सत्यातील सहकारी या नात्याने चालत राहा
योहानाचे दुसरे व तिसरे पत्र यातील ठळक वैशिष्ट्ये
सत्याचे ज्ञान हे यहोवाच्या उपासकांना ओळखण्याचे चिन्ह आहे. (योहान ८:३१, ३२; १७:१७) तारणासाठी ईश्वरी सत्यामध्ये चालत राहणे जरुरीचे आहे. शिवाय देवाच्या सेवकांनी सत्यातील सहकारी असले पाहिजे.
प्रेषित योहानाचे दुसरे व तिसरे प्रेरित पत्र “सत्यात चालत” राहण्याविषयी बोलते. (२ योहान ४; ३ योहान ३, ४) तिसरे पत्र “सत्यामध्ये . . . सहकारी” होण्याविषयीचे उत्तेजन देते. (३ योहान ५-८) ही दोन्ही पत्रे इ. स. ९८ च्या सुमारास इफिसमध्ये किंवा जवळपास लिहिण्यात आली असावीत. पण, त्यात जे म्हटले आहे त्याचा आज यहोवाच्या लोकांसाठी लाभ घडू शकतो.
दुसरे योहान सत्यावर भर देते
दुसरे योहान प्रथम सत्य व प्रेम यावर जोर देते व “ख्रिस्तविरोधी”बद्दल इशारा देते. (वचने १-७) हे पत्र “निवडलेली बाई,” कदाचित विशिष्ट व्यक्तीला उल्लेखून लिहिले आहे. पण तेच, जर ते मंडळीला लिहिले असावे तर तिची “मुले,” देवाने स्वर्गीय जीवनासाठी “निवडलेले,” आत्म्याने जन्मलेले ख्रिस्ती ठरतात. (रोमकर ८:१६, १७; फिलिप्पैकर ३:१२-१४) काही जण “सत्यात चालत” आहेत व त्याद्वारे ते धर्मत्याग धिक्कारीत आहेत हे जाणून योहानाला आनंद वाटला. तरीपण, यांनी, येशू शरीराने आला हे अमान्य करणाऱ्या “ख्रिस्तविरोधी” लोकांपासून जागृत रहायचे होते. आज, यहोवाचे साक्षीदार धर्मत्यागी लोकांविरुद्धचा हा इशारा पाळून चालत आहेत.
पुढे योहानाने अशा धर्मत्याग्यांना कसे वागवावे त्याची माहिती दिली व तो आपल्या व्यक्तीगत शुभेच्छा कळवून पत्र संपवतो. (वचन ८-१३) प्रचाराच्या माध्यमाने परिश्रम करून त्याने व इतरांनी इतरांचे परिवर्तन करण्याची फलप्राप्ती मिळविली होती. अशांनाच हे पत्र पाठविण्यात आले. स्वतः आध्यात्मिकरित्या “खबरदारी” घेतल्यामुळे ते “पूर्ण प्रतिफळ” मिळवू शकणार होते, जे विश्वासू अभिषिक्त जनांसाठी स्वर्गीय “मुकुट” होता. (२ तीमथ्य ४:७, ८) त्यांच्याकडे येणारा कोणीही जर ‘ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून राहात नाही’ तर अशाला त्यांनी ‘घरात घेऊ नये, त्याचे क्षेमकुशल विचारू नये,’ म्हणजे त्याच्या “दुष्कर्मांचा” भागीदार होण्याचे टाळता येईल. आपण स्वतः येऊन समविश्वासू बांधवांना समक्ष बोलू ही आशा व्यक्त करून तसेच शुभेच्छा कळवून योहान आपले पत्र संपवतो.
तिसरे योहान सहकार्यावर जोर देते
योहानाचे तिसरे पत्र गायस ह्याला लिहिण्यात आले व त्यात सुरवातीला त्याने समविश्वासू बांधवांसाठी जे केले त्याविषयी दखल घेण्यात आली आहे. (वचने १-८) गायस ख्रिस्ती शिकवणींची पूर्ण तत्त्वप्रणाली आचरून “सत्यात चालत” होता. शिवाय भेट देणाऱ्या बांधवांचे साहाय्य करून तो ‘विश्वासूपणाचे कार्य’ करीत होता. योहानाने लिहिलेः “आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.” आज यहोवाचे साक्षीदार प्रवासी देखरेख्यांचा अशाच प्रकारचा पाहुणचार करतात.
दियत्रफेस याची वाईट वागणूक व देमेत्रिय याची चांगली वागणूक याजमधील फरक स्पष्ट केल्यावर योहान आपले पत्र संपवतो. (वचने ९-१४) स्वतः अग्रगण्य होणाऱ्या दियत्रफेस याने योहानाविषयी कसलाही आदर दाखविला नाही; तसेच जे बांधवांचा पाहुणचार करीत असत अशा लोकांना त्याने मंडळीबाहेर घालविले. परंतु देमेत्रियच्या चांगल्या उदाहरणाचा उल्लेख केला गेला. योहान गायसला लवकर भेटण्याची आशा करून आपली शुभेच्छा कळवून आणि गायसने शांतीचा अनुभव घ्यावा हीच आशा व्यक्त करून आपले पत्र संपवतो.
[३१ पानावरील चौकट]
कागद, शाई व लेखणी: योहानाने “निवडलेली बाई” व तिची “मुले” यांना “कागद व शाई” यांनी पुष्कळ गोष्टी लिहिण्यापेक्षा समक्ष येऊन भेटण्याची इच्छा दर्शविली. गायसला देखील “शाईने व लेखणीने” अधिक लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटण्याची त्याने इच्छा दाखविली. (२ योहान १, १२; ३ योहान १, १३, १४) ज्याचे “लेखणी” असे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक शब्द (कʹल·मोस) एका छडीला किंवा बोरुला सूचित करतो व त्यामुळे त्याला “लिहिण्याचा बोरु” असे म्हणता येऊ शकत होते. ग्रीक व रोमी लोक पुढे टोक असलेली व मागे पिसे असणारी बोरुची लेखणी वापरीत असत. शाईसाठी असलेला मेʹलान हा शब्द मेʹलास या पुर्ल्लिगी विशेषणाचे नपुंसकलिंगी रुप आहे, ज्याचा अर्थ “काळा” असा होतो. प्राचीन काळातील शाई ही कोळशाच्या रंगाइतकी काळी असे, व ती तेल किंवा लाकूड यांच्या जळणामुळे तयार होणारे काजळ यापासून किंवा भाजीपाला व जनावरे यांच्या जळणामुळे मिळणाऱ्या बिलोरी कोळशापासून तयारी करीत. शाई सहसा सुक्या चिपा वा वड्या या रूपात साठविली जाई. लिखाण करणारा ही वडी ओलसर करी व तयार झालेला द्रव ब्रश किंवा बोरूने लेखणीवर लावीत. त्या काळचा कागद हा लव्हाळी वनस्पतिपासून मिळणाऱ्या पट्ट्यांपासून तयार करण्यात आलेल्या तावाच्या रुपात होता. अशा या कागदाचा वापर आरंभीच्या ख्रिश्चनांनी पत्र, गुंडाळ्या आणि मृत्युपत्रे लिहिण्यासाठी केला.