पाठ ७४
येशू मसीहा बनतो
योहानने लोकांना प्रचार केला. त्याने लोकांना सांगितलं: ‘माझ्यापेक्षाही महान अशी एक व्यक्ती येत आहे.’ येशू जवळपास ३० वर्षांचा होता, तेव्हा तो गालील प्रदेशातून यार्देन नदीकडे आला. तिथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत होता. येशूलाही योहानकडून बाप्तिस्मा घ्यायचा होता. पण योहान त्याला म्हणाला: ‘मी तुला बाप्तिस्मा देऊ शकत नाही. खरंतर तूच मला बाप्तिस्मा द्यायला हवा.’ येशू त्याला म्हणाला: ‘यहोवाची इच्छा आहे की तू मला बाप्तिस्मा द्यावा.’ यामुळे ते दोघं यार्देन नदीत उतरले. योहानने येशूला पाण्यात बुडवून बाप्तिस्मा दिला.
पाण्यातून वर आल्यावर येशूने प्रार्थना केली. त्याच वेळी आकाश उघडलं आणि देवाचा आत्मा येशूवर एका कबुतरासारखा आला. तेव्हा यहोवा आकाशातून बोलला: ‘तू माझा प्रिय मुलगा आहेस. मी तुझ्यावर खूश आहे.’
यहोवाचा आत्मा जेव्हा येशूवर आला, तेव्हा तो ख्रिस्त किंवा मसीहा बनला. यहोवाने ज्या कामासाठी त्याला पृथ्वीवर पाठवलं होतं, ते काम आता तो सुरू करणार होता.
बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू ओसाड रानात गेला. तिथे तो ४० दिवस राहिला. तिथून परत आल्यावर तो योहानला भेटायला गेला. येशू आपल्याकडे येत असल्याचं पाहून, योहान म्हणाला: ‘जगाचं पाप दूर करणारा हाच तो देवाचा कोकरा आहे!’ योहानने असं बोलून सगळ्यांना दाखवून दिलं, की येशू हाच मसीहा आहे. पण जेव्हा येशू ओसाड रानात होता तेव्हा त्याच्यासोबत काय घडलं, हे तुला माहीत आहे का? चल याबद्दल आपण पुढे पाहू या.
“स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: ‘तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.’”—मार्क १:११