देवाची न्यायनिवाडा करण्याची घटका आली आहे
“देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे.”—प्रकटीकरण १४:७.
१. प्रकटीकरणाच्या सुरुवातीच्या अध्यायात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे थरारक भविष्यवाद नमूदित आहेत, ज्यांची आमच्या काळात पूर्णता होत असल्याचे दिसते. यापैकीच्या काहींचे आम्ही मागील लेखात परिक्षण केले आहे. त्यात सहा लाक्षणिक शिक्के फोडल्याचा समावेश आहे. या उघडलेल्या शिक्क्यांमुळे प्रकटीकरणातील चार घोडेस्वारांची “शेवटल्या काळा”तील उध्वस्त करणारी दौड सुरु झाली. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण ६:१-८) त्यामध्ये कोण ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करतील आणि कोण “मोठे संकट” यातून पार होऊन पुढे पृथ्वीवर जिवंत राहतील हे सुद्धा दिसले. देवाचा न्यायदंड बजावण्याचा “नेमलेला समय जवळ आला आहे” हे त्यातून स्पष्ट दिसले.—प्रकटीकरण १:३; ७:४, ९-१७.
२. प्रकटीकरणाच्या ८ व्या अध्यायातील सात लाक्षणिक कर्ण्यांचा कसा वापर व्हावयाचा आहे?
२ पण आणखी एक शिक्का, सातवा शिक्का होता. हो शेवटला शिक्का फोडला तेव्हा काय प्रकट होते ते आपल्याला प्रकटीकरण ८:२ सांगते. ते म्हणतेः “तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांस सात कर्णे देण्यात आले.” ६ वे वचन पुढे म्हणतेः “ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजविण्यास सिद्ध झाले.” पवित्र शास्त्र काळी, कोणा महत्वपूर्ण घटनेचा इशारा निनादविण्यासाठी कर्ण्यांचा वापर करीत. याचप्रमाणे, या सात कर्ण्यांचा नाद आमच्या काळी जीवन-मरणाची महत्वपूर्णता राखून असलेल्या घटनांकडे आपले लक्ष वेधवितो. दिव्यदूत हे कर्णे वाजवीत असता, पृथ्वीवरील साक्षीदार, त्या प्रत्येक कर्ण्याद्वारे जो नाद निनादविला गेला त्याचा पाठपुरावा महत्वपूर्ण संदेशाची जाहीर घोषणा सर्वत्र करुन करतात.
कर्ण्याच्या निनादांचा काय अर्थ होतो
३. सात कर्ण्यांच्या निनादाचा काय अर्थ होतो?
३ या कर्ण्यांचा निनाद आपल्याला, यहोवाने मोशेच्या काळी मिसरावर ज्या पीडा पाठविल्या त्यांचे स्मरण देतो. या पीडा, ते पहिले जागतिक साम्राज्य व त्याचा खोटा धर्म यावर यहोवाने आणलेल्या न्यायदंडाचे वक्तव्य करीत होत्या. पण यामुळेच देवाच्या लोकांसाठी सुटकेचा मार्गदेखील मोकळा झाला. याचप्रकारे, प्रकटीकरणात निनादलेले कर्णे हे, सैतानी जगत व त्याचा खोटा धर्म यांजवर असणाऱ्या आधुनिक काळच्या पीडा आहेत. तथापि, ह्या खरोखरीच्या पीडा नसून यहोवाच्या अग्निमय न्यायदंडाचे पीडा देणारे संदेश आहेत. यांच्यामुळे देखील देवाच्या लोकांसाठी सुटकेचा मार्ग समजून येतो.
४. सात कर्ण्यांच्या निनादाची आमच्या काळात कशी पूर्णता दिसली?
४ या सात कर्ण्यांच्या निनादाच्या अनुरोधाने, यहोवाच्या लोकांच्या १९२२ ते १९२८ पर्यंत झालेल्या सात खास वार्षिक अधिवेशनात कठीण प्रहार करणारे ठराव संमत करण्यात आले. या ठरावांच्या हजारो प्रतींचे वितरण करण्यात आले. परंतु या पीडात्मक संदेशाचा डंख फक्त त्या वर्षांपुरताच मर्यादित नव्हता तर तो या शेवटल्या दिवसात चालूच राहिला. आता, आज त्याच्या जाहीर प्रकटनाचा जोर अधिकच वाढता आहे. कारण जे आधी पहिल्या जागतिक महायुद्धानंतर प्रचार करीत होते त्या अभिषिक्त जणांच्या छोट्या गटाला “मोठा लोकसमुदाय” वर्गाच्या लाखोंचा सूर मिळाला असल्यामुळे तो आवाज अधिक भरदार बनला आहे. (प्रकटीकरण ७:९) आता दरवर्षीं वाढती संख्या व वाढते बळ असल्यामुळे हे लाखोजण, सैतानाचे जग नाशाच्या खाईत लोटले जाणार आहे असे मोठ्या आवेशाने सांगत आहेत.
५. ज्याचा प्रथमतः प्रतिकूल न्यायदंड केला जातो तो जगाचा “तिसरा भाग” कोणता आहे, व का?
५ प्रकटीकरण ८:६-१२ मध्ये पहिल्या चार कर्ण्यांचा निनाद होतो. तेव्हा गारा, अग्नि व रक्त यांचा वर्षाव झाला व त्यामुळे जगाचा “तिसरा भाग” उध्वस्त झाला. सध्याचे हे दोषी जग प्रतिकूल न्यायदंडास पात्र असताना, त्याचा “तिसरा भाग” असे येथे का म्हणण्यात आले? कारण वस्तुतः देवाच्या दृष्टीने सबंध सैतानी व्यवस्थीकरण दोषी असले तरी त्यातील एक भाग अधिकांशाने दोषयुक्त आहे. हा कोणता भाग बरे? ज्याने ख्रिस्ताचे नाव स्वतःला लावून घेतले आहे तोच भाग म्हणजे ख्रिस्ती धर्मराज्य. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर जेव्हा या ख्रिस्ती धर्मराज्याविरुद्ध देवाचा न्यायदंडाचा संदेश आला तेव्हा त्याच्या साम्राज्याने मानवजातीचा एक तृतीयांश भाग व्यापला होता.
६. यहोवाने ख्रिस्ती धर्मराज्याचा नाशासाठी परित्याग का केला आहे?
६ खऱ्या ख्रिस्ती धर्मात धर्मत्याग घडणार असे जे येशू व त्याच्या शिष्यांनी भाकित केले होते त्याच्या १,९०० वर्षांची निष्पत्ती म्हणजे ख्रिस्ती धर्मराज्याचा धर्म होय. (मत्तय १३:२४-३०; प्रे. कृत्ये २०:२९, ३०) ख्रिस्ती धर्मराज्याचे पाळक स्वतःला ख्रिस्ती धर्माचे शिक्षक म्हणवतात, पण त्यांची शिकवली जाणारी तत्वे पवित्र शास्त्र सत्यापासून खूपच दुरावलेली आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कृतीमुळे देवाच्या नामाचा नेहमी उपमर्द होत आहे. २० व्या शतकातील युद्धांना पाठबळ दिल्यामुळे त्यांच्यावर आलेला रक्तदोष स्पष्टरित्या दिसत आहे. खरेच, ख्रिस्ती धर्मराज्य सैतानी व्यवस्थेचा मुळावलेला भाग आहे. याकरताचा त्याला यहोवाकडून प्रबळ व यातनामय संदेश मिळत आहेत व त्याद्वारे त्याच्यावर देवाची मर्जी नाही हे स्पष्ट होते. यहोवाने पहिल्या शतकात जसे यहुदी घरास नाशासाठी सोडून टाकले होते त्याचप्रमाणे त्याने ख्रिस्ती धर्मराज्याच्या घराला देखील नाशासाठी त्यागले आहे!—मत्तय २३:३८.
जगव्याप्त प्रचारासाठी जागृति
७, ८. (अ) प्रकटीकरणाच्या ९ व्या अध्यायात पाचव्या कर्ण्याचा नाद काय प्रकटवितो? (ब) टोळ कोणाला चित्रित करतात?
७ प्रकटीकरण ९:१ मध्ये पाचवा देवदूत करणा वाजवितो तेव्हा दृष्टांतात एक तारा आकाशातून पृथ्वीवर खाली येत आहे असे दिसते. या ताऱ्यापाशी किल्ली आहे. या किल्लीने तो एक खड्डा उघडतो. यात टोळ बंदिस्त आहेत. हा तारा नव्यानेच अधिष्ठित केलेला स्वर्गीय राजा येशू ख्रिस्त आहे. टोळ देवाचे सेवक आहेत. यांचा छळ झाला आणि जेव्हा १९१८ मध्ये त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांना कैदेत टाकण्यात आले तेव्हा जणू यांना नाहीसे केले गेले आहे असे वाटले. परंतु, स्वर्गात राज्याधिकार प्राप्त झालेला येशू ख्रिस्त त्यांची मुक्तता करतो ते अशासाठी की, त्यांनी पुन्हा जाहीररित्या जागतिक प्रचाराची सुरुवात करावी. ज्या पाळकवर्गाने हे कार्य समूळ नष्ट करण्याचा कट केला होता त्यांच्यासाठी ही एक धक्कादायक घटना होती.—मत्तय २४:१४.
८ प्रकटीकरण ९:७ या टोळाचे वर्णन असे देतेः “त्या टोळांचे स्वरुप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुगुटासारखे काहीतरी दिसत होते, त्यांचे तोंडावळे माणसासारखे होते.” १० वे वचन पुढे सांगतेः “त्यांस विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत.” हे टोळ पुनरुज्जीवित झालेल्या आणि १९१९ पासून पुढे आध्यात्मिक लढतीत सरसावलेल्या राज्य वारसांच्या शेषांना चित्रित करतात. त्यांनी नव्याने शक्ती संपादित करून खासपणे भ्रष्ट अशा ख्रिस्ती धर्मराज्यास दंशपूर्ण संदेश वदविला.
९, १०. (अ) सहाव्या कर्ण्याचा निनाद काय प्रकटवितो? (ब) अगणित अशा प्रबळ घोड्यांच्या समूहात कशाचा समावेश आहे?
९ पुढे, सहावा देवदूत कर्णा वाजवितो. (प्रकटीकरण ९:१३) यावेळी घोडदळ सैन्य बाहेर पडते. १६ वे वचन सांगते की, त्यांची संख्या “दोन अयुतांची अयुते” म्हणजे २० कोटी होती! यांचे आणखी वर्णन १७ व १९ व्या वचनांत असे आहेः “त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती, आणि त्यांच्या तोंडातून अग्नि, गंधक व धूर निघत होता. . . . त्यांची शेपटे सापासारखी . . . आहेत.” हे सैन्य, राजा येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली कडाडून पुढे सरसावते. त्यांचे हे दृश्य केवढे भयानक आहे!
१० हे प्रबळ घोडे कोणाचे प्रतिनिधित्व करतात? त्यांची संख्या लाखांनी असल्यामुळे ते अभिषिक्त शेषांचे चित्र ठरु शकत नाहीत, कारण आज पृथ्वीभरात केवळ ८,८०० इतकेच या वर्गाचे लोक आहेत. या कारणास्तव त्या घोडदळात प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायाचा “मोठा लोकसमुदाय”, ज्याला पृथ्वीवर सदासर्वदा जगण्याची आशा आहे अशांचा जरुर समावेश असला पाहिजे. पवित्र शास्त्रात “अयुते” हा शब्द नेहमी प्रचंड व अमर्याद संख्येला अनुलक्षून वापरलेला आहे. यामुळेच, त्या लाक्षणिक घोड्यांत, मावळत चाललेल्या अभिषिक्त जनांच्या संख्येचाच नव्हे तर “दुसरी मेंढरे” वर्गाचा “मोठा लोकसमुदाय” याच्या लाखोंच्या संख्येचा समावेश आहे. ते टोळांप्रमाणे असणाऱ्या अभिषिक्त शेषांनी आरंभिलेले काम जाहीरपणे पुढे नेत आहेत.—योहान १०:१६.
११. “घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात आहे” असे का म्हणण्यात आले, आणि ‘ते आपल्या शेपटांनी कसा उपद्रव करतात’?
११ प्रकटीकरण ९:१९ म्हणतेः “त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे, . . . आणि [त्या शेपटांनी] ते उपद्रव करतात.” त्यांची ही शक्ती त्यांच्या तोंडात कोणत्या अर्थी आहे? ते असे की, आज कित्येक दशकापासून देवाच्या सेवकांना ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा व इतर सभांद्वारे आपल्या मुखाने देवाच्या न्यायदंडाचा संदेश कसा सांगावा याचे शिक्षण मिळाले आहे. पण ते आपल्या शेपटाने कसा उपद्रव देतात? ते असे की त्यांनी जगभरात करोडो प्रकाशनांचे वितरण करुन मागे दंशपूर्ण संदेश सोडला आहे. त्यांच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्यांना हे घोडदळ खऱ्या अर्थाने अयुतांची अयुते वाटते.
१२. लाक्षणिक टोळ व घोड्यांनी काय करणे चालूच ठेवले पाहिजे आणि कोणत्या परिणामासह?
१२ देवाचा सूड घेण्याचा दिवस समीप येत असता लाक्षणिक टोळांनी व लाक्षणिक घोड्यांनी हा संदेश स्पष्टरित्या व मोठ्याने निनादविला पाहिजे. राज्याची ही घोषणा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना पृथ्वीवरील सर्वोत्तम वार्ता ठरते, पण ज्यांना सैतानी जग पसंत आहे अशांना ती वाईट वार्ता आहे कारण त्याचा अर्थ, त्यांचे जग लवकरच नष्ट होणार आहे, असा होतो.
१३. सातव्या कर्ण्याच्या निनादासोबत संबंधित असणारा “तिसरा अनर्थ” काय आहे, व तो “अनथ” कसा आहे?
१३ पीडा देणारे टोळ आणि घोडदळ यांचे वर्णन अनुक्रमे पहिला व दुसरा इश्वरी “अनर्थ” असे करण्यात आले. (प्रकटीकरण ९:१२; ११:१४) पण मग, “तिसरा अनर्थ” काय आहे? प्रकटीकरण १०:७ मध्ये आम्हाला सांगण्यात आले आहेः “सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात . . . देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना सुवार्ता सांगितली, तदनुसार त्याचे गूज पूर्ण होईल.” या पवित्र गुजात एदेनमध्ये प्रथमच भाकित करण्यात आलेल्या “संतति”चा समावेश आहे. (उत्पत्ती ३:१५) हे “संतान” प्रामुख्यत्वे येशू, तर दुय्यम स्थानावर, स्वर्गात त्याच्यासोबत राज्य करणारे त्याचे अभिषिक्त सहकारी आहेत. यास्तव, हे पवित्र गूज देवाच्या स्वर्गीय राज्यासंबंधाने आहे. हे राज्य तिसरा इश्वरी “अनर्थ” आणणार, कारण तेच सैतानी जगतावरील देवाच्या न्यायदंडाची परिपूर्ती करणार आहे.
राज्य स्थापित झाले आहे
१४. प्रकटीकरण ११:१५ मधील सातव्या कर्ण्याच्या नादाने काय घोषित केले?
१४ आता पहा, तेच घडते! प्रकटीकरण ११:१५ म्हणतेः “सातव्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या, त्या म्हणाल्याः ‘जगाचे राज्य आमच्या प्रभु [यहोवा] चे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.’” होय, ख्रिस्ताद्वारे असलेल्या देवाच्या राज्याची सरतेशेवटी, १९१४ या महत्वपूर्ण वर्षी स्थापना झाली अशी घोषणा झाली. पहिल्या जागतिक युद्धानंतर जेव्हा शेषांचे पुनरुज्जीवन झाले तेव्हा त्यांनी ही वार्ता सामोरी आणली.
१५. १९२२ मध्ये कोणत्या घटनेने राज्य प्रचाराची नवी लाट उसळली गेली?
१५ अमेरिकेत, सीडर पॉईंट, ओहायो येथे १९२२ मध्ये झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनात हजारोंनी ही शिरशिरी भरविणारी घोषणा ऐकलीः “हा सर्वात मोठा दिवस आहे. पहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधि आहात. या कारणास्तव, राजा व त्याचे राज्य यांची जाहीर घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा!” यामुळे जाहीरपणे राज्याचा प्रचार करण्याची लाट उसळली गेली आणि त्यात सात दिव्यदूतांच्या कर्ण्यांनी घोषित केलेला न्यायदंडही समाविष्ट करण्यात आला. आज जवळजवळ ३५ लाखाच्या जवळपास आलेले यहोवाचे सेवक जगभरातील ५५ हजार मंडळ्यातून राज्य-प्रचाराच्या या जगव्याप्त कामात सहभागी होत आहेत. ही खरीच अयुते आहेत!
१६. सातव्या कर्ण्याच्या नादाकरवी आणखी कोणत्या घटना स्वर्गात व पृथ्वीवर घडल्या असे प्रकटीकरणाचा १२ वा अध्याय सांगतो?
१६ तरीपण सातव्या देवदूताला आणखी काही प्रकट करावयाचे आहे. प्रकटीकरण १२:७ म्हणते की, त्यावेळी “स्वर्गात युद्ध सुरु झाले.” वचन ९ आम्हाला ख्रिस्त या राजाने केलेल्या कृतीचा परिणाम सांगतेः “तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.” १२ वे वचन पुढे म्हणतेः “यास्तव, स्वर्गांनो व त्यात वसणाऱ्यांनो, उल्लास करा!” होय, स्वर्गातून सैतानाचा प्रभाव समूळ काढून टाकल्यामुळे विश्वासू देवदूतांमध्ये मोठा आनंद दिसला. पण याचा मानवजातीकरता काय अर्थ झाला? तेच वचन असे उत्तर देतेः “पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”
१७. जागतिक सरकारला प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायात “श्वापद” या रुपात चित्रित केले ते योग्य का आहे?
१७ प्रकटीकरण १२:३ सैतानाचे वर्णन “एक मोठा अग्निवर्ण अजगर व त्याला सात डोकी व दहा शिंगे” आहेत असे विक्राळ हिंस्र श्वापदासारखे करते. या वर्णनावरुन हे दिसते की तो, ज्याविषयीचे वर्णन अध्याय १३ आणि १ व २ वचनात आहे त्या पृथ्वीवरील राजकारणी “श्वापद” याचा रचनाकार आहे. या श्वापदाला देखील सैतानाच्या नमुन्याप्रमाणेच सात डोकी व दहा शिंगे आहेत. २ रे वचन म्हणतेः “त्या (श्वापदा) ला अजगराने [सैतान] आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.” राजकारणी सरकारांना श्वापदाच्या रुपात चित्रित करणे हे अगदीच योग्य आहे, कारण या २० व्या शतकातच राष्ट्रांच्या युद्धात १० कोटीपेक्षा अधिक लोकांची हत्या घडली.
१८. प्रकटीकरण १३:११ मधील दोन शिंगे असणारे श्वापद कोण आहे आणि त्याच्या हालचाली त्याची कशी ओळख देतात?
१८ प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायाच्या पुढी दृश्यात ११ वे वचन सांगते त्याप्रमाणे “दुसरे एक श्वापद वर (आले); त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती व ते अजगरासारखे बोलत होते.” हे दोन शिंगे असणारे श्वापद अँग्लो-अमेरिकन राजकीय जोडसत्ता आहे, ती दिसायला जणू कोकरासारखी म्हणजे, सालस वा गरीब दिसते आणि स्वतःला अधिक तेजोमयपणा असणारे सरकार असल्याचे भासविते. तथापि, ते अजगरासारखे म्हणजे सैतानासारखे बोलते व त्याला “दुसरे श्वापद” म्हटले आहे ते यासाठी की त्याच्या अधिपत्य गाजविण्याच्या हालचाली पशुसारख्याच आहेत. जेथे कोठे त्याचे अधिपत्य मानले जात नाही तेथे तेथे ते दबाव आणते, धमकी देते आणि हिंसाचारसुद्धा करते. ते देवाच्या राज्याला अधीन व्हा असे सांगत नाही, उलट, ते सैतानी जगताच्या दास्यात आहे. याच कारणास्तव १४ वे वचन म्हणते की, “तू पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकविते.”
१९, २०. (अ) यहोवाच्या सेवकांनी राखलेली सचोटी काय प्रदर्शित करते? (ब) सैतानी जगतावर अभिषिक्त शेष खात्रीने विजयी होतील हे आम्हाला कसे समजते?
१९ असे हे सैतानाच्या अधिपत्याखाली असणारे जग, येशूने, खऱ्या ख्रिश्चनांना दिलेल्या आज्ञेच्या अनुमतात जे या जगाचे भाग नाहीत, त्यांना जीवन व्यतित करण्यास मोठे अवघड स्थळ आहे. (योहान १७:१६) या कारणास्तव, जरी प्रखर विरोध, छळ होत असला आणि मरावे लागले तरीही देवाचे सेवक जगभरात आपली सचोटी व ऐक्यता अबाधित राखून यहोवाचे अद्वितीय नाम व त्याचे नीतीमान मार्ग उंचावत आहेत. हा यहोवाच्या सामर्थ्याचा व आशीर्वादाचा लक्षणीय पुरावा आहे.
२० अभिषिक्त शेष हे ख्रिस्तासोबत सहअधिपती होणार असल्यामुळे तेच खासपणे सैतानाचे निशाण बनले आहेत. पण प्रकटीकरणाचा १४ वा अध्याय दाखवितो की राज्य सत्तेत ख्रिस्तासोबत १,४४,००० ची पूर्ण संख्या विजयोत्सवाने गोळा करण्यात आली आहे. ते आपल्या धन्यास निष्ठावंत जडून राहिले आहेत, कारण ४ थे वचन म्हणतेः “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत.” सैतानाने कितीही निष्ठुरतेने छळ केला तरीही ते तोच मार्ग अवलंबतात.
प्रथम देवाचे न्यायदंड पूर्ण झाले पाहिजेत
२१, २२. (अ) प्रकटीकरण १४:७, ८ मध्ये दिव्यदूत कोणती घोषणा करतात? (ब) धार्मिक बाबेल अद्याप अस्तित्वात असताना देवदूत त्याच्या पतनाविषयीची घोषणा का करतो?
२१ प्रकटीकरण १४:७ मध्ये एक देवदूत मोठ्याने ओरडून सांगतोः “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा.” पण, कोणाला प्रथम देवाकडिल प्रतिकूल न्यायदंड मिळतो? ८ वे वचन सांगतेः “त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणलाः ‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्माबद्दलच्या क्रोधरुपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.’” येथे पहिल्यांदाच प्रकटीकरण “मोठी बाबेल” म्हणजे जगव्याप्त खोट्या धर्माचे भाष्य करते.
२२ वस्तुतः धर्म हा अद्याप पृथ्वीच्या कित्येक भागावर आपले प्रभुत्व राखून आहे तर मग देवदूताने मोठी बाबेल जणू आधीच पडली आहे अशी घोषणा का केली बरे? जरा विचार करा की मागे इ. स. पूर्वी ५३९ मध्ये जेव्हा प्राचीन बाबेलोन पडले पण तेव्हाच त्याचा संपूर्ण नाश झाला नव्हता तेव्हा काय घडले होते बरे? त्यावेळी यहोवाच्या बंदिवान सेवकांची सुटका होऊन ते आपल्या स्वगृही परतून त्यांनी खऱ्या उपासनेची पुनर्स्थापना केली नव्हती का? याचप्रमाणे १९१९ मध्ये देवाच्या सेवकांचे पुन्हा नव्याने कार्य सुरु करण्यासाठी पुनर्वसन करण्यात आले व तेथून पुढे त्यांची आध्यात्मिक समृद्धी होत राहिली हे याचा स्पष्ट पुरावा आहे की तेव्हा म्हणजे १९१९ मध्ये यहोवाच्या दृष्टीने मोठ्या बाबेलला खाली कोसळण्याचा अनुभव आला. तेथेच यहोवाने तिला, तिचा नंतर समूळ नाश होईल या अर्थी धिक्कारले.
२३. (अ) मोठ्या बाबेलच्या नाशाचा मार्ग कसा तयार होत आहे? (ब) टेहळणी बुरुज याच्या पुढील अंकात कोणत्या भविष्यवादांची चर्चा आढळेल?
२३ समोर सर्वनाश उभा आहे की काय म्हणूनच आधुनिक बाबेल आत्ताच मोठ्या त्रासात अडकली आहे. तिचा भ्रष्टाचार, महामूर अनैतिकता, अप्रामाणिकता व राजकारणात लुडबुडणे हे आता सर्वत्र उघड होत आहे. आता बहुतेक युरोप खंडात चर्चला जाणारे कोणी असतील तर ते फारच थोडे लोक आहेत. कित्येक समाजसत्तावादीय देशात धर्म हा “लोकांना नशेत ठेवणाऱ्या अफुप्रमाणे” वाटू लागला आहे. याखेरीज, देवाच्या सत्य वचनावर उत्कट प्रीति प्रदर्शित करणाऱ्यांच्या नजरेत मोठी बाबेल ही खूपच ओंगळ बनली आहे. तर आता, जणू फाशीच्या रांगेतील तिचा नंबर आलाच आहे व मृत्यु तिची वाट पाहत आहे या अर्थी ती थांबून आहे. होय, जगासाठी दृश्य भेदारुन टाकणाऱ्या घटना घडण्याचा “नेमलेला समय जवळ आला आहे.” यानंतर टेहळणी बुरुज च्या पुढील अंकातील अभ्यासाच्या लेखात ही धार्मिक “वेश्या” त्याचप्रमाणे सैतानाच्या सबंध व्यवस्थीकरणावर येऊ घातलेल्या नाशाविषयी प्रकटीकरणातील भविष्यवाद जी माहिती देतात त्याविषयीची चर्चा करण्यात येईल.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ प्रकटीकरणाच्या ८ व्या अध्यायापासून सुरु होणाऱ्या सात कर्ण्यांच्या निनादाचा आज आमच्या काळासाठी कोणता अर्थ होतो?
◻ ख्रिस्ती धर्मराज्याला पहिल्यांदा प्रतिकूल न्यायदंड का मिळणार आहे?
◻ अभिषिक्त शेष व “मोठा लोकसमुदाय” यांच्याकरवीच्या प्रचार कार्याचे वर्णन प्रकटीकरणाच्या ९ व्या अध्यायात कसे केले आहे?
◻ प्रकटीकरण ११:१५ मध्ये केलेल्या घोषणेचा स्वर्ग व पृथ्वी यांच्यासाठी कोणता अर्थ झाला?
◻ प्रकटीकरण १४:८ मध्ये वर्णिल्यानुसार धार्मिक बाबेलोनचे १९१९ मध्ये कसे पतन घडले, आणि याचा तिच्यासाठी काय अर्थ होतो?