तुम्हाला मौल्यवान खजिना मिळू शकतो!
“तुम्हाला काही दिसतं का?” असे त्या इंग्रज श्रीमंताने विचारले. “होय, खूपच अद्भूत गोष्टी,” असे मिसरी संस्कृतीचा शोध घेणाऱ्या संशोधकाने म्हटले. ती १९२२ सालची गोष्ट होती. हॉवर्ड कार्टरने इजिप्तच्या राजांच्या दरीतील फारो तुतनखामेनच्या थडग्यात नुकतेच डोकावले होते. कार्टरच्या शब्दांत उत्साह अगदी ओतप्रोत भरलेला दिसून येत होता.
“ज्यावेळी माझे डोळे प्रकाशाला सरावले तेव्हा त्या धुक्यातून खोलीतील वस्तू दिसू लागल्या. विचित्र प्राणी, पुतळे आणि सोने—सगळीकडे सोन्याचा झगमगाट दिसला. क्षणभर काळाचे चक्रचं थांबले असे वाटले. विस्मयाने तर मी स्तब्धचं झालो. एक खोली भरून किंवा एखाद्या प्रदर्शनाची खोली भरेल इतक्या वस्तूंचे दर्शन होईल असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. खजिन्याच्या शोध घेणाऱ्या एका शोधकाला वाटणारी तणावपूर्ण अपेक्षापूर्तीची भावना मला चाटून गेली,” असे कार्टरने म्हटले.
ह्या संशोधनाने ३,००० वर्षांपूर्वीचा लपलेला दिव्य खजिना प्रकाशात आणला. तथापि देवाची इच्छा आहे की, यापेक्षाही भव्य खजिन्याचा आम्ही शोध घ्यावा. हा एक असा शोध आहे की, ज्याचे बक्षिस हे रत्ने, सोने व रुपे यांच्या शोधाने मिळणाऱ्या बक्षिसांपेक्षा मोठे आहे. हा खजिन्याचा शोध देवाच्या ज्ञानाविषयीचा आहे व त्यातील अतिशय मौल्यवान दागिना आहे, सार्वकालिक जीवन.—योहान १७:३.
प्रयत्न महत्त्वाचे
पुरानवस्तु संशोधनाच्या जागेचे उत्खनन करण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. लपविलेल्या, पुरलेल्या किंवा पाण्यात बुडालेल्या खजिन्याचा शोध लावण्यासाठी जमिनीचा विस्तृत भाग खणून काढणे किंवा भीतीदायक पाण्यात उतरणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण ज्यांना त्याची खरीच कळकळ वाटते ते खजिन्याचा शोध घेणारे आनंदाने ते परिश्रम करतात. ते अतिशय कठीण गोष्टींना तोंड देतात व अशक्यप्राय वाटणाऱ्या अडथळ्यांवरही मात करतात. मग, देवाच्या ज्ञानाचा शोध लावण्यासाठी करावे लागणारे परिश्रम अधिक योग्यतेचे नाहीत का?
जर आम्ही पवित्र शास्त्र व खरी ख्रिस्ती प्रकाशने जी त्यामधील ज्ञानाची रत्ने शोधण्यास मदत करतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी योग्य ते परिश्रम घेतले तर आम्हाला हा मौल्यवान खजिना किंवा ठेवा मिळू शकतो. यासाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. जर आम्ही भौतिक, पैशांचा खजिना शोधण्यास आरंभ केला व केवळ वरवरचं थोडीशी जमीन खरवडल्यानंतर थांबलो तर आम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. ही गोष्ट त्यावेळीही खरी ठरू शकते, जेव्हा आम्ही आध्यात्मिक खजिन्याचा शोध सुरु तर करतो, परंतु ते चालू ठेवणे फारच कष्टप्र्द आहे असे मनात आणून ते प्रयत्न सोडून देतो. “वरुन येणारे ज्ञान,” हे त्यांच्यासाठी आहे, जे ते मिळविण्यास परिश्रम करतात. (याकोब ३:१७) तर मग, देवाच्या ज्ञानाचा अनमोल खजिना मिळविण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते तुम्ही करणार नाही का?