वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ४/१ पृ. १०-१५
  • आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सात मंडळ्या
  • सूचना व प्रशंसा
  • शेवटपर्यंत धीर
  • गुंडाळीचे शिक्के
  • पवित्र रहस्य उघड करणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्रकटीकरणाच्या वाचकांनो, आशीर्वादित व्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • योहान गौरवी येशूला बघतो
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ४/१ पृ. १०-१५

आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐका

पृष्ठ १० ते २१ वर असणारी ही माहिती, यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८८ मधील “इश्‍वरी न्याय” प्रांतिय अधिवेशनात “नेमलेला समय जवळ आला आहे” या परिसंवादातील आरंभीच्या भाषणांमध्ये सादर करण्यात आली.

“आत्मा मंडळ्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.”—प्रकटीकरण ३:२२.

१. सध्याच्या दुःखी युगात प्रकटीकरणाचे कोणते शब्द सुवार्ता असे आहेत, आणि “संदेश” तसेच “नेमलेला समय” या गोष्टी कशास अनुलक्षून आहेत?

एका समाजशास्त्रज्ञाने काही वर्षांआधी अमेरिकेत असे म्हटले होते की, लोक मनमुराद स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत, परंतु पुरेसा आनंद त्यांना मिळू शकत नाही. त्यांनी पुढे म्हटलेः “लोकांना आनंद आपणाकडून पळाला आहे असे दिसते. ज्या नंदनवनाचे अभिवचन त्यांनी देऊ केले आहे ते निरर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे.” या अनुषंगाने पाहता, प्रेषित योहानाने प्रकटीकरण १:३ मध्ये लिहिलेले शब्द सुवार्ता असेच आहेत, कारण तेच आम्हाला आनंद कसा मिळवता येऊ शकेल याची माहिती देतात. योहानाने लिहिलेः “या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण नेमलेला समय जवळ आला आहे.” हा “संदेश” प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिखित असणारा आहे. हा “नेमलेला समय” तो तोच समय आहे ज्यावेळी प्रकटीकरणाचे भविष्यवाद पूर्ण होतील. योहानाचे हे शब्द आज आमच्यासाठी अतिशय अर्थपूर्ण आहेत.

२. पहिले शतक समाप्तीला आले असता योहानाला कशाविषयीचे आश्‍चर्य वाटले असावे?

२ योहानाने आपले प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिण्याच्या ६० पेक्षा अधिक वर्षांआधी, तो स्वतः अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीची प्रस्थापना झाली त्या पेंटेकॉस्टच्या वेळी उपस्थित होता. ती मूळची १२० सदस्यांची मंडळी आता इ. स. ९६ मध्ये मोठी अशी आंतरराष्ट्रीय संघटना बनली होती. पण काही समस्या उद्‌भवल्या होत्या. येशू, पौल व पेत्राने इशारा दिला होता त्याप्रमाणे धर्मत्यागीपणा व गटबाजी ही आता दिसू लागली होती व यामुळेच योहानाला भविष्याविषयीचे आश्‍चर्य वाटले असावे.—मत्तय १३:२४-३०, ३६-४३; प्रे. कृत्ये २०:२९, ३०; २ पेत्र २:१-३.

३. योहानाने पाहिलेले व प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिखित केलेले दृष्टांत कशाची हमी देतात?

३ पण “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्यासाठी” जेव्हा ‘देवाने दिलेले व येशू ख्रिस्ताद्वारे झालेले प्रकटीकरण’ त्याला समजले तेव्हा त्याला किती आनंद झाला असावा याची जरा कल्पना करा. (प्रकटीकरण १:१) त्याने अद्‌भूत दृष्टांतांच्या मालिकेत हे पाहिले की यहोवाचे उद्देश पूर्ण होणार आणि विश्‍वासू ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासाचे प्रतिफळ मिळणार. त्याला येशूकडून सात मंडळ्यांकरता संदेश मिळाले; हे येशू आपल्या स्वर्गीय वैभवात येण्याआधी त्याने दिलेल्या थेट व अंतिम सूचना होत्या.

सात मंडळ्या

४. (अ) विश्‍वासू ख्रिस्ती मंडळीची जबाबदारी कोणती? (ब) अभिषिक्‍त वडील हे ख्रिस्ताच्या उजव्या हातातील सात ताऱ्‍यांप्रमाणे आहेत असे दिसले याचा कोणता अर्थबोध होतो?

४ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या सात मंडळ्यांचे सात समया व त्यातील अभिषिक्‍त वडीलांचे ख्रिस्ताच्या उजव्या हातातील सात तारे याकरवी प्रतिनिधित्व करण्यात आले. (प्रकटीकरण १:१२, १६) या स्पष्ट रुपकाद्वारे योहानाला विश्‍वासू ख्रिस्ती, अंधःकारमय जगात प्रज्वलित समयांप्रमाणे प्रकाशधारी असतील असे दिसले. (मत्तय ५:१४-१६) येशूने वडीलांना आपल्या उजव्या हातात धरले आहे याचा अर्थ तो त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शन करतो व त्यांच्यावर देखरेख ठेवीत आहे असा होतो.

५. सात मंडळ्यांना अनुलक्षून असणारा संदेश योहानाच्या काळी कोणास मार्गदर्शित करण्यात आला होता?

५ येशू योहानास सांगतोः “जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांना पाठीव.” (प्रकटीकरण १:११) या सात मंडळ्या योहानाच्या काळी खऱ्‍याच अस्तित्वात होत्या; तेव्हा योहानाने प्रकटीकरणाचे लिखाण संपवल्यावर त्याची एकेक प्रत या मंडळ्यांकडे पोचती झाली असावी याची आम्हाला खात्री देता येईल. पण, प्रकटीकरणाविषयी हेस्टींग्ज यांचा डिक्शनरी ऑफ द बायबल हा शब्दकोष काय सांगतो ते पहाः “प्रकटीकरणाइतक्या न[वीन] क[रारातील] इतर कोणत्याही पुस्तकाची साक्ष दुसऱ्‍या शतकापर्यंत मिळत नाही.” याचा अर्थ, प्रकटीकरणाच्या पुस्तकाची माहिती आणि त्याचे वाचन सात मंडळ्यामधील ख्रिश्‍चनांनी केले इतकेच नाही तर ज्यांना या भविष्यवादाच्या वचनांचा अभ्यास करण्याची इच्छा होती त्या इतरांनीही ते वाचले होते. खरेच, येशूने दिलेल्या सूचना सर्वांसाठी होत्या.

६, ७. (अ) प्रकटीकरणाचे शब्द प्रामुख्यत्वे केव्हा लागू होतात, आणि हे आपल्याला कसे कळते? (ब) सात तारे आणि सात मंडळ्या यांचे आज कोण प्रतिनिधित्व करीत आहेत?

६ तथापि, सात मंडळ्यांना उल्लेखून असणाऱ्‍या संदेशाचा व्याप्त स्वरुपाचा अवलंब आहे. प्रकटीकरण १:१० मध्ये योहान म्हणतोः “मी आत्म्याने संचरित होऊन प्रभुच्या दिवसापर्यंत आलो.” हे वचन प्रकटीकरणाची समज प्रदान करण्यामध्ये महत्वाच्या किल्लीप्रमाणे आहे. याद्वारे, प्रकटीकरणाच्या पुस्तकातील गोष्टींचा अवलंब प्रामुख्यत्वे “प्रभुच्या दिवसात” म्हणजे येशू जेव्हा १९१४ मध्ये राजा झाला तेव्हा लागू होणारा आहे हे सूचित होते. या गोष्टीची पुष्टी, सात मंडळ्यांना येशूने पाठविलेल्या संदेशातही मिळते. त्यात, पर्गम मंडळीला लिहिलेल्या संदेशातील शब्दप्रयोग आहे, तो असा की, “मी तुजकडे लवकर येतो.” (प्रकटीकरण २:१६; ३:३, ११) इ. स. ९६ नंतर, येशू १९१४ मध्ये राजा असा सिंहासनाधिष्ठ होऊन प्रभुचा दिवस सुरु होईपर्यंत तो कोणत्याहि अभूतपूर्व मार्गी “आला” नाही. (प्रे. कृ. १:९-११) तर मलाखी ३:१ च्या पूर्णतेस अनुसरुन तो १९१८ मध्ये, यहोवाच्या मंदिरात देवाच्या घराचा न्यायनिवाडा करावयासाठी आला तेव्हा तो “आला.” (१ पेत्र ४:१७) तो जवळच्या भविष्यात, “देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा सूड” उगवील तेव्हा परत एकदा ‘येईल.’—२ थेस्सलनीकाकर १:७, ८; मत्तय २४:४२-४४.

७ हे लक्षात आल्यावर आता आपल्याला कळेल की, त्या सात मंडळ्या १९१४ नंतरच्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या सर्व मंडळ्यांचे चित्र ठरतात आणि सात तारे त्या मंडळ्यातील सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधित्व करतात. याखेरीज, “इतर मेंढरे” गटातील वडील सुद्धा भविष्यवादाच्या विस्तारित अवलंबनानुसार येशूच्या उजव्या हाताच्या देखरेखीखाली आहेत. (योहान १०:१६) तसेच सात मंडळ्यांना दिलेल्या सूचना तात्विकदृष्ट्या देवाच्या लोकांच्या जगभरात पसरलेल्या सर्व मंडळ्यांना, ज्यात पृथ्वीची आशा असणारे ख्रिस्तीजन आहेत त्यांनाही लागू होणाऱ्‍या आहेत.

८. ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्‍यांची पाहणी करण्यासाठी येशू १९१८ मध्ये आला तेव्हा त्याला काय दिसले?

८ ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्‍यांची पाहणी करण्यासाठी येशू १९१८ मध्ये आला त्यावेळी त्याला पृथ्वीवर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा गट संदेशातील शब्दांचे कसोशीने पालन करीत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दिसले. १८७० च्या दशकापासून ते लोकांना १९१४ या महत्वपूर्ण वर्षाविषयी इशारा देत होते. पहिल्या महायुद्धात त्यांनी ख्रिस्ती धर्मजगताकडून खूप छळ सहन केला आणि १९१८ पर्यंत त्यांचे कार्य, जेव्हा वॉचटावर सोसायटीच्या प्रमुख अधिकाऱ्‍यांना खोट्या आरोपामुळे तुरुंगात जावे लागले तेव्हा जवळजवळ बंद होण्यास आले होते. परंतु, त्या काळी त्यांना आलेले अनुभव प्रकटीकरणाच्या संदेशासोबत अद्‌भूत स्वरुपात जुळतात. शिवाय येशूने सात मंडळ्यांना अनुलक्षून उद्‌गारलेल्या शब्दांप्रमाणे राहण्याचा त्यांचा निर्धार यामुळे हेच या काळोख्या जगात प्रकाश धारण केलेले ख्रिस्ती आहेत अशी त्यांच्याविषयीची ओळख मिळाली. आज या शेषांचा मिळून एक योहान वर्ग तयार होतो व तो प्रकटीकरणाच्या कित्येक भागांची पूर्णता बघण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी जिवंत आहे.

सूचना व प्रशंसा

९, १०. येशूच्या कोणत्या शब्दांच्या पूर्णतेमुळे आधुनिक ख्रिश्‍चनांना मोठा आनंद लाभला? विवेचीत करा.

९ प्रकटीकरण ३:८ मध्ये येशूने फिलदेल्फिया येथील मंडळीस म्हटलेः “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत—पहा, मी तुजपुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही—तुला शक्‍ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले आहे व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे.” फिलदेल्फियातील ख्रिस्ती खूप क्रियाशील होते असे याद्वारे दिसते व आता यांना एका मोठ्या संधीचे दार उघडण्यात आले होते.

१० या संदेशाच्या आधुनिक खरेपणामुळे देवाच्या लोकांना अत्यंत आनंद झाला. १९१८ च्या कठीण अनुभवानंतर त्यांना आध्यात्मिकरित्या पुन्हा पुनर्स्थापित केले गेले आणि येशूने यांना १९१९ मध्ये संधीचे दार खुले करुन दिले. सर्व राष्ट्रांस राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या नेमणूकीचा स्वीकार करून त्यांनी या दारातून प्रवेश केला. यहोवाचा आत्मा त्यांच्यावर असल्यामुळे काहीही या कामास मागे टाकू शकले नाही. या कारणास्तव या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना येशूच्या उपस्थितीच्या चिन्हातील प्रमुख लक्षणात भाग घेण्याचा विलोभनीय हक्क मिळाला. (मत्तय २४:३, १४) त्यांच्या या विश्‍वासू प्रचाराच्या कामामुळे १,४४,००० च्या बाकी राहिलेल्यांना पाचारण होऊन त्यांचा अभिषेक झाला व त्यानंतर “मोठा लोकसमुदाय” याची मोठ्या संख्येने जमवाजमव सुरु झाली. (प्रकटीकरण ७:१-३, ९) याकरवी देवाच्या लोकांना किती आनंद मिळाला!

११. योहानाच्या काळी गटबाजीने यहोवाची संस्था भ्रष्टाविण्याचा कसा प्रयत्न केला आणि तेच आज आमच्या काळी कसे होत गेले?

११ असा हा आनंद हिरावला जाण्याची शक्यता आहे का? होय. उदाहरणार्थ, पर्गम येथील वडीलांचा सहनशीलतेविषयीचा उत्तम कित्ता होता तरी ते आपल्या मंडळीतून निकलाइताचे शिक्षण काढून टाकण्यात असमर्थ ठरले. (प्रकटीकरण २:१५) वेगळा पंथ आपले वर्चस्व जमवू पाहात होता. याचप्रमाणे, या शेवटल्या दिवसात काही जणांनी धर्मत्यागीपणा स्विकारला व त्यांनी यहोवाच्या संस्थेस भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. वडीलांनी एकंदरीत त्याचा प्रतिकार केला, पण, काहीजणांनी स्वतःची दिशाभूल करुन घेतली. खरेच, आम्ही धर्मत्याग्यांना आपला आनंद कधीही हिरावू देऊ नये!

१२. (अ) बलाम व इजबेल यांचा प्रभाव काय आहे? (ब) आजच्या आधुनिक काळात सैतानाने ख्रिस्ती मंडळीत बलाम किंवा इजबेलीचे वर्चस्व आणण्याचा प्रयत्न केला आहे का?

१२ येशूने पर्गम येथील मंडळीला “बलामाचे शिक्षण खरे मानून राहणाऱ्‍या” लोकांविषयीची देखील ताकीद दिली. (प्रकटीकरण २:१४) हे कोणते शिक्षण होते? पर्गममध्ये कोणीतरी ख्रिश्‍चनांना, बलामाने इस्राएलांना जसे अरण्यवासात भ्रष्टावले होते त्याचप्रमाणे भ्रष्ट करीत होता. बलामाने ते, इस्राएलांना “मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करणे” याकरवी साध्य केले होते. (गणना २५:१-५; ३१:८) तसेच येशूने थुवतीरा येथील मंडळीला “इजबेल नामे स्त्री” बद्दलचा इशारा दिला. ही स्त्रीसुद्धा ख्रिस्तीजनांना “जारकर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास” शिकवीत होती. (प्रकटीकरण २:२०) तर मग, सैतानाने अशाच स्वरुपाचा बलामाचा व इजबेलीचा प्रभाव आज ख्रिस्ती मंडळीत आणण्याचा प्रयत्न केला आहे का? होय, निश्‍चितपणे. कारण वर्षाला ४०,००० लोकांचा त्याने अनैतिकपणाच्या कारणामुळे बहिष्कृतपणा घडवून आणला आहे. केवढी ही भयंकर स्थिती! बलामसारखे पुरुष व इजबेलीसारख्या स्त्रियांनी वडीलांविरुद्ध बंडखोरपणा करून मंडळीला भ्रष्टाविण्याचा प्रयत्न केला आहे. असा हा अशुद्ध प्रभाव आपण आपल्या सर्व सामर्थ्यानिशी दूर भिरकावू या!—१ करिंथकर ६:१८; १ योहान ५:२१.

१३. (अ) येशूला कोमटपणाची किती चीड आहे ते स्पष्ट करा. (ब) लावदिकीयातील लोक कोमट का होते आणि हा अशक्‍तपणा आपण कसा टाळू शकतो?

१३ प्रकटीकरण ३:१५, १६ मध्ये येशू लावदिकीयाच्या मंडळीस म्हणालाः “तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस हे मला ठाऊक आहे; तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” येशूला कोमटपणाविषयीची किती चीड वाटते त्याचे हे केवढे समर्पक वर्णन! तो पुढे म्हणतोः “मी धनवान आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस.” होय, लावदिकीया येथील ख्रिश्‍चनांवर जडवादाने आपला पगडा बसविला होता. ते स्व-संतुष्ट व भावनाशून्य होते. तरीपण येशू त्यांना म्हणालाः “पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अंधळा व उघडावाघडा आहेस हे तुला कळत नाही.” (प्रकटीकरण ३:१७) आपण “कष्टी, दीन, दरिद्री, अंधळा व उघडावाघडा” असे येशूच्या दृष्टीने व्हावे असे आपल्याला वाटते का? खचितच नाही! तर मग, जडवादी किंवा कोमट बनू नये यासाठी आपण यथाशक्‍ती लढत देत राहू या—१ तीमथ्य ६:९-१२.

शेवटपर्यंत धीर

१४. (अ)स्मुर्णाच्या मंडळीला कोणता त्रास सहन करावा लागला? (ब) स्मुर्णाच्या अनुभवासारखा समांतर असा आधुनिक अनुभव कोणता आहे?

१४ स्मुर्णा ही अशी मंडळी होती की जी कोमट नव्हती. या ख्रिश्‍चनांना येशू म्हणालाः “तुझे संकट व तुझे दारिद्र्‌य मला ठाऊक आहे—तरी तू धनवान आहेस—आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवितात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्‍त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरु नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही दहा दिवस संकटात असाल.” (प्रकटीकरण २:८-१०) हे ख्रिश्‍चनांना आज अनुभवाव्या लागणाऱ्‍या गोष्टींशी किती जुळणारे आहे! आजची “सैतानाची धर्मसभा” ख्रिस्ती राष्ट्रसमूह याच्याकडून अभिषिक्‍त आणि “दुसरी मेंढरे” या दोन्ही वर्गाच्या आधुनिक ख्रिश्‍चनांना भयंकर विरोधाचा सामना करावा लागला. पहिल्या जागतिक महायुद्धापासून ते आजपर्यंत हजारो पुरुष, स्त्रिया व बालके यांना मारहाण, तुरुंगवास, पीडा, डागणे, बलात्कार व ठार होणे हा अनुभव, त्यांनी आपली ख्रिस्ती तटस्थता हातमिळवणी करण्याचे नाकारले म्हणून आला.

१५, १६. (अ) छळ सहन करीत असले तरीही अभिषिक्‍त ख्रिस्ती कसे आनंदी असू शकतात? (ब) इतर मेंढरांसाठी प्राप्त होणारे कोणते खास वरदान त्यांना आनंदी राहण्यास समर्थ करते?

१५ असे अनुभव आनंद देतात का? नाही. परंतु, संकट सहन करणारे, विश्‍वासू ख्रिस्ती प्रेषितांसारखेच “[येशूच्या] नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो” म्हणून अंतर्यामी आनंद अनुभवीत आहेत. (प्रे. कृत्ये ५:४१) त्यांच्या शत्रूंनी काहीही केले तरीही ते आनंदी आहेत कारण आपल्या सचोटीचे प्रतिफळ मिळण्याचा नेमलेला समय जवळ आला आहे हे त्यांना ठाऊक आहे. ते प्रतिफळ खरेच मोठे आहे. स्मुर्णा येथील ख्रिश्‍चनांना येशू म्हणालाः “तुला मरावे लागले तरी विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुगूट देईन.” (प्रकटीकरण २:१०) शिवाय तो सार्दीस येथील ख्रिस्तीजनांना म्हणालाः “जो विजय मिळवितो तो अशा रितीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही.”—प्रकटीकरण ३:५.

१६ हे खरे की ही अभिवचने खासपणे अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होतात व ती त्यांना त्यांच्यासाठी स्वर्गात अमर जीवनाचे बक्षीस आहे याचे स्मरण देतात. पण जे “दुसरी मेंढरे” या वर्गाचे आहेत त्यांना सुद्धा या शब्दांकरवी प्रोत्साहन मिळते. ते आवेशी व सहनशील राहिले तर त्यांच्यासाठीही यहोवाने प्रतिफळ तयार करून ठेवले आहे. होय, ख्रिस्ताच्या हाती असणाऱ्‍या देवराज्य वर्चस्वाखालील नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवनप्राप्तीचे अभिवचन यांना आहे. तेथे यांना असे नंदनवन आढळेल जे या जगाच्या लोकांना कधीच आढळू शकले नाही.

१७. येशूने प्रत्येक संदेशाचा समारोप कोणत्या शब्दाने केला, आणि त्या शब्दांचा आज आम्हासाठी काय अर्थ होतो?

१७ येशूने सात मंडळ्यांना पाठविलेल्या प्रत्येक संदेशाचा समारोप अगदी उचितपणे या शब्दात केलाः “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.” (प्रकटीकरण ३:२२) होय, आम्ही प्रमुख मेंढपाळाचे शब्द ऐकले व पाळले पाहिजे. आम्ही अशुद्धपणा व धर्मत्याग टाळला पाहिजे व आपला आवेश राखला पाहिजे. यावरच आम्हास प्रतिपळ मिळणे अवलंबून आहे. प्रकटीकरणात आणखी पुढे लिहिलेली माहिती विचारात घेण्यामुळे, असे हे मार्गाक्रमण करीत राहण्याचा आमचा निश्‍चय निश्‍चितच दृढ होऊ शकेल.

गुंडाळीचे शिक्के

१८. (अ) स्वर्गीय न्यायालयात येशूला काय मिळते? (ब) प्रकटीकरणाच्या सहाव्या अध्यायातील तीन घोडेस्वारांची दौड याचा आज जगत असलेल्या मानवजातीसाठी कोणता अर्थ आहे?

१८ प्रकटीकरणाच्या ४ व ५ अध्यायात योहान यहोवाच्या वैभवी न्यायालयाचे अद्‌भूत दृश्‍य बघतो. देवाचा कोकरा हा तेथे आहे व त्याला सात शिक्के असणारी एक गुंडाळी दिलेली आहे. सहाव्या अध्यायात येशू सात शिक्क्यांपैकी सहा एका मागोमाग फोडतो असे दाखविले आहे. पहिला शिक्का फोडल्यावर पांढऱ्‍या घोड्यावर बसलेला स्वार दिसला. त्याला मुकूट देण्यात आला होता व तो “जिंकीत आणि जिंकावयाला निघाला.” (प्रकटीकरण ६:२) हा येशू आहे, ज्याने नव्यानेच राजा या अर्थी मुकूट धारण केला आहे. तो आपली विजयी, बादशाही दौड १९१४ मध्ये सुरु करतो त्याच वेळेस “प्रभुचा दिवस” सुरु होतो. यानंतर पुढचे तीन शिक्के उघडल्यावर तीन आणखी घोडे व त्यावरील स्वार दिसतात. ते मानवी युद्ध, दुष्काळ व अकाली मृत्यु यांचे भीषण स्वरुप सादर करतात. ते, येशूने दिलेल्या थोर भविष्यवादात त्याच्या राज्य सत्तेतील उपस्थितीत जी मोठी युद्धे, दुष्काळ, भूकंप व इतर आपत्ती घडतील असे म्हटले होते त्यांची पुष्टी देतात. (मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:१०, ११) खरेच, ख्रिश्‍चनांनी अशा परिस्थितीत टिकून रहावयाचे आहे तर त्यांनी, येशूने सात मंडळ्यांना जे संदेश पाठविले ते ऐकून ग्रहण केले पाहिजेत.

१९. (अ) आधीच वारलेल्या विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना ख्रिस्ताच्या उपस्थितीत कोणते वरदान मिळते? (ब) सहाव्या शिक्क्याच्या फोडण्यामुळे कोणत्या भयंकर घटना प्रतिछायित केल्या गेल्या व यामुळे कोणता प्रश्‍न सामोरा आला?

१९ पाचवा शिक्का फोडण्यात येतो तेव्हा अदृश्‍य आत्मिक वातावरणात घडलेली घटना दिसते. आपल्या विश्‍वासाखातर ज्यांचा मृत्यु घडला अशा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पांढरा झगा देण्यात येतो. त्याकरवी ख्रिस्ताच्या उपस्थितीत स्वर्गीय पुनरुत्थानास आरंभ झाला आहे असे कळते. (१ थेस्सलनीकाककर ४:१४-१७; प्रकटीकरण ३:५) यानंतर सहावा शिक्का फोडण्यात येतो तेव्हा सैतानी व्यवस्थीकरणाची “पृथ्वी” मोठ्या भूकंपामुळे हादरली जाते. (२ करिंथकर ४:४) मानवी अधिपत्याचे सैतानी “आकाश” एखादी जुनी गुंडाळी गुंडाळून जशी फेकून देण्यात येते त्याप्रमाणे गुंडाळले जाते. बंडखोर मानवजातीच्या उरात भीति धडकते. ते खडक व डोंगरास हताशपणे ओरडतातः “आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून व कोकऱ्‍याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्यापुढे कोण टिकू शकेल?”—प्रकटीकरण ६:१३, १४, १६, १७.

२०. यहोवा व त्याचा कोकरा यांच्या मोठ्या क्रोधाच्या दिवशी कोणाचा निभाव लागू शकेल?

२० पण कोण टिकू शकतो? खरे तर याचे उत्तर येशूने आधीच दिले आहे. जे “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो ते ऐक”तात तेच त्या क्रोधाच्या मोठ्या दिवशी टिकू शकतील; आणि याला पुष्टी म्हणूनच की काय, योहानाला १,४४,००० च्या शेवटल्या जनांवर शिक्का झाल्याचे व “मोठे संकट” यातून निभावण्यासाठी एका मोठ्या लोकसमुदायाची जमवाजमव होत असल्याचे समजते. (प्रकटीकरण ७:१-३, १४) पण आता गुंडाळीचा सातवा शिक्का उघडण्याची वेळ झाली आहे, तसेच योहानासाठी व त्याच्याद्वारे आज आमच्यासाठी अधिक नाट्यमय दृष्टांत दिसणार आहेत. यापैकींच्या काहींची चर्चा पुढील लेखात आढळेल.

तुम्हास आठवते का?

◻ येशू व मंडळीतील वडील यात कोणता नातेसंबंध आहे?

◻ पर्गम व थुवतीरा मंडळीतील वडीलांपुढे कोणत्या समस्या आल्या आणि अशाच प्रकारच्या समस्या आज मंडळ्यांवर कसा परिणाम करीत आहेत?

◻ लावदिकीया मंडळीने कोणती गंभीर चूक केली होती, आणि हीच चूक आज आम्हास कशी टाळता येईल?

◻ या २० व्या शतकात ख्रिस्तीजनांना कसा धीर दाखवावा लागला, आणि तो दाखविण्यात येशूच्या कोणत्या अभिवचनांनी साहाय्य दिले?

◻ आर्मगिदोनात राष्ट्रांना जी निराशा व असहाय्यता अनुभवावी लागणार आहे ती आम्ही कशी टाळू शकतो?

[१३ पानांवरील चित्रं]

नाझींच्या छळग्रस्त छावण्यातील छळण्यात आलेले काही विश्‍वासू ख्रिस्तीजन

[चित्राचे श्रेय]

DÖW, Vienna, Austria

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा