तत्परतेने “पूर्णपणे साक्ष” द्या
१, २. सुवार्तेचा प्रचार करण्याबद्दलच्या पौलाच्या कोणत्या दृष्टिकोनामुळे तुम्ही प्रभावीत झाला आणि “पूर्णपणे साक्ष” देण्याच्याबाबतीत त्याने मांडलेल्या उदाहरणाचे आपण अनुकरण कसे करू शकतो?
१ येशू व इतर अनेक प्राचीन विश्वासू सेवक यांच्याप्रमाणे प्रेषित पौल सुवार्तेचा आवेशी प्रचारक होता; परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा त्याने “पूर्णपणे साक्ष” दिली. नजरकैदेत असताना देखील, “जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे” व “पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे, आणि प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.”—प्रे. कृत्ये २८:१६-३१, NW.
२ आपण देखील सर्व वेळी “पूर्णपणे साक्ष” देण्यास तत्पर असले पाहिजे. यामध्ये, संमेलनांना व अधिवेशनांना जाता-येता भेटणाऱ्या लोकांना साक्ष देणे समाविष्ट आहे.—प्रे. कृत्ये २८:२३; स्तो. १४५:१०-१३.
३. अनौपचारिक साक्षकार्य काय आहे आणि काय नाही?
३ अनौपचारिक साक्षकार्य म्हणजे काय? अनौपचारीक साक्षकार्य, अचानक किंवा हेतू न बाळगता केले जात नाही; ते योजना न करताच केले जात नाही किंवा कमी महत्त्वाचेही नाही. कारण हे वर्णन निश्चित्तच आपल्या सेवेला शोभत नाही. पौलाप्रमाणे आपल्याला देखील आपल्या साक्षकार्याद्वारे देवाचे गौरव करणे महत्त्वाचे वाटते आणि या वर्षादरम्यान आपण प्रवास करत असताना जाता-येता उचित प्रसंगी साक्ष देण्याचा आपला हेतू असला पाहिजे. पण, आपण ज्या प्रकारे इतरांना भेटतो त्याचे वर्णन उचितपणे अनौपचारिक—कसल्याही दडपणाविना, मैत्रीपूर्ण व साधे, असे करू शकतो. या पद्धतीमुळे उत्तम प्रतिफळ मिळू शकते.
४. कोणत्या गोष्टीमुळे पौल, राहत असलेल्या ठिकाणी साक्ष देऊ शकला?
४ साक्ष देण्यास तयार असा: रोममध्ये नजरकैदेत असताना पौलाला, साक्ष देण्याकरता संधी निर्माण करावी लागत होती. तो जेथे राहत होता तेथे तो स्थानीय यहुदी नेत्यांना आपल्या घरी स्वतःहून बोलवायचा. (प्रे. कृत्ये २८:१७) रोममध्ये एक ख्रिस्ती मंडळी होती तरीसुद्धा पौलाला समजले की त्या शहरातील यहुदी समाजाला ख्रिस्ती विश्वासाविषयी खूप कमी माहिती होती. (प्रे. कृत्ये २८:२२; रोम. १:७) येशू ख्रिस्त आणि देवाचे राज्य यांच्याविषयी “पूर्णपणे साक्ष” देण्यास तो कचरला नाही.
५, ६. अनौपचारिक साक्ष देण्याकरता आपल्याला कोणत्या संधी मिळू शकतात व असे प्रभावीपणे करण्याकरता आपण कोणती तयारी करू शकतो?
५ असा विचार करा, की प्रवास करत असताना तुम्ही कदाचित अशा लोकांना भेटाल ज्यांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल फार कमी माहिती आहे. आपण मोफत गृह बायबल अभ्यासाची योजना सादर करतो याविषयी कदाचित त्यांना कसलीच माहिती नसेल. प्रवास करत असताना आपण, विश्राम-तळ, पेट्रोल पंप, बाजारात, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करताना, वगैरे ठिकाणी भेटत असलेल्या लोकांना साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीची जाणीव ठेवली पाहिजे. संभाषण सुरू करून संक्षिप्त साक्ष देण्यासाठी तुम्ही काय म्हणाल हे आधीच ठरवा. येणाऱ्या दिवसांत तुम्ही कदाचित तुमच्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, सहकर्मींना आणि इतर ओळखीच्या लोकांना साक्ष देण्याद्वारे सराव करू शकता.
६ अनौपचारिक साक्ष देताना तुम्हाला प्रकाशनांचा पुरेसा साठा बाळगावा लागेल. कोणकोणती प्रकाशने तुम्ही बाळगू शकता? तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिकेचा तुम्ही उपयोग करू शकता. पहिल्या पाच परिच्छेदांमध्ये, बायबल का वाचले पाहिजे त्याची जी विविध कारणे देण्यात आली आहेत ती दाखवा. मोफत गृह बायबल अभ्यास हवा अशी विनंती असलेले मागच्या पानावरील कूपन दाखवा. कान देणारी व्यक्ती आढळते तेव्हा तिला अपेक्षा माहितीपत्रक द्या. इतर भाषा जाणणारे लोक भेटतील म्हणून, सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता (इंग्रजी) ही पुस्तिका सोबत असू द्या. साक्ष देण्याकरता या पुस्तिकेचा उपयोग कसा करायचा ते पृष्ठ २ वर समजावून सांगितले आहे. तुम्ही कारने प्रवास करणार असाल तर, राज्य संदेशात खरोखर आस्था दाखवणाऱ्यांसाठी इतर महत्त्वाची प्रकाशने देखील सोबत नेऊ शकता.
७, ८. प्रवास करत असताना किंवा फावल्या वेळी आपण आपल्या पेहरावाबद्दल व वर्तनाबद्दल खबरदारी बाळगण्याचा कोणता सल्ला पाळला पाहिजे?
७ आपला पेहराव आणि आपले वर्तन यांकडे लक्ष द्या: आपले वर्तन, आपला पेहराव आणि आपली केशभूषा यांमुळे लोकांना आपल्याबद्दलचा चुकीचा ग्रह होणार नाही किंवा ते यहोवाच्या संघटनेच्या ‘विरुद्ध’ बोलणार नाहीत याविषयी आपण खबरदारी बाळगली पाहिजे. (प्रे. कृत्ये २८:२२) हे तत्त्व, केवळ संमेलनांना व अधिवेशनांना उपस्थित राहतानाच लागू होत नाही तर, प्रवास करत असताना व फावल्या वेळेसाठी देखील लागू होते. टेहळणी बुरूज ऑगस्ट १, २००२ पृष्ठ १८, परिच्छेद १४ असा इशारा देते: “आपले स्वरूप दिखाऊ, विक्षिप्त, उत्तेजक, अंगप्रदर्शक किंवा अतिशय फॅशनेबल असू नये. शिवाय, आपण ‘देवभक्तिला’ अनुसरून पेहराव करावा. हे शब्द आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात, नाही का? याचा अर्थ आपण केवळ मंडळीच्या सभांना उपस्थित राहतेवेळी योग्य पेहराव करावा आणि इतर वेळी आपल्या पेहरावाविषयी बेफिकीर राहावे असा नाही. आपल्या वैयक्तिक पेहरावावरून नेहमी एक भक्तिपूर्ण, आदरयुक्त मनोवृत्ती दिसून आली पाहिजे कारण आपण २४ तास ख्रिस्ती व सेवक आहोत.”—१ तीम. २:९, १०.
८ आपण सभ्य आणि आदरणीय पेहराव केला पाहिजे. आपला पेहराव आणि आपले वर्तन नेहमी, देवावरील आपला विश्वास प्रकट करत असेल तर, आपल्यावर कधी अशी वेळ येणार नाही की जेव्हा आपण आपल्या पेहरावामुळे अनौपचारिक साक्ष देण्यापासून परावृत्त होऊ.—१ पेत्र ३:१५.
९. रोममध्ये पौलाला साक्ष देताना यश कसे मिळाले?
९ अनौपचारीक साक्ष प्रतिफलदायी आहे: रोममध्ये दोन वर्षे नजरकैदेत असताना पौलाने आपल्या साक्षकार्याचे चांगले परिणाम पाहिले. लूक याविषयी असे सांगतो, की ‘तो जे काही सांगत असे त्यावरून कित्येकांची खातरी झाली.’ (प्रे. कृत्ये २८:२४) “पूर्णपणे साक्ष” देण्यात आपण किती प्रभावी आहोत याचा पौलाने अंदाज लावताना असे लिहिले: “मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे; म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धि झाली; आणि त्यांची खातरी पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठायी देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास अधिक धाडस केले.”—फिलिप्पै. १:१२-१४.
१०. गेल्या वर्षी एका जोडप्याला साक्ष देण्यात यश कसे मिळाले?
१० गेल्या वर्षी, एका प्रांतीय अधिवेशनानंतर एका महिला वेटरने एका जोडप्याला त्यांनी लावलेल्या अधिवेशन बॅज कार्डाविषयी विचारले तेव्हा त्यांना अनौपचारिक साक्ष देण्यात यश आले. त्यांनी तिला अधिवेशनाविषयी आणि मानवजातीसाठी बायबलमध्ये असलेल्या आशेविषयीही सांगितले. त्यांनी तिला तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका दिली आणि मोफत गृह बायबल अभ्यासाच्या योजनेविषयी सांगितले. या स्त्रीने पत्रिकेच्या मागे नाव व पत्ता लिहिण्यासाठी असलेले कूपन भरून या जोडप्याला दिले व त्यांना आपल्या घरी कोणीतरी यावे म्हणून व्यवस्था करण्यास सांगितले. तत्परतेने “पूर्णपणे साक्ष” देण्याद्वारे तुम्हाला या वर्षी यश कसे मिळू शकते?
११. “पूर्णपणे साक्ष” देण्याद्वारे सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आपण स्वतः कोणते गुण विकसित केले पाहिजेत?
११ सुवार्तेचा पूर्णपणे प्रचार करणे: सहख्रिस्ती आपल्या आवेशी उदाहरणाचे अनुकरण करत आहेत हे ऐकून पौलाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! आपल्या बायबल आधारित विश्वासांविषयी अनौपचारिक साक्ष देण्याद्वारे आपण सुवार्तेचा पूर्णपणे प्रचार करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू या.
[१ पानांवरील चौकट]
अनौपचारिक साक्षकार्यासाठी लागणारी प्रकाशने
▪ तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका)
▪ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? (माहितीपत्रक)
▪ सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता (पुस्तिका)
▪ इतर महत्त्वाची प्रकाशने
[४ पानांवरील चौकट]
यांना विसरू नका!
कोणाला विसरू नका? ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला किंवा खास भाषणाला उपस्थित राहिलेल्या सर्व आस्थेवाईक लोकांना विसरू नका. या वर्षाच्या संमेलनांना व अधिवेशनांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रण दिले आहे का? पुष्कळ जण, प्रेमाने प्रोत्साहन दिल्यास कदाचित उपस्थित राहतील. अशा मेळाव्यांमध्ये ते उभारणीकारक संगती आणि उत्तेजनदायक आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतील आणि यामुळे यहोवा व त्याची संघटना यांच्या जवळ येतील. तेव्हा, त्यांना आमंत्रण देऊन पुढे काय होते ते पाहायला काय हरकत आहे? हवी असलेली सर्व सविस्तर माहिती त्यांना द्या, तसेच संमेलनांच्या, अधिवेशनांच्या तारखा, तेथे कसे जायचे त्याबद्दलची माहिती, कार्यक्रम केव्हा सुरू होऊन समाप्त होईल ती वेळ आणि आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००३ व सावध राहा! जून ८, २००३ (इंग्रजी) या अंकात आलेली कार्यक्रमांची पूर्व माहिती त्यांना द्या.