अध्याय १
तुम्हाला आनंदी भवितव्य मिळवता येईल!
१, २. तुम्हाला काय मिळावे अशी तुमच्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे?
तुमची ज्याच्यावर प्रीती आहे अशांकडून सस्नेह आलिंगन. प्रिय मित्रांसोबत जेवण करताना मनापासूनचे हास्य. तुमची मुले खेळताना किती उत्साहाने बागडतात ते पाहण्याचा आनंद. हे सर्व जीवनात आनंद देणारे क्षण आहेत. तथापि, पुष्कळांना सध्याचे जीवन म्हणजे एकामागून एक समस्या असणारे चक्र वाटते. अशी तुमची स्थिती आहे तर धैर्य धरा.
२ मनोरम परिसरांत उत्तम परिस्थितींमध्ये तुम्ही दीर्घकाल आनंदाचा उपभोग घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. हे काही स्वप्न नव्हे, कारण खरे पाहता आनंदी भवितव्याची किल्ली तो तुम्हाला देत आहे. ज्ञान ही ती किल्ली होय.
३. कोणते ज्ञान आनंदाची किल्ली आहे आणि हे ज्ञान देव पुरवू शकतो याची आम्हाला खात्री का वाटू शकते?
३ आम्ही एका खास प्रकारच्या ज्ञानाबद्दल येथे बोलत आहोत जे मानवी ज्ञानापेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. ते “देवाविषयीचे ज्ञान” आहे. (नीतिसूत्रे २:५) सुमारे २,००० वर्षांआधी बायबलच्या एका लेखकाने असे म्हटले: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्रीयांस ३:४) सर्व गोष्टींच्या निर्मात्याठायी केवढे अगाध ज्ञान वसते त्याचा जरा विचार करा! देव ताऱ्यांची गणती करतो व त्यांना नावेही देतो असे बायबल म्हणते. हा केवढा चक्रावून टाकणारा विचार आहे, कारण आमच्या आकाशगंगेत लाखो करोडो तारे आहेत आणि खगोल शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, आणखी शंभर अब्ज आकाशगंगा आहेत! (स्तोत्र १४७:४) देवाला आपल्याबद्दल सर्व माहिती देखील आहे, तर मग जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची त्याच्यापेक्षा आणखी कोण चांगली उत्तरे देऊ शकेल?—मत्तय १०:३०.
४. आपल्याला मार्गदर्शन द्यावे म्हणून देवाने सूचना प्रदान करण्याची आपण अपेक्षा का बाळगावी आणि कोणते पुस्तक ती गरज पूर्ण करते?
४ दोन माणसे आपापल्या मोटारगाड्या दुरुस्त करीत असल्याचे चित्र स्वतःपुढे उभे करा. यापैकीचा एक जण वैतागून आपली अवजारे टाकून देतो. पण दुसरा अगदी शांतपणे गाडी दुरुस्त करतो. तो चावी लावतो आणि इंजिन सुरू होते व ते सुरळीत चालू लागते तेव्हा त्याच्या मुखावर हास्य झळकते. या दोघांपैकी कोणाजवळ उत्पादकाने तयार केलेले सूचना पुस्तक होते याची कल्पना करणे तुम्हाला जड जाणार नाही. तर मग, देव देखील आपल्याला जीवनामध्ये सूचना पुरवू शकतो हे वास्तविक वाटत नाही का? तुम्हाला कदाचित माहीत असेल की, बायबलचा आपल्या निर्मात्याकडून सूचना व मार्गदर्शन देणारे, देवाचे ज्ञान प्रदान करण्यासाठी रचलेले पुस्तक असल्याचा दावा आहे.—२ तीमथ्य ३:१६.
५. बायबलमध्ये असणारे ज्ञान किती मोलाचे आहे?
५ बायबलचा हा दावा खरा असेल तर त्या पुस्तकात ज्ञानाचे केवढे मोठे भांडार आहे त्याचा विचार करा! नीतिसूत्रे २:१-५ मध्ये आपल्याला बुद्धी मिळवण्यासाठी, आपण गुप्त खजिना जसा खणून काढतो तसे तिला मनुष्याच्या सुपीक डोक्यातून नव्हे तर देवाच्या स्वतःच्या वचनातून मिळवण्याचा ते आर्जव करते. आपण तेथे शोध घेतल्यास “देवाविषयीचे ज्ञान” आम्हाला मिळू शकेल. वस्तुतः, देवाला आपल्या गरजा व मर्यादा कळत असल्यामुळे तो आम्हाला अशा सूचना देतो ज्यामुळे आपल्याला शांतीदायक व आनंदी जीवन व्यतीत करायला मदत होते. (स्तोत्र १०३:१४; यशया ४८:१७) शिवाय, देवाचे ज्ञान आपल्याला उत्साहवर्धक सुवार्ता देखील सादर करते.
सार्वकालिक जीवन!
६. देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल येशू ख्रिस्ताने कोणती खात्री दिली?
६ सुपरिचित ऐतिहासिक व्यक्ती येशू ख्रिस्त याने देवाच्या ज्ञानाबद्दल स्पष्ट रूपात माहिती दिली. त्याने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी प्राप्त करावे.” (योहान १७:३, NW) सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान—जरा विचार करा!
७. आपण मरावे अशी देवाची इच्छा नव्हती याचा कोणता पुरावा आहे?
७ सार्वकालिक जीवन एका स्वप्नासारखे वाटते म्हणून त्याचा विचार लगेचच मनातून काढून टाकू नका. उलटपक्षी, मानवी शरीराची घडण कशी करण्यात आली ती पाहा. त्याची, चव घेणे, ऐकणे, वास घेणे, पाहणे व जाणीव होणे याकरता अगदी उत्तम रीतीने रचना करण्यात आली आहे. या पृथ्वीवर आपल्या ज्ञानेंद्रियांना आनंदित करतील अशा पुष्कळ गोष्टी आहेत—रुचकर अन्न, पक्षांचे मंजुळ गाणे, फुलांचा सुगंध, सुंदर देखावा, आनंददायी सोबत! शिवाय आमचा आश्चर्यकारक मेंदू हा तर अत्यंत मोठ्या व शक्तिशाली संगणकापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो आपल्याला या सर्व गोष्टींची कदर करण्यास व आनंद उपभोगण्यास समर्थ करतो. आपण मरावे व या सर्व गोष्टींना मुकावे अशी आमच्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? त्यापेक्षा आपण आनंदी जीवन जगावे आणि अनंतकाल जीवनाचा उपभोग घ्यावा अशी त्याची इच्छा आहे असा निष्कर्ष काढणे अधिक व्यवहार्य वाटणार नाही का? देवाच्या ज्ञानाचा तुमच्यासाठी अगदी हाच अर्थ होऊ शकतो.
परादीसमधील जीवन
८. मानवजातीच्या भवितव्याबद्दल बायबल काय म्हणते?
८ पृथ्वी व मानवजातीच्या भवितव्याबद्दल बायबल जे काही म्हणते त्याचा सारांश—परादीस या एका शब्दात देता येईल! येशू ख्रिस्ताने याबद्दल, मरणाच्या बेतात असलेल्या एका माणसाला सांगितले: “तू माझ्याबरोबर सुखलोकात [परादीस] असशील.” (लूक २३:४३) येथे सुखलोकाच्या किंवा परादीसच्या उल्लेखाने त्या माणसाच्या मनात आपले पहिले पालक, आदाम व हव्वा यांच्या आनंदी परिस्थितीचे चित्र आले असावे यात काही शंका नाही. देवाने यांची निर्मिती केली तेव्हा ते परिपूर्ण होते आणि त्याने रचना केलेल्या व लावलेल्या एका उद्यानासमान बागेत ते राहात होते. त्याला एदेन बाग असे उचितपणे म्हटले जाई, त्या नावाचा परादीस असा अर्थ आहे.
९. मूळच्या परादीसमधील वास्तव्य कशाप्रमाणे होते?
९ तो बाग केवढा रमणीय होता! ते खरेच परादीस होते. त्यातील सुंदर वनश्रींमध्ये चविष्ट फळे देणारी झाडी होती. आदाम व हव्वा त्यांच्या परिसरात नवनवीन गोष्टींचा शोध घेत असता, तेथील शुद्ध व गोड पाणी पीत असता आणि वृक्षांवरील फळे गोळा करीत असता त्यांना चिंता करण्याचे किंवा भयग्रस्त होण्याचे कसलेही कारण नव्हते. प्राण्यांपासून देखील कोणतीही भीती नव्हती, कारण देवाने पुरुष व त्याच्या बायकोला प्राण्यांच्या प्रेमळ देखरेखीसाठी ठेवले होते. या खेरीज पहिल्या मानवी जोडप्याला दमदार आरोग्य दिले होते. जोपर्यंत ते देवाशी आज्ञाधारक राहतील तोपर्यंत त्यांच्यापुढे चिरकालिक, आनंदी भवितव्य होते. त्यांच्या मनोरम परादीस गृहाची काळजी घेण्याचे तृप्तीदायक काम त्यांना देण्यात आले होते. शिवाय देवाने आदाम व हव्वा यांना “पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा,” ही आज्ञा दिली होती. त्यांनी व त्यांच्या संतानांनी परादीसच्या सीमा आपल्या सबंध ग्रहावर पोहंचवून त्याला सुंदर व विलोभनीय स्थळ होईपर्यंत पूर्ण करायचे होते.—उत्पत्ति १:२८.
१०. येशूने जेव्हा परादीसबद्दल म्हटले तेव्हा त्याच्या मनात कोणता विचार असावा?
१० परंतु, येशूने जेव्हा परादीसचा उल्लेख केला तेव्हा तो त्या मरणाऱ्या माणसाला गतकाळातील गोष्टींचा विचार करायला सांगत नव्हता. नाही, येशू भवितव्याबद्दल बोलत होता! आपले सबंध पार्थिव गृह एक परादीस होईल हे त्याला माहीत होते. या प्रकारे, मानवजात व आपली पृथ्वी याबद्दल बाळगलेला मूळ उद्देश देव पूर्ण करील. (यशया ५५:१०, ११) होय, परादीसची पुनर्स्थापना होईल! पण ते कसे असेल? याचे उत्तर देवाचे वचन, पवित्र बायबल यालाच देऊ द्या.
पुनर्स्थापित परादीसमधील जीवन
११. पुनर्स्थापित परादीसमध्ये आजार, वार्धक्य व मृत्यू यांचे काय होईल?
११ आजार, वार्धक्य व मरण यापुढे राहणार नाहीत. “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील; बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३५:५, ६) “देव स्वतः [मानवजातीबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
१२. भावी परादीसमध्ये गुन्हे, हिंसाचार व दुष्टाई नसणार याबद्दल आपल्याला खात्री का असू शकते?
१२ गुन्हे, हिंसाचार व दुष्टाई कायमची नाहीशी होणार. “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल; . . . थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . त्याचा पत्ता लागणार नाही. पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.” (स्तोत्र ३७:९-११) “दुर्जनांचा देशांतून [पृथ्वीतून] उच्छेद होईल; अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२२.
१३. देव शांती कशी आणील?
१३ संपूर्ण पृथ्वीवर शांती नांदेल. “तो [देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो.” (स्तोत्र ४६:९) ‘नीतिमान उत्कर्ष पावतील; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.’—स्तोत्र ७२:७.
१४, १५. पुनर्स्थापित परादीसमध्ये घरे, काम व अन्न असण्याबद्दल बायबल काय म्हणते?
१४ सुरक्षित घरे व तृप्तीदायक काम असेल. “ते घरे बांधून त्यात राहतील. . . . ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.”—यशया ६५:२१-२३.
१५ सकस आहार मुबलकपणे उपलब्ध असेल. ‘भूमीत भरपूर पीक येईल; पर्वतांच्या शिखरापर्यंत ते डोलेल.’ (स्तोत्र ७२:१६) ‘भूमी आपला उपज देईल; देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल.’—स्तोत्र ६७:६.
१६. परादीसमध्ये जीवन आनंदमय का असेल?
१६ परादीस पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन आनंदमय असेल. “नीतिमान् पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.”—यशया ३५:१.
ज्ञान व तुमचे भवितव्य
१७. (अ) परादीसमधील जीवन तुम्हाला अपीलकारक वाटत असल्यास तुम्ही काय करावे? (ब) देव पृथ्वीवर मोठे बदल घडवून आणणार हे आपल्याला कसे कळते?
१७ परादीसमधील जीवन तुम्हाला अपीलकारक वाटत असल्यास, देवाचे ज्ञान मिळवण्यापासून काहीही तुम्हाला परावृत्त न करो. त्याची मानवजातीवर प्रीती आहे आणि पृथ्वीला परादीस बनवण्याकरता आवश्यक असणारे सर्व बदल तो घडवून आणील. समजा, आज जगात इतक्या विपुलतेने दिसणारी दैन्यावस्था व अन्याय काढून टाकण्याचे सामर्थ्य तुम्हाठायी असते तर तुम्ही ते केले नसते का? मग, देव यापेक्षा काही कमी करील अशी अपेक्षा आम्ही धरावी का? खरे म्हणजे, झगड्यांनी ग्रस्त असणारी ही व्यवस्था काढून टाकून त्याऐवजी देव एक परिपूर्ण व न्यायी शासन आणण्याच्या काळाबद्दल बायबल अगदी स्पष्टपणे बोलते. (दानीएल २:४४) तथापि, या गोष्टी केवळ सांगण्यापेक्षा बायबल आणखी काही करते. आपण देवाच्या वचनदत्त नव्या जगात बचावून कसे जाऊ शकतो हे ते आपल्याला दाखवते.—२ पेत्र ३:१३; १ योहान २:१७.
१८. देवाचे ज्ञान तुम्हाला सध्याकरता काय करू शकते?
१८ देवाचे ज्ञान सध्याही तुमच्यासाठी बरेच काही करू शकते. जीवनातील खोल तसेच अत्यंत त्रस्त अशा प्रश्नांची उत्तरे बायबलमध्ये देण्यात आली आहेत. त्याचे मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे तुम्हाला देवासोबत मित्रत्व वाढवता येईल. केवढा हा विशेषाधिकार! त्यामुळे केवळ देवच देऊ शकतो अशा शांतीचा अनुभव तुम्हाला घेता येईल. (रोमकर १५:१३, ३३) हे महत्त्वपूर्ण ज्ञान घेण्याची सुरवात केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या व प्रतिफळदायक प्रयत्नाला सुरवात करता. सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या देवाच्या ज्ञानाची प्राप्ती केल्याबद्दल तुम्हाला कधीच खंत वाटणार नाही.
१९. पुढच्या अध्यायात आम्ही कोणत्या प्रश्नाचा विचार करणार आहोत?
१९ बायबलमध्ये देवाचे ज्ञान नमूद आहे असा आम्ही उल्लेख केलेला आहे. तरीपण, ते मानवी ज्ञानाचे पुस्तक नसून त्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ प्रकारातील आहे हे आपल्याला कसे कळते? या प्रश्नाचा विचार आपण पुढील अध्यायात करणार आहोत.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
देवाविषयीचे ज्ञान तुम्हाला चिरकालिक आनंदाकडे का निरवू शकते?
येणाऱ्या पार्थिव परादीसमधील जीवन कसे असेल?
तुम्ही सध्या देवाचे ज्ञान घेत राहण्यामुळे तुमचा फायदा का होईल?