जगाचे स्वामित्व बदलत आहे
तुम्हास निवड करता आलीच तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या सरकारच्या वर्चस्वाखाली राहण्याचे पसंद कराल? आम्हापैकी अनेकांना स्थिर राहणारे व त्याबरोबरच योग्य रितीने वाजवी व्यक्तीस्वातंत्र्य पुरविणारे सरकार आवडेल. आम्हास अशी राज्ययंत्रणा हवी असेल जी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून शांतीप्रद ध्येयांना प्राधान्य देईल, सामाजिक न्यायत्वास उत्तेजन देईल आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतिशील असेल. खरोखर जी राज्ययंत्रणा जुलमी व भ्रष्ट नसेल तीच आम्हाला अधिक आवडेल.
बहुतेक सरकारे अशी राहिलेली नाहीत ही एक दुःखद गोष्ट आहे. आम्ही २० व्या शकाच्या उत्तरार्धातील जगाचा विचार केल्यास आमच्या दृष्टीस काय पडते? गरीबी, भ्रष्टता, टंचाई, दडपशाही, सामाजिक अन्याय, गुन्हेगारी व आंतरराष्ट्रीय तणाव ही चोहीकडे पसरलेली आहेत. हा आजपर्यंत चालत असलेल्या मानवी सरकारचा अंतिम परिणाम आहे.
अर्थात, हेही खरे आहे की, काही अधिपती व्यक्तीगतपणे सुविचारी आणि कार्यक्षम होते. काही सरकारी व्यवस्थांकडे पाहता त्या तुलनात्मकपणे काही काळासाठी स्थिर व कार्यक्षम होत्या. पण तेच, मानवी सरकार म्हणून सर्वांचा जर एकत्रितपणे विचार केल्यास त्यांनी मानवीजातीकरता जे काही करावे असे आम्ही अपेक्षितो त्यातील अपयश पवित्र शास्त्रातील या निवेदनास खरे ठरवितेः “मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही. पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) याचाच अर्थ, बाहेरील मदतीविना स्वतःवर अधिकार चालविण्यासाठी मनुष्याची निर्मिती केलेली नाही.
या कारणास्तव हे जाणणे केवढे फायदेशीर आहे की जगाचे स्वामित्व बदलत आहे. असे म्हणण्यामागील आमचा काय अर्थ आहे? हाच की, मानवी जीवनावर अधिपत्य गाजवीत असलेल्या व्यवस्थीकरणाचे सूत्र लवकरच अशा एका नवीन सरकारच्या हाती दिले जाईल जे त्यात पूर्णपणे विजयी ठरेल. राज्ययंत्रणेमधील हा आमूलाग्र बदल देवाने आधीच भाकित केलेला आहे. हाच पवित्र शास्त्राचा मुख्य विषय आहे.
राज्य यंत्रणेबद्दल देवाला वाटणारी आस्था
मानवजातीवरील राज्य कारभाराशी देव नेहमीच संबंधीत राहिलेला आहे. मानवी शासने आपणावरील जबाबदाऱ्या किती मर्यादेपर्यंत पुऱ्या करीत आहेत हे तो बारकाईने न्याहाळत असतो; आणि काही वेळा तो त्यांच्याकडून हिशेब सुद्धा घेतो. इतिहासामधील गेल्या २,५०० वर्षातील उल्लेखनीय सत्तांचा इतिहास पवित्र शास्त्रात पूर्वभाकित केलेला आहे. जे ख्रिस्तजन्माआधी ५०० पेक्षा अधिक वर्षे आधी लिहिले गेले त्या दानीएलाच्या पुस्तकात असे भविष्यवाद लिखित आहेत ज्यात प्राचीन काळातील बाबेलच्या अधःपाताबद्दल तसेच मेद-पारस, ग्रीस आणि रोम यांच्याबद्दल देखील भविष्यवाद आहेत. या भविष्यवादात, आमच्या दिवसातील अँग्लो-अमेरिकन जागतिक सत्तेचा उदय कसा होणार हे आधीच सांगितले होते. यांच्यापैकी काही भविष्यवादांचा संक्षिप्त विचारविनिमय आमचे हे आकलन करून घेण्यात साहाय्य करील की, जगाचे स्वामित्व बदलत आहे या विधानामागील अर्थ काय होता.
आश्चर्यचकित करणाऱ्या या भविष्यवादातील पहिले एक असे प्रेरित स्वप्न होते ज्यात दानीएलाच्या काळापासून ते आमच्या दिवसापर्यंतची राजकीय जागतिक साम्राज्ये एका अवाढव्य मूर्तिद्वारे सादर केली गेली आहेत. मग, एक पाषाण, कोणाचाही हात न लागता आपोआप सुटतो व या मूर्तीवर आदळतो व तिचे चूर्ण करतो. तो पाषाण या जागतिक साम्राज्यांचे चूर्ण करतो व “त्यांचे चूर्ण होऊन [ते] उन्हाळ्यातील भुशाप्रमाणे झाली; वाऱ्याने ती उधळून नेली; त्यांचा मागमूसही राहिला नाही.”—दानीएल २:३१-४३.
याचा काय अर्थ होतो याचे दानीएलाने याच अध्यायात स्पष्टीकरण दिले आहे. ते हे स्पष्ट करते की, अपयशी ठरलेल्या मानवी सरकारांच्या जागी असे काही स्थापिले जाईल जे अत्यंत वरिष्ठ दर्जाचे असेल. तेथे सांगण्यात आले आहेः “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील. त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल. . . . हे स्वप्न खरे आहे व त्याचा अर्थही निःसंशये खरा आहे.”—दानीएल २:४४, ४५, न्यू.व.
पण या विषयाचा एवढ्यात शेवट होणार नव्हता. तर दुसऱ्या दृष्टांतात लागोपाठ येणाऱ्या जागतिक साम्राज्यांचे प्रतिनिधीत्व अशा बलाढ्य हिंस्र पशुद्वारे केले आहे ज्यांचे गुण ज्या साम्राज्याचे ते प्रतिनिधीत्व करीत त्यांच्यात दिसून आले. मग, दानीएलास सर्वोच्च स्वर्गातील “पुराण पुरुष” याचे सिंहासन पाहण्याची परवानगी देण्यात आली; याशिवाय त्याला आणखी काही असे दाखविण्यात आले जे त्याच्या नव्हे तर आमच्या काळातील अँग्लो-अमेरिकनांच्या कारकिर्दीत घडणार होते. त्याने पाहिले तो, यहोवाची ऐश्वर्यशाली न्यायसभा या जागतिक साम्राज्याबद्दलची दंडाज्ञा ठरविण्यास बसलेली आहे. (दानीएल ७:२-१२) जसे पुढील शास्त्रवचनात स्पष्ट करण्यात आले त्यानुसार जगाच्या स्वामित्वात बदल आणावा असा ईश्वरी हुकुम काढण्याचे ठरले. हे स्वामित्व कोणास देण्यात येणार होते?
मानवपुत्रासारखा कोणी
अंतःकरणास हेलावून सोडणारे उत्तर दानीएल देतोः
“तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले तो आकाशातील मेघावर आरुढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला, व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व रा व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.”—दानीएल ७:१३, १४.
याप्रकारे, हा “पुराणपुरुष,” स्वतः यहोवा देव, मानवी सरकारामार्फतच्या गैरकारभारास कायमचे दूर करील. त्यांच्या जागी एका अशा सरकारची स्थापना तो करील जे मानवजात अपेक्षिते त्याहीपेक्षा फारच उत्तम प्रकारचे असेल—एक असे अदृश्य राज्य जे त्याचा अधिकार आणि अंमल स्वर्गातून चालवील. पण हा “मानवपुत्रासारखा कोणी” कोण आहे ज्याला राज्य सोपवून देण्यात आले?
आम्हास साशंकतेत सोडलेले नाही. येशूने स्वतः आपली “मनुष्याचा पुत्र” अशी ओळख दिली आहे. त्याच्या उपस्थितीच्या काळाच्या वर्णनात त्याने म्हटले कीः “मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील.” (मत्तय २५:३१) जेव्हा यहुद्यांच्या महायाजकाने येशूपाशी मागणी केली की त्याने न्यायसभेला सांगावे की तो “देवाचा पुत्र ख्रिस्त” आहे की नाही, तेव्हा येशूने उत्तर दिलेः “तू म्हटले तसेच. आणखी मी तुम्हास सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल.”a—मत्तय २६:६३, ६४.
शेवटले मानवी जागतिक साम्राज्य
दानीएलाच्या काळाच्या सुमारे ६०० वर्षांनंतर प्रेषित योहानाने ईश्वरी प्रेरणेने पवित्र शास्त्रातील प्रकटीकरण पुस्तकाचे लिखाण केले. ते पुस्तक या जागतिक साम्राज्यांना बलाढ्य “राजे” असे संबोधून म्हणते की, ते “सात राजे आहेत. त्यापैकी पाच पडले आहेत; एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.”—प्रकटीकरण १७:१०.
पाच आधीच पडले आहेत असे जे योहानाने लिहिले ते, मिसर, अश्शुर, बाबेल, मेद-पारस आणि ग्रीस हे होते. रोमी साम्राज्य त्याच्याकाळी ‘होते.’ मग, हे उघड आहे की, आमच्या काळातील अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य सातवे होते की जे योहानाच्या काळातील लिखाणानुसार ‘अद्याप आले नव्हते.’ प्रकटीकरणानुसार सातव्यानंतर कोणतेही जागतिक साम्राज्य येणार नव्हते—ते आजही अस्तित्वात आहे. ते शेवटले आहे. याच्यानंतर कोणी नाही.
अर्थात, हा आम्हासाठी कोणाही प्रकारे भयप्रद विचार नाही—तो तर सुखदविणारा आहे! याचा अर्थ अन्यायी, युद्धप्रिय मानवी साम्राज्यांचा अंत जवळ आहे. पृथ्वीवरील अधिपत्यात केवढा मोठा बदल होणार आहे ते सांगण्यात भविष्यवादांची एकवाक्यता आहे. हा बदल म्हणजेच स्वार्थी मानवी सरकारांच्या जागी नीतीमान स्वर्गीय सरकारची, देवराज्याची प्रस्थापना.
देवाचे राज्य सरकार
पण ते राज्य काय आहे? ते लोकांच्या अंतःकरणातील किंवा जीवनातील चांगले ते करण्याच्या आभासापेक्षा, पुष्कळसे अधिक सामावून आहे. तसेच ज्याला ख्रिश्चन चर्चचे जीवन संबोधितात त्यापेक्षा हे कितीतरी वेगळ्या प्रकारचे आहे. देवाचे राज्य हे एक खरोखरचे सरकार आहे. त्याला एक राजा आहे; सहअधिपती आहेत; व त्याला त्याचे क्षेत्र आहे, तसेच प्रजाही आहे. ते आधी उल्लेखिलेल्या विस्मयकारक आशीर्वादांचा वर्षाव करील.
राजांचा राजा म्हणून येशूची ओळख दिलेली आहे. त्याने स्वतःला एका उमरावासारखे दर्शविले. तो “राज्य मिळवून परत यावे म्हणून दूर देशी गेला.” त्या भावी काळाबद्दल तो म्हणालाः “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल.”—लूक १९:१२; मत्तय २५:३१.
हा “मनुष्याचा पुत्र” कधी येणार? याच्या उत्तरासाठी आम्ही तर्कवितर्क करीत बसण्याची गरज नाही. येशूच्या या शब्दात ते उत्तर आहे की, “आपल्या येण्याचे [उपस्थितीचे] व युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३, ३०) या मासिकातील रकान्यात वेळोवेळी हे स्पष्ट करण्यात आले आहे की, ती “उपस्थिती” स्वर्गात अदृश्यपणे १९१४ मध्ये “विदेश्यांचा काळ” पूर्ण झाल्यापासून आरंभिली गेली.b—लूक २१:२४.
प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात आधीच दर्शविले त्याप्रमाणे येशूने आपल्या हाती राज्याधिकार घेतला आणि सैतानास स्वर्गातून पृथ्वीवर टाकून दिले. स्वर्गात वाणी झालीः “आता तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाचे झाले आहे व अधिकार त्याचा ख्रिस्ताचा झाला आहे. कारण जो आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याजवर दोषारोप करणारा, तो खाली टाकण्यात आला आहे.” यामुळे हे स्पष्ट होते की, त्या काळापासून जगाची परिस्थिती एवढी का खालावत आहे. यासाठीच ती स्वर्गीय वाणी पुढे म्हणतेः “पृथ्वी व समुद्र यांवर आपला अनर्थ ओढवला आहे, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरुन तुम्हाकडे गेला आहे.”—प्रकटीकरण १२:९-१२.
हा थोडा काळ लवकरच संपेल. काही अध्यायानंतर गौरवी येशूला पांढऱ्या घोड्यावरील स्वार असे चित्रित करण्यात आलेले आहे. त्याला “देवाचा शब्द” म्हटलेले आहे. तो ‘राष्ट्रांस मारील,’ आणि ‘त्यांजवर लोखंडी दंडाने राज्य करील.’ हे जसे दानीएलने स्पष्ट केले तसेच आहे की, देवाचे पाषाणरुपी राज्य प्रथम सर्व राष्ट्रांचा चुराडा करील व नंतर ते वाढून सबंध पृथ्वीला व्यापून टाकेल.—प्रकटीकरण १९:११-१६; दानीएल २:३४, ३५, ४४, ४५.
त्यानंतर कधीही श्वापदासारखी मानवी राजकीय सत्ता मानवजातीवर दडपशाही करण्यास उद्भवणार नाही.
सहअधिपती
पण आणखी काही आहे. दानीएलास असे म्हणण्यास प्रेरित केले की, हे राज्य फक्त “मानवपुत्रासारखा कोणी” यालाच नव्हे तर “परात्पर देवाची प्रजा, जे पवित्र जन” यांसही देण्यात येईल.—दानीएल ७:२७.
हे कोण आहेत? प्रकटीकरण कोकरा, ख्रिस्त येशू याविषयी म्हणते की, त्याने “सर्व वंश, भाषा, लोक व रा यातील इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत; आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत.” ते पुढे म्हणते की हे “देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याजबरोबर हजार वर्षे राज्य करतील.” त्यांची संख्या एकूण १,४४,००० आहे—प्रकटीकरण ५:९, १०; १४:१; २०:६.
हेच ते आहेत ज्यांची निवड सर्वोच्च देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर जागतिक सरकारमध्ये सहभागी होण्यास केलेली आहे. मग ज्यांची निवड देवाने कलेली आहे त्यांच्यापेक्षा अधिक सुरक्षित असे आमचे भवितव्य कोणाच्या हाती असू शकेल? कोणाच्याही नाही. कारण हे राज्य हेच, मानवास आतापर्यंत अनुभवास आलेल्या सरकारांमध्ये सर्वोच्च प्रतीचे असल्याचे दिसेल. त्याच्या अमलाखाली देवाच्या मूळ संकल्पानुसार या पृथ्वीचे रुपांतर नंदनवनात होईल.
पुढील लेख वाचा आणि विचार करा की, अशा प्रकारच्या सरकारच्या अमलाखाली राहण्याचे तुम्ही पसंत कराल की नाही.
[तळटीपा]
a दानीएलाच्या दृष्टांताविषयी द न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतोः “दानीएल येथे शेवटल्या काळी घडणाऱ्या चिरकाल अभूतपूर्व अशा घटनेविषयी बोलत आहे याविषयी किंचितही शंका येत नाही.” तो पुढे म्हणतोः “येशूने सन्हेद्रीनपुढे दिलेला कबुलीजबाब, तो स्वतःच मनुष्याचा पुत्र आहे याविषयी निर्विवाद पुरावा देतो व त्याच्या राज्यसत्तेत येण्याच्या सामर्थ्याविषयी स्पष्ट संदर्भ पुरवितो.”
b पहा द वॉचटावर मे १, १९८२ व एप्रिल १, १९८४ चे अंक.
[८ पानावरील चौकट]
येशूच्या शिकवणीचा मुख्य विषय
“देवाचे राज्य हाच येशूच्या प्रचारकार्यातील मुख्य विषय आहे.”—न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ.
“[देवाचे राज्य] हा सर्वसाधारणपणे येशूच्या शिकवणूकीतील मुख्य विषय आहे.”—एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका.
पण, “येशूच्या शिकवणीतील मुख्य विषय,” चर्चमध्ये गेल्यावेळी कधी चर्चिलेला तुम्ही ऐकला?
[९ पानावरील चौकट]
देवाच्या राज्याबद्दलच्या समजूतीत घोटाळा
काही लोकांस वाटते की, “पृथ्वीवरील चर्च हेच देवाचे राज्य आहे.” इतरांठायी हा विश्वास आहे की जेव्हा हे जग “ख्रिश्चन प्रभावाखाली एवढे भरभराटीस पोहंचेल की त्याचे रुपांतर देवराज्यात होईल.” तर दुसरे काहीजण समजतात की, “एखाद्याच्या ह्रदयात किंवा जीवनात चालत असलेला देवाचा अमल हे देवाचे राज्य आहे.”
पण देवराज्याबद्दल, एक धार्मिक व्यवस्था, ओघाओघाने बदलणारा राजकीय बदल किंवा लोकांच्या हृदयातील एखादी आध्यात्मिक स्थिती इतकेच आहे का?