तरुण लोक विचारतात . . .
आईला हे आजारपण का यावं?
ॲलचे वडील कॅन्सरमुळे गेले तेव्हा तो जणू खोल दुःखाच्या खाईत लोटला गेला.a पण, मेलेले लोक भविष्यात पुन्हा जिवंत होतील याची त्याला आधीच कल्पना असल्यामुळे तो या दुःखातून कसाबसा सावरला. परंतु, नंतर त्याच्या आईलाही कॅन्सर असल्याचे उघडकीस आले तेव्हा मात्र त्याच्यावर आभाळच कोसळले. आता आई देखील आपल्याला कायमची सोडून जाणार याच्या केवळ कल्पनेनेसुद्धा त्याच्या मनात धस्स व्हायचे. “पण का? माझ्याच आईला का?” या एकाच प्रश्नाने तो अगदी हवालदिल व्हायचा.
डॉ.लिओनार्ड फेल्डर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमेरिकेत सहा कोटींपेक्षा जास्त लोक असे आहेत, . . . ज्यांची जवळची एखादी तरी व्यक्ती आजारी किंवा अपंग आहे.” फेल्डर पुढे म्हणतात: ‘अमेरिकेत कोणत्याही दिवशी सर्वेक्षण केल्यास, चारपैकी एका व्यक्तीला नोकरी-धंदा करता करता आपल्या आजारी आईची किंवा वडिलांची अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागते.’ तुम्हीही याच स्थितीत आहात का? असल्यास, हवालदिल होण्याचे कारण नाही; ही तर एक सर्वसामान्य समस्या आहे. तरीसुद्धा, तुमची प्रिय व्यक्ती अंथरुणाला खिळते तेव्हा त्रेधा उडणे किंवा डोळ्यात पाणी येणे साहजिक आहे. तर मग, यातून बाहेर पडण्याकरता काय करता येण्यासारखे आहे?
आईबाबा का आजारी पडले?
नीतिसूत्रे १५:१३ म्हणते: “आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनांतील खेदाने हृदय भंग पावते.” आपल्या आईला किंवा वडिलांना गंभीर स्वरूपी आजार होतो तेव्हा भावना अनावर होणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ, आजारामुळे तुमच्या आईची किंवा वडिलांची झालेली जर्जर अवस्था पाहून तुम्हाला मनात कुठेतरी अपराध्यासारखे वाटेल. तुमच्या आईशी किंवा वडिलांशी कदाचित तुमचे फारसे जमत नसेल. एकदोन वेळा तुमच्यात कडाक्याचे भांडणही झाले असेल. आणि आता अचानक आई किंवा वडील आजारी पडल्यामुळे तुम्हाला असे वाटते की हे माझ्यामुळे तर घडले नसेल? कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या कुरबुरीमुळे मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असली तरी यामुळे गंभीर स्वरूपाचा आजार होत नाही. शिवाय, खटके हे प्रत्येक घरात उडणारच आणि याला प्रेमळ ख्रिस्ती कुटुंबेही अपवाद नाहीत. त्यामुळे आई किंवा वडील आपल्यामुळेच आजारी पडले असे वाटून घेण्याचे काही कारण नाही.
तुमच्या आईला किंवा वडिलांना झालेल्या आजाराचे मूळ कारण म्हणजे आदाम आणि हव्वा यांनी केलेले पाप. (रोमकर ५:१२) त्यांनी केलेल्या पापामुळेच “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:२२.
घायाळ मन
पण, तरीही चिंता वाटणे, हुरहूर वाटणे साहजिक आहे. टेरीच्या आईला ल्यूपस नावाच्या एका भयंकर व्याधीने ग्रासले आहे. आपल्या आजारी आईविषयी वाटणाऱ्या भावना तिने या शब्दांत व्यक्त केल्या: “मी जरी घराच्या बाहेर पडले, तरी माझा सगळा जीव आईमध्ये अडकलेला असतो; तिला काही कमीजास्त तर झालं नसेल ना? अशा चिंतेत मी असते. कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. हे सगळं तिला सांगितल्यावर तिला आणखीनच त्रास होईल म्हणून मी माझं मन तिच्यापाशी मोकळं करत नाही.”
नीतिसूत्रे १२:२५ म्हणते: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते.” ज्यांच्या आईवडिलांना गंभीरस्वरूपी आजार झाला आहे अशा युवकांसाठी निराशा काही नवीन गोष्ट नाही. टेरी म्हणते, की आई साधीसुधी कामेही करू शकत नाही हे पाहून माझा जीव खूप तुटायचा. युवकांसमोर खासकरून मुलींसमोर अधिक जबाबदाऱ्या पेलण्याशिवाय दुसरा पर्याय न राहिल्यामुळे मानसिक ताण आणखीनच वाढतो. प्राध्यापक ब्रूस कॉपास यांच्या मते, “घरकाम करणं, लहान भावंडांना सांभाळणं यांसारख्या अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलता पेलता अशा मुलींची इतकी पुरेवाट होऊन जाते की त्यांचे व्यक्तिमत्त्व चारचौघींसारखे फुलत नाही.” परिणामस्वरूप, काही किशोरवयीन मुले एकलकोंडी बनतात आणि मन विषण्ण करणारे दर्दभरे संगीत ऐकत राहतात.—नीतिसूत्रे १८:१.
आपली आई किंवा आपले वडील या आजारातून बचावले नाही तर? ही देखील एक स्वाभाविक भीती असते. टेरी ही एकुलती एक मुलगी आहे. शिवाय, तिला आईशिवाय आणि आईला तिच्याशिवाय दुसरे कोणीच नाही. त्यामुळे, जेव्हाकेव्हा तिची आई हॉस्पिटलमध्ये जायची तेव्हातेव्हा आईला आपण पुन्हा जिवंत पाहू की नाही या भीतीने टेरीला अश्रू आवरत नसे. टेरी म्हणते: “आम्हा दोघींना एकमेकींचाच आधार होता. आणि मला तो गमवायचा नव्हता.” मार्था नावाच्या आणखीन एका तरुणीने आपल्या भावना व्यक्त केल्या: “मी अठरा वर्षांची आहे; पण तरीही आईबाबांवर मृत्यू झडप घालील की काय या भीतीने माझी गाळण उडते. त्यांच्याशिवाय, मी अगदीच एकटी पडेन.” आजारी आईवडिलांची चिंता केल्यामुळे निद्रानाश होणे, भयानक स्वप्ने पडणे आणि खाण्यासंबंधित विकार जडणे अशी लक्षणे मुलांमध्ये सर्सासपणे दिसून येतात.
काय करता येण्यासारखे आहे?
सुरवाती सुरवातीला याचा सामना करणे अशक्य कोटीतील गोष्ट वाटत असेल, पण त्यावर मात करणे शक्य आहे! तुमच्या मनातील शंकाकुशंका, तुम्हाला वाटणाऱ्या चिंता हळूहळू आपल्या पालकांकडे बोलण्यास सुरवात करा. तुमच्या आईचा किंवा वडिलांचा आजार किती वाढला आहे? तिची किंवा त्यांची तब्येत सुधारण्याची कितपत शक्यता आहे? तुमचे आई किंवा वडील आजारातून बरे झालेच नाही तर तुमच्या भवितव्यासाठी काही योजना करण्यात आल्या आहेत का? पुढेमागे तुम्हाला देखील असा काही आजार होण्याची संभावना आहे का? या गोष्टींची चर्चा करणे आजारी पालकांसाठी सोपे नसले तरी, तुम्ही शांतपणे आणि आदराने त्यांचा सल्ला मागितला तर तुमची मदत करण्यासाठी आणि तुम्हाला आधार देण्यासाठी ते त्यांच्या परीने होईल तितके करतील.
याशिवाय त्यांच्याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रेमाच्या भावना लपवू नका. ॲलला आठवते, कॅन्सरमुळे त्याची आई मृत्यूशी झुंजत असताना आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचे त्याच्याकडून राहून गेले. तो म्हणतो: “मी तिच्यावर किती प्रेम करतो हे मी तिला सांगितलंच नाही. नेमके हेच शब्द ऐकण्यासाठी ती अगदी आसुसली होती हे मला माहीत होतं; पण मोठा झाल्यामुळे अशा भावना बोलून दाखवणं मला जरा विचित्रच वाटलं. त्यानंतर काही दिवसांनी ती कायमचीच गेली. तिच्यावरील माझं प्रेम व्यक्त करता येत असतानाही मी ते केलं नाही याचा आज मला खूप पस्तावा होतोय. तिच्यावर मी जितकं प्रेम केलं तितकं माझ्या जीवनात कोणावरही केलं नाही, तरी ते शब्दांत व्यक्त केलं नाही याची खंत मला वाटते.” तेव्हा, तुमचे तुमच्या पालकांवर किती प्रेम आहे हे जरूर व्यक्त करा.
शक्य असल्यास, तुमच्या आईला किंवा बाबांना जो आजार आहे त्याच्याविषयी माहिती मिळवा. (नीतिसूत्रे १८:१५) ही माहिती तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून तुम्ही मिळवू शकता. तुमच्या पालकांच्या आजाराविषयी एकंदर माहिती मिळाल्यामुळे त्यांच्याशी अधिक सहानुभूतीने, सबुरीने आणि समजूतदारपणे तुम्हाला वागता येईल. शिवाय, आधीपासूनच कल्पना मिळाल्यामुळे अंगावर चट्टे पडणे, केस गळणे, दम लागणे यांसारखी गंभीर स्वरूपाची लक्षणे तुमच्या पालकांमध्ये दिसू लागल्यास तुम्ही चिंतातूर होणार नाही.
तुमच्या आईला किंवा वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे का? असल्यास, उदास चेहरा घेऊन त्यांना भेटायला जाऊ नका; त्यांना हुरूप येईल अशा गोष्टी त्यांना सांगा. त्यांचा उत्साह मावळेल, ते नाउमेद होतील अशा गोष्टी बोलण्याचे शक्यतो टाळा. शाळेत, सभांमध्ये घडलेल्या गोष्टी आणि प्रचार कार्यात आलेले चांगले अनुभव त्यांना सांगा. (पडताळा नीतिसूत्रे २५:२५.) हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खाण्यापिण्याची किंवा अशा इतर सेवा उपलब्ध नसल्यास, ही कामे कुरकूर न करता स्वेच्छेने करा. शिवाय त्यांना भेटायला जाताना नीटनेटका पेहराव करा, त्यामुळे तुम्हाला पाहून त्यांना तर बरे वाटेलच, पण त्याचवेळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर देखील याची चांगली छाप पडेल आणि त्यामुळे ते कदाचित तुमच्या पालकांची आणखीन चांगल्याप्रकारे काळजी घेतील.b
तुमच्या पालकावर घरीच उपचार केला जात आहे का? तसे असल्यास त्यांची काळजी घेण्यासाठी होईल तितके करा. घरातील कामे करण्यासाठी पुढे या. ‘दोष न लावता उदारपणे देण्यात’ यहोवाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. (याकोब १:५) नेहमी सहनशील, आशावादी आणि उत्साही असा.
पण, या सगळ्यातून जात असताना तुमच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? या समस्येमुळे शिक्षणाचे महत्त्व काही कमी होत नाही; तेव्हा, अभ्यासासाठी विशिष्ट वेळ राखून ठेवा. आणि शक्य असल्यास विश्रांती घेण्यासाठी, करमणुकीसाठी देखील थोडा वेळ द्या. (उपदेशक ४:६) यामुळे, तुमच्या आजारी पालकाची काळजी घेण्यास तुम्हाला नवीन उत्साह मिळेल. आणि शेवटची एक गोष्ट म्हणजे, एकटे एकटे राहू नका. इतर ख्रिश्चनांची मदत घ्या. (गलतीकर ६:२) या संदर्भात टेरी म्हणते: “त्या काळात मंडळीतल्या बांधवांनी मला घरच्या माणसांसारखं प्रेम दिलं. मंडळीतले वडील वेळोवेळी माझ्याशी येऊन बोलायचे, मला उत्तेजन द्यायचे. हे सगळं मी कसं विसरू शकेन?”
आध्यात्मिक तोल सांभाळणे
पण, सर्वात मुख्य म्हणजे तुमचा आध्यात्मिक तोल सांभाळणे. बायबलचा अभ्यास, सभा, प्रचार कार्य यांसारख्या आध्यात्मिक कार्यांत स्वतःला झोकून द्या. (१ करिंथकर १५:५८) दर उन्हाळ्याच्या सुट्टीत टेरी सहायक पायनियरींग करून सुवार्तिकेच्या कार्यात अधिक सहभाग घ्यायची. ती म्हणते: “आई नेहमी मला सभांची तयारी करायला आणि सभांना उपस्थित राहायला सांगायची. त्यामुळे आम्हा दोघींनाही लाभ झाला. इच्छा असतानाही ती प्रत्येक सभेला येऊ शकत नव्हती; त्यामुळे सभांमध्ये मी नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्यायचे ज्यामुळे त्या सर्व गोष्टी मला तिला सांगता यायच्या. तिला सभांना उपस्थित राहता आलं नाही की आपली आध्यात्मिक भूक तृप्त करण्यासाठी ती सर्वस्वी माझ्यावर विसंबून असायची.”
पालकांच्या आजाराच्या कटू अनुभवाला सामोरे जात असतानाही “मुलं कशी प्रौढ होऊ शकतात, बहरू शकतात या गोष्टीचं नेहमीच नवल करणाऱ्या” एका समाज सेविकेच्या शब्दांचे द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने उत्तम सार दिले आहे. ती म्हणते: “या अनुभवातून जाताना त्यांच्या अशा गुणांचा विकास होतो की जे आपल्याजवळ आहेत याची त्यांना आधी जाणीवही नसेल. . . . यातून ते निभावून गेले तर पुढे येणाऱ्या इतर अनेक प्रसंगांतून ते सहज निभावून जाऊ शकतात.”
होय, या महाकठीण काळातून तुमचाही निभाव लागणे शक्य आहे. उदाहरणार्थ, टेरीच्या आईची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली असून तिला आता टेरीवर अवलंबून राहावं लागत नाही. कदाचित, काही काळानंतर तुमच्याही पालकाची तब्येत सुधारेल. पण दरम्यान, तुमचा स्वर्गीय मित्र, यहोवा तुमच्या पाठीशी आहे हे सदैव लक्षात असू द्या. तो ‘प्रार्थना ऐकणारा’ असल्यामुळे तुमच्या कळकळीच्या विनंत्यांची जरूर दखल घेईल. (स्तोत्र ६५:२) या समस्येचा सामना करता यावा म्हणून तो तुम्हाला आणि तुमच्या देव-भीरू पालकाला—‘पराकोटीचे सामर्थ्य’ देईल.—२ करिंथकर ४:७; स्तोत्र ४१:३.
[तळटीपा]
a काही नावे बदललेली आहेत.
b “मार्च ८, १९९१ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील “रुग्णाला भेटायला जाताना कोण-कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल,” या लेखात बरेचसे उपयुक्त सल्ले दिलेले आहेत.
[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी जरी घराच्या बाहेर पडले, तरी माझा सगळा जीव आईमध्येच अडकलेला असतो; तिला काही कमीजास्त तर झालं नसेल ना? अशा चिंतेत मी असते.”
[२४ पानांवरील चित्र]
तुमच्या पालकांच्या आजाराविषयी एकंदर माहिती मिळवल्यामुळे तुम्हाला त्यांची आणखीन चांगल्याप्रकारे मदत करता येईल