वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १२/१ पृ. २१-२४
  • बेथलहेम व नाताळ याबद्दलचे सत्य काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बेथलहेम व नाताळ याबद्दलचे सत्य काय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याचा जन्म कधी झाला?
  • कोणत्या जागी
  • नुसती परंपरा
  • येशूचा जन्म—कोठे आणि केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • येशूचा जन्म—सत्य कथा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • येशूचा जन्म—कोठे व केव्हा?
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • येशूच्या जन्माच्या अहवालातून धडे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १२/१ पृ. २१-२४

बेथलहेम व नाताळ याबद्दलचे सत्य काय आहे?

“बेथलहेम . . . अटळ प्रेमाचा पुरावा आहे, ते आम्हाला नम्रतेचा धडा देते.”—मारिया तेरेसा पेट्रोझी, बेथलहेम या पुस्तकाची संपादिका.

तुम्हाला बेथलहेम असेच वाटते का? कदाचित वाटेलही, कारण जगातील लाखो, शांतीप्रिय लोक बेथलहेमाकडे खासपणे नाताळाच्या ऋतुत याच भाविक दृष्टीने बघतात. त्यांना हे ठाऊक आहे की, मध्यपूर्वेतील हे लहानसे गाव “शांतीचा राजपुत्र,” येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान आहे. ख्रिस्तीधर्मजगताच्या पवित्र स्थानातील या एकास यात्रेकरुंनी आदरभाव दाखविण्यासाठी कित्येक वर्षांपासून भेटी दिलेल्या आहेत. या स्थानाला ग्रोटो ऑफ द नेटिव्हिटी किंवा येशूच्या जन्माची सांप्रदायिक गुहा असे संबोधितात. ती एक भव्य व मोठी वास्तु असून तिला चर्च ऑफ नेटिव्हिटी असे म्हणतात.—यशया ९:६; मत्तय २:१.

येशूच्या जन्मस्थानाच्या परिस्थितीबद्दलचे सत्य काय आहे? तो केव्हा जन्मला? सध्या ज्याला नेटिव्हिटी ग्रोटो असे म्हणतात, तीच ती जागा होती का? आणि तुम्ही किंवा इतर कोणीही त्याच्या जन्मस्थानाबद्दल आदरभाव व्यक्‍त करावा का?

“बेथलहेमच्या गूढाबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनात येणाऱ्‍या प्रश्‍नांना व शंकाना रोखता येत नाही.”—बेथलहेम, लेखिका, मारिया तेरेसा पेट्रोझी.

तुम्ही विचाराल, ‘प्रश्‍न व शंका का?’ कारण काही झाले तरी नाताळबद्दलचे वेगवेगळे विश्‍वास व त्या विश्‍वासांशी संबंधित स्थळे वस्तुस्थितीवर आधारीत आहेत. नाहीत का?

त्याचा जन्म कधी झाला?

येशूच्या जन्माच्या तारखेबद्दल मारिया तेरेसा पेट्रोझी विचारतातः “उद्धारकाचा जन्म नक्की कधी झाला? केवळ वर्षच नव्हे तर तो महिना, दिवस व घटकेबद्दलही आपल्याला माहिती हवी आहे. त्याबाबतीत आपल्याला गणितासारखी अचूकता लाभत नाही.” याला द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ दुजोरा देतोः “येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख केवळ अंदाजाने ठरवता येते.” ख्रिस्ताच्या जन्माच्या मानलेल्या तारखेबद्दल तोच ग्रंथ पुढे म्हणतोः “डिसेंबर २५ ही तारीख ख्रिस्ताच्या जन्माशी जुळत नाही; तर दक्षिणायनाच्या वेळेचा रोमी लोकांचा सूर्याचा सण, नातालिस सोलिस इन्व्हिक्टी या रोमी लोकांच्या अजिंक्य सूर्याच्या जन्माच्या मेजवानीशी जुळतो.”

या कारणास्तव, तुम्ही विचारालः ‘येशू २५ डिसेंबरला जन्मला नव्हता तर तो कधी जन्मला?’ मत्तयाच्या २६ व २७ व्या अध्यायावरुन आपल्याला कळते की, इ. स. ३३ च्या एप्रिल १ रोजी सुरु होणाऱ्‍या वल्हांडण सणाच्या वेळी येशू मरण पावला. लूक ३:२१-२३ आपल्याला सांगते की, येशूने आपले सेवाकार्य आरंभिले तेव्हा त्याचे वय ३०च्या जवळपास होते. त्याचे पृथ्वीवरील सेवकपण साडे तीन वर्षे चालले; तेव्हा तो मृत्युसमयी जवळपास ३३१/२ वर्षांचा होता. आणखी सहा महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर १ला तो पूर्ण ३४ वर्षांचा झाला असता. येशूचा जन्म कधी झाला हे पाहण्यासाठी उलटे मोजू लागल्यास देखील डिसेंबर २५ किंवा जानेवारी ६ तारखेला आपण पोहोचत नाही, तर इ. स. पूर्वी २ च्या ऑक्टोबर १ला पोहोचतो.

डिसेंबरच्या महिन्यात बेथलहेम व त्याच्या परिसरातील प्रदेशात थंड हवामान, गोठवणारा पाऊस व कधी कधी बर्फ असते हेही लक्षात घेण्याजोगे आहे. अशा वेळी रात्री मेंढपाळ आपल्या कळपांसह बाहेर उघड्यावर बसल्याचे दिसून येत नाही. हे काही अलिकडील हवामान नाही. पवित्र शास्त्र सांगते की, नवव्या महिन्यात [किसलेव, जो नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांशी जुळतो] यहूदाचा राजा यहोयाकीम “हेमंतगृहात बसला होता व त्याच्यापुढे शेगडी पेटलेली होती.” (यिर्मया ३६:२२) उबदार राहण्यासाठी त्याला शेक घेण्याची गरज होती. याशिवाय एज्रा १०:९, १३ मध्ये आपल्याला स्पष्ट पुरावा सापडतो की, किसलेव महिन्यात “पावसाची झड” होती व यामुळे त्यांच्याने ‘बाहेर उभे राहता येत नव्हते.’ या सर्वांवरुन दिसून येते की, येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित असणाऱ्‍या घटनांचे पवित्र शास्त्रातील वर्णन, डिसेंबरमधील बेथलहेमाच्या हवामानाशी जुळणारे नाही.—लूक २:८-११.

कोणत्या जागी

एक लक्षाहून अधिक फ्रेंच सैनिकांचा बळी घेणाऱ्‍या ‘रक्‍तपाती झुंज’ म्हटलेल्या क्रिमियन युद्धाला (१८५३-५६) प्रेरणा देण्यात सहभागी झालेल्या स्थळाबद्दल योग्य दृष्टीकोण कोणता धरावा? ती विशिष्ट जागा खरोखरीच येशूचे जन्मस्थान आहे का?

मुळात, पवित्र शास्त्र येशूच्या जन्माच्या विशिष्ट स्थानाचा उल्लेख करीत नाही. मत्तय व लूक यांनी ही पुष्टी दिली की, येशूच्या जन्माने मीखा ५:२ मधील मशीही भविष्यवाद पूर्ण केला; जेथे असे म्हणण्यात आले की, जो “इस्राएलाचा शास्ता होईल, ज्याचा उद्‌भव प्राचीन काळापासून, अनादि काळापासून आहे,” तो बेथलहेमातून येईल. (मत्तय २:१, ५; लूक २:४) शुभवर्तमानाचे दोन्ही वृत्तांत, येशू बेथलहेमात जन्माला आला एवढ्याच जरुरीच्या गोष्टीचा उल्लेख करतात; आणि लूकने लिहिले आहे की, ते तान्हे मूल कपड्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवलेले होते.—लूक २:७.

शुभवर्तमानाच्या लेखकांनी अधिक तपशील का जोडला नाही? मारिया तेरेसा पेट्रोझी म्हणतातः “असा तपशील त्यांना निरर्थक वाटत असल्याने शुभवर्तमानकारांनी तो वगळला आहे हे उघड आहे.” एवढेच काय पण, स्वतः येशूला देखील त्याच्या जन्माचा तपशील विशेष महत्त्वाचा वाटला नसल्याचे स्पष्ट आहे. कारण त्याने आपली जन्म तारीख किंवा जन्माची विशिष्ट जागा यांच्याबद्दल बोलल्याचा एकही उल्लेख नाही. त्याचा जन्म बेथलहेममध्ये झाला असला तरी त्याने त्याला आपले मूळ गाव मानले नाही, तर गालील प्रांताचा उल्लेख ‘स्वदेश’ या अर्थाने केला जाई.—मार्क ६:१, ३, ४; मत्तय २:४, ५; १३:५४.

योहान ७:४०-४२ चे वाचन हे दाखविते की, सर्वसाधारण लोक येशूच्या जन्मस्थानाबद्दल अनभिज्ञ होते. तो गालीलात जन्मला होता अशी त्यांची समजूत होती. तेथे आपण वाचतोः “काहींनी म्हटलेः ‘ख्रिस्त गालीलातून येतो काय?’” योहान ७:४१ मध्ये नमूद केलेल्या गोष्टींच्या आधारे द चर्च ऑफ नेटिव्हिटी, बेथलहेम हे पुस्तक अशा निर्णयाला येतेः “तेथे वादविवाद जरी उत्पन्‍न झाले तरी त्यामुळे ख्रिस्त बेथलहेमात जन्मला नाही हे शाबीत होऊ शकले नाही. पण ते असे दाखवते की, त्याच्या अनेक सहकाऱ्‍यांना त्याची जाणीव नव्हती.”

येशूने आपल्या पृथ्वीवरील हयातीत त्याच्या जन्माबाबतच्या तपशीलाचा गवगवा केला नाही हे स्पष्टच आहे. त्याच्या जन्मस्थानाला महत्त्व देण्यात आले आहे. तर मग, येशूच्या ‘जन्माची गुहा’ म्हटलेल्या जागीच योसेफाने मरीयेला बाळंतपणासाठी आणले असा विश्‍वास ठेवण्यासाठी काय आधार आहे?

पेट्रोझी स्पष्टपणे कबूल करतातः “ही गुहा, बेथलहेमच्या परिसरात असलेल्या अनंत नैसर्गिक गुहांपैकी एक होती अथवा गोठा म्हणून तिचा उपयोग करण्यात येत होता अशी खात्रीलायक माहिती मिळणे शक्य नाही. पण ती गोठावजा गुहा आहे अशी २ऱ्‍या शतकाच्या सुरवातीपासून चालत आलेली परंपरागत समजूत आहे.”—तिरपे अक्षरवळण आम्ही घातले आहे.

नुसती परंपरा

बेथलहेमाच्या इतिहासाच्या इतर अनेक अभ्यासकांसह मारिया तेरेसा पेट्रोझी व आर. डब्ल्यू. हॅमिल्टन सूचित करतात की, इ. स. च्या दुसऱ्‍या शतकातील जस्टिन मार्टरने येशू एका गुहेत जन्मल्याचा दावा सर्वप्रथम केला होता. जस्टिन मार्टरच्या विधानाबद्दल, “हा ओघाने केलेला उल्लेख असून संत जस्टिनच्या मनात एखादी विशिष्ठ गुहा असावी व त्यातही तो [येशूच्या] ‘जन्माच्या गुहे’चा उल्लेख करीत होता असे समजणे म्हणजे एका शब्दाच्या या पुराव्यावर अनावश्‍यक भर देणे होईल.” अशा निर्णयाला हॅमिल्टन आले आहेत.

एका तळटीपेत हॅमिल्टन लिहितातः “जवळपास त्याचा काळात लिहिलेल्या बनावटी ‘याकोबाचे पुस्तक’ वा ‘प्रोटेवेंगलिझम’ मध्ये एका गुहेची माहिती आहे, परंतु ती बेथलहेमच्या वाटेवर अर्ध्या रस्त्यात असल्याचे वर्णन केले आहे. इतिहासाच्या दृष्टीने परंपरेचा एखाद्या विशिष्ट स्थळाशी संबंध जोडण्यात आला नव्हता व [येशूच्या] ‘जन्माच्या गुहे’शी तर नक्कीच नव्हता.

तिसऱ्‍या शतकातील धार्मिक लेखक ओरिजन व युसेबियस त्या काळी समजल्या जाणाऱ्‍या परंपरेचा संबंध एका विशिष्ट स्थळाशी लावतात. हॅमिल्टन प्रतिपादन करतातः “एकदा का ती कथा एका विशिष्ट गुहेशी जोडण्यात आली की त्यात बदल होणे संभाव्य नव्हते व इ. स. २०० नंतर लगेच लोकांना दाखवली गेलेली गुहा व आजची (येशूच्या) ‘जन्माची गुहा’ या एकच आहेत असा निष्कर्ष निर्धास्तपणे काढता येतो.”

वॉक्स अबाऊट द सिटी ॲण्ड एन्व्हीरॉन्स ऑफ जेरुसलेम (१८४२) या पुस्तकात डब्ल्यू. एच. बार्टलेट या गुहेबद्दल अनुमान काढतातः “हीच जागा आपल्या उद्धारकाचे जन्मस्थान असल्याबद्दलची परंपरा, शेजारच्याच एका लहानशा जागेत राहिलेल्या व मृत्यु पावलेल्या संत जेरोम याने उल्लेख करण्याइतकी पुरातन असली तरी ती संभाव्यतेशी मेळ खात नाही. कारण पॅलेस्टाईनमध्ये कधीकधी गुहा गोठ्यासारख्या वापरल्या जात असल्या तरी ही जास्त खोल असल्याने अशा कामासाठी सोयीची नाही. आणि त्याशिवाय बहुधा अशा जागांच्या परिणामकारकपणामुळे, पवित्र शास्त्रातील ठळक घटनांचा गुहांशी संबंध जोडण्याची भिक्षूंची प्रवृत्ती पाहता, ह्‍या जागेविरुद्ध अनुमान अगदी निर्णायक असावेसे दिसते.”

हाताशी असलेला ऐतिहासिक पुरावा व येशू किंवा त्याच्या शिष्यांनी त्याच्या जन्मस्थानाला काहीही महत्त्व दिले नाही या त्याहूनही महत्त्वाच्या पवित्र शास्त्रीय वस्तुस्थितीवरुन आपण काय अनुमान काढू शकू? इ. स. ३२६ मध्ये, कॉन्स्टंटाईन या सम्राटाची आई हेल्लेना हिने चर्च ऑफ नेटिव्हिटीची जागा नक्की केली; तेव्हा तिने, हॅमिल्टन यांनी म्हटलेल्या ‘जुन्या परंपरे’च्या आधारावर तसे केले हे उघड आहे. ऐतिहासिक वा पवित्र शास्त्राच्या पुराव्याच्या आधारावर ते केले नव्हते.

यामुळे पुढील अनुमान निघते की, येशूच्या जन्माचे स्थान अज्ञात आहे. तेव्हा (येशूच्या) ‘जन्माच्या गुहे’सारख्या जागी विश्‍वासू लोकांनी यात्रेला जावे व त्यांना पवित्र मानावे हे तर्काला धरुन आहे का? ख्रिश्‍चनांकडून जर खरोखरीच अशी अपेक्षा असती तर येशूने स्वतः त्याच्या शिष्यांना या बंधनाबद्दल माहिती दिली नसती का किंवा त्याने तशी इच्छा प्रकट केली नसती का? मानवजातीने वाचण्यासाठी ही गोष्ट देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, नमूद केली गेली नसती का? असे पुरावे पवित्र शास्त्रात नसल्याने येशूला कोणती गोष्ट स्मरणादाखल साजरी करण्याच्या योग्यतेची वाटली ते आपण विचारणे रास्त ठरेल.

आपण कितीही शोध केला तरी, येशूचा बलिदानपर मृत्यु हाच येशूच्या शिष्यांनी पिढ्यान्‌पिढ्या स्मरणादाखल साजरा करण्याचा एकमेव प्रसंग असल्याचे आपल्याला आढळून येईल. वसंतऋतुमध्ये आपल्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे शेवटले भोजन झाल्यावर लवकरच तो मृत्यु पावला. त्या भोजनप्रसंगी मोत्झोथसारखी बेखमीर भाकरी व लाल द्राक्षारस वापरुन, त्याच्या शिष्यांनी एक लाक्षणिक भोजन करण्याबद्दल त्याने मार्गदर्शन केले. इ. स. ३३ च्या एप्रिल १ रोजी प्रथम झालेल्या या साध्या समारंभाबद्दल त्याने आज्ञा केलीः “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९, २०.

येशूने स्वतः दिलेल्या पवित्र शास्त्रातील या आज्ञेला अनुसरुन यहोवाचे साक्षीदार जगभर दर वर्षी येशूच्या बलिदानपर मृत्युचा स्मरणोत्सव साजरा करतात. येरुशलेममध्ये एखाद्या विशेष स्थानी माडीवरील खोलीत ते हे ख्रिस्ती-संमेलन भरवत नाहीत. कारण येशूने तसे मुद्दाम सांगितले नव्हते. परंतु जगभर ते आपल्या राज्य सभागृहात व त्यांच्या विभागातील इतर सोयीच्या सभास्थानात जमतात. या पुढचा समारंभ एप्रिल १७, १९९२ रोजी सूर्यास्तानंतर होईल. तुम्हाला सर्वात जवळ असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात त्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे.

येशूच्या आज्ञेला अनुसरुन या महत्त्वाच्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी यरुशलेम वा बेथलहेमला जाण्याची तुम्हाला गरज नाही. येशूने व त्याच्या शिष्यांनीही ख्रिस्ती भक्‍तीची केंद्रे या दृष्टीने स्थळांना महत्त्व दिले नाही. उलट, यरुशलेमाच्या उत्तरेला गेरिज्जीम या शोमरोन मधील पहाडावर भक्‍तीचे केंद्र मानणाऱ्‍या एका शोमरोनी स्त्रीला येशूने सांगितलेः “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्‍या डोंगरावर व यरुशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे; हे माझे खरे मान. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.”—योहान ४:२१, २३.

आत्म्याने व खरेपणाने पित्याची भक्‍ती करणारे भक्‍ती करण्यासाठी बेथलहेमसारख्या विशेष स्थळांवर वा मूर्त्यांसारख्या वस्तूंवर अवलंबून राहात नाही. प्रेषित पौल म्हणालाः “आम्ही शरीरात वास करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे आहो. आम्ही विश्‍वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.”—२ करिंथकर ५:६, ७.

तथापि, तुमच्या मनात विचार येईल की, देवाला स्वीकारार्ह असेल अशा रितीने त्याची भक्‍ती कशी करता येईल? याकरता, पुढल्या वेळी यहोवाचा कोणी साक्षीदार तुमच्या दारी आला तर कृपया तुम्ही त्याला याबाबत विचारणा करा.

[२२ पानांवरील चित्रं]

हिवाळ्यात बेथलहेमाजवळील जमिनीवर बर्फ पडलेले असते. तर अशा परिस्थितीत मेंढपाळ आपली मेंढरे सोबत घेऊन तेथे विश्रांती घेऊ शकतील का?

[२३ पानांवरील चित्रं]

बेथलहेममधील चर्च ऑफ द नेटिव्हिटी व त्यामधील भूमिगत गुहा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा