वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १२/१ पृ. १४-१९
  • प्रकटीकरणाच्या वाचकांनो, आशीर्वादित व्हा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रकटीकरणाच्या वाचकांनो, आशीर्वादित व्हा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्त मंडळ्यांना निर्देशित करतो
  • यहोवाच्या सार्वभौम राजपदाला आनंदाने आज्ञांकित होणे
  • ह्‍या पुस्तकातील संदेशवचने पाळणारे आशीर्वादित
  • प्रकटीकरण आणि तुम्ही
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • लवकरच घडल्या पाहिजेत अशा गोष्टी
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • प्रकटीकरणातील “सुवार्ता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १२/१ पृ. १४-१९

प्रकटीकरणाच्या वाचकांनो, आशीर्वादित व्हा!

“या भविष्यवादाचे शब्द जो वाचतो आणि जे ऐकतात आणि त्यांत लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते आशीर्वादित आहेत.”—प्रकटीकरण १:३, पं.र.भा.

१. प्रेषित योहानाने कोणत्या परिस्थितीत प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले आणि यातील अनेक दृष्टान्त कोणत्या हेतूने लिहून ठेवण्यात आले?

“मीयोहान . . . देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर पात्म नावाच्या बेटात होतो.” (प्रकटीकरण १:९) रोमन सम्राट डॉमिशियन (सा.यु. ८१-९६) याने त्याच्या राज्यात सम्राटाची उपासना करण्याचा कायदा सक्‍तीचा केला होता आणि सम्राटाची उपासना न करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांचा तो छळ करत असे. त्याच्याच राज्यात प्रेषित योहानाला पात्म बेटावर हद्दपार करण्यात आले होते. अशा परिस्थितीत योहानाने अपोकॅलिप्स, अर्थात प्रकटीकरण हे पुस्तक लिहिले. पात्म बेटावर असताना योहानाला अनेक दृष्टान्त झाले आणि त्याने ते लिहून ठेवले. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना दहशत बसावी या हेतूने त्याने या गोष्टी कळवल्या नाहीत. उलट, त्यांना धैर्य आणि सांत्वन मिळावे तसेच ज्या परीक्षांना ते तोंड देत होते आणि ज्या परीक्षा पुढे त्यांच्यावर येणार होत्या त्यांना तोंड देण्यासाठी त्यांचे मन बळकट व्हावे या उद्देशाने योहानाने त्यांना या गोष्टी कळवल्या होत्या.—प्रेषितांची कृत्ये २८:२२; प्रकटीकरण १:४; २:३, ९, १०, १३.

२. योहान आणि त्याच्यासोबतच्या इतर ख्रिस्ती बांधवांची परिस्थिती लक्षात घेणे आजच्या ख्रिस्ती लोकांसाठी का महत्त्वाचे आहे?

२ बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिण्यात आले तेव्हा काय परिस्थिती होती हे जाणून घेणे आजच्या ख्रिश्‍चनांकरता अतिशय महत्त्वाचे आहे. योहानाचा छळ करण्यात येत होता कारण त्याने यहोवाची आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताची साक्ष दिली होती. तसे पाहिल्यास, योहान आणि त्याचे सोबती चांगल्या नागरिकाची सर्व कर्तव्ये पार पाडत होते; पण सम्राटाची उपासना करणे त्यांना शक्य नव्हते. आणि या कारणास्तव त्यांना बाकीच्या लोकांचे शत्रुत्व पत्करावे लागले. (लूक ४:८) आजही काही देशांमध्ये जेव्हा सरकार “धार्मिकरित्या उचित-अनुचित” काय आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खऱ्‍या ख्रिश्‍चनांना अशाच परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रकटीकरणाचे अगदी सुरवातीचेच शब्द अतिशय सांत्वन देणारे आहेत. “या भविष्यवादाचे शब्द जो वाचतो आणि जे ऐकतात आणि त्यांत लिहलेल्या गोष्टी पाळतात ते आशीर्वादित आहेत, कारण समय जवळ आला आहे.” (प्रकटीकरण १:३, पं.र.भा.) होय, प्रकटीकरणाचे पुस्तक लक्ष देऊन वाचणाऱ्‍यांना आणि त्यातील मार्गदर्शनाचे पालन करणाऱ्‍यांना खरा आनंद आणि उदंड आशीर्वाद मिळेल.

३. योहानाला प्रकटीकरण मुळात कोणी केले?

३ हे प्रकटीकरण मुळात कोणाचे आहे आणि कोणाच्या माध्यमाने ते करण्यात आले? पहिल्याच वचनात सांगितले आहे: “येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण: हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्‍याला कळविले.” (प्रकटीकरण १:१) सोप्या शब्दांत, प्रकटीकरण मुळात यहोवा देवाचे आहे; त्याने ते येशूला दिले आणि येशूने एका देवदूताच्या माध्यमाने ते योहानाला कळवले. तसेच येशूनेही पवित्र आत्म्याच्या माध्यमाने मंडळ्यांना संदेश दिले आणि योहानाला दृष्टान्त दिले; हे आपल्याला पुढच्या काही वचनांकडे लक्ष दिल्यास कळून येईल.—प्रकटीकरण २:७, ११, १७, २९; ३:६, १३, २२; ४:२; १७:३; २१:१०; पडताळा प्रेषितांची कृत्ये २:३३.

४. यहोवा आजही कोणाच्या माध्यमाने पृथ्वीवर असलेल्या आपल्या लोकांना मार्गदर्शन पुरवतो?

४ “मंडळीचे मस्तक” असलेल्या आपल्या पुत्राद्वारे यहोवा आजही त्याच्या सेवकांचे मार्गदर्शन करतो. (इफिसकर ५:२३; यशया ५४:१३; योहान ६:४५) तसेच आपल्या लोकांना ज्ञान देण्याकरता यहोवा त्याच्या आत्म्याचाही उपयोग करतो. (योहान १५:२६; १ करिंथकर २:१०) आणि ज्याप्रमाणे येशूने पहिल्या शतकातल्या मंडळ्यांना “आपला दास योहान” याच्या माध्यमाने आध्यात्मिकरित्या पोषक असे अन्‍न पुरवले होते, त्याचप्रमाणे आज तो ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ (पृथ्वीवर असणारे येशूचे अभिषिक्‍त ‘बंधू’) यांच्या माध्यमाने त्याच्या परिवाराला व या परिवारासोबत सहवास राखणाऱ्‍या सर्वांना आध्यात्मिक अन्‍न “यथाकाळी खावयास” देत आहे. (मत्तय २४:४५-४७; २५:४०) आपल्याला मिळणारे आध्यात्मिक अन्‍न आणि ते पोहंचवण्याकरता उपयोगात येणारे माध्यम या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळालेल्या “उत्तम देणग्या” आहेत; या देणग्या मुळात यहोवाकडून मिळालेल्या आहेत हे ओळखून जे त्याचा स्वीकार करतात ते आशीर्वादित आहेत.—याकोब १:१७.

ख्रिस्त मंडळ्यांना निर्देशित करतो

५. (अ) ख्रिस्ती मंडळ्या आणि या मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍यांची कशाशी तुलना केली आहे? (ब) मनुष्य हा मुळातच अपरिपूर्ण असला तरीसुद्धा, काय लक्षात घेतल्यास आपण आनंदी राहू शकू?

५ प्रकटीकरणाच्या सुरवातीच्या काही अध्यायांत, ख्रिस्ती मंडळ्यांची तुलना समयांशी करण्यात आली आहे. आणि मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍यांना दूत आणि तारे म्हणण्यात आले आहे. (प्रकटीकरण १:२०)a येशू ख्रिस्त स्वतःविषयी योहानाला असे लिहिण्यास सांगतो: “जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करितो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो.” (प्रकटीकरण २:१) आशियातील सात मंडळ्यांना पाठवलेल्या सात संदेशांतून दिसून येते, की सा.यु. पहिल्या शतकातील या मंडळ्यांमध्ये आणि या मंडळ्यांच्या वडिलांमध्ये काही जमेच्या बाजू होत्या आणि काही त्रुटी देखील होत्या. आजही परिस्थिती वेगळी नाही. पण ख्रिस्त हा मंडळ्यांच्या मस्तकपदी असून तो मंडळ्यांमध्ये उपस्थित असतो हे सत्य नेहमी ध्यानात ठेवल्यास आपण अधिक आनंदी होऊ शकतो. मंडळ्यांमध्ये काय चालले आहे याचे त्याला पूर्ण ज्ञान आहे. एका लाक्षणिक अर्थाने मंडळ्यांची देखरेख करणारे त्याच्या “उजव्या हातात” आहेत; याचा अर्थ ते त्याच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करतात आणि मंडळ्यांची ते ज्याप्रकारे देखभाल करतात त्याविषयी त्यांना जाब द्यावा लागेल.—प्रेषितांची कृत्ये २०:२८; इब्री लोकांस १३:१७.

६. केवळ मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍यांनाच ख्रिस्ताला जाब द्यायचा नाही असे का म्हणता येईल?

६ पण केवळ मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍यांनाच ख्रिस्ताला जाब द्यावा लागेल असे आपण समजत असू तर आपण स्वतःची फसवणूक करत आहोत. कारण एका संदेशात ख्रिस्त म्हणतो: “सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणे ह्‍यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.” (प्रकटीकरण २:२३) असे म्हणताना ख्रिस्त आपल्याला ताकीद देतो आणि आपले सांत्वनही करतो. ताकीद अशी, की ख्रिस्त आपल्या अंतःकरणाच्या तळाशी असणारे हेतू, इच्छा-आकांक्षा ओळखतो. आणि सांत्वन असे, की ख्रिस्ताला आपल्या प्रांजळ प्रयत्नांची जाणीव आहे आणि आपल्या परीने होईल तितके, म्हणजे आपले सर्वस्व देऊन आपण त्याची सेवा केली तर तो निश्‍चितच आपल्याला आशीर्वादित करेल.—मार्क १४:६-९; लूक २१:३, ४.

७. फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांनी ‘धीराविषयीचे येशूचे वचन’ कशाप्रकारे राखले होते?

७ लुदिया राज्यातील फिलदेल्फिया शहराच्या मंडळीला ख्रिस्ताने जो संदेश दिला त्यात त्याने त्यांना कोणताही दोष दिला नाही; पण या संदेशात तो एक अभिवचन देतो आणि ते आपल्याकरता अतिशय अर्थपूर्ण आहे. “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनहि मी तुला राखीन.” (प्रकटीकरण ३:१०) या आधीच्या ८ व्या वचनात सांगितल्याप्रमाणे फिलदेल्फियाच्या ख्रिश्‍चनांनी ख्रिस्ताच्या आज्ञा तर पाळल्याच होत्या शिवाय विश्‍वासूपणे धीर धरण्याविषयी त्याच्या मार्गदर्शनाचेही त्यांनी पालन केले होते.—मत्तय १०:२२; लूक २१:१९.

८. (अ) फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांना येशूने कोणते अभिवचन दिले? (ब) “परीक्षेची घटका” आज कोणावर आहे?

८ येशूने पुढे म्हटले, की ‘परीक्षाप्रसंगापासून [‘परीक्षेच्या घटकेपासून,’ पं.र.भा.] मी तुला राखीन.’ त्या काळच्या ख्रिश्‍चनांवर कोणत्या प्रकारचा परीक्षाप्रसंग आला होता हे आपल्याला आज ठाऊक नाही. सा.यु. ९६ मध्ये डॉमिशियनच्या मृत्यूनंतर काही काळ सर्वकाही ठीक चालले होते, पण ट्राजन (सा.यु. ९८-११७) सम्राटाच्या राज्यात पुन्हा एकदा ख्रिश्‍चनांचा छळ होऊ लागला. यामुळे निश्‍चितच पुढे अनेक परीक्षाप्रसंग त्या ख्रिश्‍चनांवर आले असतील. पण सर्वात मोठी “परीक्षेची घटका” येते ती ‘प्रभूच्या दिवसात,’ किंवा ‘अंतसमयादरम्यान’ म्हणजेच आपल्या या काळात. (प्रकटीकरण १:१०; दानीएल १२:४) पहिल्या महायुद्धादरम्यान आणि त्याच्यानंतरच्या काही वर्षांपर्यंत आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या ख्रिश्‍चनांना अतिशय आव्हानात्मक परीक्षाप्रसंगातून जावे लागले होते. पण “परीक्षेची घटका” अद्याप संपलेली नाही. ‘सर्व जगाला’ अर्थात मोठ्या संकटातून बचाव होण्याची आशा बाळगणाऱ्‍या लाखो लोकांच्या मोठ्या लोकसमुदायाला या परीक्षेच्या घटकेला सामोरे जायचे आहे. (प्रकटीकरण ३:१०; ७:९, १४) “जो शेवटपर्यंत टिकून राहील [धीर धरेल] तोच तरेल,” असे येशूने म्हटले होते; तेव्हा आपण ‘धीराविषयी येशूचे हे वचन राखल्यास’ आपल्याला नक्की आशीर्वाद प्राप्त होईल.—मत्तय २४:१३.

यहोवाच्या सार्वभौम राजपदाला आनंदाने आज्ञांकित होणे

९, १०. (अ) यहोवाच्या सिंहासनाचा दृष्टान्त वाचून आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे? (ब) प्रकटीकरणाचे पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे आनंद मिळू शकतो?

९ प्रकटीकरणाच्या चवथ्या आणि पाचव्या अध्यायातील दृष्टान्तात यहोवाच्या सिंहासनाचे आणि त्याच्या स्वर्गीय दरबाराचे वर्णन वाचून आपले मन आदरयुक्‍त भयाने भरून आले पाहिजे. स्वर्गातील शक्‍तिशाली प्राणी कसे यहोवाच्या नीतिमान सार्वभौमत्त्वाला आनंदाने अधीन होऊन त्याची मनःपूर्वक स्तुती करतात ते वाचून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. (प्रकटीकरण ४:८-११) “राजासनावर बसलेला ह्‍याला व कोकऱ्‍याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम ही युगानुयुग आहेत” असा जयघोष करणाऱ्‍यांमध्ये आपण सामील झाले पाहिजे.—प्रकटीकरण ५:१३.

१० पण आपल्या दररोजच्या, नेहमीच्या जीवनात, प्रत्येक लहानसहान बाबतीत आनंदाने यहोवाच्या इच्छेनुसार पावले उचलण्याद्वारे आपण असे करू शकतो. प्रेषित पौलाने लिहिले: “जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभु येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुति करा.” (कलस्सैकर ३:१७) प्रकटीकरणाचे वाचन करून आपल्याला खऱ्‍या अर्थाने आनंदी व्हायचे असेल, तर आपण अगदी पूर्ण मनाने यहोवाचे सार्वभौमत्त्व स्वीकारले पाहिजे आणि जीवनातल्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीत त्याची इच्छा काय हे विचारात घेतले पाहिजे.

११, १२. (अ) सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थेला कशाप्रकारे मुळापासून हादरवून नष्ट केले जाईल? (ब) प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायानुसार, त्यावेळी कोणाच्याने “टिकाव धरवेल?”

११ यहोवाचे सार्वभौमत्व आनंदाने स्वीकारल्यानंतरच कोणत्याही व्यक्‍तीचे जीवन आनंदी बनू शकते आणि सबंध विश्‍वातही सुख-शांती येण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. येणाऱ्‍या दिवसांत एक प्रचंड लाक्षणिक भूकंप सैतानाच्या जागतिक व्यवस्थेला अगदी मुळापासून हादरून टाकेल आणि तिचा संपूर्ण विनाश करेल. देवाच्या न्याय्य सार्वभौमत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्याचे अधिपत्य जे लोक स्वीकारू इच्छित नाहीत अशांना तेव्हा शोधूनही आश्रय सापडणार नाही. याविषयी अशी भविष्यवाणी आहे: “पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, गुहांत व डोंगरांतील खडकांतून लपली; आणि ते डोंगरांस व खडकांस म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्‍याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”—प्रकटीकरण ६:१२, १५-१७.

१२ कोणाच्याने टिकाव धरवेल या प्रश्‍नाचे उत्तर प्रेषित योहान पुढच्या अध्यायात देतो; यात तो मोठ्या संकटातून बचावलेल्या आणि ‘राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभे राहिलेल्या’ मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांचे वर्णन करतो. (प्रकटीकरण ७:९, १४, १५) ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत याचाच अर्थ ते देवाच्या राजपदाला मान देतात आणि त्याच्या सार्वभौमत्त्वाचा पूर्ण मनाने स्वीकार करतात. आणि म्हणूनच ते देवाच्या पसंतीस उतरले आहेत.

१३. (अ) पृथ्वीवर राहणारे अधिकांश लोक कशाची उपासना करतात आणि त्यांच्या कपाळावर किंवा त्यांच्या हातावर असलेली खूण काय दर्शवते? (ब) तर मग धीर धरणे का आवश्‍यक असेल?

१३ पण १३ व्या अध्यायातील वर्णनानुसार पृथ्वीवरील बाकीचे लोक एका श्‍वापदाला, अर्थात सैतानाच्या राजकीय व्यवस्थेला पुजतात. त्यांनी आपल्या “कपाळावर” किंवा “हातावर” खूण करून घेतली आहे; यावरून ते हेच दाखवून देतात, की सैतानाच्या व्यवस्थेला मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. (प्रकटीकरण १३:१-८, १६, १७) पुढे १४ व्या अध्यायात असे म्हटले आहे: “जो कोणी श्‍वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, तोहि देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल . . . देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्‍वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्‍यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्‍यातच आहे.” (प्रकटीकरण १४:९, १०, १२) येणाऱ्‍या काळात आपल्याला या प्रश्‍नाला वारंवार तोंड द्यावे लागेल: की आपण कोणाचे समर्थन करतो? यहोवाचे आणि त्याच्या सार्वभौमत्त्वाचे, की अधार्मिक राजकीय व्यवस्थेचे प्रतीक असणाऱ्‍या श्‍वापदाचे? जे लोक श्‍वापदाची खूण करून घेणार नाहीत आणि जे यहोवाच्या सार्वभौमत्वाला अधीन होऊन शेवटपर्यंत विश्‍वासूपणे धीर धरतील ते खरोखरच आनंदी लोक ठरतील.

१४, १५. हर्मगिदोनाचे वर्णन वाचताना मध्येच कोणता इशारेवजा संदेश वाचायला मिळतो आणि आपल्याकरता याचा काय अर्थ होतो?

१४ सार्वभौमत्वाचा प्रश्‍न सोडवण्याकरता लवकरच “संपूर्ण जगातील” राज्यकर्त्यांचा यहोवाशी आमनासामना होणार आहे. ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ अर्थात हर्मगिदोनात या वादाचा अखेरीस सोक्षमोक्ष होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) यहोवासोबतच्या या लढाईकरता जगातील राजांना कशाप्रकारे एकत्रित केले जाईल याविषयीचे वर्णन वाचताना, मध्येच आपल्याला एक लक्षवेधक गोष्ट वाचायला मिळते. स्वतः येशू या दृष्टान्तात प्रवेश करतो आणि म्हणतो: “पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य.” (प्रकटीकरण १६:१५) मंदिरात पहारा देण्याचे काम करणाऱ्‍या प्राचीन काळातील लेवीयांशी येशूने अप्रत्यक्ष तुलना केली असावी कारण पहारा देताना झोपलेल्या अवस्थेत आढळल्यास त्या व्यक्‍तीला सर्वांसमोर नग्न केले जात असे.

१५ ही आपल्याकरता एक स्पष्ट ताकीदच आहे: आपल्याला हर्मगिदोनातून बचावायचे असेल, तर आपण आध्यात्मिकरित्या जागृत राहिले पाहिजे आणि आपली लाक्षणिक वस्त्रे म्हणजेच यहोवा देवाचे विश्‍वासू साक्षीदार अशी जी आपली ओळख आहे ती आपण टिकवून ठेवली पाहिजे. आध्यात्मिक कार्यात सुस्त न होता, स्वर्गात स्थापन झालेल्या देवाच्या राज्याची “सार्वकालिक सुवार्ता” घोषित करण्यात आपण आवेशाने सहभाग घेत राहिलो तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील.—प्रकटीकरण १४:६.

ह्‍या पुस्तकातील संदेशवचने पाळणारे आशीर्वादित

१६. प्रकटीकरणाच्या शेवटल्या अध्यायांचे वाचन खासकरून इतके आनंददायक का आहे?

१६ प्रकटीकरणाचे आनंदी वाचक या पुस्तकाचे शेवटचे अध्याय वाचतात तेव्हा त्यांचा आनंद अगदी शिगेला पोचतो. नवे आकाश आणि नवी पृथ्वी स्थापन होण्याची आपली वैभवी आशा अखेरीस कशाप्रकारे पूर्ण होईल याविषयी शेवटच्या अध्यायांत आपल्याला वाचायला मिळते. म्हणजेच एक नीतिमान स्वर्गीय राज्य एका नव्या, निष्कलंक मानवी समाजावर राज्य करू लागेल आणि अशाप्रकारे ‘सर्वसमर्थ प्रभुची’ अर्थात यहोवा देवाची महिमा होईल. (प्रकटीकरण २१:२२) योहानाला दिसलेल्या अद्‌भुत दृष्टान्तांची मालिका संपुष्टात येते तेव्हा संदेश कळवणारा देवदूत त्याला म्हणतो: “ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत; आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभु त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या गोष्टी आपल्या दासांना कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पाहा, मी लवकर येतो. ह्‍या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य [आशीर्वादित].”—प्रकटीकरण २२:६, ७.

१७. (अ) प्रकटीकरण २२:६ येथे कोणते आश्‍वासन आहे? (ब) आपण कोणत्या गोष्टींना बळी पडण्यापासून सांभाळले पाहिजे?

१७ प्रकटीकरण पुस्तकाच्या आनंदी वाचकांना वरील शब्द या ‘पुस्तकाच्या’ सुरवातीला देखील वाचलेले आठवत असतील. (प्रकटीकरण १:१, ३) हे शब्द आपल्याला आश्‍वासन देतात, की बायबलच्या या शेवटल्या पुस्तकात भाकीत केलेल्या सर्व “गोष्टी” ‘लवकर घडून येतील.’ आपण अंतसमयाच्या अगदी शेवटल्या टप्प्यात येऊन पोचलो आहोत आणि प्रकटीकरणात भाकीत केलेल्या घटना आता लवकरच एकापाठोपाठ एक घडून येतील यात शंका नाही. सैतानाच्या या जगात सर्वकाही सुरळीत चालले आहे असे भासत असले तरीसुद्धा यामुळे आपण आपल्या कार्यात सुस्त होता कामा नये. प्रकटीकरण पुस्तकाचा सतर्क वाचक आशियातील सात मंडळ्यांना पाठवलेल्या प्रत्येक संदेशातून मिळणारी ताकीद लक्षात ठेवतो आणि भौतिकवाद, मूर्तिपूजा, अनैतिकता, आध्यामिक निरुत्साह आणि धर्मत्याग व मंडळीत फूट पाडण्याची प्रवृत्ती यांसारख्या गोष्टींना बळी पडण्यापासून स्वतःला सांभाळतो.

१८, १९. (अ) कशाकरता येशूला अद्याप यायचे आहे आणि योहानाने व्यक्‍त केलेली कोणती आशा आपणही बाळगतो? (ब) यहोवा कशासाठी ‘येईल’?

१८ प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशू बऱ्‍याच वेळा “मी लवकर येतो,” असे म्हणतो. (प्रकटीकरण २:१६; ३:११; २२:७, २०अ) येशू मोठ्या बाबेलवर, सैतानाच्या राजकीय व्यवस्थेवर आणि यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला (जे तो मशीही राज्याच्या माध्यमाने गाजवतो) न जुमानणाऱ्‍या सर्व लोकांवर न्यायदंड आणण्यासाठी येणार आहे. आपणही प्रेषित योहानासोबत म्हणतो: “आमेन. ये, प्रभु येशू, ये.”—प्रकटीकरण २२:२०ब.

१९ यहोवा स्वतः म्हणतो: “पाहा! मी लवकर येतो; आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.” (प्रकटीकरण २२:१२) देवाच्या अभिवचनानुसार, आपल्यापैकी काहीजण ‘नव्या आकाशात’ तर काही ‘नव्या पृथ्वीवर’ कधी न संपणाऱ्‍या जीवनाचे अद्‌भुत प्रतिफळ मिळण्याची वाट पाहात आहेत; पण दरम्यान आपण मोठ्या आवेशाने सर्व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना हे आमंत्रण दिले पाहिजे की ‘या! आणि तान्हेले येवोत; ज्याला पाहिजे त्यांनी जीवनाचे पाणी फुकट घेवोत.’ (प्रकटीकरण २२:१७) या लोकांनी देखील देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आणि आपल्यालाही प्रेरित करणारे प्रकटीकरणाचे पुस्तक वाचून खऱ्‍या अर्थाने आशीर्वादित व्हावे हीच आशा आपण करतो!

[तळटीपा]

a पाहा प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, पृष्ठे २८-९, १३६ (तळटीप).

उजळणीचे मुद्दे

◻ यहोवाने कोणाच्या माध्यमाने प्रकटीकरण केले आणि यावरून आपण काय शिकतो?

◻ आशियातील सात मंडळ्यांना लिहिलेले संदेश वाचण्यास आपल्याला आनंद का वाटला पाहिजे?

◻ ‘परीक्षेच्या घटकेपासून’ आपल्याला कशाप्रकारे बचावले जाईल?

◻ प्रकटीकरणाच्या पुस्तकातील वचने आपण पाळली तर आपण कशाप्रकारे आशीर्वादित होऊ?

[१५ पानांवरील चित्र]

प्रकटीकरणातली सुवार्ता मुळात कोणाकडून आहे हे ओळखणाऱ्‍यांना अनेक आशीर्वाद मिळतील

[१८ पानांवरील चित्र]

जो जागृत राहतो तो आशीर्वादित होईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा