५ अब्राहाम
आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट करायला तो तयार होता
अब्राहाम हळूहळू एकेक पाऊल पुढे टाकत यहोवाने त्याला जिथे जायला सांगितलं होतं तिथे चालला होता. तसं पाहिलं तर त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच वेळा कठीण प्रवास केला होता. पण हा प्रवास फक्त काही दिवसांचा असला, तरी तो त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रवास होता.
यहोवाने अब्राहामकडे जे मागितलं होतं त्याच गोष्टीवर तो सारखा विचार करत होता. यहोवाने त्याला म्हटलं होतं: “कृपा करून तुझ्या एकुलत्या एका मुलाला, ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे, त्या इसहाकला घेऊन मोरिया देशात जा. तिथे मी सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर.” अब्राहामचा त्याच्या मुलावर, इसहाकवर किती जीव आहे हे यहोवाला माहीत होतं. मग तो अब्राहामला हे का करायला सांगत होता? आणि यहोवाने सांगितलेली गोष्ट करायला अब्राहामला इतका विश्वास आणि धैर्य कसं दाखवता आलं?
बायबल अब्राहामला ‘विश्वास ठेवणाऱ्यांचा पिता’ असं म्हणतं. (रोम. ४:११) या घटनेच्या आधीच अब्राहामचा विश्वास खूप मजबूत होता आणि यहोवाने त्याचा विश्वास आणखी मजबूत करायला त्याला मदत केली. उदाहरणार्थ, बऱ्याच वर्षांआधी यहोवाने अब्राहामला सांगितलं, की तो सदोम आणि गमोरा या दुष्ट शहरांचा नाश करेल. पण काळजीपोटी अब्राहामने यहोवाला विचारलं, की तो वाईट लोकांसोबत चांगल्या लोकांचाही नाश करेल का? मग यहोवाने अब्राहामला धीराने सांगितलं, की त्या शहरात खूप कमी नीतिमान लोक असले तरी तो त्या शहरांचा नाश करणार नाही. (उत्प. १८:१६-३३) यातून अब्राहामला जे शिकायला मिळालं ते तो कधीच विसरला नाही. ते म्हणजे यहोवा खूप न्यायी आणि दयाळू देव आहे.
जेव्हा यहोवाने एका प्रेमळ पित्याला कल्पनाही करता येणार नाही अशी गोष्ट करायला सांगितली, तेव्हा ती करायचं धैर्य त्याला कुठून मिळालं?
काही काळानंतर यहोवाने एक चमत्कार घडवून आणला आणि अब्राहाम आणि साराला एक सुंदर भेट दिली. सारा जवळजवळ ९० वर्षांची होती आणि अब्राहाम जवळजवळ १०० वर्षांचा होता, तरीसुद्धा यहोवाने त्यांची प्रजनन शक्ती पुन्हा जिवंत केली आणि त्यांना इसहाक झाला. अब्राहामला यातून शिकायला मिळालं की यहोवाला काहीही अशक्य नाही. अगदी निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीमध्येसुद्धा तो पुन्हा प्राण टाकू शकतो. अब्राहामचं “शरीर एखाद्या मेलेल्या माणसासारखं झालं होतं,” तरी यहोवाने त्याला मूल होऊ दिलं. (रोम. ४:१८, १९) अब्राहामला जे शिकायला मिळालं ते त्याच्या मनात आणि हृदयात कायमचं कोरलं गेलं.
आता जवळजवळ २५ वर्षांनंतर अब्राहाम मोरिया डोंगराकडे जात होता. आणि त्याला शिकायला मिळालेल्या या गोष्टी त्याच्या मनात पुन्हापुन्हा घोळत होत्या. त्या वेळी त्याला एका गोष्टीची खातरी झाली. ती म्हणजे, इसहाक जरी मेला तरी यहोवा त्याला पुन्हा जिवंत करू शकतो आणि तो ते नक्की करेल! (इब्री ११:१९) या आशेनेच अब्राहामला धैर्य मिळालं आणि त्याला जिथे जायचं होतं, त्या दिशेने तो जाऊ लागला.
यहोवाने जिथे जायला सांगितलं होतं, ते ठिकाण दूरूनच पाहिल्यावर अब्राहामने आपल्या सेवकांना तिथेच थांबायला सांगितलं. आणि तो इसहाकसोबत अर्पण द्यायला वरती गेला. अब्राहामने आपल्या सेवकांना अगदी आत्मविश्वासाने सांगितलं, की तो आणि इसहाक दोघंही परत येतील. डोंगरावर एका एकांत ठिकाणी गेल्यावर आता अर्पण द्यायची वेळ आली. इसहाक तरुण होता आणि त्याच्याकडे आपल्या वयस्कर वडिलांपेक्षा जास्त ताकद होती. पण तरीही अब्राहाम जेव्हा त्याचे हात बांधत होता आणि त्याला वेदीवर झोपवत होता, तेव्हा इसहाकने नम्रपणे त्याला तसं करू दिलं. मग अब्राहामने हातात चाकू घेऊन हात वर उचलला आणि कल्पनाही करता येणार नाही अशी गोष्ट करायला तो तयार झाला. पण अचानक एका स्वर्गदूताने त्याला हाक मारली आणि म्हटलं, “त्या मुलाला मारू नकोस.” तेव्हा अब्राहाम लगेच थांबला.
अब्राहामने जो विश्वास आणि आज्ञाधारकता दाखवली, त्याबद्दल यहोवाने त्याची प्रशंसा केली. अब्राहाम जे करायला तयार झाला त्यासाठी यहोवाने त्याची संतती वाढवायचं आणि त्याद्वारे ‘पृथ्वीवरच्या सगळ्या राष्ट्रांना’ आशीर्वाद द्यायचं जे अभिवचन दिलं होतं, त्याची पुन्हा एकदा अब्राहामला खातरी करून दिली.
यहोवाने अब्राहामला दिलेलं वचन आजही पूर्ण होत आहे आणि त्यामुळे लोकांना पुढेही कायम आशीर्वाद मिळत राहतील. यहोवाने अब्राहाम आणि इसहाक यांच्या बाबतीत जे केलं, त्यावरून यहोवाबद्दल आणखी एक गोष्ट आपल्याला कळते. सगळ्या मानवांना वाचवण्यासाठी यहोवा स्वतः कोणत्या दुःखातून जाणार आहे, याची एक झलक त्याने दिली. जसं अब्राहाम आपल्या प्रिय मुलाचं अर्पण द्यायला तयार होता, तसं यहोवा त्याच्या एकुलत्या एका मुलाचं, येशूचं अर्पण करायला तयार होता. (योहा. ३:१६) आपण जेव्हा अब्राहामने निःस्वार्थपणे केलेल्या या गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा यहोवाच्या प्रेमाबद्दलसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं.
भूतकाळात यहोवाने जे काही सांगितलं आणि जे काही केलं त्यावर आपण मनन करतो तेव्हा अब्राहामप्रमाणे आपलाही विश्वास वाढेल. आणि जसजसा आपला विश्वास वाढेल तसतसं आपलं धैर्यही वाढेल. देवाने अब्राहामला जे करायला सांगितलं तसं तो आपल्यालाही करायला सांगेल का, अशी चिंता करायची आपल्याला गरज नाही. कारण त्याने कधीही इतर कोणाला तसं करायला सांगितलं नाही. पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहीत आहे. ती म्हणजे, देवाने आपल्याला कोणतीही गोष्ट करायला सांगितली तरी त्याच्यावरच्या विश्वासामुळे आपण ती धैर्याने करू. आणि असं केल्यामुळे कल्पनाही करता येणार नाही इतके आशीर्वाद तो आपल्याला देईल!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
या अध्यायात शिकल्याप्रमाणे अब्राहामने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. अब्राहाम इतिहासात होऊन गेलेली खरोखरची व्यक्ती होती याचे कोणते पुरावे आहेत? (सावध राहा! ५/१२ १८, चौकट-wcgr; इन्साइट “अब्राहाम” ¶२२-२३-wcgr) १
चित्र १: इजिप्तच्या कर्नाक इथे “अब्राहामचं शेत” असा उल्लेख असलेली एक भिंत
२. अब्राहामला यहोवाबद्दल कुठून कळालं असेल? (अनुकरण करा अध्या. ३ ¶४-५)
३. अब्राहामची उपासना यहोवाने का स्वीकारली? (शुद्ध उपासना अध्या. २ ¶१८)
४. उत्पत्ती २२:१७ मध्ये यहोवाने अब्राहामला जे अभिवचन दिलं त्यावरून बायबल वैज्ञानिक रितीने अचूक आहे हे कसं कळतं? (सावध राहा! ८८ ४/८ २५-wcgr) २
चित्र २
चित्र २
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
अब्राहामच्या आशेमुळे त्याला धैर्य दाखवायला कशी मदत झाली? आपणही आपल्या आशेबद्दल विचार करत राहिल्यामुळे आपल्याला धैर्य दाखवायला कशी मदत होईल? ३
चित्र ३
पुढे दिलेल्या परिस्थितींमध्ये आपण अब्राहामसारखं धैर्य दाखवून एका अर्थाने यहोवाला कसं अर्पण देऊ शकतो?
साक्ष द्यायची संधी असते तेव्हा (इब्री १३:१५)
आपला पैसा आणि साधन-संपत्ती कशी वापरणार हे ठरवायचं असतं तेव्हा (नीति. ३:९)
भाऊबहिणींना आपल्या मदतीची गरज आहे हे आपल्याला कळतं तेव्हा (फिलिप्पै. ४:१८)
या अहवालात अब्राहामने जे धैर्य दाखवलं त्याचं तुम्ही कसं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
अब्राहाम आणि इसहाकचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्यांना काय विचारेन?
आणखी शिका
या अहवालातल्या घटना किती जबरदस्त आहेत ते पाहा.
अब्राहाम यहोवाचा अतिशय जवळचा मित्र कसा बनला आणि तुम्ही यहोवासोबतच्या तुमच्या मैत्रीचं नातं कसं मजबूत करू शकता?
“यहोवानं त्याला ‘माझा मित्र’ म्हटलं” (टेहळणी बुरूज१६.०२ ८-१२)