अध्याय १०
देवाचे राज्य आधिपत्य गाजवते
१, २. मानवी सरकार अपुरे असल्याचे कसे सिद्ध झाले आहे?
तुम्ही एखादे साधन विकत घेतले, पण ते आणल्यावर कामच करीत नसल्याचा अनुभव कदाचित तुम्हाला आला असेल. तुम्ही दुरुस्ती करणाऱ्याला बोलावले, असे आपण म्हणू. त्याने “ठाकठीक” केल्यावर काही वेळाने तुम्हाला ते साधन परत मोडल्याचे दिसते. ते किती निराशाजनक होते!
२ मानवी सरकारांबद्दल हीच गोष्ट खरी आहे. शांती व आनंदाची खात्री देणारे एक सरकार असावे अशी मानवजातीची नेहमीच इच्छा राहिली आहे. तरीपण, समाजातील बिघाड काढून टाकण्यासाठी केलेले प्रचंड परिश्रम खरे पाहता यशस्वी ठरले नाहीत. कितीतरी शांती तह करण्यात आले आणि मोडलेसुद्धा. याशिवाय दारिद्र्य, कलुषितपणा, गुन्हेगारी, रोगराई व परिस्थितीकीचा नाश कोणत्या सरकारला काढून टाकता आला? माणसांचे आधिपत्य दुरुस्त होण्याच्याही पलीकडे गेले आहे. इस्राएलचा सुज्ञ राजा शलमोनाने सुद्धा असे विचारले: “कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?”—नीतिसूत्रे २०:२४.
३. (अ) येशूच्या प्रचाराचा विषय कोणता होता? (ब) काही लोक देवाच्या राज्याचे वर्णन कसे करतात?
३ तरीपण, निराश होऊ नका! जागतिक चिरस्थायी सरकार हे निव्वळ स्वप्न नाही. तो येशूच्या प्रचाराचा विषय होता. त्याला त्याने “देवाचे राज्य” असे म्हटले व त्याच्या अनुयायांना त्यासाठी प्रार्थना करावयास शिकवले. (लूक ११:२; २१:३१) अर्थात, धार्मिक वर्तुळात देवाच्या राज्याचा कधी कधी उल्लेख होतो. खरे म्हणजे जेव्हा लाखो लोक प्रभूची प्रार्थना वारंवार म्हणतात तेव्हा दररोज त्या राज्यासाठी प्रार्थिले जाते (हिला आमच्या पित्या किंवा नमुनेदार प्रार्थना असे देखील म्हटले जाते). पण, “देवाचे राज्य काय आहे?” असे विचारल्यावर लोकांची उत्तरे वेगवेगळीच येतात. काही म्हणतात, “ते तुमच्या अंतःकरणात आहे.” दुसरे काही त्याला स्वर्ग म्हणतात. परंतु, बायबल याचे स्पष्ट उत्तर देते, जे आम्ही पाहणारच आहोत.
उद्देश असणारे राज्य
४, ५. यहोवाने आपल्या सार्वभौमत्वाचे नवे प्रकटन सामोरे आणण्याचे का ठरवले व ते काय साध्य करील?
४ यहोवा देव राजा किंवा विश्वाचा सार्वभौम सत्ताधारी नेहमीच राहिला आहे. त्यानेच सर्व गोष्टींची निर्मिती केलेली असल्यामुळे तो या उच्च पदाचा आहे. (१ इतिहास २९:११; स्तोत्र १०३:१९; प्रेषितांची कृत्ये ४:२४) तथापि, येशूने ज्या राज्याचा प्रचार केला ते देवाच्या विश्व सार्वभौमत्वापुढे दुय्यम स्वरूपाचे आहे. या मशीही राज्याचा खास उद्देश आहे, तो कोणता?
५ सहाव्या अध्यायात विवेचित करण्यात आल्याप्रमाणे पहिल्या मानवी दांपत्याने देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड केले. जे वादविषय उद्भवले गेले त्यामुळे यहोवाने त्याच्या सार्वभौमत्त्वाचे नवे प्रकटन सामोरे आणण्याचे ठरवले. देवाने एका ‘संतानाची’ निर्मिती करण्याचा त्याचा संकल्प जाहीर केला. ते संतान, सर्प, सैतानाचे डोके फोडणार होते व मानवजातीला वारशाने मिळालेल्या पापाचे परिणाम काढून टाकणार होते. ते प्रधान “संतान” येशू ख्रिस्त असून “देवाचे राज्य” हे साधन आहे, ज्याद्वारे सैतानाचा पूर्ण पराजय केला जाणार होता. याच राज्याद्वारे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर यहोवाच्या नामात आधिपत्य स्थापन करणार आणि देवाच्या कायदेशीर सार्वभौमत्वाला सदासर्वकाळासाठी गौरव देत राहणार होता.—उत्पत्ति ३:१५; स्तोत्र २:२-९.
६, ७. (अ) ते राज्य कोठे आहे आणि त्याचा राजा व सहशासनकर्ते कोण आहेत? (ब) राज्याची प्रजा कोण आहे?
६ एका भाषांतरानुसार येशूने दुष्ट परूश्यांना असे म्हटल्याचे पाहावयास मिळते: “देवाचे राज्य तुमच्यात आहे.” (लूक १७:२१, किंग जेम्स व्हर्शन) ते राज्य त्या भ्रष्ट माणसांच्या दुष्ट अंतःकरणात होते असे येशूच्या म्हणण्याचा अर्थ होता का? नाही. मूळ ग्रीकमधील अधिक अचूक भाषांतर असे वाचले जाऊ शकते: “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.” त्यांच्यामध्ये असणारा येशू स्वतःला अशाप्रकारे, भावी राजा या नात्याने संबोधित होता. देवाचे राज्य एखाद्याच्या अंतःकरणात असण्यापेक्षा ते खरे, कार्यवाही सरकार असून त्याला शासनकर्ता व प्रजाही आहे. ते स्वर्गीय सरकार आहे, कारण त्याला “स्वर्गाचे राज्य” व “देवाचे राज्य” अशा दोन्ही संज्ञांनी संबोधले जाते. (मत्तय १३:११; लूक ८:१०) दानीएल संदेष्ट्याने दृष्टान्तामध्ये त्याच्या शासनकर्त्याला ‘मानवपुत्रासारख्या कोणाला तरी’ सर्वसमर्थ देवापुढे आणल्याचे व “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून” त्याला चिरकाल “प्रभुत्व, राज्य व वैभव” देण्यात आल्याचे पाहिले. (दानीएल ७:१३, १४) हा कोण राजा असावा? बरे, बायबल येशू ख्रिस्ताला “मनुष्याचा पुत्र” असे म्हणते. (मत्तय १२:४०; लूक १७:२६) होय, यहोवाने त्याच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला राजा म्हणून नियुक्त केले आहे.
७ पण येशू एकटाच शासन करीत नाही. त्याच्या बरोबर १,४४,००० जण आहेत, ज्यांना त्याचे सहराजे व सहयाजक बनण्यासाठी “पृथ्वीवरून विकत घेतलेले” आहे. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३; लूक २२:२८-३०) देवाच्या राज्याची प्रजा ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली अधीन असणारे मानवाचे जगव्याप्त कुटुंब असेल. (स्तोत्र ७२:७, ८) तरीपण, हे राज्य देवाच्या सार्वभौमत्वाचे खरेपणाने गौरव करील आणि आमच्या पृथ्वीवर परादीसमय परिस्थितींची पुनर्स्थापना करील याची आम्हाला कशी खात्री होऊ शकते?
देवाच्या राज्याचा खरेपणा
८, ९. (अ) देवाच्या राज्य अभिवचनाबद्दलच्या खात्रीलायकतेबद्दल आपल्याला उदाहरण देऊन कसे सांगता येईल? (ब) राज्याच्या खरेपणाबद्दल आपल्याला खात्री कशी होऊ शकते?
८ तुमचे घर आगीने जळून खाक झाले आहे अशी कल्पना करा. आता, तुमचा एक मित्र आहे व त्याच्यापाशी साधनसामग्री आहे. तो तुम्हाला तुमचे घर पुन्हा बांधून देण्याचे आणि तुमच्या कुटुंबाला अन्न पुरवण्याचे अभिवचन देतो. हा तुमचा मित्र जर नेहमीच खरे बोलणारा असला तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही का? समजा, तुम्ही दुसऱ्या दिवशी कामावरून परतता आणि बघता की, आधीच आगीत जळून खाक झालेल्या गोष्टी दूर करण्याच्या कामात कामगार तर गुंतलेले आहेत आणि तुमच्या कुटुंबाकरता अन्न देखील आणण्यात आले आहे. ते बघून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल की, काही काळानंतर सर्व काही परत उभारले जाईल इतकेच नसून ते पूर्वीपेक्षा चांगले असेल.
९ याचप्रकारे, यहोवा आपल्याला राज्याच्या खरेपणाबद्दलची हमी देतो. बायबलमधील इब्रीयांस पत्र या पुस्तकात दाखवल्यानुसार नियमशास्त्राच्या विविध गोष्टी राज्य व्यवस्थेच्या पडछाया होत्या. (इब्रीयांस १०:१) देवाच्या राज्याच्या पूर्वछटा इस्राएलाच्या पृथ्वीवरील राज्यात दृश्यमान होत्या. ते काही साधे सरकार नव्हते, कारण त्याचे शासक “परमेश्वराच्या सिंहासनावर” बसत असत. (१ इतिहास २९:२३) याखेरीज, हे भाकीत करण्यात आले होते: “शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही. राजदंड त्याच्या पायामधून ढळणार नाही. राष्ट्रे त्याच्या आज्ञांकित होतील.” (उत्पत्ति ४९:१०)a होय, या यहूदी राजांच्या मालिकेमधून देवाच्या सरकारचा, कायमचा राजा येशू, जन्मणार होता.—लूक १:३२, ३३.
१०. (अ) देवाच्या मशीही राज्याचा पाया केव्हा घालण्यात आला? (ब) येशूचे भावी सहशासक पृथ्वीवर कोणत्या कामामध्ये पुढाकार घेणार होते?
१० देवाच्या मशीही राज्याचा पाया येशूच्या प्रेषितांच्या निवडीद्वारे घालण्यात आला. (इफिसकर २:१९, २०; प्रकटीकरण २१:१४) हे, सहराजे या नात्याने येशू ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करणाऱ्या १,४४,००० मधील पहिले होते. पृथ्वीवर असताना हे भावी सहशासक येशूच्या या आज्ञेला अनुलक्षून साक्षकार्याच्या मोहीमेत पुढाकार घेणार होते: ‘तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.’—मत्तय २८:१९.
११. राज्य-प्रचाराचे कार्य आज कसे पूर्ण होत आहे आणि ते काय साध्य करीत आहे?
११ शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे आता अभूतपूर्व प्रमाणात पालन होत आहे. यहोवाचे साक्षीदार राज्याच्या सुवार्तेची घोषणा सबंध जगभर येशूच्या या भविष्यवादित शब्दांच्या अनुषंगाने करीत आहेत: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) राज्य-प्रचार कार्याचा एक भाग म्हणून एक मोठा शैक्षणिक कार्यक्रम पार पाडला जात आहे. जे देवाच्या राज्याचे नियम व तत्त्वे यांच्या अधीन होत आहेत अशांना मानव सरकारांना संपादता येत नाहीत त्या शांती व ऐक्यतेचा अनुभव आधीच मिळाला आहे. या सर्व गोष्टी, देवाचे राज्य खरे असल्याचा स्पष्ट पुरावा देत आहेत.
१२. (अ) राज्य घोषकांना यहोवाचे साक्षीदार असे म्हणणे का समर्पक आहे? (ब) देवाचे राज्य मानवी सरकारांपेक्षा कसे भिन्न आहे?
१२ यहोवाने इस्राएल लोकांना म्हटले होते: “तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.” (यशया ४३:१०-१२) “विश्वासनीय साक्षी” येशूने राज्याच्या सुवार्तेची आवेशाने घोषणा केली. (प्रकटीकरण १:५; मत्तय ४:१७) या कारणास्तव, सध्याच्या राज्य-घोषकांनी देखील ईश्वरी संमतीने नियुक्त करण्यात आलेले नाव, यहोवाचे साक्षीदार, धारण करावे हे योग्य आहे. पण साक्षीदार, देवाच्या राज्याबद्दल इतरांना बोलण्यामध्ये इतका वेळ व इतके प्रयत्न का करतात? कारण, राज्य हीच मानवजातीची एकमात्र आशा आहे; त्यामुळे ते हे करतात. मानवी सरकारे आज ना उद्या नाहीशी होतात, पण देवाचे राज्य कधीही नाश होणार नाही. यशया ९:६, ७ त्याचा शासनकर्ता, येशूला “शांतीचा अधिपति” असे संबोधते व पुढे म्हणते: “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” देवाचे राज्य मानवाच्या सरकारसारखे आज आहे व उद्या नाही, असे नाही. म्हणनूच दानीएल २:४४ म्हणते: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील; त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर . . . ते सर्वकाळ टिकेल.”
१३. (अ) देवाचे राज्य कोणत्या काही समस्यांना यशस्वीरित्या हाताळील? (ब) देवाची अभिवचने पूर्ण होतील याची आम्हाला का खात्री आहे?
१३ कोणत्या मानवी राजाला युद्ध, गुन्हे, आजारपण, उपासमार आणि बेघरपणा यांचे उच्चाटन करता येऊ शकेल? याशिवाय, कोणत्या ऐहिक शासनकर्त्याला मृतांचे पुनरुत्थान करता येईल? देवाचे राज्य व त्याचा राजा या गोष्टी साध्य करील. हे राज्य, बिघडलेल्या व सारखी दुरुस्ती कराव्या लागणाऱ्या साधनाप्रमाणे नसणार. उलटपक्षी, देवाचे राज्य यशस्वी होईल, कारण यहोवाचे हे अभिवचन आहे: “माझ्या मुखातून निघणारे वचन . . . माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता ते मी पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.” (यशया ५५:११) देवाचा उद्देश तर अपयशी होणारच नाही. पण हा राज्याधिकार केव्हा सुरू व्हावयाचा होता?
राज्याधिकार—केव्हा?
१४. राज्याबद्दल येशूच्या शिष्यांनी कोणती गैरसमजूत करून घेतली होती पण येशूला त्याच्या राज्यपदाबद्दल काय माहीत होते?
१४ “प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” येशूच्या शिष्यांनी विचारलेला हा प्रश्न, त्यांना तेव्हापर्यंत देवाच्या राज्याचा उद्देश आणि त्याने आधिपत्य गाजवण्यास सुरवात करण्याचा नियुक्त काळ कळला नव्हता हे प्रकटवतो. या प्रकरणाबद्दल काही अंदाज न लावण्याची ताकीद देताना येशूने त्यांना म्हटले: “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही.” येशूला ठाऊक होते की, त्याला पृथ्वीकरता मिळणारे शासन त्याचे पुनरुत्थान व स्वर्गारोहणाच्या काळाच्या बऱ्याच काळानंतर, भविष्यकालात मिळणार होते. (प्रेषितांची कृत्ये १:६-११; लूक १९:११, १२, १५) शास्त्रवचनांनी हे भाकीत केले होते. ते कसे?
१५. येशूच्या राज्याधिकाराच्या वेळेबद्दल स्तोत्र ११०:१ कसा प्रकाश पाडते?
१५ दावीद राजाने येशूला भविष्यवादितपणे ‘प्रभू’ असे संबोधून म्हटले: “माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो: ‘मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.’” (स्तोत्र ११०:१; पडताळा प्रेषितांची कृत्ये २:३४-३६.) ही भविष्यवाणी सुचवते की, येशूचा राज्याधिकार त्याचे स्वर्गारोहण झाल्यानंतर लगेच सुरू होणार नव्हता. उलट, तो देवाच्या उजवीकडे बसून राहणार होता. (इब्रीयांस १०:१२, १३) ही प्रतीक्षा किती काळ चालणार होती? त्याचा राज्याधिकार केव्हा सुरू होणार होता? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास बायबल आमची मदत करते.
१६. सा. यु. पू. ६०७ मध्ये काय घडले व हे देवाच्या राज्याशी कसे संबंधित होते?
१६ सबंध पृथ्वीवर ज्या एका शहराला यहोवाने आपले नाव दिले, ते जेरुसलेम होते. (१ राजे ११:३६) ते देवाच्या स्वर्गीय राज्याचे नमुनेदार प्रतिरूप असणाऱ्या, देवाची मर्जी लाभलेल्या, पृथ्वीवरील राज्याची राजधानी होते. याकरताच, सा. यु. पू. ६०७ मध्ये बाबेलोन्यांनी जेरुसलेमचा केलेला नाश मोठा अर्थसूचक होता. या घटनेने पृथ्वीवरील देवाच्या लोकांवरील त्याच्या थेट अधिकारामध्ये दीर्घ पल्ल्याच्या हस्तक्षेपाचा आरंभ चिन्हांकित केला. याच्या साधारण सहा शतकांनी येशूने दर्शवले की, अधिकारामध्ये हस्तक्षेप झाल्याचा तो काळ अद्याप सुरू होता, कारण त्याने म्हटले: “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायाखाली तुडवितील.”—लूक २१:२४.
१७. (अ) “परराष्ट्रीयांची सद्दी” काय आहे व ती किती काळ टिकणार होती? (ब) “परराष्ट्रीयांची सद्दी” केव्हा सुरू झाली व संपली?
१७ “परराष्ट्रीयांची सद्दी” दरम्यान असा काळ होता, जेव्हा जागतिक सरकारांना, देवाची मर्जी असणाऱ्या राज्याधिकारात हस्तक्षेप करण्याची मुभा दिली जाणार होती. तो काळ जेरुसलेमचा सा. यु. पू. ६०७ मध्ये झालेल्या नाशाने सुरू झाला आणि हा अवधि “सात काळ” असेल असे दानीएलाने सूचित केले. (दानीएल ४:२३-२५) हे केवढ्या लांब मुदतीचे आहे? बायबल दाखवते की, साडेतीन “काळ” म्हणजे १,२६० दिवस. (प्रकटीकरण १२:६, १४) याची दुप्पट किंवा सात काळ म्हणजे २,५२० दिवस होणार. पण हा छोटासा अवधी संपल्यावर लक्षवेधी असे काहीच घडले नाही. तथापि, “प्रत्येक दिवसामागे एक वर्ष” हा नियम दानीएलाच्या भविष्यवाणीला लागू केला आणि २,५२० वर्षांची मोजणी सा. यु. पू. ६०७ पासून केली तर आपण सा. यु. १९१४ या वर्षी येऊन पोहंचतो.—गणना १४:३४; यहेज्केल ४:६.
१८. येशूने राज्याधिकार मिळाल्यावर काही काळातच काय केले आणि याचा पृथ्वीवर काय परिणाम झाला?
१८ त्या वेळी येशूने स्वर्गात आपला राज्याधिकार सुरू केला का? त्याने सुरू केला असे म्हणण्यामधील शास्त्रवचनीय कारणांची चर्चा पुढील अध्यायात करण्यात येईल. अर्थातच, येशूच्या राज्याधिकाराची सुरवात पृथ्वीवर लगेच शांती येण्याने चिन्हांकित होणार नव्हती. प्रकटीकरण १२:७-१२ दाखवते की, राज्याधिकार मिळाल्यावर येशू लगेच सैतान व त्याच्या दुरात्मिक दूतांना स्वर्गातून घालवून देणार होता. याचा अर्थ, पृथ्वीसाठी अनर्थ होणार होता; परंतु दियाबलाचा केवळ “थोडा काळ” आहे हे वाचणे खरेच उत्तेजनात्मक आहे. लवकरच आपल्याला देवाचे राज्य आधिपत्य करते याचाच नव्हे तर ते पृथ्वीवर व आज्ञाधारक मानवजातीवर आशीर्वादांचा वर्षाव करील म्हणून आनंद वाटेल. (स्तोत्र ७२:७, ८) हे लवकरच घडणार आहे हे आपल्याला कसे कळते?
[तळटीप]
a शिलो या नावाचा अर्थ, “ज्याचे आहे तो; ज्याच्या मालकीचे आहे तो.” कालांतराने, हा “शिलो” “यहूदा वंशाचा सिंह,” येशू ख्रिस्त होता हे प्रकट झाले. (प्रकटीकरण ५:५) यहूद्यांच्या काही लिखाणात “शिलो” ऐवजी “मशीहा” किंवा “मशीहा राजा” असे शब्द वापरण्यात आले आहेत.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
देवाचे राज्य काय आहे आणि ते कोठून शासन करते?
राज्याचा अधिकार कोण चालवतात आणि कोण त्याची प्रजा आहे?
यहोवाने त्याचे राज्य खरे असल्याबद्दलची खात्री आपल्याला कशी दिली आहे?
“परराष्ट्रीयांची सद्दी” केव्हा सुरू झाली व संपली?
[९४ पानांवरील चौकट]
देवाच्या राज्याशी संबंधित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण घटना
• दियाबल सैतान या सर्पाचे डोके ठेचणाऱ्या ‘संतानाची’ निर्मिती करण्याच्या उद्देशाची यहोवा घोषणा करतो.—उत्पत्ति ३:१५.
• सा. यु. पू. १९४३ मध्ये यहोवा हे दर्शवतो की, हे “संतान” अब्राहामाचा मानवी वंश असेल.—उत्पत्ति १२:१-३, ७; २२:१८.
• इस्राएलाला सा. यु. पू. १५१३ मध्ये देण्यात आलेला नियमशास्त्र करार “पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी[ची] . . . छाया” देतो.—निर्गम २४:६-८; इब्रीयांस १०:१.
• पृथ्वीवरील इस्राएलाचे राज्य सा. यु. पू. १११७ मध्ये सुरु होते, आणि ते दावीदाच्या मालिकेत पुढे जाते—१ शमुवेल ११:१५; २ शमुवेल ७:८, १६.
• जेरुसलेमचा नाश सा. यु. पू. ६०७ मध्ये होतो व “परराष्ट्रीयांची सद्दी” सुरु होते.—२ राजे २५:८-१०, २५, २६; लूक २१:२४.
• येशूचा सा. यु. २९ मध्ये नियुक्त होणारा राजा या अर्थाने अभिषेक होतो व तो पृथ्वीवरील त्याच्या सेवकपणात पुढे सरसावतो.—मत्तय ३:१६, १७; ४:१७; २१:९-११.
• सा. यु. ३३ मध्ये येशू स्वर्गास जातो व तेथे त्याचा अधिकार सुरु होईपर्यंत देवाच्या उजवीकडे बसून राहतो.—प्रेषितांची कृत्ये ५:३०, ३१; इब्रीयांस १०:१२, १३.
• “परराष्ट्रीयांची सद्दी” संपते तेव्हा सा. यु. १९१४ मध्ये येशू स्वर्गीय राज्यामध्ये सिंहासनावर बसतो.—प्रकटीकरण ११:१५.
• सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीच्या आसमंतात टाकून दिले जाते, त्यामुळे मानवजातीवर वाढता अनर्थ येतो.—प्रकटीकरण १२:९-१२.
• येशू देवाच्या राज्याच्या जागतिक सुवार्ता प्रचार कामावर देखरेख करतो.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.