“देवाचे वचन सजीव व सतेज आहे”
१, २. (अ) जे ख्रिस्ती बनतात त्यांच्या जीवनात कशामुळे बदल होतो? (ब) पवित्र शास्त्र एखाद्यावर केवढा खोल परिणाम करू शकते?
पहिल्या शतकाच्या मध्याला प्रेषित पौलाने रोम मंडळीतील ख्रिश्चनांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्याने खऱ्या ख्रिश्चनांनी कोणते बदल करावेत त्याविषयीच्या गरजा ठळकपणे मांडल्या. त्याने म्हटले: “या युगाबरोबर समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की, देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे.” (रोमकर १२:२) पण येशूच्या अनुयायांना कोणती गोष्टी बदलविते, किंवा त्यांच्या विचारसरणीत बदल घडवून आणते. ती, प्रामुख्यत्वे, देवाचे वचन, पवित्र शास्त्र याचे सामर्थ्य आहे.
२ पवित्र शास्त्र आम्हावर किती खोलवर परिणाम करते ते दाखविताना पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांस भेदून आरपार जाणारे आणि अंतःकरणातील भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.” (इब्रीयांस ४:१२) खरेच, पवित्र शास्त्राठायी लोकांमध्ये इतका बदल घडवून आणण्याचे जे असाधारण सामर्थ्य आहे, त्यामुळेच ते मानवाच्या वचनापेक्षा अति श्रेष्ठ उगमाकडून असल्याचा प्रभावशाली पुरावा मिळतो.
३, ४. ख्रिश्चनांचे व्यक्तीमत्व केवढ्या प्रमाणात बदलण्यात आले?
३ रोमकरांस पत्र १२:२ मध्ये आलेल्या “रूपांतर होऊ द्या” या शब्दप्रयोगाचा अनुवाद ग्रीक भाषेतील मेटामोरफोओ पासून आहे. यामध्ये संपूर्ण बदल, जसा की सुरवंटाचे फुलपाखरूत जे रुपांतर घडते त्याला सूचित आहे. हा बदल इतका पूर्ण रुपाचा असतो की, पवित्र शास्त्र त्याला व्यक्तीमत्वाचा बदल असे संबोधिते. दुसऱ्या एका पवित्र शास्त्रवचनात आम्ही वाचतो: “तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसुद्धा काढून टा[का], आणि जो नवा मनुष्य, त्यास अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरुपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्या.”—कलस्सैकर ३:९, १०.
४ पहिल्या शतकात हा व्यक्तीमत्वामध्ये जो बदल घडविण्यात आला त्याविषयी करिंथच्या मंडळीला लिहिताना पौलाने त्याचे प्रमाण दिले आहे. तो म्हणतो: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, चैनबाज, पुमैथुनकारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे यांस देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही . . . धुतलेले, पवित्र केलेले असे झाला आहे.” (१ करिंथकर ६:९-११) होय, अनैतिक, भांडखोर, चोर व मद्यपी या सर्वांचा बदल होऊन ते उदाहरणशील ख्रिस्ती बनले.
व्यक्तीमत्वातील आजचे बदल
५, ६. पवित्र शास्त्राच्या सामर्थ्याकरवी एका तरुण युवकाचे व्यक्तीमत्व कसे संपूर्णपणे बदलले गेले?
५ आजही व्यक्तीमत्वातील असेच बदल घडत आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील एक मुलगा वयाच्या नवव्या वर्षापासून अनाथ बनला होता. त्याची वाढ पालकांच्या मार्गदर्शनाविना झाली आणि त्यामुळे व्यक्तीमत्वाच्या गंभीर समस्या त्याला वाढल्या. तो म्हणतो: “मी १८ वर्षांचा झालो तेव्हा मादक द्रव्यांच्या व्यसनाधीन झालो आणि आपली ही सवय राखावी यासाठी चोऱ्या करू लागलो; त्यामुळे बऱ्याच वेळा तुरुंगात गेलो.” तथापि, त्याची आत्या यहोवाची साक्षीदार होती, तिने त्याला हळूवारपणे मदत दिली.
६ हा तरुण पुढे म्हणतो: “माझ्या आत्याने मजसोबत पवित्रशास्त्राचा अभ्यास आरंभिला, आणि सात महिन्यानंतर मला माझी मादक द्रव्याची सवय सोडता आली.” त्याने आपला पूर्वीचा मित्रपरिवार सोडून दिला आणि यहोवाच्या साक्षीदारांत नवे मित्र संपादले. तो आणखी म्हणतो: “हे नवे मित्र, त्याचप्रमाणे माझा पवित्र शास्त्राचा नियमितरित्या चालू असलेला अभ्यास यामुळे माला प्रगति करता आली व शेवटी मला देवाची सेवा करण्यासाठी स्वतःचे समर्पण करता आले.” होय, हा पूर्वीचा मादक द्रव्याच्या व्यसनाधीन असणारा व चोर आता क्रियाशील व शुद्ध ख्रिस्ती जीवन व्यतित करीत आहे. त्याचे हे इतके खडतर व्यक्तीमत्व कसे बदलू शकले? पवित्र शास्त्राच्या सामर्थ्याने.
७, ८. व्यक्तीमत्वाची आणखी एक वेगळी समस्या पवित्र शास्त्राच्या सामर्थाने कशी पूर्णपणे दूर झाली ते विवेचीत करा.
७ दक्षिण युरोपमधून आलेले आणखी एक उदाहरण आहे. येथेही एका तरुणाची वाढ काही कठीण अशा व्यक्तीमत्वाच्या समस्येने झाली. ती समस्या होती, रागाने भडकण्याची. तो सतत भांडण करीत असे. एका भांडणात तर त्याने आपल्या बापास झोडपले व त्याला जमिनीवर लोळवले! पण, ओघाओघाने त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला व रोमकरांस पत्रातील देवाच्या आज्ञेची दखल घेतली. त्यात म्हटले आहे: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका; साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून शांतीने राहा. प्रिय बंधूनो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या.”—रोमकर १२:१७-१९.
८ या वचनांमुळे त्याला स्वतःमध्ये केवढा कमतरता होती ते समजण्याची बुद्धी आली. पवित्र शास्त्रातून अधिक शिकून घेतल्यामुळे त्याचा विवेक शुद्ध बनला व त्यामुळे त्याला आपल्या संतापावर संयम ठेवण्यामध्ये मदत मिळाली. त्याची अभ्यासात प्रगति होत असता एकदा असे घडले की, एका अनोळख्याने त्याची ओरडून निंदा केली. तेव्हा या तरुणाला आपल्या आत राग खवळत असल्याची जाणीव झाली. पण तेव्हाच त्याला आणखी काहीसे वाटायला लागले व ती होती लज्जा; तिने त्याचा राग शमविला. आता त्याजमध्ये इंद्रियदमन हे आत्म्याचे महत्त्वपूर्ण फळ वाढले होते. (गलतीकर ५:२२, २३) त्याचे व्यक्तीमत्त्व वेगळे झाले होते. हे सर्व देवाच्या सामर्थ्यामुळे घडले गेले.
९. पौलाच्या मते आमचे व्यक्तीमत्व कोणत्या माध्यमाने बदलले जाते?
९ तरीपण, पवित्र शास्त्र इतका प्रभावशाली परिणाम कसा निर्माण करू शकते? पौलाने कलस्सैकर ३:१० मध्ये म्हटले आहे की, आमचे व्यक्तीमत्व हे अचूक ज्ञानामुळे बदलले जाते. ते ज्ञान पवित्र शास्त्रात आढळते. पण हे ज्ञान लोकांना कसे बदलवू शकते?
अचूक ज्ञानाची भूमिका
१०, ११. (अ) आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा इष्ट व अनैच्छिक गुणलक्षणांविषयी आपल्याला काय शिकायला मिळते? (ब) व्यक्तीमत्वात बदल घडायचा आहे तर ज्ञानाशिवाय आणखी काय जरूरीचे आहे?
१० प्रथमतः पवित्र शास्त्र अशा अनैच्छिक गुणलक्षणांची माहिती देते जी काढून टाकली पाहिजे. यामध्ये, “उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष करण्यास त्वरित धावणारे पाय, लबाड बोलणारा साक्षी व भावाभावात वैमनस्य निर्माण करणारा मनुष्य.” (नीतीसूत्रे ६:१६-१९) दुसरे असे की, पवित्र शास्त्र काही इष्ट गुणांची माहिती देते, ज्याची जोपासना केली जाण्यास हवी. ते गुण आहेत: “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन.”—गलतीकर ५:२२, २३.
११ अशाप्रकारचे हे अचूक ज्ञान प्रामाणिक व्यक्तीला स्वतःचे परीक्षण करण्यास लावून कोणती गुणलक्षणे जोपासावीत व कोणती काढून टाकावीत त्याची समज देते. (याकोब १:२५) पण, ही केवळ सुरवात असते. ज्ञान संपादल्यावर प्रेरणा जरुरी असते. ती अशी प्रेरणा हवी की ज्यामुळे बदल करण्यास त्याला पुढे सरसावले जाते. येथेही पुन्हा, पवित्र शास्त्रातील अचूक ज्ञानाची गरज आहे.
चांगले करण्यासाठी प्रेरणा
१२. देवाच्या व्यक्तीमत्वाचे ज्ञान आम्हास बदलण्यास कशी मदत देते?
१२ पौलाने म्हटले की, हवे असणारे नवे व्यक्तीमत्व हे “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरुपाप्रमाणे” बनवले जाते. (कलस्सैकर ३:१०) यासाठीच ख्रिश्चनाचे व्यक्तीमत्व देवाच्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाशी जुळले गेले पाहिजे. (इफिसकर ५:१) देवाच्या व्यक्तीमत्वाचे प्रकटन आपल्याला पवित्र शास्त्राद्वारे होते. येथे आम्हाला त्याने मानवजातीसोबत राखलेले दळणवळण दिसते, तसेच त्याचे प्रेम, कनवाळूपणा, चांगुलपणा, दया व नीतीमत्ता हे सुंदर गुण पाहायला मिळतात. असे हे ज्ञान सुहृदयी लोकांना देवावर प्रेम करण्यास व देव संमती देतो अशा प्रकारातील व्यक्ती बनण्यास चालना देते. (मत्तय २२:३७) आम्ही देवाची प्रेमळ मुले या नात्याने त्याला संतुष्ट करण्याची इच्छा धरली पाहिजे; यासाठीच आम्ही अशक्त, अपूर्ण स्थितीत असलो तरीही त्याच्या व्यक्तीमत्वाचे होता होईल तितके अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो.—इफिसकर ५:१.
१३. कोणते ज्ञान आपल्याला “न्यायाची आवड व स्वैराचाराचा वीट” करण्यास शिकवते?
१३ व्यक्तीमत्वाची चांगली लक्षणे व वाईट लक्षणे कोठे निरवतात त्याची माहिती पवित्र शास्त्र देत असल्यामुळे आमचा निर्धार बळकट बनतो. (स्तोत्रसंहिता १४:१-५; १५:१-५; १८:२०, २४) दाविदाने ईश्वरी भक्ती व नीतीमत्तेविषयीचे प्रेम दाखविले तेव्हा त्याच्यावर आशीर्वाद आले; पण जेव्हा त्याने सयंम सोडला तेव्हा त्याच्यावर विपत्ती आली असे आपल्याला शिकायला मिळते. याचप्रमाणे शलमोन म्हातारा झाल्यावर जेव्हा त्याने आपले चांगले गुण भ्रष्टावले तेव्हा त्याच्यावर केवढे वाईट प्रसंग आले. योशीया व हिज्किया या राजांनी धार्मिकतेचे वर्तन केल्यामुळे त्याच्यावर आशीर्वाद आले, पण अहाबाची दुर्बळता व मनश्शेच्या हट्टी स्वभावामुळे हानिकारक परिणाम ओढावले. (गलतीकर ६:७) अशाप्रकारे, “न्यायाची आवड व स्वैराचाराचा वीट” करावा हे आपल्याला शिकायला मिळते.—इब्रीकर १:९; स्तोत्रसंहिता ४५:७; ९७:१०.
१४. जग व त्यातील वैयक्तीकांसाठी यहोवाचे उद्देश काय आहेत?
१४ देवाच्या उद्देशांचे अचूक ज्ञान मिळाल्यामुळे तो निर्धार अधिकच बळकट होतो. ती माहिती ‘आपल्या मनोवृत्तीत नवे’ होण्याची शक्ती, म्हणजेच आमचे विचार व कृती यावर प्रभूत्व ठेवणाऱ्या शक्तीला बदलण्याची मदत देते. (इफिसकर ४:२३, २४) पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यावर हे कळते की, यहोवा दुष्टाईला अधिक खपवून घेणार नाही. लवकरच तो या अनीतीमान जगाचा नाश करील व ‘धार्मिकता वास करणारे नवे आकाश व नवी पृथ्वी’ स्थापन करील. (२ पेत्र ३:८-१०, १३) या नव्या जगात कोण राहील? “सरळ जनच देशात वस्ती करतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”—नीतीसूत्रे २:२१, २२.
१५. पवित्र शास्त्र यहोवाच्या इच्छेविषयी जे म्हणते त्यावर आमचा खरोखर विश्वास असला तर त्यामुळे आम्हावर कसा परिणाम घडला जाईल?
१५ या अभिवचनावर आम्ही खरेपणाने विश्वास ठेवला तर आमची विचार करण्याची पद्धतच बदलून जाईल. दुष्टांचा नाश होण्याविषयीचे भाकित केल्यावर प्रेषित पेत्र म्हणतो: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व ईश्वरी भक्तीत राहून यहोवाचा दिवस येण्याची वाट पाहात व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११, १२) दुष्टांचा नाश झाल्यावर जे मागे राहतील त्या धार्मिकांमध्ये असण्यासाठी आमच्या व्यक्तीमत्वात आमच्या बळकट इच्छेने बदल घडून आला पाहिजे.
१६. नव्या जगात कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना थारा नसेल, या माहितीने आम्हावर कोणता प्रभाव पाडावा?
१६ धार्मिकांच्या बाबतीत प्रकटीकरणाचे पुस्तक हे अभिवचन देऊन म्हणते की, या जगाच्या अंतानंतर “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिले होऊन गेले.” पण पुढे ते हा इशारा देते: “भेकड, विश्वास न ठेवणारे, अंमगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे” यांना धिक्कारले जाईल. (प्रकटीकरण २१:४, ८) तर मग, ज्या अनिष्ट गुणांना देव आपल्या नव्या जगात परनावगी देणार नाही ते आत्ताच टाळणे किती सूज्ञतेचे आहे बरे!
बाहेरील मदत
१७. आम्ही कोणत्या प्रकारातील मदत मिळवावी असे पवित्र शास्त्र सल्ला आपल्याला सांगतो?
१७ तथापि, माणूस अशक्त आहे आणि जर बदल करायचा आहे तर माहिती व प्रेरणा यापेक्षा आणखी काही त्याला हवे आहे. त्यांना मदत हवी आहे, व ही मदत कोठे मिळेल ते पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. उदारहणार्थ, ते म्हणते: “सूज्ञांची सोबत धर म्हणजे सूज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतीसूत्रे १३:२०) त्याचप्रमाणे, ज्या गुणांची जोपासना करावी असे आम्हाला वाटत असते, त्याच लोकांशी आपण संगत ठेवल्यास आम्हाला त्यांचे अनुकरण करण्याची मोठी मदत मिळेल.—उत्पत्ती ६:९; नीतीसूत्रे २:२०; १ करिंथकर १५:३३.
१८, १९. देवाच्या आत्म्यापुढे आमची मने व अंतःकरणे ही उघडी करायची असल्यास आम्ही काय करण्याची गरज आहे?
१८ याशीवाय, यहोवा स्वतः ती पवित्र आत्म्याच्या रुपात आम्हाला देतो. हा तोच पवित्र आत्मा आहे जो आधीच्या काळात अद्भुत कामासाठी त्याने वापरला. “आत्म्याची फलप्राप्ती” यामध्ये “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, नम्रता व संयम” हे चांगले गुण आहेत. (गलतीकर ५:२२, २३) आम्हाला पवित्र आत्म्याकडून कशी मदत मिळते? पवित्र शास्त्रास पवित्र आत्म्याची प्रेरणा असल्यामुळे जेव्हा आम्ही त्याचे वाचन करतो किंवा त्याविषयी इतरांना बोलतो तेव्हा आम्ही आमचे मन व अंतःकरण त्या आत्म्याच्या प्रभावाला उघडे करीत असतो. (२ तीमथ्य ३:१६) आम्ही आमच्या आशेविषयी इतरांना बोलणी करू तेव्हा येशूने अभिवचन दिले त्याप्रमाणे आम्हाला त्या आत्म्याच्या थेट हालचालीचा अनुभव येऊ शकतो.—मत्तय १०:१८-२०.
१९ याशिवाय, पवित्र शास्त्र अशीही आज्ञा देते: “प्रार्थनेत तत्पर असा.” (रोमकर १२:१२) प्रार्थनेकरवी आपण यहोवाशी बोलत असतो, त्याची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो व त्याची मदत मागतो. तेव्हा आपणाठायी असणाऱ्या वाईट प्रवृत्तीला जसे की, भडकलेले माथे, हट्टीपणा, अधीरपणा, किंवा गर्व, यावर मात करण्याची मदत मागितली तर देवाचा आत्मा, आम्ही त्या प्रार्थनेच्या अनुषंगाने जी हालचाल करू तिला पाठबळ देईल.—योहान १४:१३, १४; याकोब १:५; १ योहान ५:१४.
२०. ख्रिश्चनांनी नवे व्यक्तीत्व धारण करून ते टिकविण्यासाठी सतत प्रयत्नशील का असले पाहिजे?
२० “आपल्या मनाच्या नवीकरणाने आपले रुपांतर होऊ द्या,” असे पौलाने लिहिले तेव्हा तो बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती अभिषिक्तांच्या मंडळीस ते लिहित होता. (रोमकर १:७; १२:२) त्याने ग्रीक भाषेत मूळ लिखाण करताना क्रियापदाचा असा प्रकार वापरला की ज्याकरवी ती क्रिया चालूच आहे असा अर्थ ध्वनित होतो. यामुळे आपल्याला हे सूचित होते की, पवित्र शास्त्रातील अचूक ज्ञानाकरवी आपल्यात घडविला जाणारा बदल हा प्रगतीशील आहे. आज आपण देखील पौलाच्या काळातील ख्रिस्तीजनांप्रमाणे भ्रष्ट प्रभावांनी गुरफटलेल्या जगाने वेढलेलो आहोत. शिवाय आम्हीही त्यांच्यासारखेच अपूर्ण, चुका करण्याकडे कल असलेले आहोत. (उत्पत्ती ८:२१) यासाठीच आम्हाला जुन्या, स्वार्थी व्यक्तीमत्वावर सतत मात करून, त्यांनी परिधान केले तसे नवे व्यक्तीमत्व धारण करण्यास हवे. आरंभीच्या ख्रिश्चनांनी यात इतके यश संपादिले की, त्यांच्या सभोवतालच्या जगात सर्वांपेक्षा वेगळे असे सर्वांमध्ये उठून दिसत असत.
“यहावाने शिकवलेले” लोक
२१. या शेवटल्या काळी देवाच्या लोकांच्या बाबतीत कोणत्या भविष्यवादांची पूर्णता झालेली आहे?
२१ खरेच, आज देवाचा आत्मा केवळ वैयक्तीकांवर नव्हे तर ख्रिश्चनांच्या संघटनेवर काम करीत आहे. आज यातील सदस्यांची संख्या लाखावर गेली आहे. या संस्थेच्या बाबतीत यशयाचे हे अभिवचन पूर्ण होत आहे: “देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील: ‘चला, आपण यहोवाच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’” (यशया २:३) यशयाचा हा आणखी एक भविष्यवाद त्यांच्या बाबतीत पूर्ण झाला आहे: “तुझी सर्व मुले यहोवापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” (यशया ५४:१३) तर हे यहोवाकडून शिक्षण प्राप्त झालेले असे कोणते लोक आहेत ज्यांना शांती मिळाली आहे?
२२. (अ) आज यहोवाकरवी कोण शिक्षण घेतलेले आहेत? (ब) यहोवाचे साक्षीदार वेगळे लोक आहेत हे दाखविण्यासाठी उदाहरण द्या.
२२ उत्तर अमेरिकेतील एक वर्तमानपत्र न्यू हेवन रजिस्टर याला जे पत्र पाठविण्यात आले होते त्यातील सारांशाकडे लक्ष द्या: “त्यांच्या प्रचारकार्यामुळे तुम्ही मी झालो होतो तसे दुःसह किंवा चिडला असाल तरी त्यांची निष्ठा, त्यांचे पूर्णत्व, मानवी स्वभावाविषयी दाखवीत असलेले उल्लेखनीय उदाहरण व आरोग्यदायी रहाणी याविषयी तुम्हाला त्यांचे कौतुक करावे लागेल.” तो लेखक कोणाविषयी असे म्हणत होता? त्याच गटाविषयी, अर्जेंटिनाच्या ब्युएन एयर्समधील हेरल्ड याने माहिती देऊन म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांनी इतक्या वर्षांत स्वतःला उद्योगी, नम्र, काटकसरी व देवाचे भय बाळगणारे नागरिक असल्याचे दाखवून दिले आहे.” याचप्रमाणे, ला स्टँपा या इटलीतील वृत्तपत्राने असे म्हटले: “ते कर चुकवीत नाहीत आणि आपल्या फायद्यासाठी कायद्याच्या पळवाटा पहात नाहीत. शेजारप्रेमाची उच्च प्रणाली, सत्तेची हाव नाकारणे, अहिंसा, प्रामाणिकपणा . . . हे त्यांच्या ‘दैनंदिन’ जीवनाचे मार्ग बनले आहेत.”
२३. यहोवाचे साक्षीदार एक संघटना या नात्याने वेगळेच का दिसतात?
२३ पण, यहोवाचे साक्षीदार, आरंभीच्या ख्रिस्ती लोकांप्रमाणे वेगळा गट असे का दिसतात? पुष्कळ बाबतीत तर ते इतरांसारखेच आहेत. त्यांनाही जन्मतःच अपूर्णत्व आहे, तसेच त्यांनाही त्याच आर्थिक समस्या आहेत व त्याच मूलभूत गरजा आहेत. तथापि, एक जागतिक मंडळी या नात्याने ते देवाच्या वचनाला त्यांच्या जीवनावर सामर्थ्य घडवू देतात. परिणामतः त्यांचे खऱ्या ख्रिश्चनांचे आंतरराष्ट्रीय बंधुत्व बनले आहे ही गोष्ट पवित्र शास्त्र हे देवाचे प्ररित वचन आहे असा प्रबळ पुरावा सादर करते.—स्तोत्रसंहिता १३३:१.
पवित्र शास्त्र प्रेरित आहे
२४. आमची आणखी अधिक लोकांसाठी काय प्रार्थना आहे?
२४ आमच्या या दोन लेखात आम्ही, पवित्र शास्त्र हे मानवाचे नव्हे तर देवाचे वचन आहे हे सिद्ध करणाऱ्या दोन गोष्टी पाहिल्या. मग, प्रांजळ लोक, पवित्र शास्त्रात आढळणारे अप्रतिम ज्ञान हे कारण घेवोत की किंवा दुसरे एखादे कारण घेवो त्याच्याठायी लोकांत बदल घडवून आणणारे सामर्थ्य हे कारण घेवो, त्यांना ते देवाकडील प्रेरित असणारे आहे हे न चुकता मान्य करावे लागेल. या गोष्टीची सत्यता आणखी लोक जाणून घेतील हीच आमची प्रार्थना व आशा आहे. मग, ते देखील स्तोत्रकर्त्याचे हे आनंदी बोल प्रतिध्वनित करतील: “तुझे विधि मी किती प्रिय मानतो ते पाहा; हे यहोवा, तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. तुझे संपूर्ण वचन सत्य आहे; तुझे सर्व न्याय्य निर्णय सनातन आहे.”—स्तोत्रसंहिता ११९:१५९, १६०.
तुम्हाला आठवते का?
◻ पवित्र शास्त्र खऱ्या ख्रिश्चनांवर कसला परिणाम करते?
◻ अचूक ज्ञान आम्हाला रुपांतर करण्यास कशी मदत देते?
◻ चांगल्या गुणांची जोपासना करावी व वाईट गुणांवर मात करावी यासाठी प्रेरणा पुरविण्यात पवित्र शास्त्र कशी मदत करते?
◻ ईश्वरी गुणांची वाढ करण्यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे?
◻ पवित्र शास्त्र हे प्रेरित असल्याचा कोणता पुरावा यहोवाच्या लोकात दिसून येत आहे?
[२५ पानांवरील चित्रं]
शलमोनाला आपल्या उतारवयात अविश्वासूपणामुळे जे दुःखद परिणाम मिळाले त्यावरून आम्हाला नीतीमत्तेची आवड धरण्याची व वाईटाचा वीट मानण्याची चालना मिळाली पाहिजे
[२७ पानांवरील चित्रं]
आम्ही यहोवाकडून मदत मागितली तर त्याचा आत्मा, आम्ही वाईट गुणांवर मात करण्याचा जो पराकाष्ठेचा यत्न करतो त्याला आधार देईल