तरुण लोक विचारतात . . .
माझ्या विवाहास माझ्या पालकांचा विरोध असल्यास काय?
लाकीशा आणि तिचा मित्र विवाह करण्याच्या विचारात आहेत, पण तिच्या आईची संमती नाही. लाकीशा म्हणते: “या वर्षी मी १९ वर्षांची होईन, पण आईचं म्हणणं आहे की मी २१ वर्षांची होईस्तोवर आम्ही थांबावं.”
तुम्ही विवाह करण्याचे ठरवले असल्यास, तुमच्या पालकांनाही तुमच्या या निर्णयाबद्दल आनंद व्हावा असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही निवडलेला विवाहसोबती त्यांना पसंत नसल्यास तुम्ही खरोखरच व्यथित व्हाल. अशावेळी काय करावे? त्यांच्या इच्छाआकांशा धुडकावून तुम्ही लग्न करावे का?a
तुम्ही प्रौढ असून पालकांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचे कायदेशीर वय गाठले असल्यास असे करण्याचा मोह अधिकच असू शकतो. तथापि, पालकांचा आदर-सन्मान करण्यासंबंधी बायबल कोणतीही वयोमर्यादा घालून देत नाही. (नीतिसूत्रे १:८) आणि तुम्ही जर त्यांच्या भावनांची हेळसांड केली तर त्यांच्यासोबत असलेल्या तुमच्या नातेसंबंधास तुमच्या हातून स्थायी हानी पोहंचण्याची शक्यता आहे. याशिवाय, तुमच्या विवाहास विरोध करण्यासाठी तुमच्या पालकांजवळ काही ठोस कारणे असण्याची शक्यता, नव्हे दाट शक्यता आहे.
कोणत्या वयाला फार लहान म्हणता येईल?
उदाहरणार्थ, तुमचे पालक तुम्हाला असे म्हणत आहेत का, की विवाह करण्यास तुम्ही अद्याप फार लहान आहात? खरे तर, बायबलमध्ये विवाहासाठी कोणतेही कमीतकमी वय ठरवून दिलेले नाही. पण, ते असा सल्ला जरूर देते, की विवाह करण्याआधी एखाद्याचा “तारुण्याचा बहर”—ऐन तारुण्याचा काळ जेव्हा लैंगिक वासना अगदी शिगेला पोहंचलेल्या असतात—“ओसरलेला” असावा. (१ करिंथकर ७:३६; NW) असे का बरे? कारण असे तरुण-तरुणी भावनिक प्रगल्भता, आत्मसंयम आणि यशस्वी वैवाहिक जीवनाकरता आवश्यक असणारे आध्यात्मिक गुण विकसित करण्याच्या केवळ सुरवातीच्या टप्प्यांत असतात.—पडताळा १ करिंथकर १३:११; गलतीकर ५:२२, २३.
वीस वर्षांच्या डेलने विवाह करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या पालकांचा विरोध असल्यामुळे तो निराश झाला. “ते म्हणे मी अजूनही फार लहान आहे, मला काही अनुभव नाही,” असे तो म्हणतो. “मला तर असं वाटलं होतं, की मी आणि माझी मैत्रीण विवाह करण्याच्या वयाचे होतो आणि लग्न झाल्यानंतर अनुभव आलाच असता; पण मी केवळ भावनेच्या आहारी जाऊन तर हे सगळं करत नव्हतो ना, याची माझ्या आईबाबांना खात्री करून घ्यायची होती. त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले. दररोज घ्यावे लागणारे लहान-मोठे निर्णय, पैशांच्या बाबी तसेच भौतिक, भावनिक आणि आध्यात्मिकरितीने कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास मी खरोखरच तयार होतो का? मी एका पित्याच्या जबाबदारीसाठी तयार होतो का? दळणवळण राखण्यास मी खरोखर शिकून घेतले होते का? विवाहसोबत्याच्या गरजा काय असतात याची मला खरंच जाणीव झाली होती का? त्यांचं असं मत होतं, की मी कोणा दुसऱ्या प्रौढ व्यक्तीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारण्याआधी, प्रौढ व्यक्ती म्हणून प्रथम स्वतःला अधिक जाणून घेतलं पाहिजे.
“आम्हाला थांबायची इच्छा नव्हती पण तरीही परिपक्व होता यावं म्हणून आम्ही आमचा विवाह लांबणीवर टाकला. शेवटी, आमचं लग्न झालंच तेव्हा एका अधिक भरभक्कम पायासह, तसंच अधिक उत्तम गुण आणि क्षमतांसह आम्ही या नातेसंबंधात बांधले गेलो.”
धार्मिक भिन्नतेचा प्रश्न
टेरी नामक एक युवती, दुसऱ्या एका धर्मातल्या पुरुषाच्या प्रेमात पडली तेव्हा ती लपूनछपून त्याच्याशी भेटीगाठी करू लागली. विवाह करण्याचा आपला बेत त्यांनी उघड केला तेव्हा या विवाहास टेरीच्या आईचा विरोध होता हे जाणून ती वैफल्यग्रस्त झाली. टेरी शोकाकुल होऊन म्हणाली: “माझ्याविषयी आईचं मन कलुषित होऊ नये असं मला वाटतं. आम्हा दोघा माय-लेकीमध्ये पूर्वी जो नातेसंबंध होता तो मला पुढं टिकवून ठेवायचा आहे.”
पण या नातेसंबंधात खरे तर कोण बाधा आणत होते? टेरीची आई तिला जाचत होती का? किंवा तिच्याशी गैरवाजवी वागत होती का? नाही, ती तर ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा,’ हा बायबलचा सल्ला उंचावून धरत होती. (१ करिंथकर ७:३९) वस्तुतः, बायबल आज्ञा करते: “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४, १५) असे का बरे?
याचे एक कारण म्हणजे, एका सुखी व यशस्वी विवाहासाठी धार्मिक सुसूत्रता एक अतिमहत्त्वपूर्ण घटक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की असमान धार्मिक विश्वास असलेल्यांच्या विवाहांत सर्रासपणे आढळणाऱ्या ताण-तणावांचा शेवट बहुधा घटस्फोटात होतो. तथापि, याहीपेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे, धार्मिक विश्वासांसंबंधी तडजोड करण्यास—किंवा त्यांचा सर्वस्वी त्याग करण्यास दबावाखाली येण्याची शक्यता. ख्रिस्ती विश्वासात नसणारा एखादा विवाहसोबती तुमच्या उपासनेच्या आड येत नसला तरीही, आपले सर्वात खोलवर रुजलेले विश्वास एकसारखे नसल्याची बोचणी आयुष्यभर तुम्हाला सलत राहील. हे वैवाहिक सौख्यानंदाचे सूत्र असल्यासारखे वाटते का?
म्हणूनच, टेरीवर एक मोठा निर्णय घेण्याची वेळ आली. टेरी म्हणाली: “यहोवा देवावर माझं खूप प्रेम आहे, पण मला माझा प्रियकर गमवायचा नाही.” तथापि, दोन्ही डगरींवर हात ठेवून कसे चालेल. देवाच्या दर्जांसंबंधी तडजोड करून तुम्ही त्याच्या अनुग्रहाचा व आशीर्वादांचा उपभोग घेऊच शकत नाही.
तथापि, एखाद्या सह-ख्रिश्चनासोबतच्या तुमच्या विवाह निर्णयास देखील तुमच्या पालकांचा कदाचित विरोध असेल. ख्रिस्ती विश्वासात असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत संबंध जोडून विजोड होणे शक्य आहे का? होय, जर त्या व्यक्तीची आध्यात्मिक ध्येये अथवा देवाविषयीची भक्ती तुमच्यासारखी नसली तर असे होणे शक्य आहे. असे असल्यास किंवा मग तिच्या मंडळीतील लोक तिला “नावाजीत” नसल्यास या व्यक्तीसोबतच्या तुमच्या विवाहासंबंधी तुमच्या पालकांनी चिंताग्रस्त होणे कदाचित रास्त असू शकते.—प्रेषितांची कृत्ये १६:२.
वांशिक किंवा सांस्कृतिक भिन्नतेबाबत काय?
लिनच्या पालकांचे, आक्षेप घेण्यामागील कारण काहीसे निराळेच होते: तिला दुसऱ्या एका वंशाच्या पुरुषासोबत विवाह करायचा होता. याबाबतीत बायबल काय शिकवण देते? ते आपल्याला सांगते की, “देव पक्षपाती नाही” आणि “त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण” केली आहेत. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; १७:२६) मानवांचे उगमस्थान एकच असून देवाच्या नजरेत ते सर्व समान आहेत.
असे असताना, सर्वच वैवाहिक दांपत्यांना “संसारात हालअपेष्टा” भोगाव्या लागत असल्या तरी, आतंरवंशीय दांपत्ये कदाचित अधिक आव्हाने अनुभवतील. (१ करिंथकर ७:२८) का बरे? कारण द्वेषभावात आकंठ बुडालेल्या या जगातील अनेक लोक, वंशासंबंधी देवाचा दृष्टिकोन स्वीकारत नाहीत. काही पाश्चात्त्य देशांमध्ये आंतरवंशीय विवाह हल्ली अतिशय सर्वसामान्य झाले असले तरी, अशीही क्षेत्रे आहेत जेथे संमिश्र दांपत्यांना तीव्र स्वरूपाच्या वंशभेदांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, असले दबाव हाताळण्यास तुम्ही सुसज्जित नाहीत अशी भीती तुमच्या पालकांच्या मनात असेल.
लिन कबूल करते: “माझ्या आईबाबांना वाटलं की आम्हा दोघांना हे फारच जड जाईल.” लिनने सुज्ञपणे वागून त्यांच्या भावना विचारात घेतल्या व विवाहाचा विचार तेवढ्यापुरता तरी मनातून काढून टाकला. लिनच्या पालकांनी तिची प्रौढता निरीक्षली व ज्या पुरुषावर तिचे प्रेम होते त्याच्याशी देखील ते अधिक परिचित झाले. आणि हळूहळू, या विवाहातील दबाव ती हाताळू शकते अशी योग्य खात्री त्यांना वाटू लागली. लिन म्हणते: “एकदा का त्यांना जाणवलं की आम्ही दोघेही खरोखरच आनंदानं राहू शकतो, मग त्यांनाही आमच्याबद्दल आनंदच वाटला.”
तथापि, काहीवेळा प्रश्न वंशाचा नव्हे तर संस्कृतीचा असतो. तुमच्या पालकांच्या मनाला कदाचित अशी हुरहूर लागलेली असेल, की ज्या व्यक्तीची व तुमची जीवनशैली, अपेक्षा तसेच खाणेपिणे, संगीत व करमणुकीच्या आवडीनिवडी यांत जमीन आसमानाचा फरक आहे, अशा व्यक्तीसोबत सुखाने राहणे पुढेमागे तुम्हाला जड जाईल. काहीही असो, पण दुसऱ्या एका वंशाच्या किंवा संस्कृतीच्या व्यक्तीसोबत संसार करणे निश्चितच आव्हानात्मक आहे. त्यांना तोंड देण्यास तुम्ही खरोखरच सुसज्जित आहात का?
पालकांचा विरोध निराधार वाटतो तेव्हा
पण मग, तुमच्या पालकांचा विरोध सर्वस्वी निराधार असल्याचे तुम्हाला वाटते तेव्हा काय? फेथ नामक एक तरुणी आपल्या आईबद्दल म्हणते: “माझ्या आईचा अनेक वेळा घटस्फोट झाला आहे. तिचं असं म्हणणं आहे, की एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखणे शक्यच नाही आणि ओळख पटली तरी तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तिचं असं एक ठाम मत झालेलं आहे, की माझ्या वैवाहिक जीवनात मला कधीच सुख मिळणार नाही.” कित्येक वेळा, ज्या पालकांचा विवाह अपेशी झालेला असतो ते आपल्या मुलांच्या विवाहाकडे एका वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहू शकत नाहीत. काही प्रकरणी, आपल्या मुलांच्या विवाहास विरोध करण्यामागील पालकांचे हेतू अगदीच कपटी असतात; उदाहरणार्थ, आपल्या मुलाच्या जीवनावर ताबा ठेवण्याची इच्छा.
यावर सयुक्तिक चर्चा करण्यासाठी तुमचे पालक इच्छुक नसल्यास तुम्ही काय करावे? यहोवाच्या साक्षीदारांमध्ये, कौटुंबिक समस्या मिटविण्यास साह्य मिळावे म्हणून मंडळीतील वडिलांची मदत घेतली जाऊ शकते. कोणा एकाची कड न घेता, एका शांत, निश्चिंत व सुफल मार्गाने चर्चा करून गोष्टी हाताळण्यास ते कुटुंबीयांना साह्य करू शकतात.—याकोब ३:१८.
शांती राखणे
अर्थातच, आर्थिक प्रश्न किंवा भावी विवाहसोबत्याचे व्यक्तिमत्त्व यांसारख्या बाबी देखील तुमचा विवाहाप्रती पालकांचा विरोध पेटवू शकतात. शिवाय, सध्याच्या एड्स व लैंगिकरित्या संक्रमित होणाऱ्या इतर रोगांच्या युगात आपण जगत असल्यामुळे, एक ख्रिस्ती व्यक्ती बनण्याआधी तुमच्या भावी विवाह सोबत्याने अनैतिक जीवन व्यतीत केले असल्यास, तुमच्या पालकांनी तुमच्या आरोग्याची चिंता करणे सार्थच असू शकेल.b
तुम्ही जोपर्यंत तुमच्या पालकांच्या घरात राहता तोपर्यंत त्यांचा अधिकार मान्य करणे तुमचे कर्तव्य आहे. (कलस्सैकर ३:२०) पण तुम्ही जरी वेगळे राहात असलात व आपले निर्णय स्वतः घेण्याइतके वयाने मोठे झाला असलात तरीही, तुमच्या पालकांच्या चिंता पटकन मनातून काढून टाकण्याची घाई करू नका. ऐकून घेण्यास इच्छुक असा. (नीतिसूत्रे २३:२२) विवाह करण्याचे संभवनीय परिणाम काळजीपूर्वक तोलून पाहा.—पडताळा लूक १४:२८.
समग्र विचार केल्यावर, आईवडिलांची इच्छा नसली तरीही लग्न करण्याचा कदाचित तुम्ही निर्णय घ्याल. अर्थात, अशा निर्णयामुळे जे काही परिणाम उद्भवतील त्यांसाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार ठराल. (गलतीकर ६:५) तुमच्या पालकांचे दृष्टिकोन विचारात घेण्यात तुम्ही काहीच कसूर ठेवली नाही तर, नाखुषीने का होईना पण तुमच्या निर्णयाला पाठिंबा देण्यास ते कदाचित प्रवृत्त होतील. परंतु, ते विरोध करतच राहिले तरी तुम्ही मात्र रूष्ट न होण्याचा किंवा मनात राग न बाळगण्याचाच प्रयत्न करा. लक्षात ठेवा: तुमच्या पालकांचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्या भावी सुखाबद्दल त्यांना काळजी आहे. त्यांच्याबरोबर नेहमी शांती राखण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचा विवाह यशस्वी होत जातो तसे त्यांची मनोवृत्ती निवळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला पाहता, तुमच्या पालकांचे जे काही म्हणणे असेल ते तुम्ही विचारात घेतले आणि तुमचे स्वतःचे व तुम्ही जिच्याशी विवाह करण्यास इतके उतावीळ झाला आहात त्या व्यक्तीचे परखड विश्लेषण केल्यानंतर, कदाचित तुमच्या पालकांचे म्हणणेच बरोबर असेल या अनपेक्षित निर्णयावर तुम्ही येऊन पोहंचता तेव्हा मात्र अवाक होऊ नका.
[तळटीपा]
a या लेखातील माहिती अशा देशांतील युवकांना उद्देशून लिहिलेली आहे, जेथे एखाद्याला आपला विवाहसोबती स्वतः निवडण्याची रीत आहे.
b “एड्सग्रस्तांना साह्य करणे,” मार्च २२, १९९४ च्या सावध राहा! (इंग्रजी) अंकातील लेख पाहा
[२१ पानांवरील चित्र]
विवाह करण्यास तुम्ही फार लहान आहात असे तुमच्या पालकांना वाटेल