१४ राहाब
तिने आपल्या लोकांऐवजी यहोवाची बाजू घेतली
प्राचीन यरीहो शहराच्या भिंतीवर असलेल्या एका घरात राहाब नावाची एक वेश्या राहात होती. घराच्या खिडकीतून ती सूर्याच्या तेजाने उठून दिसणारा तो संपूर्ण प्रदेश आणि तिचं “खजुरांच्या झाडांचं शहर” पाहू शकत होती. (अनु. ३४:३) पण शहरात फिरत असताना मात्र तिला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि दहशत दिसत होती. कारण तिथल्या रहिवाश्यांना हे माहीत झालं होतं, की यहोवा त्याच्या लोकांसोबत म्हणजे इस्राएली लोकांसोबत आहे. पण शहरातल्या लोकांचा मात्र तो लवकरच नाश करणार आहे. आणि ते योग्यच होतं.
चाळीस वर्षांपूर्वी यहोवाने असंच केलं होतं. त्याने फारोच्या सैन्याला तांबड्या समुद्रात बुडवून त्यांचा नाश केला होता आणि आपल्या लोकांना वाचवलं होतं. आणि अगदी अलीकडेच सीहोन आणि ओग या शक्तिशाली अमोरी राज्यांवर यहोवाने त्यांना जबरदस्त विजय मिळवून दिला होता. हे खरंच खूप आश्चर्यकारक होतं! कारण याआधी त्याचे लोक वाळवंटात भटकत होते; ते काही योद्धे नव्हते. इस्राएल राष्ट्राने आता यरीहोच्या जवळच तळ ठोकला होता आणि ते यरीहोला येत होते. त्यांचा वापर करून यहोवा यरीहोतल्या लोकांच्या दुष्ट कामांबद्दल त्यांना शिक्षा देणार होता!
राहाबला माहीत होतं, की तिच्या शहरातले लोक खूप दुष्ट आहेत. वेश्या म्हणून अतिशय अपमानास्पद जीवन जगण्याऐवजी तिला एक चांगलं आयुष्य हवं होतं. तिने यहोवाबद्दल जे काही ऐकलं होतं त्यामुळे तिच्या मनात भीती नाही, तर आशा निर्माण झाली होती. कारण कनानच्या खोट्या दैवतांपेक्षा इस्राएलचा देव किती वेगळा आहे, हे तिला समजलं होतं. तो आपल्या लोकांचं रक्षण करणारा आणि त्यांना आदराने वागवणारा देव होता. तो शुद्ध, न्यायी आणि आपल्या लोकांची काळजी घेणारा देव होता. म्हणूनच या देवाकडे म्हणजे यहोवाकडे ती आकर्षित झाली.
एका रात्री, दोन अनोळखी माणसं राहण्यासाठी ठिकाण शोधत तिच्या घरी आले. चाणाक्ष आणि हुशार असलेल्या राहाबला लवकरच समजलं की ते इस्राएलचे गुप्तहेर आहेत. आणि ही गोष्ट यरीहोच्या राजाच्याही कानावर पडली होती. म्हणून यरीहोच्या राजाने त्या हेरांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी तिच्याकडे माणसं पाठवली. राहाबला आता असा एक निर्णय घ्यायचा होता ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलणार होतं. ती त्या दुष्ट शहरातल्या लोकांची बाजू घेईल की यहोवाची बाजू घेईल हे तिला ठरवायचं होतं.
राहाबने धैर्याने यहोवाची बाजू घेतली. तिने आपल्या छतावर हेरांना लपवलं. नंतर राजाची माणसं जेव्हा तिच्याकडे आली तेव्हा ते निघून गेले आहेत असं तिने त्यांना सांगितलं. राजाची माणसं गेल्यावर ती छतावर गेली आणि तिने त्यांना का वाचवलं हे सांगितलं. तिने म्हटलं: “यहोवा हा देश तुम्हाला देईल याची मला पूर्ण खातरी आहे.” खरंच, तिने त्यांच्या देवावर विश्वास ठेवला होता! तिने त्यांना आणखीन एक गोष्ट सांगितली आणि त्यामुळे त्यांना खूप धीर मिळाला. तिने सांगितलं की, ‘इस्राएलच्या भीतीने यरीहोच्या लोकांचं धैर्य खचलं आहे.’ म्हणून तिने त्यांना अशी विनंती केली, की यहोवा या शहराचा नाश करेल तेव्हा त्यांनी तिचं संरक्षण करावं.
एका वेश्येला अनैतिक जीवन सोडून द्यायला आणि आपल्या लोकांना सोडून यहोवाची बाजू घ्यायला कशामुळे मदत झाली?
राहाबने त्या हेरांचा जीव वाचवला होता. आणि त्या हेरांनीसुद्धा यहोवावरचा तिचा विश्वास पाहिला होता. म्हणून तिने सांगितल्याप्रमाणे करायला ते तयार झाले. राहाब आणि तिचं कुटुंब आता वाचणार होतं. पण त्यासाठी तिला हेरांची माहिती गुप्त ठेवावी लागणार होती, आपल्या घराच्या खिडकीतून लाल रंगाचा दोर सोडावा लागणार होता आणि युद्धाच्या वेळी आपल्या घरातच राहावं लागणार होतं. यामुळे ती स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकणार होती.
राहाबने तिच्या खिडकीतून एका दोरीच्या मदतीने हेरांना शहरातून पळून जायला मदत केली. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच तिने केलं. तिने खिडकीत एक लाल रंगाचा दोर बांधला आणि त्या हेरांबद्दलची माहिती गुप्त ठेवली. असं करण्यासाठी तिला नक्कीच धैर्याची गरज लागली असेल. कारण या गोष्टीची भनक जर शहरातल्या लोकांना लागली असती, तर त्यांनी तिला नक्कीच ठार मारलं असतं. यासोबतच, हेरांनी सांगितल्याप्रमाणे तिने आपल्या सगळ्या कुटुंबाला आपल्या घरातच ठेवलं. जेव्हा तिला कळलं असेल, की इस्राएली लोकांना यार्देन नदी पार करता यावी म्हणून यहोवाने त्या नदीचा प्रवाह जागच्या जागी थांबवलाय, तेव्हा तिने घेतलेला निर्णय बरोबर होता याची तिला आणखीनच खातरी पटली असेल. इस्राएलच्या सैनिकांनी सात दिवस शहराभोवती फेऱ्या मारल्या तेव्हा त्या शहरातल्या लोकांचा थरकाप उडाला असेल. शेवटी सातव्या दिवशी जेव्हा रणशिंगं वाजली आणि इस्राएली लोक मोठ्याने ओरडले तेव्हा त्या शहराच्या सुरक्षा भिंती पडल्या. पण राहाब आणि तिचं कुटुंब मात्र तिच्या घरात सुरक्षित राहिलं.
युद्धानंतर, हेरांनी राहाबला आणि तिच्या कुटुंबाला घरातून बाहेर आणलं. यरीहो शहराच्या ज्या भिंतीचा छोटासा भाग अजूनही उभा होता त्यावर राहाबचं घर होतं. यहोशवाने सांगितल्याप्रमाणे राहाब आणि तिच्या कुटुंबाचा जीव वाचला. काही काळानतंर राहाब इस्राएल राष्ट्राचाच भाग बनली. तिने एका इस्राएली माणसाशी लग्न केलं आणि तिला मुलं झाली. पुढे बऱ्याच शतकांनंतर तिच्या वंशातूनच आजपर्यंत होऊन गेलेला सगळ्यात धैर्यवान माणूस जन्माला आला. तो म्हणजे येशू ख्रिस्त. (मत्त. १:५, १६) खरंच, राहाबने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि धैर्याबद्दल यहोवाने तिला भरभरून आशीर्वाद दिला.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
राहाबने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. यरीहोमध्ये राहाबचं जीवन कसं होतं याचं वर्णन करा. (टेहळणी बुरूज१३ ११/१ १२ ¶४-१३ ¶१-wcgr)
२. इस्राएलचे हेर कोणतंही अनैतिक काम करायच्या उद्देशाने राहाबच्या घरी गेले नव्हते हे आपल्याला कशावरून कळतं? (इन्साइट “वेश्या” ¶१६-wcgr)
३. राहाबच्या घराच्या छतावर जवसाची ताटं का पसरवून ठेवली होती, आणि जवसाचा उपयोग कशासाठी केला जायचा? (इन्साइट “जवस” ¶२-४-wcgr) १
Thanks for your interest in my photos/Moment Open via Getty Images
चित्र १: जवसाचं शेत
४. आपल्याकडे आलेले हेर निघून गेले असं राहाबने राजाच्या माणसांना सांगणं चुकीचं का नव्हतं? (टेहळणी बुरूज०४ १२/१ ८ ¶६) २
चित्र २
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
आपलं अनैतिक जीवन सोडून इस्राएली लोकांसोबत यहोवाची उपासना करण्यासाठी राहाबला धैर्याची गरज का होती? तिच्या उदाहरणातून बायबल विद्यार्थी काय शिकू शकतात?
खोटं बोलणं चुकीचं आहे असं बायबल सांगतं. पण कधीकधी विरोधक आपल्या भाऊबहिणींबद्दलची गोपनीय माहिती सांगायचा दबाव आपल्यावर टाकतील. अशा परिस्थितीत राहाबच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (नीति. ११:१३; उप. ३:७; इफिस. ४:२५) ३
चित्र ३
चित्र ३
आणखी कोणत्या मार्गांनी तुम्ही राहाबच्या धैर्याचं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
राहाबचं पुनरुत्थान झाल्यावर मी तिला काय विचारेन?
आणखी शिका
यहोवाच्या येणाऱ्या दिवसातून वाचण्यासाठी राहाबच्या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
“अंत येईल तेव्हा तुम्ही कोठे असले पाहिजे?” (टेहळणी बुरूज०९ ५/१५ ६-८)
या अहवालातल्या घटनांचं चित्र आपल्या मुलांसमोर उभं करण्यासाठी बायबलच्या या चित्रकथेचा वापर करा.
“राहाबला सांगितलं होतं तसंच तिने केलं” (बायबलच्या चित्रकथा लेख ११-wcgr)