वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ९/१ पृ. १५-२०
  • प्रभूच्या दिवसाचा तुम्हासाठी काय अर्थ होईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रभूच्या दिवसाचा तुम्हासाठी काय अर्थ होईल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मोठ्या बाबेलची सार्वजनिक विवस्रता
  • आकाशे अंधःकारमय होतील
  • पुढे चालविलेले युद्ध
  • सेवेच अद्‌भूत हक्क
  • ईश्‍वरी संरक्षण
  • येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी मुक्‍तता
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • “हा थोर दिवस आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मोठं संकट काय आहे?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • हर्मगिदोनात योद्धा-राजा विजय मिळवतो
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ९/१ पृ. १५-२०

प्रभूच्या दिवसाचा तुम्हासाठी काय अर्थ होईल?

“तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”—स्तोत्रसंहिता ११०:२.

१-३. (अ) प्रभूच्या दिवसाची सुरवात संघर्षपूर्वक काळाने झाली ती का, आणि येशूने मिळविलेले काही विजय कोणते होते? (ब) येशू आपले विजय कसे पूर्ण करणार?

१९१४ मध्ये येशूला देवाच्या राज्याचा राजा म्हणून विधिपूर्वक स्थानापन्‍न करण्यात आले आणि प्रभूच्या दिवसाची सुरवात झाली. लगेच या नवीन राजाला दियाबल सैतान आणि पृथ्वीवरील त्याच्या प्रतिनिधींच्या हिंसक विरोधास तोंड द्यावे लागले. (स्तोत्रसंहिता २:१-६) अशाप्रकारे प्रभूच्या दिवसातील सुरवातीची काही वर्षे असा एक संघर्षमय काळ होता ज्यामध्ये येशूने ‘आपल्या शत्रूंवर प्रभुत्व’ मिळवले.—स्तोत्रसंहिता ११०:२.

२ या नवीन राजाचा विजय मनावर छाप पाडणारा होता. १९१४ नंतर सैतानाने नवजात राज्यास ‘खाऊन टाकण्याचा’ प्रयत्न केला; पण त्याऐवजी, त्याचीच लाजीरवाण्या स्थितीत स्वर्गातून हाकलपट्टी करण्यात आली. (प्रकटीकरण १२:१-१२) मग त्याने, अभिषिक्‍त वर्गातील शेषांविरुद्ध “लढाई” पुकारली, पण १९१९ मधील त्यांनी आपल्या ‘पायावर उभे राहणे’ किंवा येशू ख्रिस्ताच्या हातातून ती ‘लहानशी गुंडाळी’ स्विकारणे यात तो अडथळा आणू शकला नाही. (प्रकटीकरण १०:८-११; ११:११, १२; १२:१७) याचप्रमाणे १,४४,००० मधील उरलेल्यांना गोळा करण्यात तसेच जे “अहोरात्र त्याच्या [यहोवाच्या] मंदिरात सेवा करतात” अशा (सर्व राष्ट्रातील) मोठा लोकसमुदाय संघटीत होण्यात अडथळा आणण्यातही तो तसाच दुबळा ठरला.—प्रकटीकरण ७:१-३, ९-१५.

३ खरोखरी, १९१४ पासून येशू ‘जिंकावयाला निघाला’ आहे. तरीही अद्याप पुष्कळ करायचे बाकी आहे. येशूला त्याचा “विजय” पूर्ण करावयाचा आहे. त्याला सैतानी जगाच्या व्यवस्थीकरणातील सर्व खाणाखूणा काढून टाकावयाच्या आहेत. (प्रकटीकरण ६:१, २; १९:११-२१) या महत्वाच्या कामगिरीचा आम्हा सर्वांकरिता व्यक्‍तीशः कोणता अर्थ होईल?

मोठ्या बाबेलची सार्वजनिक विवस्रता

४. प्रकटीकरणात खोट्या धर्माचे वर्णन कसे केले आहे?

४ खोट्या धर्माच्या अंताकरवी सैतानी जगताचा विनाश सुरु होतो. प्रकटीकरण, खोट्या धर्माच्या साम्राज्यास कळवंतीण, मोठी बाबेल असे संबोधिते. यात ख्रिस्ती धर्मराज्याचाही समावेश आहे. ही मोठी बाबेल पृथ्वीवरील राजांशी जारकर्म करुन आपले जारकर्मरुपी पेय मानवजातीला प्यावयाला देते. ती स्वतःदेखील देवाच्या सेवकांचे रक्‍त प्राशन करुन मस्त झालेली आहे. (प्रकटीकरण १७:१-६) प्रकटीकरण या अमंगळ कळवंतीणीच्या नाशाचेही वर्णन करते. अशीच एक धार्मिक कळवंतीण आमच्या समान शकाच्या सातव्या शतकात अस्तित्वात होती. हिचे काय झाले त्याचा विचारविनिमय केल्यास आधुनिक कळवंतीणीवर घडणाऱ्‍या गोष्टीचा आम्हाकरिता काय अर्थ होईल ते आपल्याला चांगले समजू शकेल.

५, ६. अविश्‍वासू यरुशलेमाला कळवंतीण असे का संबोधिले, आणि यामुळे तिजवर यहोवाकडून कोणता न्यायदंड बजाविला गेला?

५ ती पूर्वीची कळवंतीण यरुशलेम शहर होती. ते पृथ्वीवर यहोवाच्या भक्‍तीचे मुख्य केंद्रस्थान समजण्यात येत होते. पण देवाने त्याला म्हटलेः “स्वतः पाडिलेल्या रक्‍ताने तू आपणास दोषी केले.” (यहेज्केल २२:४) हे शहर आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असल्याचे भासवीत होते पण, याने राष्ट्रांसोबत मित्रत्वाचे संबंध ठेऊन शिंदळकी केली. यहोवाने त्याला म्हटलेः “तू स्वच्छंदी वेश्‍येच्या कृतीप्रमाणे हे सर्व केलेस, म्हणून मला तुझ्याविषयी केवढा संताप वाटतो!”—यहेज्केल १६:३०; २३:१-२१; याकोब ४:४.

६ मग, या कळवंतीणीवर यहोवाने जो न्यायदंड बजावला तो विचारात घ्याः “पाहा, ज्यांस तू खुश केले, प्रेमपात्र व द्वेषपात्र असे जे तुझे जार, त्यांस [राष्ट्रांना] मी चोहोकडून तुजविरुद्ध जमा करीन. . . . ते तुझी कमानदार घरे उध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जडजवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करुन सोडतील.” (यहेज्केल १६:३७, ३९, ४१; २३:२५-३०) जे काही घडले त्याची इतिहास साक्ष देतो. इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलोनी आले व त्यांनी यरुशलेमाला प्रत्यक्षात उघडीनागडी केली. तिच्या लोकांस व धनास लुटून बाबेलास घेऊन गेले. शहराची नासधूस करण्यात आली, मंदिर जाळले व शहर ओसाड केले.—२ इतिहास ३६:१७-२१.

७. मोठ्या बाबेलचा शेवट काय होणार?

७ मोठ्या बाबेलचे असेच काहीसे होईल. प्रकटीकरण इशारा देतेः “ती [आधुनिक “राजे” वा सत्ताधिष्ठ, ज्यांच्यासोबत मोठ्या बाबेलने जारकर्म केले] कळवंतीणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:२, १६) प्राचीन काळच्या यरुशलेमाच्या उदाहरणावरुन आम्हास हे ज्ञात होते की याचा काय अर्थ होणार. जे पूर्वी तिच्यावर “प्रेम” करीत तीच राष्ट्रीय सरकारे खोट्या धर्माचा नाश करतील. तिची सर्व संपत्ती हिरावतील, तिला अग्नीने जाळतील आणि संपूर्ण नाश करतील. एका अमंगळ संस्थेचा हा उचित नाश ठरेल!

आकाशे अंधःकारमय होतील

८. मोठे संकट हे मानवजातीकरता कोणत्या प्रकारचा समय असेल?

८ मोठ्या बाबेलच्या नाशाच्या पाठोपाठ आम्ही, येशूने भाकित केलेले जे “मोठे संकट” त्यात प्रवेश करु. (मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:१४) त्या काळाविषयी बोलताना प्रकटीकरण म्हणतेः “मोठा भूमिकंप झाला; सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्‍तासारखा झाला, . . . आकाशातील तारे पृथ्वीवर पडले.” (प्रकटीकरण ६:१२, १३) हा मोठा भूमिकंप तोच आहे जो यहेज्केलने भविष्यवादित करण्यात म्हटले की, “त्या दिवशी इस्राएल देशात मोठा भूकंप होईल.” (यहेज्केल ३८:१८, १९; योएल ३:१४-१६) हा तो या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंतिम नाश आहे. मग, खरोखरचा सूर्य, चंद्र व तारे यांना त्यावेळी काही होईल का?

९, १०. यहेज्केलाने मिसरबद्दल काय संदेश दिला व तो कसा पूर्ण झाला?

९ इस्राएलचा सर्वात मोठा दक्षिणेचा शेजारी, मिसर, याजवर येणाऱ्‍या अधःपाताचा इशारा देण्यात यहेज्केल म्हणालाः “मी तुला [फारो] नष्ट करीन तेव्हा मी आकाश झाकीन व त्यातील तारे निस्तेज करीन; मी सूर्य मेघाच्छादित करीन, चंद्र प्रकाश देणार नाही. मी आकाशातील सर्व ज्योती तुझ्यावर निस्तेज करीन. मी तुझ्या देशावर काळोख आणीन, असे सार्वभौम प्रभु यहोवा म्हणतो.”—यहेज्केल ३२:७, ८.

१० फारो व त्याच्या सैन्याचा पाडाव झाला तेव्हा खरोखरचे आकाश काळे झाले नाही, तर मिसरचे भवितव्य काळवंडले गेले. एक पवित्र शास्त्र प्रामाण्य, सी. एफ. केईल म्हणतातः “[फारोच्या पतनावरील] काळोखी परिणाम निराधार अवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी लाक्षणिक स्थिती होती.” मिसरने आपले स्वतंत्र असे जागतिक स्वामित्व गमावून ते एकामागून एक अशा जागतिक साम्राज्याच्या अंकित बनत गेले! आजही, प्राचीन मिसरी जागतिक सत्तेच्या बहुतेक भागावर अरबी राष्ट्राच्या सत्तेचा अधिकार चालत आहे.

११. (अ) जे काही मिसराचे बाबतीत घडले ते कशाचे प्रतिरुप होते? (ब) मोठ्या संकटात सैतानी जगताचे भवितव्य अगदीच अंधःकारमय असेल ते कसे?

११ पण, केईल यांना यहेज्केलच्या भविष्यवादातून अधिक सूचक अर्थ उलगडला. ते लिहितातः “या [मिसर] जागतिक सत्तेस उलथून पाडणे हे भावी काळातील न्यायाच्या दिवशी अधार्मिक सत्तांचा जो नाश होणार त्याचा शकून किंवा संकेत आहे.” हे तात्पर्यतेत खरे आहे. जसे प्रकटीकरण स्पष्ट करते त्याप्रमाणे मोठ्या संकटात मानवजातीतील अधार्मिकांचे भवितव्य त्या मिसरी लोकांसमान अगदी अंधःकारमय आहे. ते जणू दिवसा सूर्याचा प्रकाश नाही, रात्री आभाळाला चंद्राची उब नाही आणि आकाशातील ताऱ्‍यांचे लुकलुकणेही नाही त्याप्रमाणे आहे. यहोवाच्या राजाचा सन्मान करण्यास नकार देणाऱ्‍यांना, पांढऱ्‍या घोड्यावरील स्वार आपली विजयी दौड पूर्ण करीत असता नाश करण्यात येईल; अशांना विधिपूर्वक अंतिम संस्कार मिळणार नाहीत. (प्रकटीकरण १९:११, १७-२१; यहेज्केल ३९:४, १७-१९) हे होताना अधार्मिक लोक मोठ्या स्वराने ‘डोंगरास व खडकास म्हणतीलः “आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून व कोकऱ्‍याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल?”’ यात कसलेही नवल नसणार!—प्रकटीकरण ६:१६, १७; मत्तय २४:३०.

पुढे चालविलेले युद्ध

१२. प्रभूच्या दिवसात सैतानाने येशूबद्दलचा द्वेष कसा प्रकट केला?

१२ पण या काळात, ख्रिस्तीजनांबद्दल काय? यांच्यावर, सैतान व पांढऱ्‍या घोड्यावरील स्वार यांच्यामध्ये चालत राहिलेल्या युद्धामुळे भयंकर परिणाम झालेले आहेत. सैतानाला आता येशूवर व्यक्‍तीगत हल्ला करणे शक्य नसल्यामुळे त्याने आपल्या संतापाचा पूर्ण रोख अभिषिक्‍त शेषांवर, आणि आता अलिकडेच, त्यांच्यासभोवताली जमलेल्या मोठ्या लोकसमुदायातील मेंढरावर रोखला आहे. येशूने आधीच इशारा दिल्यानुसार “[त्याच्या] नामामुळे सर्व राष्ट्री” ह्‍या सर्वांचा द्वेष करतात. (मत्तय २४:९) सैतानाने जमाव हल्ला, तुरुंगवास, छळणूक व वध या आपणाकडील प्रत्येक उपकरणांचा वापर यांच्याविरुद्ध लढा देण्यास उपयोग केला.—२ तीमथ्य ३:१२.

१३. देवाच्या लोकांविरुद्ध लढा देण्यात सैतानाने आपली कावेबाजी कशी उपयोगात आणली?

१३ सैतानाने आपली कावेबाजी देखील मोठ्या शिताफीने उपयोगात आणली. (इफिसकर ६:११) “द्रव्याचा लोभ” याचा उपयोग करुन त्याने काहींना या मोहजलात असे गुरफटून घेतले की, ते आपल्या पवित्र सेवेत मंदावले व काही निष्क्रिय बनले. (मत्तय १३:२२; १ तीमथ्य ६:९, १०) इतर काहींना त्याने अमंगळपण व अनैतिकपणा यांचे आकर्षण घातले. (१ करिंथकर ५:१, २) अनेक आज, “संसाराची चिंता” यामुळे अनेक प्रकारच्या भारी दबावाखाली आहेत, आणि सैतानाने याचाच फायदा उचलून त्यांची “अंतःकरणे जड” केली. (लूक २१:३४) इतर बाबतीत त्याने वैयक्‍तिक मतभेद किंवा बंडखोर वृत्ती यांचा वापर करुन काहींना “महत्त्वाच्या गोष्टीं”पासून दूर केले.—फिलिप्पैकर १:१०; १ करिंथकर १:११, १२; याकोब ४:१-३.

१४, १५. आम्ही सैतानाविरुद्धच्या आमच्या लढ्यात कसे विजयी होऊ शकतो?

१४ यास्तव, ख्रिस्तीजनांना प्रभूच्या दिवसात सतत सहनशीलता जोपासण्याची गरज आहे. काहींनी यात अपयश दाखविले, त्यामुळे सैतानाला थोडा विजय मिळाला. (१ पेत्र ५:८) पण अधिकांनी येशूच्या या अभिवचनाकडे कान दिलेः “शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मत्तय २४:१३) यहोवाकडील मदतीच्या आधाराने ते यशस्वी होतात व त्याच्या अंतःकरणास आनंदी करतात.—नीतीसूत्रे २७:११; १ योहान २:१३, १४.

१५ माघार घेऊन सैतानाला समाधान द्यावे असे आमच्यापैकी कोणालाही वाटणार नाही. यासाठीच, आपण पौलाच्या उपदेशाचे अनुकरण करु या आणि सत्य, नीतीमत्त्व व विश्‍वास यांची शस्त्रसामग्री धारण करुन आवेशाने सुवार्ता प्रचार करीत राहू या, तसेच आपला विश्‍वास खंबीर राखण्यासाठी सतत अभ्यासात मग्न राहू, निरंतर प्रार्थना करण्यात तत्पर व सावध राहू. (१ करिंथकर १:८; इफिसकर ६:१०-१८; १ थेस्सलनीकाकर ५:१७; १ पेत्र ४:७) यामुळेच प्रभूचा दिवस आम्हासाठी समृद्ध आशीर्वाद पुरविणारा एक खरा उगम ठरेल.

सेवेच अद्‌भूत हक्क

१६. सात गर्जनांचे बोल लिहून ठेवण्यास योहानाला का मनाई करण्यात आली, आणि याचा १९१९ मधील अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांसाठी काय अर्थ झाला?

१६ प्रकटीकरण १०:३, ४ मध्ये योहान म्हणतो की, त्याने “सात गर्जनांनी आपापले शब्द” काढलेले ऐकले. ऐकलेले लिहून ठेवावे असे त्याला वाटले पण, अहवाल म्हणतोः “इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः ‘सात गर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.” यावरुन हे स्पष्ट होते की, ती माहिती प्रकाशित होण्याची वेळ त्यावेळी नव्हती. याऐवजी, योहानाला लहान गुंडाळी घेऊन ती खाऊन टाकण्याचे सांगण्यात आले. सात गर्जना यहोवाच्या संपूर्ण संकल्पाच्या वक्‍तव्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या. (स्तोत्रसंहिता २९:३; योहान १२:२८, २९; प्रकटीकरण ४:५) मागे १९१९ मध्ये जेव्हा अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांनी लाक्षणिकरित्या छोटी गुंडाळी खाल्ली तरी त्यांच्याकरता यहोवाच्या स्वसंकल्पाची पूर्णपणे ओळख होण्याची वेळ अजून आली नव्हती. (दानीएल १२:८, ९ पडताळा.) पण त्यांनी, जी काही समज त्यांच्यापाशी होती तिच्यासह पुढे निर्भिडपणे आगेकूच केले व आपण अधिक सूज्ञता प्राप्त करण्यास पात्र आहोत हे सिद्ध केले.

१७. १९१९ पासून पुढे यहोवाने त्याच्या लोकांस कोणकोणत्या नव्या गोष्टींचे अचूक ज्ञान पुरविले?

१७ यानंतर, अनेक वर्षे यहोवाच्या संकल्पाची प्रगतीशील व स्पष्ट समज त्यांना देण्यात आली. उदाहरणार्थ, येशूच्या दाखल्यातील मेंढरे, हर्मगिद्दोनच्या आधीच शेरडांपासून वेगळी केली जातील हे त्यांच्या लक्षात आले. (मत्तय २५:३१-४६) १९१४ मध्ये राज्याचा जो जन्म घडला ती प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायाची पूर्णता होती हेही त्यांना समजले. यहोवाच्या नावाच्या महत्तेची गुणग्राहकता त्यांच्यामध्ये खोलवर रुजली गेली व प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायातील मोठा लोकसमुदाय खरोखरीच कोण आहे याचेही ज्ञान मिळाले. या प्रगतिशील प्रकटीकरणामुळे देवाच्या लोकांमध्ये केवढा मजबूत आत्मविश्‍वास निर्माण झाला!—नीतीसूत्रे ४:१८; २ पेत्र १:१९.

१८. प्रभूच्या दिवसात यहोवाच्या लोकांस सेवेच्या कोणत्या विशेष हक्कांचा सहभाग घेता आला, आणि यामुळे कोणती जागृती आमच्या हृदयात उभारली गेली?

१८ याच काळात, यहोवाने पृथ्वीवरील आपल्या सेवकांना सेवेचे विशेष हक्क बहाल केले. एका उच्चप्रतीच्या दृष्टांतात, योहानाने पाहिले की, मानवजातीकरिता सार्वकालिक सुवार्तेची घोषणा, मोठी बाबेल पडल्याची घोषणा आणि श्‍वापदाचे चिन्ह करुन न घेण्याचा इशारा देवदूत देत आहेत. (प्रकटीकरण १४:६-१०) जरी दिव्यदूतांनी या इश्‍वरी विशेष हक्कांवर आपली देखरेख राखली आहे तरी मनुष्यप्राण्यांनी म्हणजेच पृथ्वीवरील यहोवाच्या साक्षीदारांनीच सर्व मानवजातीकरता हे संदेश उद्‌घोषित केले आहेत. योहानाने हेही पाहिले की, येशू “पृथ्वीची कापणी” करीत आहे. (प्रकटीकरण १४:१४-१६) पण ते सर्व राज्य-प्रचार व पृथ्वीवरील येशूच्या प्रजेकरवी जे शिष्य बनविण्याचे काम चालले आहे त्याच्या माध्यमाने ही कापणी तो साध्य करीत आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) देवदूत व स्वतः येशू ख्रिस्ताच्या सोबतीत या महत्त्वपूर्ण सेवेचा हक्क बजावीत राहण्यात हे केवढे भूषणावह वाटते बरे! हे करण्यात मग्न असणे हे आम्हास खरोखरी यहोवाची सर्वथोर, अदृश्‍य स्वर्गीय संस्था, जी त्याच्या विश्‍वासू आत्मिक प्राण्यांनी मिळून बनलेली आहे त्याच्या एकसुत्रतेत सेवा करीत राहण्याचा आनंद मिळवून देते.

ईश्‍वरी संरक्षण

१९. (अ) देवाच्या लोकांवरील सैतानाच्या हल्ल्यांचा शेवट कशात होणार? (ब) शेवटल्या अंतिम युद्धात कोणास विजय प्राप्त होणार?

१९ सैतान, त्याच्या जगाचा नाश जसजसा जवळ येत आहे तसतसा ख्रिस्तीजनांवरील आपले दबाव अधिक वाढवीत आहे. यहेज्केलच्या ३८ व ३९ अध्यायांमध्ये त्याला गोग जो मागोग असे संबोधिले आहे. येथे सैतान आपल्या हल्ल्यांची परिसीमा कशी गाठणार याचे वर्णन सापडते. तो विजयी होईल का? प्रकटीकरण याचे उत्तर देतेः “ती दहा शिंगे [आधुनिक दिवसातील “राजे” किंवा सत्ताधिष्ट] कोकऱ्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांस जिंकील; कारण तो प्रभूंचा प्रभु व राजांचा राजा आहे; आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्‍वासू असे जे त्याजबरोबर आहेत तेही विजय मिळवतील.” (प्रकटीकरण १७:१२, १४) विश्‍वासू ख्रिस्ती त्यांचा थोर विजेता राजा याजबरोबर एकनिष्ठ राहिले तर नक्की विजय प्राप्त करतील. गोगच्या सैन्याचा समूळ नाश केला जाईल.—यहेज्केल ३९:३, ४, १७-१९; प्रकटीकरण १९:१७-२१.

२०. जे ख्रिस्तीजन मोठ्या संकटात विश्‍वासू राहतील त्यांच्यावर प्रभूचा दिवस कोणकोणते आशीर्वाद आणील?

२० अशाप्रकारे प्रभूचा दिवस देवाच्या लोकांकरिता उद्धाराचा दिवस आहे. मोठ्या संकटसमयी अभिषिक्‍तांपैकी, जे अद्याप मानवी देहात जिवंत असतील त्यांच्याजवळ त्यांच्या स्वर्गीय अधिकाराची हमी असेल व कोणतीही चलबिचल होऊ न देता त्यांची पार्थिव जीवनयात्रा विश्‍वासूपणे संपविण्याचा त्यांचा ठाम निश्‍चय राहील. (प्रकटीकरण ७:१-३; २ तीमथ्य ४:६-८) मोठा लोकसमुदायही बचावून राहील व येशू “जीवनी पाण्याच्या झऱ्‍याजवळ त्यांना नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.” (प्रकटीकरण ७:१४, १७) विश्‍वासूपणात टिकून राहण्याचा किती सुंदर मोबदला!

२१. मोठ्या संकटानंतर प्रभूच्या दिवसात पृथ्वीवर काय परिवर्तन घडून येईल?

२१ आता प्रभूच्या दिवसाने एका विस्मयकारक कालावधीत प्रवेश केलेला असेल. ख्रिस्त येशूमार्फतच्या हजार वर्षांच्या राज्यकारकिर्दीत. (प्रकटीकरण २०:६, ११-१५) प्रकटीकरण तसेच यहेज्केल या दोहोत उल्लेखित असणारी जीवनी पाण्याची नदी यहोवाच्या सिंहासनामधून मानवजातीपर्यंत वाहील व जे तिच्यातून पितील त्यांस हळूवारपणे मानवी पूर्णतेप्रत उंचावले जाईल. (यहेज्केल ४७:१-१२; प्रकटीकरण २२:१, २) हेडीज रिकाम्या केल्या जातील, आणि जे करोडो मेलेले होते त्यांनाही या नदीचे पाणी पिण्याची संधी मिळेल.—योहान ५:२८, २९.

२२. ख्रिस्ताच्या हजार वर्षीय कारकिर्दीच्या शेवटास कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडतील?

२२ हजार वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात मानवजात आपल्या पूर्णत्वास पोहंचलेली असेल. सैतानाने पृथ्वीवरील दृश्‍यात आपले अंतिम पदार्पण करण्याकरता हा केवढा योग्य काळ असेल. परत एकदा तो मानवजातीला ठकवावयास पाहील व त्यावेळीही काही त्याच्यामागे जातील. यांना सार्थपणे “गोग आणि मागोग” म्हटले जाईल कारण त्यांनी ‘गोगच्या लोकसमुदायाप्रमाणे’ यहेज्केलमध्ये उल्लेखिल्यासमान दुरात्मिक आत्मा प्रदर्शित केलेला असेल. पण जेव्हा त्यांना, स्वतः सैतानास त्याच्या दुरात्म्यांच्या सोबत लाक्षणिक अग्नीसरोवरात टाकण्यात येईल त्याचवेळी या बंडखोर आत्म्याचा सदासर्वकाळसाठी नाश केला जाईल. (प्रकटीकरण २०:७-१०; यहेज्केल ३९:११) त्या अंतिम परिक्षेत जे विश्‍वासाने टिकून राहतील त्यांच्यासाठी खरोखरीचे आशीर्वादित भवितव्य राखून ठेवले आहे; आणि त्यानंतर पूर्णत्वास पोहंचलेल्या मानववंशाचे यहोवाच्या नीतीमान विश्‍वसंस्थेशी एकीकरण होईल. यहोवा देव स्वतः ‘सर्वांकरिता सर्वकाही’ असे होईल.—१ करिंथकर १५:२४, २८; प्रकटीकरण २०:५.

२३. ज्या काळात आम्ही जगत आहोत त्याच्या दृष्टीकोणातून पाहता आम्हातील प्रत्येकाने अनुसरावा असा पौलाचा कोणता उचित उपदेश पाळून चालणे हितावह ठरेल?

२३ आम्ही जर टिकून राहिलो तर हे सर्व केवढे कल्पनातीत आशीर्वाद आम्हाकरिता राखून ठेवलेले असतील! हे लक्षात ठेवा की प्रभूचा दिवस आता बराच पुढे गेलेला आहे. विस्मयकारक गोष्टी आधीच घडण्यास सुरवात झालेली आहे. मग, पौलाचे ते शब्द योग्य ठरतात की, “योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलतीकर ६:९) यास्तव, या प्रभूच्या दिवसात “योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये.” जर आम्ही टिकून राहिलो तर, हा दिवस आम्हा प्रत्येकास अनंतकालिक फायदे मिळून देईल.

तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल का?

◻ सैतानी जगाच्या नाशाचा पहिला टप्पा कोणता असेल?

◻ येशू आपल्या शत्रुंवरील “अंतिम विजय” कसा पूर्ण करील?

◻ प्रभूच्या दिवसात सैतानाने यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध सतत कसा लढा दिला आहे?

◻ १९१९ पासून देवाच्या लोकांनी कोणत्या अप्रतिम आशीर्वादांचा आनंद लुटला आहे?

◻ काळाच्या ओघात आपण कोठे येऊन पोहंचलो आहोत ते पाहता तुमचा वैयक्‍तीकपणे काय करीत राहण्याचा निर्धार आहे?

[१६ पानांवरील चित्रं]

प्राचीन यरुशलेमाला लाभलेला परिणाम मोठ्या बाबेलचे लवकरच काय होईल ते दाखवितो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा