३ सारा
तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही
साराचं लग्न अब्राहामशी झालं होतं. त्याच्यावर ती खूप प्रेम करायची. ते शिनार प्रदेशातल्या ऊर या शहरात राहत होते. फरात नदीच्या काठावर हे एक गजबजलेलं शहर होतं आणि हे शहर मोठमोठ्या संरक्षक भिंतींनी वेढलेलं होतं. शहरातले लोक मूर्तिपूजा करण्यात पूर्णपणे बुडाले होते. पण अब्राहाम मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा होता. तो एकच खऱ्या देवाची म्हणजे यहोवाची उपासना करायचा. साराचाही खऱ्या देवावर विश्वास होता. पण एक दिवस असं झालं की तिच्या विश्वासाची आणि धैर्याची परीक्षा झाली.
‘यहोवा माझ्याशी बोलला’ असं अब्राहामने साराला सांगितलं. हे ऐकून सारा नक्कीच भारावून गेली असेल. पण यहोवाने अब्राहामला जे करायला सांगितलं होतं ते सोपं नव्हतं. कारण त्यांना ऊरमधलं आपलं घर, आपले नातेवाईक सोडून दूर जावं लागणार होतं. त्यांना आपले सेवक आणि सामानसुमान घेऊन उंटांवरून लांबचा प्रवास करावा लागणार होता आणि तंबूंमध्ये राहावं लागणार होतं. तसंच यापुढे त्यांच्या सुरक्षेसाठी शहराच्या मोठमोठ्या भिंती असणार नव्हत्या. भक्कम छताचं घर आणि अंगण असणार नव्हतं. तसंच पाणी पुरवठ्याची चांगली सोय आणि सुखसुविधाही असणार नव्हत्या. आणि जवळपास कोणतीही बाजारपेठसुद्धा असणार नव्हती. अशा बऱ्याच आव्हानांना आता त्यांना तोंड द्यावा लागणार होतं. तरीही सारा अब्राहामसोबत जायला तयार झाली. तिने यहोवावर पूर्ण विश्वास ठेवला, आपलं सगळं सामान बांधलं, आपल्या नातेवाइकांचा आणि मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन ती अब्राहामसोबत जायला निघाली, तेही अशा ठिकाणी ज्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं.
यहोवाने जेव्हा अब्राहाम आणि साराला त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूर जायला सांगितलं, तेव्हा आधीच्या सुरक्षित जीवनाकडे परतण्यासाठी अब्राहामला गळ घालण्याऐवजी साराने त्याला साथ दिली
साराने आणखी एका मार्गाने धैर्य दाखवलं. प्रेषित पौलने तिच्याबद्दल आणि अब्राहामबद्दल असं म्हटलं: “ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाची जर ते सतत आठवण करत राहिले असते, तर तिथे परत जाण्याची संधी ते शोधू शकले असते.” (इब्री ११:१५) ऊरमधलं आपलं घर किती चांगलं होतं आणि तिथे आपल्याला किती सुरक्षित वाटायचं याचा विचार सारा करू शकली असती. पण तिने तसा विचार केला नाही. उलट तिने धैर्य दाखवलं आणि मागे वळून न पाहायचा निश्चय केला.
शेवटी ते कनान देशात पोचले तेव्हा साराला कळलं, की इथे तर फरात महानदीसारखी कोणतीही नदी नाही. त्यामुळे व्यापारी दूरवरून खाण्यापिण्याच्या आणि इतर गोष्टी आणू शकत नाहीत. म्हणून जेव्हा कनानमध्ये दुष्काळ पडला तेव्हा कनान सोडण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. पण या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साराने पुन्हा ऊरला जायचा हट्ट धरला नाही; तर ती अब्राहामसोबत दक्षिणेकडे इजिप्तला जायला स्वतःहून तयार झाली.
सारा दिसायला खूपच सुंदर होती. कोणाच्याही नजरेत भरेल असं तिचं सौदर्य होतं. त्यामुळे अब्राहामला भीती होती, की तिला मिळवण्यासाठी कोणीतरी त्याचा खून करेल. म्हणून साराला असं दाखवावं लागलं की ती अब्राहामची बहीण आहे. पण याचा काहीच फायदा झाला नाही. कारण फारोला जेव्हा तिच्या सुंदरतेबद्दल कळलं, तेव्हा त्याने आपल्या सेवकांना साराला त्याच्या महालात आणायचा आदेश दिला. सारा असा विचार करू शकली असती, की तंबूंमध्ये राहून भटकत जीवन जगण्यापेक्षा आलिशान महालात सुरक्षित राहून तिथल्या सुखसुविधांचा आनंद घेणं केव्हाही चांगलं. पण साराने तसं केलं नाही. तिने धैर्य दाखवलं आणि ती आपल्या पतीला एकनिष्ठ राहिली. त्यामुळे यहोवाने तिची सुटका केली आणि आता ती पुन्हा आपल्या पतीकडे आली.a
यहोवाने वचन दिलं होतं की तो अब्राहामच्या संततीद्वारे एक मोठं राष्ट्र तयार करेल. पण साराला अजून काही मूलबाळ झालं नव्हतं आणि याचं तिला खूप दुःख होतं. मग बरीच वर्षं कनानमध्ये राहिल्यानंतर यहोवाने साराला आशीर्वाद दिला. ती ९० वर्षांची असूनसुद्धा यहोवाने तिच्या मनातली सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली. तिला एक मुलगा झाला. यहोवाने सांगितलं की त्यांनी त्या मुलाचं नाव इसहाक ठेवावं कारण त्याचा अर्थ “हसणं” असा होतो. या वयात मूल होणं ही गोष्ट साराला विचित्र वाटत असली तरी आपल्याला मूल होणार हे जेव्हा सारा आणि अब्राहामला कळलं, तेव्हा त्यांना आनंद झाला आणि ते हसले. शिवाय यहोवाच्या या चमत्काराबद्दल जेव्हा लोकांना समजेल तेव्हा तेही आनंदाने हसतील हे साराला नक्की माहीत होतं.
सारा बरीच वर्षं जगली. तिने प्रेमाने आपल्या मुलाला वाढवलं आणि धैर्याने त्याचं संरक्षण केलं. म्हणूनच आपला मुलगा मोठा होऊन एक चांगला माणूस बनलाय हे तिला पाहता आलं. तिने शेवटपर्यंत आपल्या आधीच्या आरामदायी जीवनाकडे वळून पाहिलं नाही. उलट भविष्यात मिळणाऱ्या सुंदर आशीर्वादांकडे तिने लक्ष लावलं. सारा आणि तिच्या कुटुंबाला यहोवाने दिलेली अभिवचनं पूर्ण होताना पाहता आली नाहीत. पण आपल्याला खातरी आहे की भविष्यात ते ती पूर्ण झालेली नक्की पाहतील!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
साराने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. अब्राहाम साराचा सावत्र भाऊ होता. मग तिने त्याच्याशी लग्न करणं योग्य होतं का? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १२ ¶५, तळटीप-wcgr)
२. ऊरमधून निघताना साराला कोणकोणत्या गोष्टी सोडाव्या लागल्या असतील ते सांगा. (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १३ ¶३-१४ ¶२-wcgr) १
Photograph taken by courtesy of the British Museum
चित्र १: प्राचीन ऊर शहरात खोदकाम करताना सापडलेला एक मौल्यवान दागिना
३. सारा आपली पत्नी आहे ही गोष्ट लपवून अब्राहामने योग्यच केलं हे कशावरून सिद्ध झालं? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.३ १४ ¶६-१५ ¶२-wcgr)
४. सारा आपल्या पतीच्या अधीन होती, याचा अर्थ तिने आपलं मत कधीच मांडलं नाही असा होता का? स्पष्ट करा. (सावध राहा! १/०८ २९ ¶४-५-wcgr) २
चित्र २
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
खाली दिलेल्या प्रश्नांचा वापर करून सारा आणि लोटची पत्नी यांच्यात तुलना करा.
कोणत्या बाबतीत त्यांच्यात सारखेपणा होता? (उत्प. १२:१; १३:५-७; १९:१२, १५)
कोणत्या बाबतीत त्यांच्यात फरक होता? (उत्प. १९:१७, २६; लूक १७:२८-३२)
त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचा जो परिणाम झाला त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
सारा दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या पतीकडे भरपूर धनसंपत्ती होती. आपलीही अशीच परिस्थिती असेल तर आपण तिच्या चांगल्या उदाहरणातून काय शिकू शकतो? (नीति. ३१:३०; १ तीम. ६:१७-१९)
सारासारखं तुम्हीही तुमच्या जीवनात धैर्य कसं दाखवू शकता? ३
चित्र ३
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
साराचं पुनरुत्थान झाल्यावर मी तिला काय विचारेन?
आणखी शिका
साराचं उदाहरण फक्त पत्नींसाठी आहे का, की तिच्या उदाहरणातून पतीसुद्धा शिकू शकतात?
सारा आणि अब्राहामने एकमेकांबद्दल आदर वाटावा म्हणून काय केलं ते पाहा.
“‘याहची ज्वाला’ जळत राहू द्या” (टेहळणी बुरूज२३.०५ २४-२५ ¶१५-१७)
a काही काळानंतर साराला अशाच एका प्रसंगातून जावं लागलं. या वेळी अबीमलेख राजाने साराला आपल्याकडे आणलं. पण तिने धैर्याने अब्राहामच्या सूचनांचं पालन केलं, आणि यहोवाने पुन्हा एकदा तिला या प्रसंगातून सोडवलं.