भाग ४
देव अब्राहामासोबत करार करतो
अब्राहाम यहोवावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञांचे पालन करतो आणि यहोवा त्याला आशीर्वाद देण्याची व त्याचा वंश बहुगुणित करण्याची प्रतिज्ञा करतो
जलप्रलयाला जवळजवळ ३५० वर्षे होऊन गेली होती. कुलपिता अब्राहाम त्याकाळी ऊर नावाच्या समृद्ध शहरात राहत होता. हे शहर सध्याचे इराक जेथे आहे त्या क्षेत्रात वसलेले होते. अब्राहामाचा देवावर अढळ विश्वास होता. पण, आता त्याच्या विश्वासाची खरी कसोटी होणार होती.
यहोवाने अब्राहामाला आपला देश सोडून एका अनोळखी देशात जाण्यास सांगितले. हा देश कनान होता. अब्राहामाने जराही विलंब न लावता देवाच्या आज्ञेचे पालन केले. तो आपली पत्नी सारा, पुतण्या लोट व नोकर-चाकर या सर्वांना घेऊन, कितीतरी दिवसांच्या प्रवासानंतर कनानमध्ये पोचला आणि तेथे तंबूंमध्ये राहू लागला. यहोवाने अब्राहामाशी एक करार करून त्याला वचन दिले की तो त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करेल, त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील आणि त्याचे वंशज कनान देशाचा ताबा घेतील.
अब्राहाम आणि लोट यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे वाढत गेली व ते संपन्न झाले. अब्राहामाने मनाचा मोठेपणा दाखवून लोटाला त्याच्या पसंतीचा प्रदेश निवडू दिला. लोटाने यार्देन नदीच्या आसपासचा सुपीक प्रदेश निवडला आणि तो सदोम शहरात राहू लागला. पण, सदोमातील माणसे अनैतिक होती—यहोवाच्या दृष्टीने घोर पापी होती.
यहोवा देवाने अब्राहामाला पुन्हा एकदा आश्वासन दिले की त्याचे वंशज आकाशातल्या ताऱ्यांइतके अगणित होतील. अब्राहामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. पण, अब्राहामाची प्रिय पत्नी सारा हिला अजूनही मूलबाळ नव्हते. नंतर, अब्राहाम ९९ वर्षांचा व सारा ९० वर्षांची असताना, देवाने अब्राहामाला सांगितले की त्यांना मुलगा होईल. देवाने सांगितल्याप्रमाणेच घडले आणि सारेने इसहाकाला जन्म दिला. अब्राहामाला इतरही मुले होती, पण एदेन बागेत ज्या मुक्तिदात्याविषयी वचन देण्यात आले होते तो इसहाकाद्वारेच येणार होता.
या काळात, लोट आणि त्याचे कुटुंब सदोममध्ये राहत होते. पण, नीतिमान लोट त्या शहरातील दुष्ट लोकांसारखा बनला नाही. यहोवाने सदोम शहराचा नाश करण्याचा निर्धार केला, तेव्हा येणाऱ्या विनाशाची लोटाला आगाऊ सूचना देण्यासाठी त्याने देवदूतांना पाठवले. देवदूतांनी लोटाला व त्याच्या कुटुंबाला सदोम सोडून जाण्याची व मागे वळून न पाहण्याची विनंती केली. देवाने नंतर सदोम व जवळचेच दुष्ट शहर गमोरा यांवर अग्नी व गंधकाचा वर्षाव करून त्यातील सर्वांचा नाश केला. लोट आपल्या दोन मुलींसह शहरातून सुखरूप बाहेर पडला. पण त्याच्या बायकोने, कदाचित सदोम शहरात सोडून आलेल्या गोष्टींच्या अनावर ओढीमुळे, मागे वळून पाहिले. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.
—उत्पत्ति ११:१०–१९:३८ वर आधारित.