राज्य घोषकांचा वृत्तांत
बर्मामध्ये ‘कापणी तयार आहे’
◻ बर्माच्या सुंदर प्रदेशात १,५०० पेक्षा अधिक सुवार्तेचे घोषक आहेत. त्यांची अलिकडील अधिवेशने बर्मी, लुशाई आणि हकाचिन भाषांत झाली व यात एकदंरीत २,२७३ उपस्थिती होती. पुढे देण्यात आलेले अनुभव, मेंढरासमान असलेल्या लोकांत राज्य संदेशाविषयी केवढी आस्था आहे हे दाखवितात; तसेच योहानाने आपल्या दृष्टांतात जे बघितले ते, म्हणजे “पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे,” याची प्रचिती देतात.—प्रकटीकरण १४:१५.
ते दीनाम येथे घडले
◻ मटुपी येथे घरोघरचे प्रचार कार्य करीत असता एका खास पायनियरला नरकाविषयी खास रस बाळगून असलेला एक विद्यार्थी भेटला. पवित्र शास्त्रातील नरक म्हणजे मानवजातीची सर्वसाधारण कबर असे जेव्हा त्याला स्पष्टीकरण दिले गेले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. ते त्याला इतके आवडले की, दीनाम येथील आपल्या नातेवाईकांना हे कधी सांगावे असे त्याला झाले. शाळेला सुटी पडली तेव्हा तो आपल्या खेड्याला गेला व येथे त्याने नरकाविषयीचे सत्य सर्वात पसरविले. त्याचा मेहुणा देखील आस्थेवाईक बनला आणि तो या विद्यार्थ्यासोबत मटुपी येथे अधिक माहिती मिळविण्यासाठी व त्या पायनियरला भेटण्यासाठी आला. तो तेथे बरेच आठवडे राहिला व त्याने पायनियरसोबत अभ्यास केला. दुसऱ्यांदा जेव्हा तो येथे आला तेव्हा त्याने पायनियरांना त्याच्या गावी येण्याची विनंती केली. त्याने म्हटले की तेथे बरेच आस्थेवाईक लोक आहेत. तेव्हा तीन पायनियरांनी ते आमंत्रण आनंदाने स्विकारले. ते मोठ्या कष्टाने १२ तासांच्या खडतर प्रवासानंतर दीनाम येथे पोहोंचले.
पायनियर दीनाम येथे आले तेव्हा गावात एक मयत झाली होती. या मयतीला जवळच्या खेडेगावातून बरेच लोक आले होते. ते सर्व पवित्र शास्त्रीय नरक काय आहे हे जाणून घेण्यास थांबले. पवित्र शास्त्रीय चर्चा सायंकाळी ७ वाजता सुरु झाली व ती रात्री ११ वाजेपर्यंत चालली. शेवटी एका समजदार माणसाने चर्चा थांबविली आणि पायनियरांना विसावा घेण्याची विनंति केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजताच पवित्र शास्त्रावर चर्चा सुरु झाली व ती रात्री दहा वाजेपर्यंत चालली. मध्यंतरी जेवणासाठी खपूच थोडा वेळ घेतला गेला. पायनियर त्या गावातून निघाले तेव्हा गावातील मेंढरासमान लोकांनी त्यांना विनंति केली की त्यांनी परत यावे व थोडा अधिक वेळ राहावे. अशा या शिकाऊ वृत्तीच्या लोकांना राज्याच्या मोलवान सत्याने भरवणे किती विलोभनीय हक्क आहे. खरेच, बर्मामध्ये ‘कापणी तयार’ आहे!
टाकून दिलेल्या पुस्तकातून सत्य मिळविणे
◻ एका माणसाने रद्दीची पुस्तके व मासिके विकणाऱ्या आपल्या मित्राला एकदा भेट दिली व त्याने या रद्दीत मुखपृष्ठ नसलेले एक पुस्तक पाहिले. त्याने ते उचलले व वाचायला सुरुवात केली. लगेच तो त्यामध्ये रमून गेला. ते वॉचटावर संस्थेचे थोर शिक्षकाचे ऐका हे पुस्तक होते. त्याने संस्थेच्या शाखा कार्यालयाला लिहून अधिक पुस्तकांची मागणी केली. शाखा दप्तराने लगेच एका पायनियरला या गृहस्थाची भेट घेण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत अभ्यास आरंभिला गेला. काही अभ्यासातच त्याला सत्य कळाले आणि मग त्याने आपले जीवन सुधरविले. त्याने वाईट सवया सोडल्या आणि नंतर आपल्या घरातून हिंदू धर्माच्या मूर्त्या काढल्या. लवकरच तो व त्याची थोरली मुलगी यांनी यहोवाला स्वतःचे समर्पण केले आणि बाप्तिस्मा घेतला. आता तो गृहस्थ नियमित पायनियरींग करीत आहे.
होय, बर्माच्या फलदायी क्षेत्रात “पीक फार, पण कामकरी थोडे आहेत.”—मत्तय ९:३७, ३८.