तो मशीहाचा अग्रगामी होता
एक रुंद चामडी पट्टा उन्हाने काळवंडलेल्या त्याच्या अंगावर उठून दिसत होता. उंटाच्या केसांच्या अंगरख्यामुळे तो खरोखर एका संदेष्ट्यासारखाच दिसत होता. यार्देन नदीजवळ पुष्कळ जण त्याच्याकडे आकर्षिले गेले. तेथे, या चित्तवेधक मनुष्याने धैर्याने घोषणा केली, की तो पश्चात्तापी पापी जनांचा बाप्तिस्मा करण्यास तयार होता.
लोक आश्चर्यचकित झाले! हा मनुष्य कोण होता? त्याचा उद्देश काय होता?
येशू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल म्हटले: “तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहावयास काय? मी तुम्हाला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनहि जो श्रेष्ठ त्याला, . . . स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही.” (मत्तय ११:९-११) योहान इतका असामान्य मनुष्य का होता? कारण तो मशीहाचा अग्रगामी होता.
त्याची नेमणूक भाकीत केली होती
योहानाच्या जन्माच्या ७०० पेक्षा अधिक वर्षांआधी, यहोवाने घोषित केले, की हा अरण्यात अशी घोषणा करील: “परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.” (यशया ४०:३; मत्तय ३:३) योहानाच्या जन्माच्या ४०० पेक्षा अधिक वर्षांआधी सर्वशक्तीमान देवाने घोषित केले: “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्यास तुम्हाकडे पाठवीन.” (मलाखी ४:५) बाप्तिस्मा करणारा योहान येशूच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी जन्मला होता ही वस्तुस्थिती केवळ एक आकस्मिक गोष्ट नव्हती किंवा ती निव्वळ नैसर्गिक प्रक्रियेमुळे घडली नव्हती. इसहाक या वाग्दत्त बाळाच्या जन्माप्रमाणेच, योहानाचा जन्म एक चमत्कार होता, कारण त्याचे पालक जखऱ्या आणि अलिशिबा यांचे मुलांना जन्म देण्याचे सामान्य वय उलटून गेले होते.—लूक १:१८.
योहानाचा जन्म होण्याआधी, त्याची नेमणूक, कार्य आणि जीवन पद्धतीबद्दल गब्रीएल देवदूताने प्रगट केले. एलीयाच्या सामर्थ्याने आणि आत्म्याने योहान, आज्ञाभंजक लोकांना मृत्यूच्या मार्गावरून हटवून येशूला मशीहा असल्याचे स्वीकारण्यास त्यांना तयार करणार होता. योहानाला जन्मापासून देवाला पूर्णपणे वाहिलेला नाजीरच राहायचे होते, व त्याला द्राक्षारस किंवा कोणतेही मद्य वर्ज्य करायचे होते. त्याचे अन्न “टोळ व रानमध” होते. (मार्क १:६; गणना ६:२, ३; लूक १:१३-१७) शमुवेलाप्रमाणेच, परात्पर देवाच्या वैभवी सेवेसाठी योहानाची बालपणापासून खास नेमणूक करण्यात आली होती.—१ शमुवेल १:११, २४-२८.
योहान हे नाव देखील देवानेच निवडले होते. इब्री नाव “योहान” याचा अर्थ “यहोवाने कृपा दाखवली आहे; यहोवा कृपाळू झाला आहे” असा होतो.
आठव्या दिवशी बाळकाची सुंता झाल्यावर त्याचा पिता जखऱ्या याला असे म्हणावयास ईश्वरी प्रेरणा झाली की: “हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील; ह्यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव घ्यावा. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्यायोगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.” (लूक १:७६-७८) योहानाची सार्वजनिक सेवा त्याच्या जीवनात प्रथम महत्त्वाची असावयास हवी होती; त्याच्या तुलनेत इतर सर्व कामे महत्त्वपूर्ण नव्हती. यास्तव, योहानाच्या जीवनाच्या पहिल्या ३० वर्षांचा सारांश एकाच वचनात मिळतो: “तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रगट होण्याच्या दिवसांपर्यंत अरण्यात राहिला.”—लूक १:८०.
अरण्यातील वाणी
तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहुदीयाचा अधिकारी होता तेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात आला आणि त्याने अशी घोषणा केली की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्तय ३:२; मार्क १:४; लूक ३:१, २) अवघ्या प्रदेशाची जनता जागृत झाली. या ठळक घोषणेने, खात्रीच्या आशेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांच्या अंतःकरणावर प्रभाव पाडला. योहानाच्या घोषणेने एखाद्या व्यक्तीच्या नम्रतेची परीक्षा घेतली कारण त्या व्यक्तीला पूर्ण अंतःकरणाने पश्चात्ताप करावा लागणार होता. त्याच्या प्रामाणिकपणाने व खात्रीने, ईमानदार आणि प्रामाणिक लोकांना योहानास देवाने पाठवलेला मनुष्य असे लेखण्यास प्रवृत्त केले.
योहानाची कीर्ती उगवत्या नव्या दिवसाप्रमाणे पसरली. त्याच्या पोशाखावरून आणि भक्तीवरून तो यहोवाचा संदेष्टा असल्याचे सहजपणे ओळखता येत होते. (मार्क १:६) इतकी आस्था कशामुळे वाढत होती हे पाहण्यासाठी याजक आणि लेवी जरुसलेमहून आले. पश्चात्ताप? का आणि कशासाठी? हा मनुष्य कोण होता? हे सर्व त्यांना माहीत करून घ्यायचे होते. योहानाने सांगितले: “मी ख्रिस्त नाही.” “तेव्हा त्यांनी त्याला विचारले: तर मग आपण कोण आहा? एलीया आहा काय? तो म्हणाला, मी नाही. आपण तो संदेष्टा आहा काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? तो म्हणाला, यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे. पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाहि नाही, तर बाप्तिस्मा का करिता?”—योहान १:२०-२५.
राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी पश्चात्ताप आणि बाप्तिस्मा आवश्यक होता. यास्तव, योहानाने उत्तर दिले: ‘मी पश्चात्तापी पापी जनांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु माझ्यापेक्षा समर्थ, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. त्याच्या पायतणांचा बंद सोडवण्यास मी योग्य नाही. सावध राहा! त्याच्या हातात सूप आहे आणि तो आपल्या कोठारात गहू साठवील पण भूस जाळून टाकील.’ (लूक ३:१५-१७; प्रेषितांची कृत्ये १:५) निश्चितच, मशीहाच्या अनुयायांवर पवित्र आत्मा ओतला जाईल परंतु, त्याच्या शत्रूंना अग्नीचा नाश अनुभवावा लागेल.
‘सर्व प्रकारच्या लोकांसाठी’ इशारा
अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या यहुद्यांवर खोल परिणाम झाला आणि नियमशास्त्र कराराला अविश्वासू राहिल्याने त्यांनी जाहीरपणे त्यांची पापे कबूल केली. यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याद्वारे त्यांनी जाहीरपणे त्यांचा पश्चात्ताप प्रदर्शित केला. (मत्तय ३:५, ६) परिणामी, मशीहाला स्वीकारण्यास त्यांचे हृदय सुस्थितीत होते. देवाच्या धार्मिक गरजांबद्दलचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची तहान भागवून, योहानाने आनंदाने त्यांना त्याचे शिष्य या नात्याने शिक्षित केले, प्रार्थना कशी करावी हे देखील त्यांना शिकवले.—लूक ११:१.
मशीहाच्या या अग्रगामीविषयी, प्रेषित योहानाने लिहिले: “तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला; ह्यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.” (योहान १:७) म्हणजे, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने “पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली” तेव्हा सर्व प्रकारच्या लोकांनी त्याचे ऐकले. (प्रेषितांची कृत्ये १३:२४) अन्यायाने बळकावण्याच्या उपायांविरूद्ध कर गोळा करणाऱ्यांना त्याने ताकीद दिली. त्याने शिपायांना कोणाचाही छळ करण्याविरुद्ध किंवा खोटा आरोप लावण्याविरूद्ध ताकीद दिली. शिवाय त्याने धार्मिक, दांभिक परूशी आणि सदुक्यांना सांगितले: “अहो, सापांच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? ह्यास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे, असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका; कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडापासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.”—मत्तय ३:७-९; लूक ३:७-१४.
गट या नात्याने, योहानाच्या दिवसातील धार्मिक नेत्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नाकारले आणि त्याला भूत लागले आहे असा त्यांनी त्याच्यावर आरोप केला. चिरकालिक जीवनाकडे जाणाऱ्या धार्मिक मार्गाचा त्यांनी धिक्कार केला. दुसऱ्या बाजूला पाहता, योहानाच्या साक्षीवर विश्वास ठेवणाऱ्या पापी कर गोळा करणाऱ्यांनी आणि वेश्यांनी पश्चात्ताप केला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला. नियुक्त वेळी, त्यांनी येशू ख्रिस्ताला मशीहा म्हणून स्वीकारले.—मत्तय २१:२५-३२; लूक ७:३१-३३.
मशीहाची ओळख करून दिली जाते
सहा महिन्यांसाठी—वसंत ऋतुपासून २९ सा. युगाच्या सुरवातीपर्यंत—देवाच्या विश्वासू साक्षीदाराने यहुद्यांचे लक्ष येणाऱ्या मशीहावर केंद्रित केले. मशीही राजाची प्रकट होण्याची वेळ जवळ आली होती. आणि मशीहा आल्यावर, तोही त्याच यार्देन नदीजवळ आला आणि त्याचा बाप्तिस्मा करण्याची विनंती केली. सुरवातीला योहानाने नकार दिला पण मग तो राजी झाला. येशूवर पवित्र आत्मा उतरताना आणि त्याच्या पुत्राची स्वीकृती व्यक्त करणारी यहोवाची वाणी ऐकताना योहानाला किती आनंद झाला याची कल्पना करा.—मत्तय ३:१३-१७; मार्क १:९-११.
येशू मशीहा आहे हे योहानाने पहिल्याने ओळखले आणि त्याने त्याच्या स्वतःच्या शिष्यांना या अभिषिक्ताशी ओळख करून दिली. योहान म्हणाला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” त्याने असेही म्हटले, “माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.”—योहान १:२९-३७.
योहानाचे कार्य आणि येशूची सेवा सहा महिन्यांसाठी एकसाथ चालली होती. त्या प्रत्येकाला दुसरा काय कार्य करतो हे समजत होते. योहान स्वतःला वराचा मित्र समजत होता आणि स्वत:चे कार्य जसजसे कमी होत चालले होते तशी ख्रिस्ताची वृद्धी होताना पाहून त्याला आनंद झाला.—योहान ३:२२-३०.
एलीया संबोधलेला योहान, त्याचा अग्रगामी आहे हे येशूने ओळखले. (मत्तय ११:१२-१५; १७:१२) एके प्रसंगी, येशूने म्हटले: “योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करितो.”—लूक १६:१६.
शेवटपर्यंत विश्वासू
योहानाने धैर्याने सत्याची साक्ष दिल्यामुळे त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. राजा हेरोदाचे पाप उघड करण्याच्या त्याच्या जबाबदारीपासून देखील तो मागे सरला नव्हता. देवाच्या नियमांच्या विरूद्धतेत, राजा त्याच्या स्वतःच्या भावाच्या पत्नीबरोबर, हेरोदियाबरोबर व्यभिचार करत होता. योहानाने याविषयी त्याचे विचार धैर्याने व्यक्त केले जेणेकरून राजा पश्चात्ताप करून देवाची कृपा प्राप्त करू शकेल.
योहान विश्वास आणि प्रीतीचे किती मोठे उदाहरण होता! त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा त्याग करून तो यहोवा देवाला विश्वासू राहिला आणि सहमानवांसाठी प्रीती दर्शवली. एका वर्षाच्या तुरुंगवासानंतर, दुष्ट हेरोदिया योहानाविरुद्ध “डाव” धरत असल्यामुळे तिच्या एका दियाबल प्रेरित कटामुळे त्याचा शिरच्छेद करण्यात आला. (मार्क ६:१६-१९; मत्तय १४:३-१२) परंतु, मशीहाच्या अग्रगामीने यहोवासोबत त्याचे सत्त्व टिकवून ठेवले. देवाच्या धार्मिक नवीन जगामध्ये आनंद लुटण्यासाठी लवकरच त्याला मृतातून उठवण्यात येईल.—योहान ५:२८, २९; २ पेत्र ३:१३.