देवाच्या राज्याखाली पृथ्वीचे तेजोमय भवितव्य
“विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा . . . आहे,” असे पवित्र शास्त्र म्हणते. (इब्रीयांस ११:१) आपण मागील लेखात पाहिले की, ख्रिस्ताच्या जन्माच्या ५०० वर्षे आधी देवाने दानीएलाच्या पुस्तकात दानीएलाच्या काळापासून ते आमच्या काळापर्यंत उदयास येणाऱ्या व निघून जाणाऱ्या जागतिक साम्राज्यांविषयीचा पूर्वदृष्टांत नमूद करून ठेविलेला आहे. या भविष्यवादांची अचूकता आम्हाला, दानीएलाच्या पुस्तकात आढळणारे इतर भविष्यवाद जरूर पूर्ण होतील आणि येशू ख्रिस्ताकरवीचे देवाचे राज्य लवकरच मानवी राज्यांचा ताबा आपणाकडे घेईल याची खातरी देते व तसा बळकट विश्वास उभारते.
मानवजातीसाठी हा किती अपूर्व बदल असेल! त्या काळाकडे दृष्टी रोखून देव स्वतः असे म्हणतोः “पाहा, मी सर्व नवे करतो!” (प्रकटीकरण २१:५) त्या आनंदी काळाविषयीचे दृश्य रंगविणाऱ्या काही प्रेरित भविष्यवादांचा विचार केल्यास काय “नवे” होणार व हे, आज मानवी अधिपत्याखाली आपल्याला जे अनुभवण्यास मिळते त्यापासून केवढे भिन्न असणार त्याची स्पष्टता देईल. खरे म्हणजे पवित्र शास्त्र पृथ्वी व तिजवरील जीवनाच्या भवितव्याविषयी जे म्हणजे ते जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
गुन्हे व हिंसाचार समाप्त होतील. “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल, . . . दुर्जन नाहीसा होईल.” तेथे राहणारे “सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश यहोवाच्या तोंडची ही वाणी आहे.”—स्तोत्रसंहिता ३७:९, १०; मीखा ४:४.
वंशभेद व राष्ट्रीय भेद तसेच त्यापासून उत्पन्न होणाऱ्या लढाया या सर्व गोष्टी दिसेनाशा होतील. “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—यशया २:४.
घरांची टंचाई, बेघरपणा आणि बेकारी या सर्व गोष्टी भूतकाळात जमा होतील. यशयाने भाकित केलेः “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे उपभोगतील.”—यशया ६५:२१, २२.
भयंकर दुष्काळ, ज्याचे सावट नुकतेच आफ्रिकेवर पडले होते, ते पुढे दिसणार नाहीत; त्याऐवजी सर्वत्र अन्नाची रेलचेल असेल. ‘भूमीत भरपूर पीक येईल; पर्वताच्या शिखरावर ते डोलेल.’ ‘भूमी आपला उपज देईल; देव, आमचा देव आम्हाला आशीर्वाद देईल.’—स्तोत्रसंहिता ७२:१६; ६७:६, ७.
याखेरीज या आशीर्वादांचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य आणि जीवन राहील. येशू पृथ्वीवर होता त्या काळी त्याच्या उपाध्यपणात सुद्धा “अंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात,” या गोष्टी खरेपणाने घडत होत्या. तरीपण भावी काळात हे अभिवचन मोठ्या प्रमाणात पूर्ण होईलः “तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत. कारण पहिले होऊन गेले.”—लूक ७:२२; प्रकटीकरण २१:४.
केवढा हा भव्य बदल! संत्रस्त मानवजातीला यामुळे केवढे हायसे वाटेल! याकरताच आम्ही तुम्हाला देवाच्या राज्याला आत्ताच अधीन होण्याचे नम्र प्रोत्साहन देत आहोत. यामुळे, जगाच्या स्वामित्वात संस्मरणीय बदल घडल्यावर हे जे आशीर्वाद येणार आहेत त्यांचा लाभ तुम्हालाही प्राप्त करता येईल.
[११ पानांवरील चित्रं]
आता जिवंत असणारे लोक भावी काळच्या अद्भूत आशीर्वादांकडे पाहू शकतात—युद्धे, गुन्हेगारी, गरीबी, आजार आणि मृत्यु याचा सुद्धा अंत. असे हे भवितव्य तुम्हाला आवडणार नाही का?