१३ यहोशवा
त्याने तर्काला न पटणाऱ्या सूचना पाळल्या
यहोशवा यरीहो शहर पाहत उभा होता. देवाने त्याला त्या शहरावर हल्ला करायला आणि त्या शहराचा नाश करायला सांगितलं होतं. मोशेचा मृत्यू व्हायच्या काही काळाआधीच यहोवाने त्याला जे सांगितलं होतं, ते त्याला आठवलं. यहोवा बोलला होता: “हिंमत धर आणि खंबीर हो.” (अनु. ३१:२३) आणि आता पुन्हा यहोवाने त्याला तेच सांगितलं: “हिंमत धर आणि खंबीर हो.” (यहो. १:७) यहोशवाला धैर्याची खरंच खूप गरज होती. पण का?
तसं पाहायला गेलं, तर यरीहो हे काही खूप मोठं शहर नव्हतं. पण त्या शहराभोवती असलेल्या मोठ्या, मजबूत भिंतीमुळे ते खूप सुरक्षित होतं. या शहरापासूनच इस्राएली लोक वचन दिलेला देश काबीज करायला सुरुवात करणार होते. या शहरात जे लोक राहत होते ते भयंकर वाईट कामं करायचे. बऱ्याच शतकांआधी यहोवाने अब्राहामला सांगितलं होतं, की “अमोरी लोकांना त्यांच्या पापांची शिक्षा देण्याची वेळ अजून आलेली नाही.” हे अमोरी लोक म्हणजे कनान देशात राहणारे सगळे लोक. (उत्प. १५:१६) पण आता त्यांना शिक्षा द्यायची यहोवाची वेळ आली होती. तिथले लोक मूर्तिपूजा करायचे, मंदिरात वेश्येची कामं करायचे, समलैंगिक संबंध आणि जवळच्या नातेवाइकांसोबत अनैतिक संबंध ठेवायचे, प्राण्यांशी संभोग करायचे; इतकंच काय, तर त्यांच्या घृणास्पद देवांसाठी आपल्या मुलांचा बळीही द्यायचे. कनानी लोक इतक्या खालच्या थराला गेले होते, की तो देश जणू त्यांना ‘ओकूनच’ टाकणार होता. (लेवी. १८:३, ६, २१-२७) पण हे कसं घडणार होतं?
मजबूत सुरक्षा भिंती असलेल्या शहराला जिंकण्यासाठी यहोवाने यहोशवाला कसा हल्ला करायचा ते सांगितलं. युद्धाचा एक डावपेच म्हणून याकडे पाहायला गेलं तर तसं करण्यात काहीच अर्थ नव्हता असं वाटू शकतं
यासाठी देव यहोशवा आणि त्याच्या सैन्याचा वापर करणार होता. हे सैन्य यहोवाच्या सूचनांचं पालन करायला तयार होतं. यरीहो शहरापासूनच यहोवा दुष्ट लोकांचा नाश करायला सुरुवात करणार होता. पण त्यासाठी यहोवाने यहोशवाला अशा सूचना दिल्या ज्या तर्काला न पटणाऱ्या होत्या! यहोवाने त्याला शहरावर लगेच हल्ला करायला किंवा बऱ्याच काळापर्यंत शहराला वेढा द्यायला सांगितलं नाही, तर शहराभोवती फक्त फेऱ्या मारायला सांगितलं. सहा दिवस, दिवसातून एकदा त्यांना शहराभोवती फक्त एक फेरी मारायची होती. याजकांनासुद्धा हेच करायचं होतं. काही याजकांना कराराची पेटी उचलून न्यायची होती, तर काहींना रणशिंगं फुंकायची होती. पण सातव्या दिवशी त्या सगळ्यांना सात वेळा शहराभोवती फेऱ्या मारायच्या होत्या. आणि त्यानंतर सैनिकांना मोठ्याने ओरडायचं होतं!
यहोशवाला युद्धाचा थोडाफार अनुभव असला, तरी मानवी दृष्टिकोनातून किंवा युद्धाचा डावपेच म्हणून या गोष्टीकडे पाहिलं, तर यहोवाने सांगितलेली गोष्ट करण्यात काहीच अर्थ नव्हता. शिवाय, इस्राएली लोक जर युद्धात हारले असते, तर कनानमधल्या इतर शहरांची हिंमत नक्कीच वाढली असती आणि ते खूप आक्रमक झाले असते.
पण यहोशवाने यहोवावर भरवसा ठेवला. त्यासाठी त्याच्याकडे दोन कारणं होती. एक म्हणजे, यहोशवाने यरीहो शहराची पाहणी करण्यासाठी जेव्हा दोन हेरांना पाठवलं होतं तेव्हा त्यांना कळलं होतं, की यरीहो शहरातले लोक इस्राएली लोकांच्या भीतीने खूप खचून गेले आहेत. आणि दुसरं म्हणजे, यहोवाने चमत्कार करून यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह जागच्या जागीच थांबवला होता आणि त्यामुळे इस्राएली लोक नदी पार करून जाऊ शकले होते.
या कारणांवर यहोशवाने नक्कीच मनन केलं असेल आणि त्यामुळेच त्याचा विश्वास वाढला असेल. म्हणूनच त्याला यहोवाची आज्ञा पाळायचं धैर्य मिळालं. त्याने आपलं सैन्य घेऊन यरीहो शहराभोवती फेरी मारली. याजकांनीसुद्धा रणशिंगं फुंकली. तिकडे मात्र इस्राएली लोकांच्या भीतीमुळे यरीहो शहराचे “दरवाजे बंद करण्यात आले” होते आणि ते संपूर्ण शहर शांत होतं. दुसऱ्या दिवशीसुद्धा यहोवाच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने शहराभोवती फेरी मारली. अशा प्रकारे सहा दिवसांपर्यंत ते असंच करत राहिले. मग सातवा दिवस आला.
सातव्या दिवशी इस्राएली लोकांनी यरीहो शहराभोवती सात वेळा फेऱ्या मारल्या. मग सातव्या फेरीच्या शेवटी त्यांनी एक खास गोष्ट केली. यहोशवाने अशी घोषणा केली: “मोठ्याने ओरडा, कारण यहोवाने हे शहर तुमच्या हाती दिलंय!” आणि खरंच तसं झालं. कारण आपण असं वाचतो: “सैनिकांनी मोठ्या आवाजात युद्धाची घोषणा केली . . . त्याच वेळी शहराची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली.”
मग यहोवाच्या आज्ञेप्रमाणे यहोशवा आणि त्याचे सैनिक थेट शहरात घुसले आणि त्यांनी तिथल्या सगळया माणसांना आणि प्राण्यांना मारून टाकलं. यहोवा त्यांच्यासोबत असल्यामुळेच यहोशवा आणि त्याच्या सैनिकांनी एकापाठोपाठ एक अनेक शहरांचा आणि राष्ट्रांचा पराभव केला. शेवटी यहोवाने ‘दुष्ट अमोरी लोकांच्या पापापासून’ कनान देश शुद्ध केला.
पण यरीहो शहराच्या भिंतीचा एक छोटासा भाग अजूनही तसाच उभा होता. का बरं? याचं उत्तर एका स्त्रीने दाखवलेल्या विश्वासाशी आणि धैर्याशी संबंधित आहे. याबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहू या.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
यहोशवाने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. शास्त्रवचनांच्या प्रेरित लिखाणांपैकी कोणती लिखाणं यहोशवाकडे असावीत? (टेहळणी बुरूज१० ७/१ २० ¶४, तळटीप) १
चित्र १
२. यरीहो शहराला इस्राएली लोकांनी फेऱ्या मारण्याआधी यहोवाने यहोशवाला काय करायला सांगितलं? यहोवाने सांगितलेली ही गोष्ट करणं बरोबर नाही असं इस्राएली लोकांना का वाटू शकत होतं? (यहो. ५:२-८; टेहळणी बुरूज१८.१० २३ ¶५-७)
३. यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं याचा कोणता पुरावा आहे? (टेहळणी बुरूज१५ ११/१५ १३) २
Kennedy, Titus (2023). The Bronze Age Destruction of Jericho, Archaeology, and the Book of Joshua. Accessed via researchgate.net. Licensed under CC BY 4.0
चित्र २: प्राचीन यरीहो शहराचे अवशेष—जळालेलं धान्य असलेली मडकी
४. यहोशवा ६:२६ मध्ये दिलेली यरीहो शहराबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (टेहळणी बुरूज९८ ९/१५ २१ ¶८)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवायला यहोशवाला कशामुळे मदत झाली? (यहो. २३:१४) आज आपणही तसाच भरवसा कसा ठेवू शकतो?
देवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करायला आपल्याला यहोशवाच्या उदाहरणामुळे कशी मदत होते? ३
चित्र ३
यहोशवाने जे धैर्य दाखवलं त्याचं तुम्ही कसं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
यहोशवाचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
मंडळीतल्या वयस्कर भाऊबहिणींकडून शिकायला, यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवायला आणि भाऊबहिणींमुळे दुखावलो गेलो तरी विश्वासू राहायला यहोशवाच्या उदाहरणातून आपल्याला कशी मदत होते?
“यहोशवाच्या स्मरणात राहिलेल्या गोष्टी” (टेहळणी बुरूज०२ १२/१ ९-१२)
यहोशवाच्या जीवनातल्या काही महत्त्वाच्या घटनांबद्दल शिकण्यासाठी आपल्या मुलांना मदत करा.