४ अब्राहाम
यहोवाच्या वतीने युद्ध लढणारा पहिला माणूस
यहोवाने अब्राहामला एक अतिशय खास असं अभिवचन दिलं होतं. त्या अभिवचनामुळे संपूर्ण मानवजातीचं भविष्य बदलणार होतं. देवाने म्हटलं: ‘मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन’. आणि या राष्ट्राला जो सुंदर देश यहोवा देणार होता तोसुद्धा त्याने अब्राहामला दाखवला. (उत्प. १२:२; १३:१४, १५) पण हे राष्ट्र तयार होण्याआधीच सैतानाने त्या राष्ट्राचा नाश करायचा निश्चय केला होता. कारण सैतानाला माहीत होतं की या राष्ट्रातूनच वचन दिलेली “संतती” येणार आहे आणि ती त्याचा आणि त्याच्या दुष्ट शासनाचा कायमचा नाश करणार आहे.—उत्प. ३:१५.
म्हणून सैतानाने अब्राहाम आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला. याची झळ अब्राहामचा पुतण्या, लोट यालासुद्धा बसली. काही काळाआधी अब्राहामने उदारपणे लोटला वचन दिलेल्या देशात कुठे राहायचं हे निवडण्याची पहिली संधी दिली होती. आणि लोटने सगळ्यात सुपीक प्रदेश निवडला होता. तो प्रदेश सदोम शहराच्या जवळ होता. तिथले “लोक दुष्ट होते आणि यहोवाविरुद्ध घोर पापं करायचे.” (उत्प. १३:८-१३) सदोमचा राजा आणि कनानच्या इतर चार राजांनी मिळून आपला एक गट बनवला होता. त्यांना एलामच्या राजाला कर द्यावा लागायचा. यामुळे ते खूप वैतागले होते. म्हणून त्यांनी बंड केलं. याचा परिणाम म्हणजे एलामचा राजासुद्धा दूरच्या तीन राजांसोबत आला आणि त्यांनी युद्ध करून उत्तरेपासून राज्य काबीज करायला सुरुवात केली आणि कनानच्या राजांना हरवलं. अशा प्रकारे विजय मिळवल्यावर एलामच्या राजाने आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर राजांनी युद्धातून मिळालेल्या गोष्टींची लूट केली आणि लोकांना बंदी बनवलं. यांमध्ये लोट आणि त्याचं कुटुंबसुद्धा होतं.
अब्राहामने चार शक्तिशाली राजांच्या मोठ्या सैन्याचा पाठलाग करून त्यांच्याशी युद्ध करायला त्याच्याकडच्या ३१८ माणसांना सज्ज केलं
मग अशा वेळी अब्राहाम काय करणार होता? तो असा विचार करू शकला असता, की लोटने जो निर्णय घेतलाय त्याचाच परिणाम त्याला भोगावा लागतोय. किंवा तो असाही विचार करू शकला असता, की आपण जर लोटला सोडवायला गेलो तर आपल्याला त्या राजांविरुद्ध युद्ध करावं लागेल. आणि त्यांतला एक राजा तर आपण जिथून आलोय त्या शिनार प्रदेशाचाच राजा आहे. अब्राहाम तर तंबूंमध्ये राहत होता. आणि तो काही योद्धा नव्हता, तर एक साधा मेंढपाळ होता. मग चार राजांच्या इतक्या मोठ्या सैन्याला तो कसं हरवू शकणार होता? एखाद्याने असाही विचार केला असता की मी जर त्या राजांविरुद्ध युद्ध केलं, तर ऊर देशात सुखसोयीचं जीवन जगायची माझ्याकडे काहीच आशा उरणार नाही. पण अब्राहामने तसा विचार केला नाही. त्याने लोटला वाचवायचा निर्णय घेतला, कारण यहोवा आपल्याला मदत करेल असा पूर्ण भरवसा त्याला होता.
या काळापर्यंत अब्राहामची बरीच भरभराट झाली होती आणि त्याच्या माणसांची संख्या १,००० च्या वर गेली होती. त्याने ३१८ प्रशिक्षित सेवकांना एकत्र केलं आणि त्यांना युद्धासाठी सज्ज केलं. या लोकांना आणि प्रदेशातल्या इतर ओळखीच्या लोकांना घेऊन तो एलाम आणि त्याच्यासोबत असलेल्या राजांविरुद्ध युद्ध करायला निघाला. दूर उत्तरेला दान प्रदेशात गेल्यानंतर शत्रू तिथे तळ देऊन आहेत असं अब्राहामला दिसलं. मग अब्राहामने त्याच्या लोकांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं आणि रात्रीच्या वेळी त्यांच्यावर हल्ला केला. त्या राजांच्या सैन्याची संख्या अब्राहामच्या लोकांपेक्षा खूप जास्त असली, तरीसुद्धा अब्राहामने त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्यांना पळवून लावलं. ते चार राजे जेव्हा उत्तरेकडे पळून जात होते तेव्हा अब्राहामने त्यांचा पाठलाग केला. शेवटी दिमिष्कजवळ आल्यानंतर अब्राहामने त्यांना पूर्णपणे हरवलं आणि कनानमधून त्या राजांनी जे लुटलं होतं ते परत मिळवलं. शेवटी लोट आणि त्याच्या कुटुंबाची सुटका झाली.
अब्राहामने धैर्य आणि विश्वास दाखवल्याबद्दल यहोवाने त्याला आशीर्वाद दिला का? अब्राहाम जेव्हा शालेम शहराच्या जवळून जात होता तेव्हा या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट झालं. शालेम शहराचा राजा मलकीसदेक हा यहोवाचा एक याजकसुद्धा होता. राजा आणि याजक असलेला हा मलकीसदेक राजा शहरातून बाहेर येऊन अब्राहामला भेटला आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला. त्या वेळी अब्राहामने नम्रपणे मलकीसदेकला लुटीतून आणलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींमधला दहावा भाग दिला.
हे युद्ध माणसांचं नाही तर देवाचं होतं यात काहीच शंका नाही. बायबलमध्ये आपल्याला ‘यहोवाच्या युद्धाच्या पुस्तकाबद्दल’ वाचायला मिळतं. (गण. २१:१४) अब्राहामने जे युद्ध लढलं ते या पुस्तकात लिहिलेलं पहिलं युद्ध असावं. बऱ्याच शतकांनंतर जेव्हा अब्राहामला वचन दिलेल्या देशात राहणाऱ्या दुष्ट कनानी लोकांविरुद्ध युद्ध लढावं लागलं, तेव्हा यहोवाने त्याच्या या विश्वासू लोकांना एका मागून एक विजय मिळवून दिला.
पण इस्राएली लोकांनी जेव्हा यहोवाला नाकारलं, तेव्हा मात्र त्यांनी यहोवाचं संरक्षण गमावलं. आणि शेवटी जेव्हा त्यांनी देवाच्या मुलाला, म्हणजेच मसीहाला नाकारलं तेव्हा देवानेही त्यांना नाकारलं. आता यहोवा इस्राएल राष्ट्राऐवजी ख्रिस्ताच्या शासनाखाली असलेल्या आध्यात्मिक राष्ट्राला, म्हणजे आध्यात्मिक इस्राएलला आशीर्वाद देऊ लागला. येशूने आपल्या शिष्यांना खरोखरचं युद्ध लढण्यापासून दूर राहायला सांगितलं. (मत्त. २६:५२) उलट, त्याने त्याच्या शिष्यांना आध्यात्मिक युद्ध लढायला शिकवलं. तो पृथ्वीवर होता तेव्हा त्याने या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं आणि खरोखरच्या युद्धासारखंच आध्यात्मिक युद्ध लढायला तेवढंच धैर्य लागतं हे दाखवून दिलं.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
या अध्यायात शिकल्याप्रमाणे अब्राहामने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. उत्खननात सापडलेल्या कोणत्या पुराव्यांवरून हा अहवाल खरा असल्याचं सिद्ध होतं? (टेहळणी बुरूज८९ ७/१ ५ ¶४-६ ¶१-wcgr)
२. सदोम आणि गमोरा या शहरांबद्दल बायबलमध्ये दिलेलं वर्णन बरोबर आहे, हे कोणत्या भौगोलिक पुराव्यांवरून सिद्ध होतं? (इन्साइट “मृत समुद्र (क्षार समुद्र)” ¶६-wcgr) १
BestTravelPhotography/iStock via Getty Images Plus
चित्र १: मृत समुद्राच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीच्या भागात आजही खजुराची झाडं आणि इतर वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. प्राचीन सदोम शहर कदाचित याच ठिकाणी असावं असं मानलं जातं
३. मलकीसदेक हा शालेमचा राजा आणि याजक होता. हे शालेम शहर कुठे होतं? (इन्साइट “शालेम”-wcgr)
४. मलकीसदेक येशूला कशा प्रकारे सूचित करत होता? (इन्साइट “महायाजक” ¶२७-२८-wcgr) २
चित्र २
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
अब्राहामने लोटला सगळ्यात चांगला प्रदेश घेऊ दिला. आपण आपल्या घरच्या लोकांसोबत, भाऊबहिणींसोबत आणि इतरांसोबत वागताना त्याच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? ३
चित्र ३
अब्राहाम त्याच्या पुतण्याला सोडवायला स्वतःहून पुढे आला. यातून आपण काय शकू शकतो?
या अहवालात अब्राहामने जसं धैर्य दाखवलं तसं धैर्य तुम्हीही कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
अब्राहाम आणि लोटचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?
आणखी शिका
अब्राहाम यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायला कसा शिकला ते जाणून घ्या.
ऊर देश सोडण्याआधीसुद्धा अब्राहामने धैर्य कसं दाखवलं?