शुभवर्तमानाचा वॉशिंग्टन कोडेक्स
डिसेंबर १९०६ मध्ये चार्ल्स एल. फ्रिअर या श्रीमंत अमेरिकन उद्योगपती व कलात्मक वस्तुंचा संग्रह करणाऱ्या गृहस्थांनी मिसरातील गिझा येथील अली या अरबाकडून काही जुनी हस्तलिखिते विकत घेतली. अलीने म्हटले की, त्यांचा उगम सोहग येथील व्हाईट मोनॅस्ट्रीमधून आहे. पण ही हस्तलिखिते नाईल नदीच्या मुखाजवळील त्रिभुजप्रदेशातील गिझा येथील तिसऱ्या मनोऱ्याजवळ मोनॅस्ट्री ऑफ द वाईनड्रेसरच्या अवशेषात आढळली असण्याची शक्यता अधिक आहे.
फ्रिअरना तीन हस्तलिखिते व “काळपट आणि वरुन चिवट व ठिसूळ आवरणाच्या चर्मपत्रांचा एक गठ्ठा” देण्यात आला. या चर्मपत्रांचा आकार ६.५ इंच लांब ४.५ इंच रुंद व १.५ इंच जाड इतका होता व तो हस्तलिखितांसोबत देण्यात आला; असे वाटून की, त्या दोघांचा परस्परांशी संबंध आहे व त्यासाठी वेगळे मूल्य आकारण्यात आले नाही. तुकडेतुकडे झालेली व साकळलेली पाने वेगळी करणे मोठे त्रासदायक तसेच नाजूक काम होते, पण शेवटी ८४ पाने वेगळे होऊ शकली. ती सर्व इ. स. च्या पाच किंवा सहाव्या शतकातील पौलाच्या पत्रांचा संग्रह अशी होती.
राहिलेल्या तीन हस्तलिखितांपैकी एक अनुवाद व यहोशवा ही पुस्तके होती. आणखी एक स्तोत्राचे पुस्तक होते, जे ग्रीक सेप्ट्युजंट भाषांतर होते. तथापि, तिसरे व सर्वात महत्त्वाचे असे हस्तलिखित चार शुभवर्तमानांचे होते.
हे आत्ताचे हस्तलिखित १८७ पानांचे सुदंर चर्मपत्र होते व ते मेंढ्यांच्या कातड्याचे होते आणि ते ग्रीकमध्ये मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले होते. यात विरामचिन्हे कमी होती, पण दोन संज्ञामध्ये छोट्या जागा टाकण्यात आल्या होत्या. हस्तलिखितांच्या पानांची कोपरे अगदीच कुजलेली होती, पण बहुतेक लिखाण सुरक्षित होते. ते नंतर वॉशिंग्टन मधील फ्रिअर गॅलरी ऑफ आर्ट ऑफ द स्मिथसोनियन इन्स्टिट्युट येथे देण्यात आले. याला शुभवर्तमानाचा वॉशिंग्टन कोडेक्स असे म्हणण्यात आले आणि “डब्ल्यु” हे ओळखचिन्ह देण्यात आले.
या चर्मपत्राची तारीख चवथ्या शतकाचा उत्तरार्ध किंवा पाचव्या शतकाचा आरंभ अशी ठरविण्यात आल्यामुळे ते सिनियाटिक, व्हॅटिकन आणि अलेक्झांड्रियन या तीन महत्त्वाच्या हस्तलिखितामध्ये फारसे मागे नाही. ही शुभवर्तमाने (दोन पाने वगळता पूर्ण असणारी) मत्तय, योहान, लूक व मार्क या तथाकथित पाश्चिमात्य अनुक्रमणात लावलेली आहेत.
हस्तलिखिताचे वाचन मिश्र वचनांचा प्रकार दाखविते, यात प्रत्येक प्रकार मोठ्या व सलग विभागात दाखवण्यात आला आहे. असे दिसते की हे लिखाण बचावून राहिलेल्या विविध हस्तलिखितातील तुकड्यातून केलेले आहे व प्रत्येकात वचनाचा वेगळा अक्षरप्रकार दिसतो. प्राध्यापक एच. ए. सॅडर्स यांचे मत आहे की, हे लिखाण इ. स. ३०३ चे असावे जेव्हा डायक्लेटिन या सम्राटाने ख्रिश्चनांविरुद्ध एकाएकी छळ उभा केला. त्याच्या फर्मानाने शास्त्रवचनांच्या सर्व प्रती जाळण्याची आज्ञा झाली होती. ऐतिहासिक अहवालाद्वारे आपल्याला कळते की, त्या काळी काही हस्तलिखिते लपवून ठेवली गेली. तेव्हा काही दशकांनी कोणा अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या हस्तलिखिताच्या अवशेष भागातील उरलेल्या माहितीची नक्कल केली असावी व त्याकडून वॉशिंग्टन कोडेक्सचे लिखाण निर्मिण्यात आले. नंतर यातील योहानाचा पहिला भाग (योहान १:१ ते ५:११) काही काळासाठी कोठे तरी गहाळ झाला होता व त्याचे इ. स. च्या सातव्या शतकात पुन्हा लिखाण करावे लागले.
या लिखाणात काही लक्षवेधी फरक तसेच असामान्य पण ग्राह्य नसलेले मार्कच्या १६ व्या अध्यायात अधिक लिखाण आढळते, जे कदाचित सामासिक संदर्भातून उगम पावलेले असावे. या हस्तलिखिताचे खास महत्त्व जुन्या लॅटिन व सिरियाक आवृत्तींसोबत आढळते. चर्मपत्रावर टाकण्यात आलेले चरबीयुक्त मेणाचे थर दाखवितात की त्याचा चांगला वापर करण्यात येत होता.
छळ, विरोध व काळाची छाप यातही पवित्र शास्त्र विविध हस्तलिखितांद्वारे अगदी आश्चर्यकारकपणे आज आम्हासाठी टिकून राहिले आहे. खरेच, “यहोवाचे वचन सर्वकाळ राहते.”—१ पेत्र १:२५; यशया ४०:८.
[२५ पानावरील चौकट]
काय “जरुरीचे” आहे?
शुभवर्तमानाच्या या “डब्ल्यु” कोडेक्सने, येशूचा प्रिय मित्र लाजर याची बहीण मार्था हिला जे निवेदन सादर केले ते मांडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. येशूने या कुटुंबाला भेट दिली तेव्हा मार्थेला वाटले की येशूसाठी चांगले पक्वान्न करावे. पण येशूने, त्याच्या पायाशी बसून त्याचे ऐकणाऱ्या तिच्या बहिणीचे उदाहरण अनुसरावे अशी साधेपणात शिफारस केली. त्याने म्हटलेः “थोड्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिजपासून घेतला जाणार नाही.”—लूक १०:४२.
वेस्टकॉट व हॉर्ट यांनी १८८१ मध्ये तयार केलेल्या ग्रीक वचनापासून या शब्दांचा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनसाठी आधार मिळाला. या पवित्र शास्त्राच्या १९८४ च्या रेफरन्स आवृत्तीमध्ये दाखविलेल्या तळटीपेनुसार हे वाचन सिनायटिक (א) आणि व्हॅटिकन (B) हस्तलिखितानुसार आहे व ही दोन्ही हस्तलिखिते एकाच प्रकारची आहेत. परंतु अलेक्झांड्रियन (A) हस्तलिखाणात असे वाचण्यात येतेः “तथापि, एकाच गोष्टीची जरुरी आहे; मरीयेने . . . ” तळटीप दर्शविते त्याप्रमाणे कोडेक्स “डब्ल्यु” तसेच तिसऱ्या शतकातील चेस्टर बेट्टी पपायरस (P45) आणि बोडमर पपायरस (P75) या नंतरच्या प्रकाराशी सहमती दर्शवितात. पण ही सर्व हस्तलिखिते, वेस्टकॉट व हॉर्ट यांनी १८८१ मध्ये आपले लिखाण प्रसिद्ध केल्यानंतर बऱ्याच काळाने उजेडात आली. त्यामुळे या पर्यायी वाचनाचा विचार करण्यास त्यांना वाव मिळू शकला नाही. आपण कोणत्याही आवृत्तीला आज मान्यता देत असलो तरी येशूने आपल्या निवेदनाद्वारे आपल्या जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्रथमस्थान दिले पाहिजे हे आम्हाला सहज लक्षात येऊ शकेल. हा सल्ला आज आम्ही अनुसरण्यास हवा.