प्रकाश व प्रेम यात चालत राहा
योहानाच्या पहिल्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये
यहोवा हा प्रकाश व प्रेमाचा उगम आहे. आध्यात्मिक प्रकाशासाठी आपण देवाकडे पाहिले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ४३:३) शिवाय प्रेम हे देवाच्या पवित्र आत्म्याच्या फलप्राप्तीपैकीचे एक आहे.—गलतीकर ५:२२, २३.
प्रेषित योहानाच्या पहिल्या प्रेरित पत्रात प्रकाश, प्रेम व इतर गोष्टीची चर्चा करण्यात आली आहे. हे पत्र इ. स. ९८ च्या सुमाराला इफिस किंवा त्याच्या जवळपास लिहिण्यात आले. हे पत्र लिहिण्याचे प्रमुख कारण म्हणजे ख्रिश्चनांना धर्मत्यागापासून वाचवावे आणि त्यांना प्रकाशाच्या मार्गात जात राहण्याची मदत द्यावी. सध्याही आम्ही प्रेम, विश्वास व सत्याविषयीची सचोटी याबद्दलच्या आव्हानांना तोंड देऊन असल्यामुळे या पत्राचा केलेला विचारविनिमय आम्हाला निश्चितच लाभदायक ठरेल.
‘प्रकाशात चालणे’
विश्वासू ख्रिश्चनांनी आध्यात्मिक प्रकाशात चालत राहिले पाहिजे असे योहानाने स्पष्ट केले. (१:१–२:२९) त्याने म्हटलेः “देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार [कसल्याही वाईट, अनैतिक, असत्य, वा अपवित्र गोष्टी] नाही.” आत्म्याने अभिषिक्त असणारे ख्रिश्चन ‘प्रकाशात चालत’ असल्यामुळे त्यांची देव, ख्रिस्त, व एकमेकांसोबत “सहभागिता” आहे. त्यांची येशूच्या रक्ताद्वारे पापापासून शुद्धी करण्यात आली आहे.
आम्ही स्वर्गीय आशा असणारे अभिषिक्त ख्रिश्चन असोत की, आमची आशा या पृथ्वीवर अनंतकाल जीवन मिळविण्याची असो, आपण जगावर नव्हे तर आमच्या बांधवांवर प्रीती करीत राहिलो तर आम्ही येशूच्या यज्ञार्पणापासून लाभ मिळवीत राहू. तसेच आम्ही धर्मत्यागी, “ख्रिस्तविरोधी,” म्हणजे पिता व पुत्र या दोहोंना नाकारणाऱ्या लोकांचा प्रभाव स्वतःवर पडू न देण्याची दक्षता बाळगली पाहिजे. याशिवाय, आम्ही कधीही हे विसरू नये की, जे सत्याला बिलगून राहतात व धार्मिकता आचरतात अशांनाच सार्वकालिक जीवन मिळेल.
देवाची मुले प्रीती दाखवतात
योहान पुढे देवाच्या मुलांची ओळख करून देतो. (३:१–४:२१) एकतर ते धार्मिकता आचरतात. तसेच, देवाचा पुत्र ‘येशू ख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवावा, आणि एकमेकांवर प्रीती करावी’ ही देवाची आज्ञा ते पाळतात.
“देवाविषयीचे ज्ञान” असणाऱ्या माणसाला यहोवाचे उद्देश व त्याची प्रीती कशी व्यक्त केली जाते ते समजते. यामुळे त्या व्यक्तीला प्रीती प्रदर्शित करण्याची मदत मिळते. खरे म्हणजे, “जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.” देवाने “तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले” तेव्हा ईश्वरी प्रीती प्रदर्शित झाली. जर यहोवाने येथपर्यंत आपली प्रीती दाखवली आहे तर मग, आम्ही देखील एकमेकांवर प्रीती दाखवली पाहिजे. होय, देवावर प्रीती असल्याचा जो दावा करीत असतो त्याने आपल्या आध्यात्मिक बांधवांवर देखील प्रेम करण्यास हवे.
‘जगावर जय मिळविणारा’ विश्वास
देवाच्या मुलांना त्याच्या आज्ञा पाळण्याचे प्रोत्साहन प्रीतीमुळे मिळत राहते, पण ते आपल्या विश्वासामुळेच ‘जगावर जय मिळवू’ शकतात. (५:१-२१) देव, त्याचे वचन व त्याचा पुत्र यावरील आमचा विश्वास आम्हाला जगाची चुकीची विचारशैली, चुकीचे मार्ग यांचा धिक्कार करायला लावून आणि यहोवाच्या आज्ञांचे पालन करावयास लावून ‘जगावर जय मिळवण्यास’ आम्हाला समर्थ करतो. ‘जगावर जय मिळविणाऱ्यांना’ देवाने सार्वकालिक जीवनाची आशा दिलेली आहे; तो त्याच्या इच्छेनुरुप असणाऱ्या त्यांच्या प्रार्थना ऐकतो. “देवापासून जन्मलेला” पाप आचरीत नसल्यामुळे सैतानाला अशा माणसावर आपली पकड धरता येत नाही. तथापि, अभिषिक्त जन तसेच पृथ्वीवर जिवंत राहण्याची आशा धरणाऱ्या यहोवाच्या सेवकांनी ‘सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे’ हे ध्यानात ठेवले पाहिजे.
[३० पानावरील चौकट]
पापांचे प्रायश्चित्त: येशू हा “आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच [अभिषिक्त अनुयायी] पापांबद्दल नव्हे, तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.” (१ योहान २:२) त्याचा मृत्यु हा प्रायश्चित्त (ग्रीक: हि·लॅ·स्मोसʹ, “संतुष्ट करण्याचे साधन,” “भरपाई” सूचित करणारा) होते, पण हे देवाच्या अंतःकरणास झालेल्या पीडेस हलके बनवणारे या अर्थाचे नव्हते. उलटपक्षी, या येशूच्या यज्ञार्पणाने परिपूर्ण ईश्वरी न्यायाची संतुष्टता किंवा समाधान करण्यात आले. ते कसे? कारण त्यामुळे पापांची क्षमा मिळण्याचा नीतीमान व न्यायी आधार दिला गेला की, ज्याद्वारे, “येशूवर विश्वास ठेवणाऱ्या [वारशाने पापी असणाऱ्या] माणसाला नीतीमान” ठरवताना देवाने नीतीमान असल्याचे दिसून यावे. (रोमकर ३:२३-२६; ५:१२) मानवाच्या पापास्तव पूर्ण समाधान पुरविण्याचा आधार देण्याद्वारे येशूचे बलिदान एक प्रायश्चित्त ठरले, किंवा मानवाला यहोवाबरोबरचे योग्य नाते मिळवता व जतन करता यावे यासाठी कृपायुक्त ठरले. (इफिसकर १:७; इब्रीयांस २:१७) यासाठी आम्ही सर्वांनी केवढे कृतज्ञ राहिले पाहिजे!