नवे जग नंदनवनाची पुनर्प्राप्ती!
नवीनच विवाह झालेल्या जोडप्याला सुंदरसे घर होते—घरासमोर फुलझाडे, फळझाडे आणि पशुपक्षांनी बहरलेला मोठा बाग होता. ते नंदनवन होते, जे त्यांच्या प्रेमळ पित्याने दिलेले उदार मनाचे बक्षीस होते. ते त्यानंतर “सुखासमाधानात” राहिले का? नाही. काही काळातच त्यांना त्यांचे ते घर गमवावे लागले. पण का?
त्यांच्या पित्याने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याविषयीची आवड या जोडप्याने प्रदर्शित केली नाही म्हणून ते नंदनवन त्यांच्या हातचे गेले. खरे म्हणजे ते आज्ञाभंजक बनले ही अधिक वाईट गोष्ट होती. त्यांच्या सचोटीची परिक्षा घेण्यासाठी त्यांच्या पित्याने म्हटले होते की, त्यांना एकाशिवाय सर्व झाडांची फळे खाता येतील; पण त्यांनी बंडखोरपणा केला व मना केलेले फळ खाल्ले.—उत्पत्ती २:१५-१७; ३:६, ७.
दिसायला एवढ्या लहानशा चुकीसाठी इतकी मोठी शिक्षा का बरे? या प्रश्नाचे उत्तर कदाचित एका उदाहरणामुळे मिळू शकेल. कोणी दुकानदार सर्व पात्रता असणाऱ्या एका व्यवस्थापकाला आपल्या दुकानात काम देतो. हा व्यवस्थापक खराच विश्वासपात्र आहे की काय ते पहावे म्हणून दुकानदार याच्या हाती कपाटाच्या किल्ल्यांचा जुडगा देतो व म्हणतो की, अमुक एक खण त्याने कोणत्याही परिस्थितीत उघडू नये. तसे केले तर त्याला कामावरुन काढून टाकले जाईल. एकट्याने काम करीत असता या व्यवस्थापकाठायी त्या खणाविषयीचे कुतुहूल वाटू लागते. तो खण उघडतो, तेव्हाच त्याचा मालक त्याला धरतो आणि कामावरून काढून टाकतो.
नंदनवन गमावते
याचा त्या तरुण जोडप्याशी कोणता संबंध आहे? त्यांनी मना केलेले फळ खाल्ल्यामुळे त्यांच्या पित्याने त्यांना त्या सुंदर घराबाहेर काढले. बाहेर निघाल्यावर या नवदांपत्याला, आदाम व हव्वेला, काटे व कुसळे आढळली. पूर्णत्वात राहण्याऐवजी ते अपूर्ण झाले. याखेरीज अनंतकाळ जगण्याऐवजी ते मृत्युपथाला लागले. त्यांनी आपल्या अपत्यांना जन्म देण्यासोबत अपूर्णत्व, पापीवृत्ती व मृत्यु ह्या गोष्टी देखील वारशाने सुपुर्द केल्या.—रोमकर ५:१२.
कालांतराने यहोवाने हे पाहिले की, “मानवाची दुष्टाई फार आहे.” या कारणास्तव, देवाने नोहाच्या काळी पृथ्वीला शुद्ध करण्यासाठी महाजलप्रलय आणिला. त्यामधून कोणी मानव वाचला का? होय, केवळ आठ—नोहा, त्याची तीन मुले आणि त्यांच्या एकंदर चार बायका. यांनी जणू एका वेगळ्या जगाकडे पर्यटन करण्यासाठी, देवाने दिलेल्या सूचनेनुरुप त्यांना व अनेक जातींच्या पशुपक्षांना राहील तसेच प्रचंड अन्न पुरवठा वाहून नेईल असे अवाढव्य तारू उभारले. (उत्पत्ती ६:५-७, १३-२२) ज्या बागेचा एकेकाळी आदाम व हव्वेने आनंद लुटला होता त्याचा या महाजलप्रलयात संपूर्ण नाश झाला. अशाप्रकारे नंदनवन गमावले, पण कायमचे नाही!
नंदनवनाची पुनर्प्राप्ती
काही शतके गेल्यावर देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला मानवजातीची पाप व मरणापासून सुटका करण्याकरता पृथ्वीवर पाठविले. यामुळे जे सर्व येशू ख्रिस्तावर विश्वास व्यक्त करतील अशांना सार्वकालिक जीवनप्राप्तीची शक्यता उपलब्ध झाली. (योहान ३:१६) याशिवाय, नंदनवनाची पुनर्प्राप्ती होणार असे सुद्धा येशूने भाकित केले. तो वधस्तंभावर खिळलेला असताना, शेजारी खांबावर टांगलेल्या एका अपराध्याला म्हणालाः “तू मजबरोबर नंदनवनात असशील.”—लूक २३:४३, न्यू.व.
हे पुनर्प्राप्त होणारे नंदनवन, ज्याला सहसा जगाचा अंत या अर्थाने वेळोवेळी म्हटले जाते त्यानंतर येईल. या जगाच्या अंतासंबंधाने येशूच्या शिष्यांनी त्याला असा प्रश्न केला होताः “आपल्या उपस्थितीचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” याचे उत्तर देताना येशूने युद्धे, अन्नटंचाई, भूकंप, मरी, अधर्मवाढ व जगव्याप्तपणे होणारा देवाच्या राज्याचा प्रचार याविषयींचा उल्लेख केला. चिन्हातील या व इतर घटना १९१४ पासून दृश्यमान आहेत. (मत्तय २४:३-१४) या घटना, या व्यवस्थीकरणाचा शेवट आणि पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना यांच्या आगमनाची सूचना पुरविणाऱ्या आहेत.
त्याच भविष्यवादात येशूने असेही म्हटले होते की, “अंजिराच्या झाडावरुन दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल होऊन पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे, असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.” (मत्तय २४:३२-३५) पवित्र शास्त्रातील इतर भविष्यवादही हेच सूचित करतात की हे पुनरपि किंवा परत स्थापित होणारे नंदनवन अगदी समीप आहे. याचा अर्थ एक नवे जग, क्षितिजावर उभे आहे! पण ते कसे असणार?
नवे जग—खरोखरीच वेगळे!
सध्याच्या सरकारांचे जागी देवराज्याची प्रस्थापना होईल. (दानीएल २:४४) येशू ख्रिस्त, “शांतीचा अधिपति” याच्या राज्याच्या अमलाखाली सर्वांना न्याय व चिरकालिक शांती लाभेल. (यशया ९:६, ७) दुष्ट व अधार्मिक, जे आज मानवजातीवर आपले वर्चस्व गाजवीत आहेत अशांचा तो समूळ नाश करणार व केवळ शांतीप्रिय “सात्विक जन” बचावून राहतील. (नीतीसूत्रे २:२१, २२; प्रकटीकरण १९:११-२१; १६:१४-१६) होय, बचावून राहणारे सर्व लीन, शांतीप्रिय लोक असतील. ती केवढी मोठी मुक्तता बरे!
वंशभेद व इतर सर्व प्रकारचे स्वाभिमान नवीन जगात नाहीसे होतील. प्रत्यक्षात एक मोठा लोकसमुदाय या सर्व गोष्टींवर मात करुन आधीच बरीच वाटचाल करीत पुढे गेला आहे. ते कोण आहेत? यहोवाचे साक्षीदार. पण ते एवढे वेगळे का आहेत बरे? कारण ते पवित्र शास्त्राचा परिश्रमपूर्वक अभ्यास करतात, तो जीवनास लागू करतात व एकमेकांवर प्रीती करतात. (योहान १३:३४, ३५; प्रे. कृत्ये १०:३४, ३५) साक्षीदारांचे संख्याबल जगभरात लाखोच्या घरात आहे तरी पवित्र शास्त्र भाकित करते की, ओघाओघाने पृथ्वीवरील यहोवाच्या भक्तांची संख्या “सर्व राष्ट्रे, वंश, जमाती आणि भाषा यांच्यामधून आलेले लोक यांना कोणाच्याने मोजवला जाणार नाही एवढ्या प्रचंड” स्वरुपाची असेल.—प्रकटीकरण ७:९; द जरुसलेम बायबल.
तेव्हा युद्धाने मनुष्यांची प्राणहानी होणार नाही. अणुशस्त्रे, इतर युद्धअस्त्रे व लष्करी सैन्य यावर लक्षावधींची उधळपट्टी केली जाणार नाही. बंड, राज्यक्रांती, वंशभेदाचे झगडे, आणि इतर सर्व प्रकारचा हिंसाचार यांचा तेथे मागमूसही राहणार नाही. (यशया २:४) लष्करी भरती व तालीम तेथे राहणार नाही; कारण या सर्वांची तेथे जरुरी नसणार. देव सर्व युद्धांचा शेवट करील तो दिवस किती आनंदाचा असेल बरे!—स्तोत्रसंहिता ४६:८, ९.
खरी शांती नांदेल. “थोडक्याच अवधीत,” स्तोत्रकर्ता म्हणतो, “दुर्जन नाहीसा होईल. . . . लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:१०, ११.
अन्नटंचाई दूर होऊन तिचे ऐवजी मुबलकता होईल. अनेक ठिकाणी आज गरीब शेतकरी काटे व कुसळे, निकस जमीन व वाळवंट, तसेच दुष्काळ व भयंकर टोळधाड यांचा सतत सामना करीत आले आहेत. या सर्वांना उलट गति मिळणार. (यशया ३५:१, ६, ७) याचा परिणाम? उत्पादनात प्रचंड वाढ दिसून येईल! (स्तोत्रसंहिता ७२:१६) अन्न-पाण्याची टंचाई दूर करुन यहोवा सर्वांना “मिष्ठान्नाची मेजवानी” देईल.—यशया २५:६.
फलदायी उद्योगाचा अनुभव सर्वांना मिळेल. घर बांधणे, फळझाडांचे रोपण करणे व उद्याने वाढविणे हे केवढे समाधान देणारे असेल! आपल्या स्वतःच्या अंजिराच्या झाडाखाली बसून त्याचे स्वादिष्ट फळ खाण्यात केवढी मजा येईल बरे!—मीखा ४:४.
प्रत्येकासाठी उत्तम सजावटीचे घर पुरविले जाईल. आज लाखो असे आहेत जे झोपडपट्टीत किंवा घाणेरड्या वसाहतीत राहतात. हे केवढे असंतोषी जीवन! आफ्रिकेत लक्षावधी काळे लोक ग्रामीण भागाकडून शहरात येत आहेत पण यांना येथे मातीच्या व पन्हाळ्याच्या पत्र्यांची छते असणाऱ्या गलिच्छ वस्तीतील घरात रहावे लागते, जेथे स्वच्छता तर कमीच आणि खाजगी म्हणावे असे काहीच नसते. तथापि, नवीन जगात लोक सुंदर घरे उभारतील व स्वतः त्यात राहतील.—यशया ६५:२१, २२.
आजारपण व एड्ससारख्या घातक रोगांच्या साथी फैलावण्याऐवजी उत्तम आरोग्य चोहोकडे बहरेल. प्रेरित भविष्यवाद्याने आधीच भाकित केले आहे की, “‘मी रोगी आहे.’ असे एकही रहिवाशी म्हणणार नाही.” अधिक म्हणजे जवळ आलेल्या नवीन जगात, “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३३:२४; ३५:५, ६.
मरण, अश्रू व कबरस्थाने पार नाहीशी होतील. (प्रकटीकरण २१:४) पण जे करोडो आधीच मेलेले आहेत त्यांचे काय? येशू पृथ्वीवर असताना त्याने अनेकांचे पुनरुत्थान केले. उदाहरणार्थ, तो नाईन गावाजवळ आला असताना नुकत्याच मेलेल्या एका व्यक्तीला तिरडीवरून बाहेर नेत होते. तो तरुण होता. त्याच्या शोकित विधवा मातेचे सांत्वन केल्यावर येशू म्हणालाः “मुला, मी तुला सांगतो, उठ.” तो उठला! (लूक ७:११-१७) दुसऱ्या एके प्रसंगी येशूने ही हमी दिलीः “असा समय येत आहे की, त्यात स्मृती कबरेतील सर्व मनुष्ये . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) देवाने असंख्य तारे व इतर आकाशगंगांची निर्मिती केली आहे व तो त्या सर्वांना “नावांनी हाका मारितो,” तर मग, लक्षावधी मृतांचे पुनरुत्थान करण्यात त्याला कसलीच अडचण उद्भवणार नाही.—यशया ४०:२६.
ते तुम्हासाठी आहे का?
यहोवा देवाचा मूळ उद्देश हा होता की, मानवजातीने कधीच मरु नये तर त्याने प्रेमळपणे पुरविलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा तिने उपभोग व आनंद सर्वकाळ लुटावा. तर मग, नवीन जगात आनंदी कुटुंबासोबत जे आशीर्वादित जीवन जगण्यास मिळणार त्याचा विचार करा. सध्या हिंस्त्र असणाऱ्या जनावरांसोबत लहान मुले सुद्धा खेळू शकतील त्याचाही विचार करा. (यशया ११:६-९) याशिवाय शांती, चांगली घरे, फलदायी कामे, मुबलक अन्न याही आशीर्वादांचा विचार करा. शेवटी, पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालपणे जगण्याचा आशीर्वाद केवढा असणार!
पण तुम्ही तेथे असणार का? होय, जर तुम्ही देवाच्या वचनाच्या अचूक ज्ञानाची प्राप्ती केली व त्यानुसार वागला तर ते साध्य होईल. देवाचा कधीही न ढळणारा उद्देश जाणण्यात व त्यावरील विश्वास वाढविण्यात यहोवाचे साक्षीदार तुमची मदत करण्यात उत्सुक आहेत. नंदनवनाची लवकरच पुनर्प्राप्ती होईल, कारण नवे जग अगदी जवळ आहे असा आत्मविश्वास तुम्ही नक्कीच बाळगू शकाल!