श्वान माझं श्रवणयंत्र!
ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
“माझी ट्विंकी नसती तर मी काय केलं असतं कोण जाणे!” आपल्या खुर्चीखाली निवांतपणे पहुडलेल्या ट्विंकीकडे मोठ्या आपुलकीनं पाहत डॉर्थीनं म्हटलं. ही ट्विंकी म्हणजे पाढऱ्या-तपकिरी रंगाच्या जॅक सस्सल मिश्रजातीची श्वानकन्या. “ट्विंकीला माझ्या घरी येऊन केवळ काही महिने झाले असतील; पण, ती घरात आल्यापासून माझं जीवन पार बदलून गेलंय!”
हे ऐकून मी ट्विंकीकडे अगदी लक्षपूर्वक पाहिलं; तिला पिवळ्या रंगाचं एक जॅकेट घातलं होतं आणि त्यावर मोठ्या काळ्या अक्षरांत, “श्वान—कर्णबधिरांचे श्रवणयंत्र,” असं लिहिलं होतं. ‘काय विलक्षण हा प्राणी!’ असं मी स्वतःशीच म्हटल्याचं मला अजूनही आठवतं. ‘पण, हा लहानगा जीव खरं तर काय काय करेल?’
गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमधील लंडन शहरात भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी जीवनाचा मार्ग” या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित असलेल्या ४४,००० लोकांमध्ये माझी आणि डॉर्थीची योगायोगानं भेट झाली. त्या अधिवेशनात डॉर्थी लाउडस्पिकरच्या अगदी जवळ बसल्यामुळे ती संपूर्ण कार्यक्रम नीट ऐकू शकत होती; मग तिला या श्रवण कुत्र्याची काय गरज होती? नंतर, जेवणाच्या सुटीत गप्पा मारत असताना डॉर्थीनं मला सगळी हकीगत सांगितली.
ट्विंकी नेमकं काय करते?
वयाच्या तिसऱ्या वर्षी डॉर्थी संधिवाताच्या तापामुळे फणफणली आणि त्यातच तिची श्रवणशक्ती गेली. पतीला जाऊन आता २३ वर्षं उलटली होती आणि त्यांच्या निधनानंतर ती एकटी पडली. त्यामुळे डॉर्थी असं म्हणते, की पुढे जसजसं वय वाढत गेलं तसतसं तिला वाटू लागलं, की कुणीतरी सोबत असावं. ती म्हणते: “या वयात बहिऱ्या लोकांना फार असुरक्षित वाटतं. आज मी ७४ वर्षांची आहे आणि मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्यात वॉर्डनची (वृद्धांची काळजी घेण्याची) देखील सोय आहे; पण माझा केअरटेकर मला पाहायला येतो तेव्हा त्यानं वाजवलेली दारावरची बेल मला ऐकू येत नाही. एकदोन वेळा तर असं झालं, की मला कदाचित बरं वाटत नसेल असं समजून तो सरळ दार उघडून आत आला आणि त्याला असं एकाएकी माझ्यासमोर पाहून मी दचकलेच. आता मात्र दारावरची बेल वाजली की माझी ट्विंकी ती ऐकते आणि माझ्या पायांवर आपल्या पंजांनी मारत मला दारापाशी घेऊन जाते. अव्हनचा बझर वाजतो तेव्हा देखील ट्विंकी धावत माझ्याकडे येते आणि मग मी तिच्या मागे मागे जाते. त्याशिवाय, धूर झाल्याची किंवा आग लागल्याची सूचना देणारा गजर कानांवर पडताच, ते माझ्या लक्षात आणून देणं आणि पुढे धोका आहे हे सांगण्यासाठी जमिनीवर पडणं या सगळ्या गोष्टी ट्विंकीला चांगल्याप्रकारे शिकवल्या गेल्या आहेत. अशाप्रकारे, ज्या ज्यावेळी ती मला मदत करते त्या त्यावेळी बक्षीस म्हणून मी तिला तिच्या आवडीचा खाऊ देते.”
कुशलतेने शिकवणे
ट्विंकीबद्दल आणखीन जाणून घेण्यास मी उत्सुक होते. म्हणून मग मी डॉर्थीला विचारलं, “पण, तुम्ही ट्विंकीला आणलं कुठून आणि या सगळ्या गोष्टी तिला कुणी शिकवल्या?” यावरून, ब्रिटनमधील श्वान—कर्णबधिरांचे श्रवणयंत्र नावाच्या एका समाजसेवी संस्थेविषयी सांगण्याचं निमित्त डॉर्थीला मिळालं; कर्णबधिर लोकांना चारचौघांसारखं मुक्तपणे जीवन जगण्यास, आपलं जीवन अधिक समृद्ध करण्यास मदत करणं हा या संस्थेचा उद्देश आहे. सन १९८२ पासून या संस्थेनं ब्रिटनमधील शेकडो कर्णबधिरांना अशी प्रशिक्षित कुत्री दिली आहेत. या कुत्र्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना विनामूल्य त्यांच्या नवीन मालकांना दत्तक दिलं जातं.
यांतली बहुतेक कुत्री, सहसा भटक्या कुत्र्यांना आश्रय देणाऱ्या केंद्रांतून घेतलेली असतात तर इतर काही कुत्र्यांची पैदास करणाऱ्यांनी या संस्थेला स्वेच्छेनं देऊन टाकलेली असतात. एका कुत्र्याला प्रशिक्षित करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष तरी लागतं. आणि त्यांचा सगळा खर्च एखादा प्रायोजक उचलतो; हा प्रायोजक एखादी कंपनी असू शकते किंवा मग एकत्र येऊन छोट्यामोठ्या देणग्या देणाऱ्या अनेक लोकांचा समूह या कुत्र्यांचा प्रायोजक बनतो. तसं, ट्विंकीचा प्रायोजक एक स्लिमिंग क्लब असल्याचं डॉर्थीनं मला सांगितलं.
निवड झाल्यानंतर सात आठवडे ते तीन वर्षं वयापर्यंतच्या प्रत्येक संभाव्य श्रवण कुत्र्याला विशिष्ट आवाजांना प्रतिसाद देण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पण, त्याआधी कुत्र्याला घरच्या वातावरणाची सवय होण्यासाठी दोन ते आठ महिने आपल्या घरी ठेवायला तयार असणाऱ्या व्यक्तीकडे ठेवलं जातं. हा कालावधी कुत्र्याचं वय आणि अनुभव लक्षात घेऊन ठरवला जातो. घरात घाण न करणे, सामानाचे नुकसान न करणे यांसारख्या काही चांगल्या सवयी त्याला लावल्या जातात; पण, या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्याला सार्वजनिक स्थळांची आणि परिवहनाची तसेच सर्व वयोगटांतील लोकांची म्हणजे लहान मुलांची आणि तान्ह्या बाळांची देखील ओळख करून दिली जाते. या मागचा उद्देश त्याला चांगल्या सवयी लावणे जेणेकरून पुढे ज्या कोणत्या घरात त्याला दिले जाईल तिथे तो व्यवस्थित वागेल.
याशिवाय, इतरही काही संघटना खास गरज असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षित करत असल्याची माहिती मला डॉर्थीकडून मिळाली. तिथं कुत्र्यांना विशिष्ट आज्ञा ऐकण्यास शिकवलं जातं; त्यासोबतच त्यांना विशिष्ट दृश्यं दाखवली जातात आणि विशिष्ट प्रकारचे वास ओळखायला शिकवलं जातं. व्हिलचेअरला जखडलेल्या एका स्त्रीच्या कुत्र्याला तर टेलिफोन आणि टपाल उचलायला आणि टपालावर आपल्या जिभेनं स्टँप चिकटवायलाही शिकवलं गेलं आहे! दुसऱ्या एका कुत्र्याला चक्क १२० आज्ञा समजतात आणि सुपरमार्केटच्या मांडणीवरून कॅन आणि पॅकेट घेऊन यायचंही कळतं. कुत्र्याचा अपंग मालक लेसर लाईटनं हवी ती वस्तू कुत्र्याला दाखवतो आणि कुत्रा ती वस्तू त्याला आणून देतो.
आनंदी साहचर्य
“पण, ट्विंकीचं महत्त्व सर्वांना कळतं का?” असा प्रश्न मी केला. त्यावर डॉर्थी म्हणाली, “एका दुकानदारानं ट्विंकीला दुकानात येऊच दिलं नाही. माझ्या मते, काही खायच्या वस्तू मांडणीवर ठेवल्या होत्या त्यामुळे त्यानं तिला दुकानात शिरू दिलं नाही; मला ट्विंकीची मदत का लागते हे त्या मनुष्याला कळलं नव्हतं. पण, असं फार क्वचित घडतं.”
घरामध्ये श्रवण कुत्र्याची किती गरज आहे हे एव्हाना मला समजलं होतं खरं, पण माझ्या मनात आणखीही एक प्रश्न होता. डॉर्थीसोबत इतके ख्रिस्ती भाऊ-बहीण असताना तिला ट्विंकीची काय गरज? डॉर्थी म्हणाली: “ओठांच्या हालचालीवरून मला लोकांचं बोलणं कळतं आणि मला त्यांच्याशी बोलता देखील येतं. पण, लोक जेव्हा ट्विंकीचं पिवळं जॅकेट पाहतात तेव्हा त्यांना लगेच कळतं की मला कमी ऐकू येतं. आणि मग ते माझ्याबरोबर अधिक स्पष्ट आणि मोठ्यानं बोलतात. त्यामुळे मला कमी ऐकू येतं हे प्रत्येक व्यक्तीला मला सांगावं लागतं नाही आणि त्यामुळे माझं जीवन अगदी सुरळीत चालतं.”
काही वेळातच अधिवेशनाचा कार्यक्रम सुरू होणार होता; शिवाय, दुपारच्या कार्यक्रमाला बसण्यापूर्वी ट्विंकीलाही जरा पाय मोकळे करायचे होते. तिथून निघण्याआधी प्रेमानं ट्विंकीची पाठ थोपटण्यासाठी मी खाली वाकले. ट्विंकीनं आपल्या चमकदार डोळ्यांनी माझ्याकडे आणि नंतर डॉर्थीकडे पाहिले आणि लाडानं ती आपली शेपटी हलवू लागली. किती आज्ञाधारक आणि उपयोगी मैत्रीण—कुणालाही हेवा वाटावा असा त्यांचा नातेसंबंध होता.
[२६ पानांवरील चित्र]
अधिवेशनांमध्ये ट्विंकीची मदत खरोखरच लाखमोलाची ठरते