वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. २०-२१
  • गर्व करणे चुकीचे आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गर्व करणे चुकीचे आहे का?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • गर्व केव्हा घात करतो?
  • योग्य गर्व—असाही काही प्रकार?
  • गर्वाची किंमत—किती मोठी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सैतानाविरुद्धच्या लढाईत तुम्ही विजयी होऊ शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • वांशिक अभिमानाबद्दल काय?
    सावध राहा!—१९९८
  • नम्रपणा दुर्बलता आहे की ताकद?
    सावध राहा!—२००७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. २०-२१

बायबलचा दृष्टिकोन

गर्व करणे चुकीचे आहे का?

गर्व—सात महापातकांपैकी पहिले पातक असे त्यास म्हटले जाते. पण आज अनेकांच्या मते ही कल्पना जुनी झाली आहे. २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या जगात, गर्व एक अवगुण नसून अत्यावश्‍यक गुण आहे.

पण, बायबलमध्ये गर्वाचा उल्लेख केला आहे तो सहसा अवगुण याच अर्थाने. बायबलमधील नीतिसूत्रे या एका पुस्तकातच कित्येक वेळा गर्वाला वाईट म्हटले आहे. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे ८:१३ म्हणते: “गर्व, अभिमान, कुमार्ग, व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष” करतो. मग नीतिसूत्रे १६:५ म्हणते: “प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्‍वराला वीट येतो.” आणि त्याच नीतिसूत्रातले १८ वे वचन बजावते: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.”

गर्व केव्हा घात करतो?

बायबलमध्ये वाईट म्हटलेला गर्व म्हणजे फाजील अभिमान, अर्थात स्वतःचे कौशल्य, सौंदर्य, ऐश्‍वर्य, शिक्षण, प्रतिष्ठा वगैरेमुळे स्वतःला इतरांपेक्षा नको तितके समजणे. आणि असा हा गर्व तिरस्कार, फुशारकी, चढेलपणा किंवा उद्धटपणा या स्वरूपात दिसून येतो. गर्विष्ठ व्यक्‍ती स्वतःला कोणीतरी मोठे समजत असल्यामुळे तिला कोणी सुधारण्याचा प्रयत्न केल्यास ती सहजासहजी तयार होत नाही, चार लोकांत आपली नाचक्की होऊ नये म्हणून स्वतःची चूक कबूल करून ती क्षमा मागत नाही की पडती बाजू घेत नाही किंवा मग इतरांचे वागणेबोलणे उगाचच जिव्हारी लावून घेते.

करायचे तर मी सांगेल तसेच, असा गर्विष्ठ व्यक्‍तीचा सहसा अट्टहास असतो. पण, अशा या वृत्तीमुळे किती खटके उडतात याची आपल्याला पदोपदी प्रचिती ही येतेच. जातीच्या आणि देशाच्या अभिमानापायी असंख्य युद्धे लढली गेली आणि त्यांत रक्‍ताचे असंख्य पाट वाहिले गेले. एका आत्मिक पुत्राविषयी बायबल असे म्हणते, की गर्वानेच त्याला देवाविरुद्ध बंड करण्यास उद्युक्‍त केले आणि त्यामुळे शेवटी तो सैतान झाला. ख्रिस्ती मंडळीतील वडिलाच्या योग्यतांविषयी बोलताना पौलाने सल्ला दिला: “त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा.” (१ तीमथ्य ३:६; पडताळा यहेज्केल २८:१३-१७.) गर्वाचे हे दुष्परिणाम विचारात घेता देवाला हा गुण घृणास्पद का वाटतो याचे नवल वाटू नये. पण, तुम्हाला कदाचित प्रश्‍न पडेल की, ‘अशाही काही गोष्टी नाहीत का ज्यांविषयी गर्व करणे उचित आहे?’

योग्य गर्व—असाही काही प्रकार?

बायबलमधील ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत काफ्काओमी या क्रियापदाचे भाषांतर “गर्व करणे, अभिमान बाळगणे, प्रतिष्ठा मिरवणे” असे करण्यात आले असून अवगुण वा सद्‌गुण या दोन्ही अर्थांनी या क्रियापदाचा प्रयोग करण्यात आला आहे. उदाहरणार्थ पौल काय म्हणतो ते लक्षात घ्या; तो म्हणतो की आपण, “देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगावा.” तो असाही सल्ला देतो: ‘जो प्रतिष्ठा मिरवितो, त्याने ती प्रभूविषयी मिरवावी.’ (रोमकर ५:२; २ करिंथकर १०:१७) याचा अर्थ, आपला देव यहोवा याच्याविषयी गर्व करणे किंवा दुसऱ्‍या शब्दांत त्याच्या चांगल्या नावाविषयी, नावलौकिकाविषयी इतरांना अभिमानाने सांगणे.

उदाहरणार्थ, कोणाला बदनाम केले जाते तेव्हा साहजिकच त्या व्यक्‍तीला आपला निर्दोषपणा सिद्ध करण्याची इच्छा असते; त्याला असे वाटणे चुकीचे आहे का? मुळीच नाही. तुमच्या घरच्या लोकांची किंवा तुम्हाला प्रिय आणि आदरणीय वाटणाऱ्‍या लोकांविषयी लोक नको ते बोलतात तेव्हा तुमच्या मनाला ते लागणार नाही का? आणि मग अशा वेळी तुम्हाला आपल्या माणसांची बाजू घ्याविशी वाटणार नाही का? बायबल म्हणते: “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय.” (नीतिसूत्रे २२:१) ईजिप्तच्या एका गर्विष्ठ फारोला सर्वशक्‍तिमान देव म्हणाला: “मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्‍या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे.” (निर्गम ९:१६) यावरून, देवाला त्याच्या चांगल्या नावाविषयी, नावलौकिकाविषयी अभिमान वाटतो आणि त्यासाठी त्याला ईर्ष्या आहे हे सिद्ध होते. आपणही आपल्या चांगल्या नावाविषयी, नावलौकिकाविषयी अभिमान बाळगू शकतो; पण, अहंभावाने किंवा स्वकेंद्रित गर्वाने उद्युक्‍त होऊन नव्हे.—नीतिसूत्रे १६:१८.

कोणत्याही चांगल्या नातेसंबंधासाठी त्याला आदराची झालर ही असावीच लागते. मित्रांवर आपला विश्‍वास राहत नाही तेव्हा त्यांच्याशी असलेल्या आपल्या औपचारिक, अनौपचारिक संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. एकजुटीने किंवा भागीदारीने केलेल्या कामात एकाच्या हातून चूक झाल्यास त्याची स्वतःची आणि बाकीच्या लोकांचीही बदनामी ती होणारच. तेव्हा, हेतू कोणतेही असोत ते साध्य करण्यासाठी नावलौकिक टिकून ठेवावा लागतो. यामुळेच ख्रिस्ती मंडळीतील पर्यवेक्षकांविषयी बाहेरच्या लोकांनीही “चांगली साक्ष” देणे का जरूरीचे आहे हे देखील समजण्याजोगे आहे. (१ तीमथ्य ३:७) आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी नव्हे, तर एका योग्य, आदरणीय पद्धतीने देवाचे प्रतिनिधित्व करता यावे म्हणून आपले चांगले नाव असावे अशी त्यांची इच्छा असते. देवाच्या सेवकाविषयी बाहेरच्यांनी चांगली साक्ष दिली नाही तर लोक कितपत त्याच्यावर विश्‍वास ठेवतील?

मग, साध्य केलेल्या गोष्टींबद्दल गर्व करण्याविषयी काय? उदाहरणार्थ, मूल अभ्यासात उत्तम प्रगती करीत आहे हे पाहून पालकांना आनंद होतो. आणि त्यातून मिळणारे समाधानही योग्यच आहे. थेस्सलनीकातील सहख्रिश्‍चनांची प्रगती पाहून पौलाला देखील आनंद झाला कारण त्यांना लिहिलेल्या पत्रात त्याने असे म्हटले: “तुम्हा बंधुजनांबद्दल आम्ही सदैव देवाचे आभार मानायला हवेत. असे करणे रास्तच आहे. कारण तुमच्या श्रद्धेची झपाट्याने वाढ होत आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या एकमेकांवरील प्रेमाला भरती येत आहे. आम्ही स्वतःच देवाच्या भक्‍तगणात तुमच्याविषयी मोठ्या अभिमानाने सांगत असतो. कारण तुम्हाला कितीही छळ सोसावा लागला व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या तरीही तुम्ही खंबीर आहात आणि तुमची श्रद्धा अढळ आहे.” (तिरपे वळण आमचे.) (२ थेस्सलनीकाकर १:३, ४; [थेसलोनिका] मराठी कॉमन लँग्वेज बायबल) होय, आपल्या जवळचे लोक यशस्वी होत असल्याचे पाहून आनंदी होणे स्वाभाविक आहे. मग, योग्य गर्व आणि अयोग्य गर्व यात नेमका फरक तो काय?

स्वतःचा नावलौकिक टिकवून ठेवावा, यश संपादन करावे आणि मिळालेल्या यशामुळे आनंद करावा असे वाटणे काही गैर नाही. पण, चढेलपणे किंवा मगरूरीने वागणे आणि स्वतःविषयी किंवा इतरांविषयी तोरा मिरवणे या गोष्टींची देव घृणा करतो. म्हणूनच एखादी व्यक्‍ती गर्वाने ‘फुगू’ लागते किंवा ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू’ लागते तेव्हा नक्कीच वाईट वाटते. ख्रिश्‍चनांनी गर्व करावा किंवा प्रतिष्ठा मिरवावी ती केवळ यहोवा देवाविषयी आणि त्याने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींविषयी; स्वतःविषयी किंवा इतर कोणत्या गोष्टीविषयी नव्हे. (१ करिंथकर ४:६, ७; रोमकर १२:३) या संदर्भात यिर्मया संदेष्ट्याने सांगितलेले तत्त्व अनुकरण करण्याजोगे आहे: “[अभिमान] बाळगावयाचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्‍वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा.”—यिर्मया ९:२४.

[२० पानांवरील चित्र]

“Pope Innocent X,” by Don Diego Rodríguez de Silva Velázquez

[चित्राचे श्रेय]

Scala/Art Resource, NY

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा