय असंदिग्ध केला. ईयोब यहोवा देवाशी एकनिष्ठ होता, की तो केवळ स्वार्थापायी त्याची सेवा करीत होता? मी ईयोबाला त्रास देऊन त्याला यहोवापासून दूर नेऊ शकतो अशी सैतानाने बढाई मारली. ईयोबाने त्याची सर्व मालमत्ता, सर्व मुले आणि चांगले आरोग्य गमावले तेव्हा, “देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा,” असा आग्रह त्याची पत्नी त्याला करू लागली. पण ईयोब एकनिष्ठ होता, कारण तो तिला म्हणाला: “तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस; देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय? ह्‍या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (ईयोब २:९, १०) खरे पाहता, ईयोबाच्या तथाकथित सांत्वन देणाऱ्‍यांना तो म्हणाला: “तो [देव] मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन.” (ईयोब १३:१५) म्हणूनच तर ईयोबाला यहोवाची कृपापसंती प्राप्त झाली! यास्तव, यहोवाने अलीफज तेमानीला सांगितले: “तुजवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक ईयोब जसे यथार्थ बोलला, तसे तुम्ही बोलला नाही.”—ईयोब ४२:७, १०-१६; याकोब ५:११.

१५. यहोवा देवाच्या पुष्कळ सेवकांच्या एकनिष्ठेचा कोणता शास्त्रवचनीय पुरावा आपल्याजवळ आहे?

१५ इब्रीयांस पत्राच्या ११ व्या अध्यायात वर्णिलेल्या सर्व विश्‍वासू पुरुष आणि महिलांना एकनिष्ठ म्हटले जाऊ शकते. ते केवळ विश्‍वासूच नव्हे तर संकटाचा सामना करताना देखील एकनिष्ठ राहिले. त्यांच्याविषयी आपण अशा प्रकारे वाचतो: “त्यांनी विश्‍वासाच्या द्वारे . . . सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्‍ती नाहीशी केली; ते तरवारीच्या धारेपासून बचावले . . . आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्‍यांचा आणि बंधने व कैद ह्‍यांचाहि अनुभव आला; त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते.”—इब्रीयांस ११:३३-३७.

१६. प्रेषित पौलाने एकनिष्ठेचे कोणते उदाहरण पुरवले?

१६ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने प्रेषित पौलाचे सुद्धा ठसठशीत उदाहरण देतात. थेस्सलनीकाकरांना त्याच्या सेवाकार्याविषयी तो अगदी उचितपणे म्हणू शकला: “तुम्हा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांत आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्‍याविषयी तुम्ही साक्षी आहा, व देवहि आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१०) पौलाच्या एकनिष्ठेचा आणखी पुरावा २ करिंथकर ६:४, ५ वचनातील त्याच्या शब्दांवरून आपल्याला मिळतो, तेथे आपण असे वाचतो: “तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासांत दंग्याधोप्यात, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत.” या सर्व गोष्टी, प्रेषित पौल एकनिष्ठ असल्यामुळे त्याच्याजवळ स्वाभिमान असल्याचा पुरावा देतात.

आधुनिक काळातील एकनिष्ठा

१७. जे. एफ. रदरफोर्ड यांचा एकनिष्ठ राहण्याचा दृढनिश्‍चय होता हे त्यांच्या कोणत्या शब्दांनी दिसून आले?

१७ आधुनिक काळाकडे पाहिल्यास, आपल्या प्रस्तावनेत उल्लेखलेले उत्तम उदाहरण आपल्याजवळ आहे. ‘शांतीच्या राजकुमाराच्या’ आधिपत्याखाली जगव्याप्त सुरक्षितता (इंग्रजी) या पुस्तकाच्या १४६ पृष्ठावरील, “कारागृहाच्या काळात एकनिष्ठा” या पोटमथळ्याखाली काय लिहिले आहे त्याची नोंद घ्या. तेथे असे म्हटले आहे: “कारागृहाच्या काळात यहोवाच्या संघटनेशी एकनिष्ठा प्रकट करताना वॉच टावर संस्थेचे अध्यक्ष, जोसफ. एफ. रदरफोर्ड यांनी डिसेंबर २५, १९१८ रोजी पुढील प्रमाणे लिहिले: ‘बॅबिलोनशी हातमिळवणी करण्यास नकार दिल्यामुळे व त्याऐवजी विश्‍वासूपणे माझ्या प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी तुरुंगात आहे, व याच्याबद्दल मी आभारी आहे. . . . श्‍वापदासोबत हातमिळवणी किंवा त्याच्या समोर नमते घेऊन तुरुंगातून मुक्‍त होऊन संपूर्ण जगाची शाबासकी मिळवण्यापेक्षा मला प्रभूची कृपापसंती मिळवण्यास आवडेल.’”b

१८, १९. आधुनिक काळात एकनिष्ठेची कोणती दर्जेदार उदाहरणे आपल्याजवळ आहेत?

१८ छळ सहन केलेल्या इतर अनेक ख्रिश्‍चनांच्या एकनिष्ठेची सर्वोत्कृष्ट उदाहरणे आपल्याकडे आहेत. अशा एकनिष्ठ व्यक्‍तींपैकी नात्सींच्या अमदानीतील जर्मन यहोवाचे साक्षीदार आहेत, ज्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात आलेल्या पर्पल ट्रायँग्ल्स या इंग्रजी भाषेतील व्हिडिओत वर्णन केले आहे. शिवाय मलावी मधील अनेक एकनिष्ठ आफ्रिकन यहोवाचे साक्षीदार देखील उल्लेखनीय आहेत. तेथे एका तुरुंग रक्षकाने असे म्हणून साक्षीदारांच्या एकनिष्ठेचा पुरावा दिला की: “ते कधीच हातमिळवणी करणार नाहीत. त्यांची संख्या नुसती वाढत जाते.”

१९ अलीकडच्या यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यांमधून ग्रीस, मोझांबिक आणि पोलंड सारख्या देशांमधील खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी प्रदर्शित केलेल्या एकनिष्ठेचा अहवाल वाचणारा कोणीही प्रभावीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यातील पुष्कळांनी यातनामय छळ सहन केला; तर इतरांची कत्तल करण्यात आली. १९९२ वार्षिकपुस्तक याच्या पृष्ठ १७७ वर इथियोपियातील नऊ ख्रिस्ती पुरुषांची चित्रे दिली आहेत ज्यांनी, त्यांची कत्तल होण्याइतपत एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड दिले. यहोवाचे साक्षीदार या नात्याने, एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उत्तेजन देणारी इतकी उत्तम उदाहरणे आहेत यासाठी आपण आनंदी नाहीत का?

२०. आपण एकनिष्ठ राहिल्यास काय परिणीत होईल?

२० एकनिष्ठेने मोहपाशांचा व दबावांचा प्रतिकार केल्याने आपण आपला स्वाभिमान वाढवतो. तेव्हा, एकनिष्ठेच्या वादविषयाच्या कोणाच्या बाजूने आपल्याला असावे असे वाटेल? एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड दिल्याने आपण यहोवा देवाच्या वादविषयाची बाजू घेतो व दियाबल सैतान नीच, अतिनिंद्य लबाड आहे हे शाबीत करतो! अशाप्रकारे आपण आपला सृष्टीकर्ता यहोवा देव याची कृपापसंती आणि आनंदी सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळवतो. (स्तोत्र ३७:२९; १४४:१५ब) एकनिष्ठेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे याविषयीची चर्चा पुढे करण्यात येईल.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेला दोन खंडांचा बायबल कोश.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ एकनिष्ठ होण्याने आव्हान का मांडले जाते?

◻ “एकनिष्ठा” हा शब्द असाधारण आहे असे का म्हटले जाऊ शकते?

◻ मानव अपरिपूर्ण असूनसुद्धा एकनिष्ठ राहिलेल्यांची कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे आपल्याजवळ आहेत?

◻ आपल्याकडे एकनिष्ठेची आधुनिक दिवसातील कोणती उत्तम उदाहरणे आहेत?

[११ पानांवरील चित्रं]

चार्ल्स टेझ रस्सेल

[१२ पानांवरील चित्रं]

येशू ख्रिस्त खरोखरच यहोवाचा ‘एकनिष्ठ पुरुष’ होता

[१३ पानांवरील चित्रं]

ईयोब अपरिपूर्ण असूनसुद्धा यहोवाशी एकनिष्ठ राहिला

[१४ पानांवरील चित्रं]

पौलाने यहोवाशी एकनिष्ठ राहून उत्तम उदाहरण मांडले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा