खऱ्या न्यायासाठी आम्ही कोणाकडे पहावे?
“सर्व जगाचा नियंता न्याय करणार नाही काय?”—उत्पत्ती १८:२५.
१, २. सर्वत्र आढळणाऱ्या अन्यायाबाबत अनेकांची प्रतिक्रिया कशी आहे?
तुम्हाला कदाचित अन्याय महामूर असल्याची माहिती असेल. हे दुःखद आहे. तर सर्वत्र आढळणाऱ्या खऱ्या न्यायाच्या अभावाबाबत तुमची वैयक्तीक प्रतिक्रिया काय आहे?
२ काही लोक न्यायी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त करुन प्रतिगामी भूमिका घेतात. ते कदाचित, स्वतः अज्ञेयवादी असल्याचाही दावा करतील. ही संज्ञा तुम्ही कदाचित ऐकलेली असेल. ती संज्ञा अशा व्यक्तीस अनुलक्षून आहे ज्याला असे वाटते की, “दुसरी कोणतीही परम सत्यता (जसे की, देव) असेल तर ती अपरिचित, किंबहुना अनोळखीच असेल.” १९ व्या शतकातील डार्वीनप्रणीत उत्क्रांतीवादाचे पुरस्कर्ते, जीवशास्त्रवेत्ता थॉमस एच. हक्सली यांनी ही “अज्ञेयवादी” संज्ञा प्रथम वापरात आणली.a
३, ४. “अज्ञेयवादी” या शब्दाची पार्श्वभूमी काय आहे?
३ तथापि, हक्सले यांना “अज्ञेयवादी” ही संज्ञा कोठून मिळाली? प्रत्यक्षात त्यांनी पहिल्या शतकाच्या एका कायदे पंडिताने, प्रेषित पौलाने, दुसऱ्याच अर्थाने वापरलेल्या वाक्प्रचारातून ती संज्ञा वापरली. तो वाक्प्रचार आजतागायत झालेल्या प्रसिद्ध भाषणामधील एक होता. हे भाषण आजही समयोचित आहे, कारण ते सर्वांसाठी न्याय कसा व केव्हा स्थापित होणार व याचा आम्हाला कसा व्यक्तिशः लाभ घेता येईल याचा सबळ आधार देते.
४ “अज्ञेयवादी” (अज्ञात) हा शब्द पौलाने उल्लेख केलेल्या वेदीवरुन घेण्यात आला, जिच्यावर “अज्ञात देवाला” ही अक्षरे कोरलेली होती. त्या संक्षिप्त भाषणाचे टिपण वैद्य लूक याने आपल्या प्रेषितांची कृत्ये नामक ऐतिहासिक पुस्तकातील १७ व्या अध्यायात केलेले आहे. हा अध्याय सुरवातीस दाखवितो की, पौल अथैनेला कसा पोहंचला. पृष्ठ २३ वरील चौकोनात तुम्हाला लूकची प्रस्तावना आणि पुढे सबंध भाषणाचा दिलेला भाग वाचण्यास मिळेल.
५. पौलाने अथैनेकरांना भाषण दिले त्यावेळेचा देखावा काय होता? (प्रे. कृत्ये १७:१६-३१ वाचून घ्या.)
५ पौलाचे हे भाषण खरोखरीच वजनदार आणि आम्ही आस्थेने चर्चा करण्यालायकतेचे आहे. सभोवताली घोर अन्यायाने घेरलेले असताना आम्ही त्याकडून बरेचसे शिकू शकतो. प्रथम, प्रे. कृत्ये १७:१६-२१ मध्ये आढळणारे दृश्य लक्षात घ्या. अथैनेकरांना हा अभिमान होता की, जेथे सॉक्रेटस्, प्लॅटो व ॲरीस्टॉटल यांच्यासारख्या विद्वानांनी शिक्षण घेतले त्या विद्येच्या प्रसिद्ध माहेरघरी आपण आहोत. अथैने हे प्रसिद्ध धार्मिकस्थानही होते. यामुळेच पौल आपणा सभोवताली मूर्तीच मूर्ती पहात होता. यात युद्ध देवता एरेस किंवा मार्स; झेयस, वैद्यकीय दैवत एईस्कुलापियस; क्रुद्ध समुद्रदैवत पोसेडोन; डायनासेस, अथेना, इरॉस आणि इतर दैवतांच्या मूर्त्या होत्या.
६. पौलाला अथैनेमध्ये जे आढळले ते पहाता आमच्या वसाहतीतील स्थिती कशी दिसते?
६ समजा, पौलाने तुमच्या शहराला वा तुम्ही राहात आहात त्या भागाला भेट दिली तर काय? त्याला कदाचित अनेक दैवते व धार्मिक प्रतिमा, ख्रिस्तीधर्म राज्याच्या देशातसुद्धा आढळतील. इतरत्र कदाचित अधिक दिसतील. एक मार्गदर्शक पुस्तक म्हणतेः “भारतासारख्या देशात अशी दैवते आहेत जी त्यांच्या चंचल ग्रीक ‘बंधुच्या’ सारखी नाहीत. ती एकपत्नी(पति) व्रत पाळणारी आहेत. यांनी काही विशेष अधिकार आपल्या स्त्री सहचरीला दिले आहेत. . . . कोणतीही अतिशयोक्ती न उच्चारता तेथे अनेक संस्कृतीचे व निसर्गांचे लाखो देव आहेत.”
७. प्राचीन काळची ग्रीक दैवते कशी होती?
७ अनेक ग्रीक दैवते हलक्या दर्जाची व अनितीमान असल्याचे वर्णिण्यात आले आहेत. यांच्या लिला नीतीमानास शरमेने मान खाली घालायला लावतील; होय, आज अनेक देशातील गुन्हेगारही त्यांच्यासारखे नाहीत. मग, आपणास नवल वाटेल ते योग्यच ठरेल की त्याकाळी अशा प्रकारच्या दैवताकडून ग्रीक लोक कसल्या न्यायाची अपेक्षा करुन होते. पौलास दिसून आले की, अथैनेकर त्यांच्यावरच खासकरुन आसक्त आहेत. नीतीमान विश्वासाच्या स्फूर्तीने भरुन त्याने खऱ्या ख्रिस्ती शिकवणूकीची सत्ये समजावून सांगण्यास सुरवात केली.
आव्हानकारक प्रेक्षक
८. (अ) एपिकूरपंथी यांचे विश्वास व दृष्टीकोन काय होते? (ब) स्तोयिकपंथी काय विश्वास राखून होते?
८ काही यहुद्यांनी व ग्रीक लोकांनी त्याचे लक्षपूर्वक ऐकून घेतले, पण एपिकूर पंथी आणि स्तोयिकपंथी या वजनदार लोकांची प्रतिक्रिया काय होती? त्यांच्या कल्पनांची अनेक अंगे, आजच्या सर्वसाधारण श्रद्धा किंवा आपल्या मुलांना शाळेतून जे पाठ शिकविले जातात त्यांच्या समान होती हे आपल्याला दिसेल. शक्य आहे तेवढी मौजमजा व खासपणे मानसिक मजा मिळविता यावी म्हणून जगावे असा एपिकूरपंथीयांचा आर्जव होता. त्यांचे ‘खाऊ व पिऊ; कारण उद्या मरावयाचे आहे’ हे तत्वज्ञान सर्वस्वी तत्वहीन व पवित्रताविरहीत होते. (१ करिंथकर १५:३२) दैवतांनी विश्व निर्माण केले असा त्यांचा विश्वास नव्हता तर, या यांत्रिक विश्वात जीवनाची सुरवात आकस्मिक झाली असे ते म्हणत. दैवतांना माणसांमध्ये रस नाही असे ते मानीत. पण, स्तोयिक पंथीयांबद्दल काय? ते तर्कशास्त्रावर अधिक जोर देत. त्यांचा हा विश्वास होता की, हे विश्व भौतिक वस्तु आणि निसर्ग शक्ती या दोन मूलतत्व घटकांवर आधारीत आहे. स्तोयिकपंथी देवास व्यक्तीत्व असल्याचे मानण्याऐवजी तो व्यक्तीत्वरहित असल्याचे मानीत. शिवाय त्यांना वाटे की, मानवी घडामोडीवर नशीबाचे वर्चस्व आहे.
९. पौलाने उपदेश करण्यास ती एक आव्हानकारक परिस्थिती होती ती कशी?
९ अशा या तत्त्वज्ञान्यांनी पौलाच्या जाहीर शिक्षणाबाबत कशी प्रतिक्रिया व्यक्त केली? कुतुहूल जरी निर्माण झाले होते तरी मनाचा ताठरपणा त्यावेळी अथैनेकरांना आडवा आला व या तत्त्वज्ञान्यांनी पौलाबरोबर वादविवादास सुरवात केली. शेवटी त्यांनी त्याला धरुन अरीयपगास नेले. हे स्थळ अथेन्समधील बाजारपेठेच्या मागे, अक्रोपोलीस पर्वतांच्या रांगेतील डोंगराळ भाग होता. याला त्यांची युद्धदेवता मार्स किंवा एरेस याच्या नामाने संबोधीत म्हणून मार्स हील किंवा अरीयपेगस असे म्हणत. पौलास बहुतेक न्यायसभेसमोरच उभे केले असावे, ज्याचे पार्श्वभूमीत अक्रोपोलीस आणि त्याचेवरील प्रसिद्ध पॅरेथेनॉन व त्याच्या सभोवतालची मंदिरे आणि मूर्त्या होत्या. काही असा विचार करतात की, रोमी कायदा जर कोणाही नवीन दैवताच्या ओळखीवर बंदी घालून होता तर प्रेषिताने जोखीम स्विकारली होती. पण जरी पौलास अरीयोपागेवर केवळ त्याच्या विश्वासाची स्पष्टता करण्यास किंवा तो एक मान्यवर शिक्षक आहे हे शाबीत करण्यास नेले होते तरी तो, कठीणहृदयी श्रोतेजनास तोंड देऊन होता. मग, तो त्याच्या जवळील महत्वाचा संदेश त्यांच्याशी मित्रत्व जोडल्याविनाच त्यांना विशद करु शकत होता का?
१०. आपल्या विषयाचा परिचय करुन देण्यात पौलाने व्यवहार चातुर्य कसे उपयोगात आणिले?
१० पौलाने केवढ्या चतुराईने व सूज्ञपणे बोलण्यास सुरवात केली ते प्रे. कृत्ये १७:२२, २३ मधून पहा. अथैनेकेर हे केवढ्या धार्मिक प्रवृत्तीचे आहेत व त्यांच्या केवढ्या मूर्त्या आहेत कबूली त्याने वदविली तेव्हा श्रोत्यापैकी काहींना वाटले असावे की ती त्यांची स्तुति आहे. त्यांच्या सहस्र देवांच्या विश्वासावर थेट हल्ला करण्याऐवजी पौलाने, आपण पाहिलेल्या एका वेदीकडे त्यांचे लक्ष आकर्षित केले जी “अज्ञात देव” याला समर्पित होती. ऐतिहासिक पुरावा हे सिद्ध करतो की, अशा वेद्या होत्या, ज्यामुळे लूकने लिहिलेल्या अहवालावरील विश्वासात भर पडते. पौलाने या वेदीचा प्रेरक शक्ती फलकासमान उपयोग केला. अथैनेकर ज्ञान व तर्कशास्त्र यांना बहुमोल मानीत. तरी त्यांनी हे मान्य केले होते की, असाही एक देव आहे जो त्यांना “अज्ञात” (ग्रीक, ॲʹग्नो․स्टोस) आहे. मग, त्यांना हेच तर्कशुद्ध वाटले की, पौलाला त्याचे म्हणणे सविस्तरपणे सांगू द्याचे. या समर्थनात कोणालाही कसलीच चूक आढळणार नाही, होना?
देव अज्ञात आहे का?
११. पौलाने कोणकोणत्या मार्गी त्याच्या श्रोत्यास खऱ्या देवाबद्दल विचार करण्यास भाग पाडले?
११ मग हा “अज्ञात देव” कोण होता? “देवाने” जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले. हे विश्व अस्तित्वात आहे, वनस्पति तसेच पशु अस्तित्वात आहेत, आणि आम्हीही अस्तित्वात आहोत हे कोणीही अमान्य करणार नाही. यात दिसणारे बळ आणि बुद्धीचातुर्य, होय जे सूज्ञान या सर्व गोष्टीत प्रदर्शित होते ते हे स्पष्ट दाखविते की, हे सर्व काही योगायोगाने घडलेले नसून ती एका बुद्धीमान व महासामर्थ्यवान सृष्टीकर्त्याची निर्मिती आहे. प्रत्यक्षात पौल जे समर्थन करीत आहे ते आमच्या काळात अधिक मोलाचे आहे.—प्रकटीकरण ४:११; १०:६.
१२, १३. पौलाने मांडलेल्या मुद्यास कोणता आधुनिक पुरावा पाठिंबा देतो?
१२ अलिकडेच इन द सेंटर ऑफ इमेन्सिटीज नामे पुस्तकात ब्रिटनचे खगोल शास्त्रज्ञ सर बर्नाड लोवेल यांनी पृथ्वीवरील अगदी साध्या जीवनातील गुंतागुंतीच्या शेवटल्या दुव्याबद्दल लिखाण केले. त्यात त्यांनी, असे हे जीवन आकस्मिक प्रकट झाले असावे का याबद्दलही चर्चा केली. त्यांच्या मतेः “आकस्मिकपणे एखाद्या रजःकणासमान पोषकद्रव्यासहितचा कण निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे. वेळेच्या व अंतराळाच्या कमाल धारणेस विचारात घेता तर अगदी शून्य.”
१३ किंवा दुसऱ्या बाजूस, आमचे हे विश्व याचा विचार करु. खगोल शास्त्रज्ञ आज त्याचा मूळ उगम शोधण्यासाठी वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपयोगात आणीत आहेत. त्यांना काय सापडले? गॉड ॲण्ड ॲस्ट्रोनोमर नामे पुस्तकात रॉबर्ट जेस्ट्रो लिहितातः “आता आम्हास दिसून येऊ लागले की खगोलशास्त्रातील पुरावेही, पवित्र शास्त्र जगाच्या उगमाविषयी जो वृत्तांत देते त्याकडेच घेऊन जातात.” “कारण जो शास्त्रज्ञ आपल्याच मतबलावर विश्वास ठेऊन राहतो, त्याचा शेवट भयानक स्वप्नासारखा होतो. त्याने अज्ञानाच्या शिखराचे गिर्यारोहण केले आहे. लवकरच तो एका उत्तुंग सुळक्यास सर करणार; जसजसा तो शेवटल्या टप्प्याकडे जात असतो व अगदी शेवटल्या खडकावर तो पाऊल ठेवतो व स्वतःस वर ओढत असतो तोच त्याचे स्वागत एक वेदांतीय गट [उत्पत्तीवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती] करतात जे सर्व तेथे अनेक शतके तप करीत बसलेले असतात.”—स्तोत्रसंहिता १९:१ पडताळा.
१४. देव, मानवाने बांधलेल्या मंदिरात वस्तीस नसतो ह्या पौलाच्या विधानास कोणत्या न्यायशास्त्राचा पाठिंबा आहे?
१४ या रितीने आम्ही पाहतो की, प्रे. कृत्ये १७:२४ मधील पौलाचे विधान केवढे अचूक होते; जे २५ व्या वचनातील विचाराकडे वळविते की, शक्तीशाली देव जो “जग व त्यातले अवघे” निर्माण करु शकतो तो निश्चितच मूर्त विश्वापेक्षा उच्च दर्जाचा आहे. (इब्री ३:४) मग हा विचार बाळगणे वाजवी ठरेल का की, तो कोणा मंदिरातच वास्तव्य करुन आहे; व जे खास करुन अशा लोकांकडून उभारलेले आहे जे जाहीरपणे कबूल करतात की तो त्यांच्याकरता “अज्ञात” देव आहे. हा एक केवढा जोरदार मुद्दा त्या तत्त्ववेत्त्यांसमोर मांडण्यास होता जे त्यावेळी कदाचित त्यांच्या पलिकडील मंदिराकडे भावनात्मक दृष्टीक्षेप टाकून असतील.—१ राजे ८:२७; यशया ६६:१.
१५. (अ) पौलाच्या श्रोत्यांच्या विचारात अथैने का असावे? (ब) देव सर्व गोष्टींचा दाता आहे या गोष्टीने आम्हाला कोणत्या निर्णयाप्रत निरवावे?
१५ कदाचित, पौलाचे श्रोते, अक्रोपोलीस डोंगरमाथ्यावरील अथैना कुलदेवीच्या मूर्तीच्या दर्शनास जाऊन आले असतील. या अथैनाची पार्थेनमधील मूर्ती हस्तीदंती व सोन्याने मढविलेली होती. याच अथैना देवीची दुसरी मूर्ती सत्तर फूट उंचीवर स्थापलेली होती, जिचे समुद्रातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जहाजातून दर्शन घडे. शिवाय अशी दंतकथा पसरली होती की, अथैना पोलीयास स्वर्गातून पडलेली होती; लोक दर्शनास जाताना सोबत नवे हस्त कलाकुसरीचे झगे तिला नेसविण्यास नेत. तरीसुद्धा, जो देव, ज्याच्याशी ते परिचित नव्हते, त्यांच्याकरता सर्वथोर होता, शिवाय ज्याने सबंध विश्व व त्यातले अवघे उत्पन्न केले होते, त्याने मनुष्ये जे काही त्याच्याकरता आणितात त्याकडे का लक्ष द्यावे? आम्हास जे काही आवश्यक ते सर्व तो आम्हास पुरवितोः आमचे “जीवन,” व ते टिकवून ठेवण्यास लागणारा “श्वासोच्व्छास,” आणि “अवघे,” ज्यात सूर्य, पाऊस, व धान्य उगविणारी सुपीक जमीन यांचाही समावेश आहे. (प्रे. कृत्ये १४:१५-१७; मत्तय ५:४५) तो देणारा (दाता) व माणसे ही घेणारी आहेत. मग, हे तितकेच खरे की, दाता हा घेणाऱ्यावर अवलंबून नसतो.
एकाच मनुष्याकडून सर्वजण
१६. मनुष्याच्या उगमाबद्दल पौलाने काय दावा केला?
१६ पुढे, प्रे. कृत्ये १७:२६ मध्ये, पौलाने एक सत्य शाबीत केले जे अनेकांनी विचारात घेण्यास हवे; खासकरुन या दिवसात जेव्हा की, वंशभेद, जातीभेद व त्यामधील अन्याय एवढे सर्वपरिचित आहेत. तो म्हणाला की, निर्माणकर्त्याने “एका मनुष्यापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करुन त्यांनी सगळ्या भूपृष्ठावर राहावे असे त्याने केले.” मानवी वंश हा एकी व बंधुत्व यांच्यातील खऱ्या कल्पनेने निर्मित होता (यात न्यायही समाविष्ट आहे). तर त्या प्रतिष्ठितांनी हे विचारात घेण्याजोगे होते; कारण अथैनेकर हा दावा करीत की, ते विशिष्ट उगमापासून आहेत, जो त्यांना इतर मानवजातीपासून अलग करतो. तथापि, पौलाने पहिला पुरुष आदामबद्दलचा उत्पत्तीच्या अहवालास मान्य केले होते; की तो आम्हासर्वांचा पूर्वज आहे. (रोमकर ५:१२; १ करिंथकर १५:४५-४९) असे असले तरी आपणास कदाचित कुतुहूल वाटेल कीः ‘ही सर्वसाधारण कल्पना आमच्या आधुनिक विज्ञान शास्त्रीय युगात उचलून धरलेली आहे का?’
१७. (अ) पौलाप्रमाणे काही आधुनिक पुरावे कशाप्रकारे त्याच दिशेकडे अंगुली दर्शवितात? (ब) याचा न्यायत्वासोबत काय संबंध आहे?
१७ उत्क्रांतीचा सिद्धान्त हे सुचवितो की, मनुष्य हा अनेक ठिकाणातून व स्थित्यंतरातून उत्क्रांतीत झाला आहे. पण गतवर्षी, न्यूजवीक मासिकाने आपला विज्ञानशास्त्र विभाग पूर्णपणे “आदाम व हव्वा यांच्या संशोधना”च्या विषयास समर्पित केला होता. यात त्यांनी अलिकडे अनुवंशिकतेच्या शास्त्र संशोधनात पुढील प्रगति काय आहे यावर लक्ष एकाग्र केले. जसे की, आम्ही अपेक्षितो, तसे सर्वच शास्त्रज्ञ एकमत होणार नाहीत की, संशोधनातून उदयास येणारे चित्र हे स्पष्ट करते की सबंध मानवजातीच्या उगमाचा अनुवंशिक पूर्वज एकच आहे; जे पवित्र शास्त्राने फार पूर्वी म्हटले आहे व आम्ही सर्व आपसात बंधुत्वात आहोत. मग, आम्हा सर्वाकरिता सारखाच न्याय नसावा का? आमचा वर्ण कोणताही असो, केशरचनेची पद्धत कसलीही असो किंवा व्यक्तीत्व कोणत्याहि प्रकारातले असो, आम्ही सर्व निपक्षपातीपणाच्या वागणूकीचे हक्कदार नाही का? (उत्पत्ती ११:१; प्रे. कृत्ये १०:३४, ३५) तरीही आम्हास अद्यापि ही जाणीव करुन घेण्याची गरज आहे की, मानवजातीस न्यायदान कधी व कसे प्राप्त होईल.
१८. देव मानवजातीशी जे दळणवळण राखून आहे त्याविषयी पौलाने केलेल्या विधानाला कोणता आधार होता?
१८ तसेच २६ व्या वचनात पौलाने निदर्शनास आणले आहे की, सृष्टीकर्त्याठायी मानवजातीकरता स्वतःची इच्छा किंवा न्याय्य संकल्प असण्याची अपेक्षा करु शकतो. प्रेषितास या गोष्टीची चांगली माहिती होती की जेव्हा परमेश्वर इस्राएल राष्ट्रासोबत दळणवळण राखून होता तेव्हा त्यांनी कोठे रहावे आणि परराष्ट्रीयांसोबत कसे संबंध राखावेत याबाबतचे कायदे त्यांना देण्यात आले होते. (निर्गम २३:३१, ३२; गणना ३४:१-१२; अनुवाद ३२:४९-५२) अर्थात, पौलाच्या श्रोत्यांनी कदाचित हे उद्गार मोठ्या गर्वाने आधी स्वतःस लावले असतील. पण, प्रत्यक्षात, त्यांना याची जाणीव असो की नसो, यहोवा देवाने भविष्यवादीतपणे काळाबद्दल किंवा इतिहासातील एखाद्या विशेष गोष्टीबद्दल जसे ग्रीस हे पाचवी जागतिक सत्ता कधी बनणार; त्याबद्दल आपले मनोदय व्यक्त केले होते. (दानीएल ७:६; ८:५-८, २१; ११:२, ३) तो जर राष्ट्रांनाही आपल्या इच्छेप्रमाणे हाताळू शकतो तर त्याच्याबद्दल अधिक शिकणे व्यवहार्य ठरणार नाही का?
१९. पौलाने प्रे. कृत्ये १७:२७ मध्ये मांडलेला मुद्दा व्यवहार्य का आहे?
१९ देवाने आम्हास अज्ञानतेत, काळोखात चाचपडत राहण्यास सोडले आहे असे काहीच नाही. अथैनेकरांस तसेच आम्हासही त्याच्याबद्दलची सर्व माहिती शिकण्यास म्हणून त्याने तसा मुळाधार पुरविलेला आहे. रोमकरांस पत्र १:२० मध्ये पौलाने लिहिलेः “त्याचे [देवाचे] अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरुन ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्तीकालापासून स्पष्ट दिसत आहेत, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे.” या कारणास्तव, आम्हास जर परमेश्वरास मिळवणे आहे व त्याच्याबद्दल शिकणे आहे तर तो आम्हा कोणापासूनही तितका दूर नाही.—प्रे. कृत्ये १७:२७.
२०. देवामुळे “आपण . . . जगतो, वागतो व आहो” हे कसे खरे आहे?
२० तर, जसे प्रे. कृत्ये १७:२८ सुचविते त्यानुसार आम्हाठायीच्या आवडीने, गुणग्राहकत्वाने आम्हास तसे करण्यास उत्तेजीत करावे. देवाने आम्हास जीवन दिलेले आहे. पण जसे एखाद्या वृक्षाला जीवन आहे तसेच आम्हालाही सर्वसाधारण जीवन असताही प्रत्यक्षात आम्हाला त्यात पुष्कळ अधिक आहे. आपणाठायी व पुष्कळशा पशुंठायी उच्च प्रतीच्या जीवनात हालचाल करण्याची क्षमता आहे. मग यात आम्हास आनंद वाटू नये का? पण पौल या विषयास अधिक पुढे नेतो. आम्ही आमच्या व्यक्तीत्वासह बुद्धीमान प्राणी म्हणून जगत आहोत. विचार करण्यास, गूढ तत्वांना (जसे खरा न्याय) ग्रहण करण्यास आणि आशा बाळगण्यास होय, देवाचा संकल्प भवितव्यासाठी कोणती हालचाल करीत आहे हे बारकाईने पाहण्यास देवाने आम्हा प्रत्येकास मेंदू दिला आहे. आपणास जसे वाटावे तसे पौलासही वाटले असावे की, इपिक्युरियन आणि स्तोयिकी तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारण्याजोगे पुष्कळसे आहे. त्यांची मदत व्हावी म्हणून ते ज्या कवींशी परिचित होते व आदर बाळगून होते अशांच्या लिखाणातून त्याने अवतरणे घेतली, कारण याच कवींनी समान विचारसरणीत म्हटले होतेः “आपण त्याचा वंश आहोत.”
२१. आम्ही देवाचा वंश आहोत ही भावना आम्हावर कशी परिणामित होण्यास हवी?
२१ जर लोकांठायी ही खऱ्या अर्थी आवड उत्पन्न झाली की, आपण सर्वश्रेष्ठ देवाचे वंश किंवा उत्पत्ती आहोत तर आम्ही जीवन कसे जगावे याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे पहावे हेच केवळ उचित ठरेल. पौलाठायीच्या साहसीपणाचे कौतुक वाटावे; कारण तो अक्रोपोलीस याच्या आसमंतात उभा होता. त्याने अगदी निर्भिडपणे याचे समर्थन केले की, आमचा निर्माता कोणाही मनुष्य निर्मित मूर्तीपेक्षा, एवढेच काय पण सोने व हस्तिदंतीने बनविलेल्या पार्थनोनपेक्षाही निश्चित महान आहे. आपण सर्व, जे पौलाच्या विधानांचा स्वीकार करतो, त्याबरहुकूम आहोत की, आज लोक ज्यांची भक्ती करतात अशा कोणाही समान परमेश्वर नाही.—यशया ४०:१८-२६.
२२. खरा न्याय प्राप्त करण्यात आमचा पश्चाताप कसा संबंधित आहे?
२२ कोणीही तात्पुरता विचारात घ्यावा व नंतर आपण जसे पूर्वी तसेच यापुढे जगावे, असा हा केवळ एक तांत्रिक मुद्दा नाही. पौलाने हे ३० व्या वचनात स्पष्ट केले आहेः “अज्ञानाच्या काळांची (देव एखाद्या क्षुद्र मूर्तिसमान असेल किंवा तशा वस्तुंद्वारा भक्तीचा स्वीकार करतो अशा भ्रामक कल्पनेचा काळ) देवाने उपेक्षा केली. परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांस आज्ञा करतो.” अशाप्रकारे तो आपल्या जोरदार शेवटास पोहंचत असता पौलाने आपला आश्चर्यचकित करणारा मुद्दा—पश्चाताप करा—पुढे मांडला. यास्तव जर आम्ही खरा न्याय मिळविण्यासाठी परमेश्वराकडे पाहतो तर याचा अर्थ हाच होतो की, आम्ही पश्चाताप केला पाहिजे. त्याकरता आम्ही काय केले पाहिजे? तसेच देव सर्वांसाठी खरा न्याय कसा पुरविणार?
[तळटीपा]
a आज जसे अनेकांनी केले तसेच हक्सले यांनीही ख्रिस्ती धर्मराज्यातील अन्यायांना लक्षात घेतले होते. अज्ञेयवादावरील प्रबंध लेखनात त्यांनी लिहिलेः “आम्हास जर एवढेच स्पष्ट दिसले की, दांभिकता आणि क्रुरता यांचा प्रपात व लबाड्या, घातपात व मानवतेच्या प्रत्येक जबाबदाऱ्यांच्या भंगाचा ओघ ख्रिश्चन राष्ट्रांच्या इतिहासासोबत याच मूळ उगमाकडून वाहात आहे, जो नरकाबद्दलच्या आमच्या अगदी दुराग्रही कल्पनांनाही फिका बनवितो.”
तुम्हाला उत्तर देता येईल का?
◻ पौलाला अथैनेमध्ये कोणती धार्मिक अवस्था दिसून आली व तशीच परिस्थिती आजही कशी अस्तित्वात आहे?
◻ पौलाच्या दिवसात अथैनेमध्ये ज्या सर्व दैवतांची भक्ती केली जाई त्या सर्वांपेक्षा परमेश्वर सर्वथोर आहे हे कोणकोणत्या मार्गी सिद्ध झाले?
◻ देवाने अशा कोणत्या मूळाधारावर मानवी वंशाची निर्मिती केली की ज्याकरवी सर्वांना न्याय मिळू शकतो हे सिद्ध होते?
◻ देवाच्या थोरवीच्या ज्ञानाविषयी मानवाची कशी प्रतिक्रिया असावी?
[२३ पानावरील चौकट]
सर्वांसाठी न्याय—प्रेषितांची कृत्ये, अध्याय १७
“१६ पौल अथैने येथे त्यांची वाट पाहत असता, ते नगर मूर्तीनी भरलेले पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. १७ यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर, भक्तीमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांजबरोबर प्रतिदिवशी वाद करीत असे. १८ तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील कित्येक तत्त्वज्ञानी लोक त्याला आडवे आले. कित्येक म्हणालेः ‘हा बडबड्या का बोलतो?’ दुसरे म्हणालेः ‘हा परक्या देवांची घोषणा करणारा दिसतो;’ कारण तो त्यांना येशू व पुनरुत्थान याविषयी सुवार्ता गाजवीत असे. १९ नंतर त्यांनी त्याला धरुन अरीयपगावर नेऊन म्हटलेः ‘तू हे दिलेले नवे शिक्षण काय आहे हे आम्हास कळविशील काय? २० कारण तू आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवीत आहेस, त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.’ २१ प्रत्यक्षात, सर्व अथैनेकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांना काही नवलविशेष सांगणे किंवा ऐकणे याशिवाय कशातही आपला काळ घालविणे होत नसे. २२ तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभे राहून म्हणालाः
“‘अहो अथैनेकरांनो, तुम्ही देवदैवताला फार मान देणारे आहा असे मला दिसते. २३ का तर, मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तु पाहिल्या, त्यात “अज्ञात देवाला” ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही न ओळखता ज्याचे भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. २४ ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभु आहे, म्हणून तो हातांनी बांधिलेल्या मंदिरात राहात नाही; २५ आणि त्याला काही उणे आहे, म्हणून मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही; तर जीवन, प्राण व सर्वकाही तोच सर्वांस देतो. २६ आणि एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करुन त्यांनी सगळ्या भूपृष्ठावर राहावे असे त्याने केले, आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या; २७ अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्यातल्या कोणा एकापासूनही दूर नाही. २८ कारण आपण त्यात जगतो, वागतो, व आहो; तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हटले आहेः “आपण त्याचा वंश आहो.”
२९ “तर आपण दैवी वंश असताना, मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटू नये. ३० अज्ञानाच्या काळांची देवाने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांस आज्ञा करतो. ३१ त्याने असा एक दिवस नेमलेला आहे की त्या दिवशी आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करवील; त्याने त्याला मेलेल्यामधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.’”
[२४ पानावरील चौकट]
विश्व निर्माण केले होते
१९८० मध्ये नासा (नॅशनल एरोनॉटिक ॲण्ड स्पेस ॲडमिनिस्ट्रशन) या संस्थेच्या डॉ. जॉन ए. ओकीफ यांनी लिहिलेः “मी जेस्ट्रोच्या दृष्टीकोनाशी सहमत आहे की, आधुनिक खगोल शास्त्राने एक विश्वसनीय पुरावा प्राप्त केला की, विश्व हे सुमारे पंधरा ते वीस लक्ष वर्षांपूर्वी निर्माण केले होते.” “मला हे केवढे हृदयस्पर्शी वाटते की आपण पहावे तिकडे निर्मितीचे पुरावे सृष्ट वस्तूंवर जसे की, डोंगर, आकाश, रेडिओ लहरी आणि पदार्थ विज्ञानशास्त्रातील प्रत्येक वस्तुवर अगदी स्पष्टपणे निर्मितीची छाप आहे.”
[२६ पानावरील चौकट]
“आदाम व हव्वेचा शोध”
या मथळ्याखाली न्यूजवीक पाक्षिकाने म्हटले आहेः “प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ रिचर्ड लिके यांनी १९७७ मध्ये हे जाहीर केले होते की, ‘आधुनिक मनुष्याचा इतरत्र कोठे जन्म झालेला आहे असे एकही स्थळ सापडलेले नाही. पण आत्ताचे अनुवंशिकतेचे शास्त्र अन्य तऱ्हेने विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करीत आहे. . . . ‘ते जर बरोबर असले, आणि मी तर पैज लावीन, ही कल्पना अतिशय महत्वाची ठरेल’ असे स्टीफन जे गाऊड, हावर्ड विश्वविद्यालयातील पॅलियोनथोलॉजिस्ट व निबंधकार म्हणतात. ‘हे सर्व विचार आम्हास ही जाणीव देतात की, सबंध मानवजात, तिचे बाह्यरुप जरी तिच्या विविधतेतील असले तरी, एकाच स्थळी उगम झालेल्या प्राण्यापासूनचे आहेत. हे एक विश्वबंधुत्वाचे जीवनशास्त्र आहे ज्याची ओळख पूर्वीच्या कोणाही काळापेक्षा आज आम्हास अधिक अगाधतेत प्राप्त आहे.”—जानेवारी ११, १९८८.