देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करा
“ते तुझ्या राज्यपदाविषयीचा महिमा वर्णन करून सांगतील, आणि तुझा पराक्रम कथन करतील.”—स्तोत्रसंहिता १४५:११, न्यू.व.
१. यहोवाने आपल्याला बोलण्याचे दान मुख्यत्वे कशासाठी दिले?
यहोवा देवाने आपल्याला बोलता येण्याचे दान देण्यामध्ये एक उद्देश राखला होता. (निर्गम ४:११) आमच्या ओठांनी त्याची ‘स्तुति गावी’ हा तो उद्देश होता. (स्तोत्रसंहिता ११९:१७१, १७२) स्तोत्रकर्त्या दाविदानेही याच पद्धतीने स्तुतिगान केले: “हे यहोवा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुति गातील; आणि तुझे निष्ठावान भक्त तुझा धन्यवाद करतील. ते तुझ्या राज्यपदाचा महिमा वर्णन करून सांगतील; आणि तुझा पराक्रम कथन करतील. ह्यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे; तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.”—स्तोत्रसंहिता १४५:१०–१३.
२. आम्हाला कोणत्या मार्गाने देवाची ‘स्तुति गाण्याची’ चालना मिळाली आहे?
२ येशू ख्रिस्ताचे अभिषिक्त अनुयायी व त्यांच्या सोबतीचा “मोठा लोकसमुदाय” यांना यहोवा या “सनातन राजा”ची स्तुति करण्याची उत्सुकता वाटते. (प्रकटीकरण ७:९; १५:३) पवित्र शास्त्राचा टेहळणी बुरुज व इतर ख्रिस्ती प्रकाशने या मार्गदर्शकांद्वारे केलेल्या अभ्यासाद्वारे आम्हाला देवाविषयीचे अचूक ज्ञान शुद्ध, नितळ व जीवनदायी पाण्याप्रमाणे मिळते. त्यामुळे आमची स्थिति ‘वाहता ओढा झालेल्या ज्ञानाच्या झऱ्यासारखी’ होते. (नीतीसूत्रे १८:४) आम्हाला घरोघरचे साक्षी कार्य व क्षेत्रकार्याच्या इतर प्रकारात ‘स्तुति गाण्याची’ चालना मिळते. तरीपण अनौपचारिक साक्षीकार्य करीत राहण्याची शास्त्रवचनीय कारणे आहेत.
शास्त्रवचनीय दाखले
३. येशू ख्रिस्ताने केलेल्या अनौपचारिक साक्षीकार्याचे कृपया एखादे उदाहरण द्या.
३ येशूचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाल्यावर त्याने आपले पहिले प्रचार कार्य स्वतःच्या राहत्या घरी केले. येथे त्याने योहान, आंद्रिया व बहुधा पेत्राला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांनी तेथे सबंध दिवस घालविला व त्या अनौपचारिक परिस्थितीत व्याप्त रूपाने साक्ष ऐकली. (योहान १:३५–४२) शिवाय आणखी एका अनौपचारिक प्रकारात—“जाताना”—येशूने मत्तयाला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले. याच वेळी त्याने त्याला म्हटले, “माझ्या मागे ये.” तेव्हा त्याला सरळ प्रतिसाद लाभला.—मत्तय ९:९.
४. शोमरोनी स्त्रीला साक्ष देताना येशू काय म्हणाला व त्यामुळे काय झाले?
४ येशू हा ‘वाहता ओढा झालेल्या ज्ञानाच्या झऱ्या’ विषयीचे उत्तम उदाहरण ठरला. सुखार नजीकच्या याकोबाच्या झऱ्यावर येशू भुकेला व थकलेल्या स्थितीत बसला असता पाणी भरण्यास आलेल्या एका शोमरोनी स्त्रीला त्याने साक्ष दिली. “मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही,” येशू म्हणाला. “जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” याचा परिणाम असा झाला की त्या स्त्रीने येशूचे म्हणणे गावातील लोकांना कळविले. हे लोक तिच्या बोलण्याने आश्चर्यचकित होऊन येशूकडे आले व तो त्यांना प्रचार करू शकला.—योहान ४:६–४२.
५. सुवार्तिक फिलिप्प व प्रेषित पौल यांनी अनौपचारिक साक्षीचे कोणते उदाहरण दिले?
५ सुवार्तिक फिलिप्पाने जात असलेल्या एका रथाला थांबविले व रथात यशयाच्या भविष्यवादाचे वाचन करणाऱ्या माणसाला त्याने साक्ष दिली. रथात येऊन बसण्याचे आमंत्रण मिळाल्यावर फिलिप्पाने त्या कुशी षंढाला “येशू विषयीची सुवार्ता” कळविली व त्यामुळे त्या रसिक षंढाचा बाप्तिस्मा झाला. (प्रे. कृत्ये ८:२६–३८) फिलिप्पी येथील मोठ्या भूकंपात पौलाच्या बेड्या खुल्या झाल्या तेव्हा त्याने तुरुंगाधिकाऱ्याला अनौपचारिक साक्ष दिली. याचा परिणाम? “त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला.”—प्रे. कृत्ये १६:१९–३४.
६. स्तेफनाचा धोंडमार झाल्यावर येशूच्या शिष्यांच्या कार्यात अनौपचारिक साक्षीने बहुधा कोणता कार्यभाग पार पडला होता?
६ आज, जेथे आमच्या ख्रिस्ती कार्यावर बंदी आहे तेथे सुवार्तेची घोषणा अनौपचारिक साक्षीद्वारे केली जाते. आमचा छळ केला गेला तरीही आमची अंतःकरणे आम्हाला देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करण्याविषयी चालना देतात. स्तेफनास धोंडमार करून ठार केल्यावर बहुतेक छळग्रस्त ख्रिस्ती दुरदूर पांगले. तरीही, ते सुवार्ता घोषित करीत राहिले. त्यांच्या राज्य प्रचाराच्या कार्यात अनौपचारिक साक्षीचा प्रकार निःसंशये होता—प्रे. कृत्ये ८:४–८; ११:१९–२१.
७. बंदिस्त असताना पौलाने काय केले व यामुळे कोणता प्रश्न उद्भवतो?
७ आम्ही बंदिवासात असलो, किंवा आजारपण वा अपंगत्व यामुळे अंथरूणाला खिळून असलो तर अशा वेळी अनौपचारिक साक्षीकार्य देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करण्याचा चांगला मार्ग होय. पौल रोमी रक्षकाच्या ताब्यात साधारण दोन वर्षासाठी बंदिस्त होता. तथापि, एकाकी पडून राहण्यापेक्षा त्याने लोकांना भेटीचे दालन उघडे ठेवले आणि “जे ज्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे . . . [व] . . . पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवीत असे.” (प्रे. कृत्ये २८:१६–३१) केवढे हे सुंदर उदाहरण! तुम्ही यहोवाचे बंदिस्त साक्षीदार आहात तर या सारखेच काही करू शकाल का?
८. पौलाची अनौपचारिक साक्ष केवढी प्रभावी ठरली?
८ पौलावर पहारा देणारे रक्षक वेळोवेळी बदलत असल्यामुळे त्याने इतरांजवळ देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करताना यांनीही त्याचे ऐकले असावे; शिवाय त्यांनाही त्याने थेटपणे साक्ष दिली असावी हे आम्हाला निश्चये मानता येईल. त्याची ही साक्ष एवढी प्रभावी ठरली की त्यामुळेच पौल लिहू शकला: “मला ज्या गोष्टी घडल्या . . . त्या [सुवार्तेच्या] वृद्धीला साधनीभूत झाल्या . . . म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या सर्व सैनिकात व सर्व जणात, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धि झाली. आणि त्यांची खातरी पटून बहुतेक बंधूनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठायी देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले.” (फिलिप्पैकर १:१२–१४) पौलाप्रमाणे आम्ही बंदिस्त झालो किंवा नित्याचे साक्षीकार्य करण्याची संधि हिरावून घेतली गेली तरीही देवाच्या राज्यपदाविषयीचे आम्हाला भाष्य करता येईल. हे आमच्या बांधवांठायी केवढे धैर्य उभारील!
९, १०. आरंभीच्या ख्रिश्चनांनी अनौपचारिक साक्ष दिली होती याला कोणता प्रापंचिक पुरावा आहे?
९ आरंभीच्या ख्रिश्चनांमध्ये अनौपचारिक साक्षीकार्याचा प्रकार इतका सर्वसाधारण होता की नंतरच्या वर्षांतही हे म्हटले जाऊ शकत होते: “कार्थेजमधील सुमारे २००व्या वर्षाच्या एका ख्रिस्ती लेखकाकडून आम्हाला हे ऐकावयाला मिळते . . . [की] उच्च शिक्षित लोकांमध्ये याचा प्रभाव पडला होता. परस्पर मित्र असणारे तीन तरूण वकील एका समुद्रतीरी सबंध दिवसभराची सुट्टी घालविण्यासाठी गेले. यापैकीचे दोघेजण ख्रिस्ती आहेत तर तिसरा मूर्तिपूजक. त्यांच्यातील बोलणे लवकरच धर्माकडे वळते . . . आपसात झालेल्या दीर्घकाळाची चर्चा संपते. ‘आम्ही तिघेही आनंदाने परतलो. एकजण, त्याने ख्रिस्ती विश्वासाचा अंगीकार केला म्हणून आनंदी होता तर इतर दोघे, त्यांना त्या तिसऱ्याला त्याप्रत आणता आले म्हणून आनंदी होते.’ हे लिखाण खरा इतिहास आहे असे वाटत नसले तरी ते मिनुसियस फेलिक्स करवीचे समर्थन आहे. तथापि ही गोष्ट, अधिक उच्च प्रतीच्या लोकात काय घडत होते ते दाखविते.” (चर्च हिस्ट्री १—द फर्स्ट ॲडव्हान्स: इ.स. २९–५००, जॉन फोस्टर तर्फे लिखित, पृष्ठे ४६, ४८) होय, खरेच त्या काळी ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्यांमध्ये अनौपचारिक साक्षीचे कार्य संपुष्टात आले नव्हते असे त्या अहवालाद्वारे दिसते.
१० आरंभीच्या ख्रिश्चनांच्या बाबतीत असेही म्हणण्यात आले आहे: “ख्रिस्ती विश्वासधारकांच्या संख्येत सतत वाढ होत राहिली. हे कोणत्याहि गावी आपल्या नित्याच्या व्यवसायासाठी गेले किंवा छळामुळे गेले तरी ख्रिस्ताचा प्रचार करीत होते . . . ज्यांनी स्वतःचा व्यवसाय, उद्योगधंदा केला तो कोणताहि असला तरी आपल्या विश्वासाची सहभागी ते विस्तृतपणे करीत.” (द मिशनरी एंटरप्राइझ एड्विन मनसेल ब्लिस द्वारा लिखित, पृष्ठ १४) होय, आरंभीच्या राज्य घोषकांनी औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने साक्ष दिली.
आगाऊ विचार व तयारी
११. देवाच्या सत्यावर लक्ष केंद्रित करविण्याच्या बाबतीत आम्ही येशूकडून काय शिकू शकतो?
११ येशू व त्याच्या आरंभीच्या अनुयायांप्रमाणे आम्ही औपचारिकरित्या व अनौपचारिकपणे साक्ष दिलीच पाहिजे. हे परिणामकारकपणे करण्यासाठी आगाऊ विचार व तयारी जरूरीची आहे. अनौपचारिकपणे साक्षी देताना व सूचना पुरविताना येशूने मुले, अन्न, कपडे, पक्षी, फुले, हवामान परिस्थिती आणि व्यवसाय यांना उदाहरण म्हणून उपयोगात आणिले. (मत्तय ४:१८, १९; ६:२५–३४; ११:१६–१९; १३:३–८; १६:१–४) आम्हालाही देवाच्या सत्यावर लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणत्याहि विषयाचा उपयोग आधार म्हणून करता येईल.
१२. प्रवासाची योजना आखताना एखाद्याला अनौपचारिक साक्षीकार्याबद्दल कशी तयारी करता येईल?
१२ बागेत बसलेलो असताना, दुकानाच्या रांगेत उभे असताना लोकांना अनौपचारिक साक्ष देण्याची आम्हाला संधि आहे. अथेन्समध्ये पौल “बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज” विचारांची चर्चा करीत असे. (प्रे. कृत्ये १७:१७) तथापि, आम्ही अनौपचारिक साक्षीकार्यास्तव तयारी करण्याची जरूरी आहे. उदाहरणार्थ, तुम्ही विमान, आगगाडी किंवा बसने प्रवास करण्याची योजना आखत आहात का? तेव्हा आपल्या पवित्र शास्त्रासोबत काही हस्तपत्रिका, मासिके वा माहितीपत्रके बरोबर घ्या. प्रवासात किंवा इतरत्र ख्रिस्ती प्रकाशनांचे वाचन करणे बहुधा संभाषण सुरु करण्याची वाट मोकळी करून देते.
१३. प्रवासात असताना कोणा वृद्ध व्यक्तीसोबत तुम्हाला साक्षीचे कार्य कसे करता येईल ते विवेचीत करा.
१३ यासाठी अर्थातच पहिल्या प्रथम मित्रत्वाची प्रस्तावना येते. रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स हे पुस्तक क्षेत्रकार्यात वापरण्याजोग्या प्रस्तावना सादर करीत असले तरी यापैकीच्या काही काहीशा बदलाने अनौपचारिक साक्षीकार्यात वापरता येण्याजोग्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासात तुम्ही कोणा वृद्ध व्यक्तीच्या शेजारी बसलेले आहात तर तुम्ही असे म्हणू शकाल: ‘माझं नाव.........................आहे. मी जीवनाबाबत असणाऱ्या ध्येयाविषयी बऱ्याच काळापासून विचार करीत आहे. आज लोक स्वतःच्या चरितार्थात इतके गुंतले आहेत की त्यांना जीवनातील उद्देशाविषयी विचार करण्यास मुळीच वेळ सापडत नाही. आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळते की जीवन तर खूपच अल्प दिसते. त्यामुळे ‘जीवन म्हणजे इतकेच का?’ असे नवल आपल्याला वाटू लागते. आमच्या अस्तित्वाविषयी देवाचा काही तरी उद्देश असावा असे आपल्याला वाटते का?” त्यांना उत्तर देऊ द्या. त्यानंतर तुम्हाला देवाने मानवजातीविषयी राखलेल्या उद्देशाविषयी बोलता येईल. प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये अभिवचन देण्यात आलेल्या भव्य गोष्टींवर विवेचन मांडता येईल. आपले अनौपचारिक साक्षीकार्य प्रभावी ठरण्यासाठी मंडळीच्या सभा व ख्रिस्ती प्रकाशने यातून मिळविलेल्या सुंदर मुद्यांचा तुम्हाला वापर करता येईल.
चांगल्या परिणामाची अपेक्षा धरता येईल
१४. एका यात्रेत एका बांधवाला अनौपचारिक साक्षीकार्यात कसे यश लाभले?
१४ अनौपचारिक साक्षीकार्य करताना आम्हाला येशू व त्याच्या आरंभीच्या अनुयायांप्रमाणे यश मिळवता येईल. उदाहरणादाखल: विमान यात्रेत एका साक्षीदाराने एका लष्करी अधिकाऱ्याशी बोलणी केली. यांचा विवाह होऊन २० वर्षे झाली होती. त्यांची पत्नी मादक औषधांचे सेवन करीत होती, कित्येकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि आता कोणा तरूणाच्या मागे लागली होती. साक्षीदाराने त्यांना द वॉचटावर व अवेक! मासिकाद्वारे जी शास्त्रवचनीय मदत मिळत होती त्याविषयी बोलणी केल्यावर त्या अधिकाऱ्याने दोन्ही मासिकांची वर्गणी भरली व ती मासिके त्यांच्या बायकोला पाठवावीत असे म्हटले. साक्षीदार जी बोलणी करीत होता ती इतर प्रवाश्यांनी ऐकली. याचा परिणाम? त्या प्रसंगी दिलेल्या साक्षीमुळे त्याला २२ वर्गण्या मिळाल्या. त्याने ४५ मासिके व २१ पुस्तकांचे वितरण केले!
१५, १६. (अ) सोबतीच्या कर्मचाऱ्याबरोबर केलेल्या अनौपचारिक साक्षीकार्याच्या यशाबद्दलची उदाहरणे सांगा. (ब) हे परिणाम तुम्हाला काय सांगतात?
१५ सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर अनौपचारिकतेने बोलण्याबद्दल काय? एका बंधूने आपल्या कामावर हात धुण्याच्या जागी आमच्या मासिकांचे काही अंक ठेवले. एका कर्मचाऱ्याने ती मासिके वाचली, त्या बंधूची भेट घेऊन वार्षिक वर्गणी भरली. त्या माणसाने पवित्र शास्त्र अभ्यासाचाहि स्विकार केला, आपले वाईट स्वरूपाचे जीवनक्रमण सोडून दिले. तथापि, दर खेपेला शास्त्राभ्यासात जेव्हा देवाच्या नामाचा उच्चार होत असे तेव्हा तेव्हा त्याची बायको बाहेर निघून जाई. या माणसाने त्याच्या चर्चसदस्यत्वाचा राजीनामा द्यायचे ठरवले त्यावेळी चर्चच्या पाळकांनी याकरता चर्चा करावी म्हणून त्याच्या घरी भेट दिली पण तेव्हा त्याची बायको घरी होती. पाळकाठायी असणारी विश्वासाची कमतरता व त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांविषयी कथित केलेल्या लबाड्या ऐकून तिला मोठा धक्का बसला, कारण तिने आपल्या पतीच्याबाबतीत सुधारणा झाल्याचे पाहिले होते. त्यामुळेच तिने पाळकांना म्हटले: “तुम्ही माझा व आमच्या मुलांचा सुद्धा राजीनामा लिहून घ्या!” लवकरच तो माणूस व त्याची बायको बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार बनले.
१६ सध्या अमेरिकेत राहत असणाऱ्या बंधूने काही वर्षाआधी इंग्लंडमध्ये एका सहकर्मचाऱ्याला अनौपचारिक साक्ष दिली व त्याला यहोवाच्या साक्षीदारांनी योजिलेली फिल्म दाखविण्यासाठी नेले. सुमारे ३१ वर्षांनी या बंधूला हे पत्र आले: “तुम्ही [एका तरुण माणसाला] जी साक्ष दिली होती त्याचे उत्तम फळ आले हे आता मला तुम्हाला सांगावेसे वाटते. साधारण दोन वर्षांनी आणखी एका बंधूने त्याच्याबरोबर बोलणी केली, त्याला मासिके दिली व सोबत राज्य सभागृहात नेले . . . या माणसाचा १९५९ मध्ये बाप्तिस्मा होऊन तो साक्षीदार बनला व आता तो मंडळीत वडील आहे . . . १४ वर्षांनी त्याची बायको सुद्धा बाप्तिस्मा घेऊन साक्षीदार झाली. दोन वर्षांनी त्याच्या मुलीने बाप्तिस्मा घेतला व ती आता उत्तर डर्बीशायर येथे नियमित पायनियर आहे . . . तुम्ही त्या तरूणास मागे ॲशफोर्ड येथे जी साक्ष दिली होती त्यामुळे तो स्वतः, त्याची बायको, मुलगी, चुलत बहीण व तिची मुलगी, तिचा पति व पाच मुले आणि चुलत बहीणीच्या दुसऱ्या मुलीचा एक मुलगा इतका मोठा परिवार साक्षीदार बनला. मी, बंधू टेड तुमचे खूप आभार मानतो कारण मीच तो पोलाद कर्मचारी आहे व आता जी कहाणी मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्ही मलाच केलेल्या साक्षीविषयी व त्याकरवी जे काही घडले गेले त्याबद्दल आहे.”
१७. यहोवाच्या तरूण सेवकांना अनौपचारिक साक्षीकार्याच्या कोणत्या सुसंध्या आहेत?
१७ अहो, तुम्ही यहोवाचे युवक सेवकहो, तुम्हालाही साक्षीकार्याचे एक आगळेच क्षेत्र आहे व ते म्हणजे तुमचे शाळकरी मित्र व शिक्षक. निबंध व वक्तृत्वाद्वारे तुम्ही अनौपचारिक साक्ष देता का? इक्वेडोर येथे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या एका मुलीने आपल्या निबंधासाठी अवेक! मासिकाच्या ऑगस्ट २२, १९८५ च्या अंकाच्या “हिरोशिमा—त्याचा अर्थ आम्ही विसरलो का?” या अग्रलेखाचा उपयोग केला. तिच्यासोबत पवित्रशास्त्राचा अभ्यास केला जात होता. तिच्या त्या निबंधाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या परिक्षकांची प्रशंसा मिळविली व याचा परिणाम तिला जपानमध्ये जाण्याचा फुकट प्रवास करता आला. अर्थात, स्पर्धेत विजयी होणे हा काही ख्रिस्ती प्रकाशनांचा उद्देश नाही. तरीपण त्याद्वारे प्रकाशनांचे मूल्य कळून येते व शाळेत देवाची स्तुति घडावी याकरता उत्तम साक्ष देता येते.
१८. खोलीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तिला त्रोटक साक्ष मिळाल्यामुळे काय घडले?
१८ आर्थिक कारणास्तव एका भगीनीला आपली खोली भाड्याने देण्याची वेळ आली. यासंबंधाने एका स्त्रीने फोनने विचारणा केली असता या बहिणीने म्हटले की ती यहोवाच्या साक्षीदारांपैकी आहे त्यामुळे आपल्या खोलीत गैरव्यवहार केलेले चालणार नाही. पाहुणे असतील तर त्यांना संध्याकाळी लवकर निघावे लागेल; आणि पुरुष मंडळीने व्यवस्थित वागणूक केली पाहिजे. फोनवरील ती स्त्री थोडा वेळ थांबली व नंतर म्हणाली: “माझ्या किशोरवयात मी तुमचा अभ्यास केला आहे पण मला त्यात तितकासा रस न वाटल्यामुळे कॉलेजला जाऊ लागले.” आता परत पवित्र शास्त्राभ्यास घेण्याची तयारी आहे का असे विचारल्यावर ती उत्तरली, “होय.” लवकरच ती स्त्री, तिची आई व बहीण यहोवाच्या समर्पित सेविका बनल्या. हे सर्व त्या भगिनीने अनौपचारिक साक्ष दिल्यामुळे घडले.
१९. अनौपचारिक साक्षीकार्यामुळे बहामा येथील एका स्त्रीच्या बाबतीत काय घडले गेले?
१९ बहामा येथे एका कॅथोलिक स्त्रीचा विवेक, तिने पाच वर्षे चर्चला आपली उपस्थिति दाखवली नाही म्हणून सतावू लागला. पावसाळ्यात एके रविवारी सकाळी ती चर्चला निघाली. रस्त्यात तिला तीन साक्षीदार भेटले जे आपल्या वाहनातून चालले होते. त्यांनी तिला सोबत घेतले व साक्ष दिली. चर्च जवळ आले तरी तिला अधिक ऐकण्याची जिज्ञासा वाटली त्यामुळे ती त्यांच्याबरोबर बसून राहिली. साक्षीदारांना एका पवित्रशास्त्र अभ्यासू व्यक्तिला सोबत घ्यायचे होते म्हणून ते सर्व तेथे गेले. ती स्त्री त्यांच्या सोबत होती व त्यांचे ऐकत होती. अभ्यासू व्यक्तिला घेतल्यावर ते परत चर्चच्या दिशेकडे आले पण अद्याप त्या स्त्रीची इच्छा तृप्त झाली नव्हती म्हणून ते तिला राज्य सभागृहात आपणासोबत घेऊन गेले. तेथील जाहीर व्याख्यान, त्यांनी मोटारीत ज्याविषयाची चर्चा केली त्यावरच आधारलेले होते. त्या स्त्रीसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला गेला. ती एका पुरुषासोबत लग्नाविना राहत होती व तिला त्याची चार मुलेही होती तरी त्याची शास्त्रवचनीय गोष्टींचा अवलंब करण्याची इच्छा नसल्यामुळे तिने त्याला सोडून दिले. तिचा नासाव येथील अधिवेशनात १९८६ मध्ये बाप्तिस्मा झाला. तिला कोणीतरी अनौपचारिक रित्या साक्ष दिल्यामुळे ती आता किती आनंदी आहे!
देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करीत राहा!
२०. (अ) क्षेत्रकार्याच्या तुलनेत अनौपचारिक साक्षीकार्याकडे कोणत्या दृष्टीने बघावे? (ब) अनौपचारिक साक्ष देण्यात कोणी मागेपुढे होत आहे तर अशांसाठी काय सुचविलेले आहे?
२० अनौपचारिक साक्षीकार्य हे यहोवाचे साक्षीदार क्षेत्रामध्ये जे नियमित रूपाचे कार्य करीत आहे त्याचा पर्याय नव्हे. घरोघर जाऊन प्रचार करणे हे शास्त्रशुद्ध व परिणामकारक सुद्धा आहे. (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०, २१) तरीपण अनौपचारिक स्वरूपाचे साक्षीकार्य फलदायी ठरत आहे आणि यहोवाच्या सेवकांनी त्यातही सहभागी होण्यास हवे. जेथे कोठे लोक आढळतील, मग ते नातेवाईक, विद्यार्थीमित्र, कामगार सहकारी, किंवा इतर कोणी असोत, यांच्याशी देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करीत राहण्याच्या सुसंधि आहेत. याकारणास्तव भीतीदायकता किंवा बुजरेपणा यामुळे मागे राहू नका. (नीतीसूत्रे २९:२५; २ तिमथ्यी १:६–८) अनौपचारिक साक्ष देण्यात तुम्हाला धरसोडपणा वाटत असल्यास येशूच्या छळग्रस्त शिष्यांसारखी का प्रार्थना करू नये? त्यांनी याचना केली: “हे यहोवा . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले का? होय, कारण “ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.”—प्रे. कृत्ये ४:२३–३१.
२१. एखाद्या व्यक्तिला सर्व परिस्थितीत साक्ष देण्यासाठी काय चालना देईल?
२१ यास्तव, अनौपचारिक साक्षीकार्याविषयी सरळ दृष्टीकोण बाळगा. देवाची प्रीती तुम्हाला सर्व प्रकारच्या परिस्थितीत साक्ष देण्यासाठी चालना देवो. उत्साहदायक व्हा. प्रत्येक संधीला सत्य उपळत्या झऱ्यासारखे विदित करा. होय, देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा सतत विदित करीत राहा.
तुमचे उत्तर काय आहे?
◻ अनौपचारिक साक्षीकार्याला कोणता शास्त्रवचनीय आधार आहे?
◻ अनौपचारिक साक्षीकार्याच्या तयारीचे कोणते मार्ग आहेत?
◻ अनौपचारिकरित्या साक्ष दिल्यास कोणत्या परिणामाची आम्हाला अपेक्षा करता येईल?
◻ नियमित क्षेत्राकार्याच्या तुलनेत आम्ही अनौपचारिक साक्षीकडे कोणत्या दृष्टीने बघावे?
[२२ पानांवरील चित्रं]
तुम्ही बंदिस्त आहात तर पौलाने कैदेत असताना जशी साक्ष दिली तशी तुम्ही देता का?
[२४ पानांवरील चित्रं]
आगाऊ तयारीद्वारे आम्हाला प्रभावकारी पद्धतीने अनौपचारिक साक्षीकार्य करता येईल