वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ९/८ पृ. ११-१३
  • सर्वकाळ जगण्याची आशा तुम्ही करू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्वकाळ जगण्याची आशा तुम्ही करू शकता?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘सर्वात मोठा प्रश्‍न’
  • मृत्यूचे मूळ कारण
  • शिक्षा आणि अभिवचन
  • सर्वकाळापर्यंत—आयुष्य कसे वाढवावे
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • प्रदीर्घ जीवनाची खटपट कशी यशस्वी ठरू शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • अनंतकालचे जीवन जगणे नुसते स्वप्न नव्हे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ९/८ पृ. ११-१३

सर्वकाळ जगण्याची आशा तुम्ही करू शकता?

“मानवाची ११५ ते १२० वर्षांची कमाल आयुर्मर्यादा ठरण्यासाठी मानवी शरीरात काही घडत असतं,” असे डॉ. जेम्स आर. स्मिथ हे पेशी जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणतात. “मर्यादा आहे खरी—पण ती कशामुळे ठरवली जाते त्याची आम्हाला काहीच कल्पना नाही.” जीवशास्त्रज्ञ डॉ. रॉजर गॉस्डन म्हणतात की, म्हणूनच “शास्त्रज्ञ अद्याप समाप्तीची रेषा पुढे ढकलू शकलेले नाहीत आणि कोणी असे करण्याचा विचारही करत नाही.” हे बदलू शकते का?

‘सर्वात मोठा प्रश्‍न’

म्हातारपणावर उपाय निघण्याची आशा देणारे बरेच सिद्धान्त असले, तरीही बहुतेक तज्ज्ञ, अमेरिकेच्या गेरोंटोलॉजिकल संस्थेचे अध्यक्ष डॉ. जीन डी. कोहन यांच्याशी सहमत आहेत की, “या सगळ्या चमत्कारिक गोळ्या फुसक्या निघाल्या आहेत.” का? यु.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यातील विज्ञान लेखिका नॅन्सी शूट म्हणतात की, एक कारण म्हणजे, “म्हातारपणाचे आणि त्यामुळे घडणाऱ्‍या अनिवार्य मृत्यूचे मूळ काय आहे हे अद्याप कोणालाही ठाऊक नाही. आणि हे माहीत नसताना आजारावर उपाय करणे म्हणजे निरर्थक आहे.” डॉ. गॉस्डनसुद्धा असे म्हणतात की, म्हातारपण हे एक गूढ आहे: “आपल्या प्रत्येकात ते दिसून येतं पण तरीही त्यामागचं कारण अजूनही रहस्यमय आहे.” ते म्हणतात की, “ते का घडतं या सर्वात मोठ्या प्रश्‍नाकडे” दुर्लक्ष केले जात आहे.a

किती जोराने पळावे, केवढी उंच उडी टाकावी आणि पाण्यात किती खोलवर सूर मारावा यावर मानवांना मर्यादा असते त्याचप्रमाणे केवळ मानवी विचारक्षमता आणि कारणमीमांसा यांद्वारे किती स्पष्टीकरण देता येते यावरही मर्यादा असते. आणि ‘का, या सर्वात मोठ्या प्रश्‍नाचे उत्तर देणे स्पष्टतः त्या मर्यादेपलीकडचे आहे. म्हणून, असहाय मानवी ज्ञानाच्या मर्यादांपेक्षा श्रेष्ठ उगमाकडे वळणे हाच उत्तर मिळवण्याचा एकमेव मार्ग उरला आहे. आणि सुज्ञतेचे एक प्राचीन पुस्तक अर्थात बायबल अगदी हेच करण्याचा सल्ला देते. निर्मात्याविषयी, जीवनाच्या झऱ्‍याविषयी,’ बायबल अशी खात्री देते: “तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल.” (स्तोत्र ३६:९; २ इतिहास १५:२) तर मग, देवाच्या वचनाचे अर्थात बायबलचे परीक्षण केल्यावर मनुष्य का मरतो याच्या खऱ्‍या कारणाविषयी काय प्रकट होते?

मृत्यूचे मूळ कारण

बायबल आपल्याला सांगते की, देवाने प्रथम मानवांना निर्माण केले तेव्हा “त्याने मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली.” (उपदेशक ३:११) तथापि, निर्मात्याने मानवाच्या पहिल्या पालकांना सर्वकाळ जगण्याची इच्छा तेवढीच दिली नाही; तर त्याने त्यांना सर्वकाळ जगण्याची संधीही देऊ केली. त्यांना निर्माण करतेवेळी परिपूर्ण शरीर आणि मन दिले होते आणि शांतिमय वातावरणात राहायलासुद्धा दिले होते. या पहिल्या मानवांनी सर्वकाळ जगावे आणि कालांतराने आपल्या परिपूर्ण संततीने ही पृथ्वी व्यापून टाकावी हा निर्मात्याचा उद्देश होता.—उत्पत्ति १:२८; २:१५.

तथापि, समाप्तीची रेषा नसलेल्या जीवनाला अट होती. देवाला आज्ञाधारक राहण्यावर ते अवलंबून होते. आदामाने देवाची अवज्ञा केल्यास तो ‘खचित मरणार’ होता. (उत्पत्ति २:१६, १७, पं.र.भा.) खेदाची गोष्ट म्हणजे, पहिल्या मानवांनी अवज्ञा केली. (उत्पत्ति ३:१-६) असे केल्यामुळे ते पापी झाले कारण “पाप स्वैराचार आहे.” (१ योहान ३:४) परिणामस्वरूप, अनंतकालिक जीवनाची प्रत्याशा त्यांच्याकरता राहिली नाही, कारण “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) या कारणास्तव, पहिल्या मानवांना शिक्षा सुनावताना देव म्हणाला: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”—उत्पत्ति ३:१९.

अशाप्रकारे, पहिल्या मानवांनी पाप केल्यानंतर, पूर्वीच भाकीत केलेल्या पापाचा परिणाम त्यांच्या जनुकांमध्ये रुजला गेला आणि शर्यतीच्या समाप्तीची रेषा ओढण्यात आली. यामुळे, ते म्हातारे होऊ लागले आणि त्याचा परिणाम मृत्यू होता. शिवाय, एदेन नावाच्या बागेसमान मूळ घरातून हाकलून दिल्यावर पहिल्या मानवांच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारी आणखी एक गोष्ट त्यांच्यासमोर होती—एदेनबाहेरील अडथळ्यासमान वातावरण. (उत्पत्ति ३:१६-१९; २३, २४) तर अशाप्रकारे, सदोष वारसा आणि खडतर वातावरण या दोहोंचा परिणाम पहिल्या मानवांवर आणि त्यांच्या संततीवरही झाला.

शिक्षा आणि अभिवचन

पहिल्या मानवांना मुले होण्याआधी त्यांच्यामध्ये हे हानीकारक बदल झाल्यामुळे त्यांनी स्वतःसारख्याच—अपरिपूर्ण, पापी आणि वृद्ध होणाऱ्‍या—संततीला जन्म दिला. “सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले,” असे बायबल म्हणते. (रोमकर ५:१२; पडताळा स्तोत्र ५१:५.) “आपल्या पेशींच्या रचनेत आपण स्वतःच्याच मृत्यूचे वॉरंट घेऊन फिरत असतो,” असे शरीराचे यंत्र—तुमच्या आरोग्याच्या संदर्भात (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते.

परंतु, समाप्तीची रेषा नसलेल्या—म्हातारपण आणि मृत्यू नसलेल्या—जीवनाची आता कोणतीही आशा राहिली नाही असा याचा अर्थ होत नाही. सर्वप्रथम, मानवी जीवनाचा आणि विविध अद्‌भुत जीवांचा सर्वात बुद्धिमान निर्माता जनुकांमधील कोणताही दोष काढू शकतो आणि मानव सर्वकाळ जिवंत राहावेत म्हणून शक्‍ती देऊ शकतो असा विश्‍वास करणे उचित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, निर्मात्याने अगदी हेच करण्याचे वचन दिले आहे. पहिल्या मानवांना मृत्यूची शिक्षा सुनावल्यानंतर देवाने कित्येकदा हे प्रकट केले की, पृथ्वीवर मानवांनी सर्वकाळ राहावे हा त्याचा उद्देश काही बदललेला नव्हता. उदाहरणार्थ, तो असे आश्‍वासन देतो: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) या अभिवचनाची पूर्णता अनुभवण्याकरता तुम्हाला काय करण्याची गरज आहे?

सर्वकाळापर्यंत—आयुष्य कसे वाढवावे

मनोवेधक गोष्ट म्हणजे, रोनल्ड कोट्युलक या विज्ञान लेखकाने ३०० हून अधिक वैद्यकीय संशोधकांची मुलाखत घेतल्यावर असे म्हटले: “मिळकत, व्यवसाय आणि शिक्षण हे लोकांच्या आरोग्याबद्दल आणि ते किती काळ जगतील याबद्दल भाकीत करणारे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत हे वैज्ञानिकांना फार वर्षांपूर्वी ठाऊक होते. . . . परंतु माणूस किती काळ जगू शकेल याचे भाकीत करणारा सर्वात महत्त्वाचा घटक शिक्षण होत आहे.” त्यांनी असे स्पष्टीकरण दिले: “आपल्या आहारातून जिवाला धोकेदायक असलेल्या संसर्गी जंतूंविरुद्ध लढा देण्याची ताकद आपल्या प्रतिकारकशक्‍तीला मिळते त्याचप्रमाणे शिक्षण हानीकारक निवडींपासून आपले रक्षण करते.” एका संशोधकाने म्हटल्याप्रमाणे, “शिक्षणामुळे जीवनाचा प्रवास करायला” त्याचप्रमाणे “संभाव्य अडथळ्यांवर मात” करायला माणूस शिकतो. म्हणून, एका अर्थी, लेखक कोट्युलक म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण हे “सुदृढ, दीर्घायुषी जीवनामागील रहस्य” आहे.

भवितव्यातील सार्वकालिक जीवन साध्य करण्याचे पहिले पाऊल देखील शिक्षणच आहे—बायबलबद्दलचे शिक्षण. येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे [“ज्ञान घ्यावे”].” (योहान १७:३) निर्माता यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि देवाने केलेल्या खंडणी व्यवस्थेबद्दल ज्ञान घेणे हाच एकमेव शिक्षणाचा प्रकार आहे ज्याकरवी एक व्यक्‍ती सार्वकालिक जीवन मिळवण्याच्या मार्गावरील पहिले पाऊल उचलण्यास तयार होईल.—मत्तय २०:२८; योहान ३:१६.

यहोवाचे साक्षीदार बायबल शिक्षणाचा एक कार्यक्रम चालवतात ज्याकरवी तुम्हाला हे जीवनदायी बायबलचे ज्ञान संपादन करण्यास मदत मिळेल. या मोफत कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या राज्य सभागृहाला भेट द्या किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला भेट द्यायला त्यांना सांगा. जीवनात अडथळे असणार नाहीत आणि समाप्ती रेषेची मर्यादा राहणार नाही तो काळ फार जवळ आहे याचा भक्कम पुरावा बायबलमध्ये आहे हे तुम्हाला दिसून येईल. हे खरे की, मृत्यूने शतकानुशतके राज्य केले आहे परंतु लवकरच त्याचा कायमचा पराजय होईल. अबालवृद्धांसाठी ही केवढी थरारक प्रत्याशा!

[तळटीपा]

a गेरोंटोलॉजिस्ट्‌स यांनी म्हातारपण कसे येत असावे त्याचे वर्णन देणारे विविध सिद्धान्त (३०० हून अधिक!) तयार केले आहेत. परंतु, म्हातारपण का येते याचे स्पष्टीकरण हे सिद्धान्त देत नाहीत.

[१३ पानांवरील चित्रं]

सार्वकालिक जीवन साध्य करण्याचे पहिले पाऊल आहे बायबलबद्दल शिक्षण

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा