सूज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत
ॲलिसने एक चुकीचा निर्णय घेतला जो तिला खूपच बाधक ठरला. “मी यहोवा व त्याची संस्था या पासून अलिप्त झाले” ती कबूल करते. ती परत आली खरी पण त्यासाठी १३ वर्षे लागली. “ती अत्यंत दैन्यावस्थेतील वर्षे होती” असे ती म्हणते.
देवास करीत असलेल्या सेवेसंबंधाने कोणाही ख्रिश्चनाने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे जो धोका उद्भवत असतो त्याला कमी समजू नये. सर्व वस्तुस्थिति पडताळून चुकीचे निर्णय घेतले जात नाहीत, तर ते कधी कधी उपजत प्रतिक्रियेच्या आधारावर निर्मित होतात. एखाद्या विषयाकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाला भावना अभ्राच्छादित करतात आणि अपूर्ण अंतःकरण वैचारिक क्षमतेवर फाजील वर्चस्व गाजविते त्यावेळी सर्व तऱ्हेच्या इजा व दुःख मिळते.
होय, “हृदय सर्वात कपटी आहे.” (यिर्मया १७:९) तरीपण आम्ही आमचे कसे रक्षण करू शकतो त्याविषयी पवित्र शास्त्र आम्हास मार्गदर्शन देते. “ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील” त्यावेळी, ते म्हणते, “समंजसपण तुला संभाळील.” (नीतीसूत्रे २:१०, ११) पण हे ज्ञान आमच्या चित्तात किंवा अंतःकरणात कसे प्रवेश करू शकेल?
गतकाळापासून शिका
हा प्रयत्न करून बघा. तुम्ही स्वतःला देवाच्या आरंभीच्या सेवकांमध्ये ठेवा आणि तुम्ही अनुभवीत असलेली परीस्थिती पडताळा. समजा की, ख्रिस्ती मंडळीत असणारी एखादी स्थीति तुम्हीला त्रस्त करीत आहे. तर मग पवित्र शास्त्रात याच्याशी समांतरीत असणाऱ्या परिस्थितीचा विचार करा. पहिल्या शतकातील करिंथ येथील ख्रिस्ती मंडळीबद्दल काय? या करिंथ मंडळीचे तुम्ही सदस्य आहात असे समजा. तुम्ही साधारणतः दोन किंवा तीन वर्षापासून ख्रिस्ती आहात. पौल येथे १८ महिने राहिला होता त्या काळात तुम्हाला सत्य समजले ते किती आनंदाचे होते बरे! पण आता परिस्थिती काहीशी वाईट झाली आहे.
आता मंडळीत गटबाजी व विभाजन होण्याचा प्रकार दिसत असल्यामुळे मंडळी त्रस्त बनली आहे. (१ करिंथकर १:१०, ११) काही अनैतिक वागणूकीला थारा मिळत असल्यामुळे मंडळीच्या आत्म्यावर धोका संभवला आहे. (१ करिंथकर ५:१-५) मंडळीतील लोक जगातील न्यायालयात जाऊन बंधूंबरोबर भांडत आहेत ही गोष्ट मंडळीची ख्याति बदनाम करीत आहे.—१ करिंथकर ६:१-८.
या मंडळीत आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसत आहे, ते म्हणजे, मंडळीतील काही सदस्य किरकोळ गोष्टींसंबंधाने आपसात नेहमी भांडताहेत. (पडताळा १ करिंथकर ८:१-१३.) तुम्हाला भांडणे, मत्सर, द्वेषभाव आणि अव्यवस्था माजलेली दिसत आहे त्यामुळे तुम्ही वैतागून गेले आहात. (२ करिंथकर १२:२०) तसेच काही उद्धट माणसांनी ख्रिस्ती पद्धतीने जीवन जगण्याचे कठीण केल्यामुळे तुम्हाला मोठे उद्विग्न वाटायला लागले आहे. (१ करिंथकर ४:३-८) शिवाय काहीजण प्रेषित पौलाचा दर्जा व अधिकार याबद्दल वाद निर्माण करून आहेत, त्याच्यावर निंद्य दोषारोप करून त्याला काय वक्तृत्व करता येते असा त्याचा उपहास करीत आहेत हे पाहून तुम्हाला किती यातना होत आहेत बरे! (२ करिंथकर १०:१०; १२:१६) आपली वैयक्तिक मते लोकात गुप्तरित्या पसरवून मंडळीच्या मुलभूत तत्वावरील विश्वास काही पायदळी तुडवीत आहेत हे बघून तुम्हाला किती वाईट वाटते!—१ करिंथकर १५:१२.
निर्णयाला तोंड द्यावयाचे आहे
‘हे असे व्हायला नको,’ तुम्ही विलाप करता. ‘वडील याच्याबद्दल काहीच का करत नाही? काही तरी चुकीचं घडत आहे.’
तर आता तुम्ही करिंथची मंडळी सोडून द्याल का? दुसरीकडे जाऊन देवाची सेवा तरी चांगल्याप्रकारे मला करता येईल असे तुम्ही म्हणाल का? किंवा तुम्ही आपल्या सह ख्रिश्चनांचा सहवासच मुळी नको असा निर्णय घ्याल? या सर्व समस्यांमुळे तुम्ही तुमचा आनंद मालवू द्याल का, तसेच यहोवा व येशू ख्रिस्त हे सर्व गोष्टीची दखल घेतील हा आत्मविश्वास गमावू देता का? तुम्ही टीकात्मक व तक्रारी स्वरूपाचा आत्मा वाढवाल का आणि आपल्या सह ख्रिश्चनांच्या हेतुबद्दल प्रश्नार्थकता निर्माण करणार का? अशा समस्याग्रस्त मंडळीकडे आस्थेवाईक लोकांना निरविण्यात अर्थ तरी काय असे म्हणून तुम्ही प्रचार कार्यात मंदावणार का?
आजच्या परिस्थितीच्या केंद्रभागातून परिस्थितीची हाताळणी करताना तुम्ही सहजपणे म्हणाल, त्यात काय विशेष, देवाच्या संस्थेत अपूर्णता आहे तरी त्याला निष्ठावंतपणेच जडून राहिलो असतो. पण तीच समस्याग्रस्त परिस्थिती आज उद्भवली तरी मनाची स्पष्टता व अंतःकरणाचा शांतपणा तुम्ही राखला असता का? तुम्ही त्यावेळेला जो निर्णय घेतला असता तोच आजही घ्याल का?
सूज्ञ सुचनेकडून लाभ मिळविणे
करिंथकरच्या मंडळीतील ज्यांनी मंडळीसोबत संलग्न राहण्याचा निर्णय घेतला ते सर्व सूज्ञ होते. त्यांना, पेत्राला काही वार्षाआधी जसे वाटले होते तेच वाटले. काही शिष्यांनी येशूचा सहवास सोडून दिला त्यावेळी पेत्राने म्हटले: “प्रभुजी, आम्ही कोठे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखिले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहा.” (योहान ६:६८, ६९) तर मग, आपण देवाच्या संघटनेसोबत जडून राहिलो तर आपल्याला त्याच्या सल्ल्याद्वारे लाभ मिळविता येईल.
मागे करिंथमध्ये होते त्याप्रमाणेच आजच्या नव्या मंडळीत मानवी अपूर्णता समस्या निर्माण करू शकते हे काही नवलाईचे नाही, पण यामुळेच कडक सल्ला देण्याची पाळी येते. तरीपण करिंथमधील ख्रिशचनांना सल्ला देण्याची पाळी येते. तरीपण करिंथमधील ख्रिश्चनांना सल्ला देताना पौलाने हे लक्षात ठेवले की त्यातील बहुतांशी “प्रिय बंधु” होते. (१ करिंथकर १०:१४; २ करिंथकर ७:१; १२:११) यहोवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देणाऱ्यांना तो आपली विपुल दया दाखवतो व क्षमा करतो ही गोष्ट सुद्धा तो विसरला नव्हता.—स्तोत्रसंहिता १३०:३, ४.
अर्थातच ख्रिस्ती मंडळीत सर्व तऱ्हेच्या लोकांचा भरणा आहे त्यामुळे काही जणांना हे मार्गदर्शन स्विकारण्यास इतरांपेक्षा थोडा अधिक वेळ लागतो. याशिवाय शारिरिक व मानसिक क्षमता, वातावरण, पार्श्वभूमि आणि परिस्थिति यांच्याबाबतीत प्रत्येकजण भिन्न असतो. या कारणास्तव अति टिकेखोर बनण्याचे टाळणे आणि “प्रीती पापांची पास झाकते” हे आठवणीत ठेवणे किती सूज्ञतेचे आहे बरे! (१ पेत्र ४:८) वस्तुतः यहोवा व त्याचा पुत्र त्यांच्या मंडळ्यातील अपूर्णता व अप्रौढता सहन करून आहेत तर मग आम्हीही असा आत्मा प्रदर्शित करू नये का?—१ करिंथकर १३:४-८; इफिसकर ४:१, २.
तुम्ही प्राचीन करिंथमधील मंडळीत असता आणि पौलाचे प्रेमळ पण दृढ शब्द ऐकले असते तर ख्रिस्ती मंडळीचा मस्तक ख्रिस्त आपल्या मंडळीच्या कल्याणाबाबत केवढी आस्था राखून आहे हे कळले असते. (मत्तय २८:२०) त्यामुळे तुम्हाला येशूच्या अभिवचनाचा की, त्याचे अनुयायी “विश्वासू व बुद्धीमान दास” मार्फत दिल्या जाणाऱ्या मदतीस प्रतिसाद देतील तेव्हा तो त्यांना ऐक्यात ठेवणार होता याचा अनुभव येऊन तुमचा आत्मविश्वास बळकट झाला असता. (मत्तय २४:४५-४७; इफिसकर ४:११-१३) होय, पौलाच्या शब्दांनी तुम्हाला कठिण परिस्थितीत देखील आनंद व स्थैर्य टिकवून ठेवण्यात मदत दिली असती. देव ज्या अडचणींना तात्कालिक मुभा देत आहे त्याजशी सामना करण्यासाठी तो तुम्हाला बळ देईल हा आत्मविश्वास तुम्हामध्ये वाढता राहिला असता.
याचा अर्थ हा नाही की मंडळीत वाईट परिस्थिती बळावली तर त्याबाबतीत ख्रिश्चनांनी काही करू नये. करिंथमध्ये स्तेफन, फर्तूनात, आखायिक या प्रौढ पुरुषांनी आणि ख्लोवेच्या घरातील काहीजण यांनी हालचाल केली. त्यांनी मंडळीतील परिस्थितीबद्दल पौलाला कळविले. (१ करिंथ १:११; ५:१; १६:१७) पण हे केल्यावर त्यांनी सर्व गोष्टी त्याच्या हाती सोपवून दिल्या. धार्मिकतेच्या आवेशाने त्यांचा ख्रिस्ताच्या मस्तकपदाविषयीचा आत्मविशावस कमी केला नाही व त्यांना ‘यहोवावर रूष्ट केले नाही.’—नीतीसूत्रे १९:३.
अशाच प्रकारे धार्मिकतेसंबंधीचा आवेश आज आम्हाला, सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आमच्या देवप्रणीत नेमणूकीत मंदावण्याचा विचार देखील सुचविणार नाही. तसे करणे हे इतरांच्या कल्याणाविषयी बेफिकीरीची वृत्ती दाखविणे आणि ख्रिस्त आम्हाकडून जे करण्याची अपेक्षा बाळगून आहे त्यात अपयश दाखविणे असे ठरेल. “म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो,” पौल सांगतो, “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथकर १५:५८.
सैतानाच्या योजनांबद्दल अजाण राहू नका
करिंथमध्ये होत्या त्या सारख्या उद्भवलेल्या मंडळीतील अडचणी हाताळणे हे कधीकधी छळाच्या अनुभवापेक्षाहि खूप त्रासदायक असते. आम्ही चुकीचा निर्णय घ्यावा व त्याकरवी यहोवापासून दूर व्हावे यासाठीच सैतान अशा परिस्थिती मंडळीत आणतो. पण, ‘आम्हाला त्याचे विचार कळत नाहीत असे नाही.’—२ करिंथकर २:११.
पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना म्हटले की त्यांना देवाच्या आधीच्या सेवकांच्या अहवालाच्या परीक्षणाद्वारे लाभ मिळविता येईल. “ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या,” असे त्याने इस्राएलांच्या बाबतीत म्हटले, “आणि जे आपण युगांच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.” (१ करिंथकर १०:११) याचप्रमाणे आज आम्हाला सुद्धा, आरंभीच्या ख्रिस्ती अहवालाच्या काळजीपूर्वक परीक्षणाकरवी लाभ मिळविता येईल. करिंथमध्ये जे काही घडले त्याचा आपल्याला विचार करता येईल. त्या काळी हयात असताना आम्ही जो बरोबरचा निर्णय घेतला असता त्यावर मनन करण्याद्वारे आता चुकीचे निर्णय टाळता येतील.
१३ वर्षांची “दैन्यावस्थेतील वर्षे” संपल्यावर ॲलीस राज्य सभागृहात पहिल्याच सभेला आल्यावर म्हणाली. “मला रडू कोसळणार या भीतीने मी गप्प राहिले, पण खरे पाहता आता मला खरेच विसावल्यासारखे वाटत होते. त्याचा मला विश्वास बसत नव्हता.” तद्वत, समस्या उद्भवल्या तर यहोवाच्या संस्थेस सोडून न देण्याविषयी तुमचा सूज्ञ निर्णय दृढ धरून राहण्याचा निर्धार करा. देवाच्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे तुम्हाला अगणित आशीर्वाद प्राप्त होत राहतील. त्यांना अंत नसणार.—नीतीसूत्रे २:१०-१५, २०, २१.