तरुण लोक विचारतात . . .
रोल-प्लेइंग गेम्स खेळण्यात काही धोका?
“सगळं काही काल्पनिक असतं. एकदा आपण जादूगार बनतो तर दुसऱ्या वेळी योद्धा. आपल्याला वाटेल ते बनता येतं. वाटेल ते म्हणजे अगदी काहीपण.”—ख्रिस्टॉफ.
“जे काही होता येत नाही ते सर्व व्हा.” एका पत्रिकेने एका लोकप्रिय काल्पनिक खेळाचे वर्णन वरीलप्रमाणे केले. लाखो युवकांना सगळे काही विसरून रोल-प्लेइंग गेम्सच्या काल्पनिक विश्वात जाण्याचे प्रचंड आकर्षण आहे. परंतु, हे रोल-प्लेइंग गेम्स नेमके आहेत तरी काय?
झॉई द रोल (वेगवेगळ्या भूमिकांचे खेळ) या पुस्तकानुसार, “प्रत्येक खेळाडू, विशिष्ट हेतूने किंवा कशाच्या तरी शोधात निघालेल्या कल्पित पात्राची भूमिका स्वीकारतो आणि मग काल्पनिक विश्वात त्याचा साहसपूर्ण प्रवास सुरू होतो.” तो विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव, पैसा, हत्यारे किंवा जादूची शक्ती मिळवून या कल्पित पात्राची भूमिका वठवून कहाणी पूर्ण करायची असते.
सन १९७० च्या दशकात, डंजन्स ॲण्ड ड्रॅगन्स या खेळाद्वारे रोल-प्लेइंग गेम्स अधिक लोकप्रिय झाले.a तेव्हापासून, हे खेळ कोट्यवधी डॉलर्सचा उद्योग बनले आहेत; यामध्ये बोर्ड गेम्स, ट्रेड कार्ड, इंटरॲक्टिव्ह पुस्तके, कम्प्युटर गेम्स त्याचप्रमाणे प्रत्यक्षात या साहसी दृश्यांमध्ये भाग घेण्याचे लाईव्ह ॲक्शन गेम्ससुद्धा असतात. असे दिसते की, संयुक्त संस्थानांत नियमितपणे खेळणारे ६० लाखांहून अधिक तरुण आहेत तर युरोपमध्ये हे खेळ खेळणारे लाखो लाख तरुण आहेत. फ्रान्सच्या अनेक उच्च माध्यमिक शाळांमध्ये रोल-प्लेइंग गेम्सकरता क्लब्स आहेत; जपानमध्ये तर हा सर्वात लोकप्रिय असलेला व्हिडिओ गेम्सचा प्रकार आहे.
समर्थकांचे म्हणणे आहे की, हे खेळ कल्पनाशक्तीला प्रेरणा देणारे, समस्या सोडवण्याची कुशलता वाढवणारे आणि देवाण-घेवाण करण्यास उत्तेजन देणारे आहेत. तथापि, विरोधकांचे मात्र असे म्हणणे आहे की या खेळांचा संबंध आत्महत्या, खून, बलात्कार, कबरा उकरणे आणि सैतानवाद यांच्याशी आहे. माद्रिद, स्पेन येथे रोल-प्लेइंग गेम्सच्या एका दृश्यात दोन तरुणांनी ५२ वर्षांच्या एका माणसाला ठार मारले या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली. जपानमध्ये, अशाच एका खेळाच्या शेवटी एका किशोरवयीनाने आपल्या पालकांचा खून केला आणि स्वतःचे मनगट कापले. अर्थात, हे अपवाद आहेत—बहुतेक खेळाडू बुद्धिमान आणि मनमिळाऊ असतात. तरीही, तरुण ख्रिश्चनांनी स्वतःला हा प्रश्न विचारणे उचित ठरेल, ‘रोल-प्लेइंग गेम्स माझ्याकरता आहेत का? त्यांच्याबाबत सावधानगिरी बाळगण्याची काही गरज आहे का?’
हिंसा आणि जादूटोणा
रोल-प्लेइंग गेम्स विविध स्वरूपाचे आणि प्रकारचे आहेत. सर्वच नाही तरी बऱ्याच गेम्समध्ये हिंसा असते. किंबहुना, या गेम्समध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या काल्पनिक विश्वांत विजयी होण्यासाठी—किंवा वाचण्यासाठी हिंसा करावीच लागते. तर मग, हे खेळ बायबलमधील सल्ल्याशी कसे जुळू शकतात? नीतिसूत्रे ३:३१ म्हणते: “जुलूम करणाऱ्याशी स्पर्धा करू नको. त्याची कोणतीहि रीत स्वीकारू नको.” बायबल आपल्याला हिंसेसाठी नव्हे, तर ‘शांतीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा’ असेही सांगते.—१ पेत्र ३:११.
अनेक खेळांमध्ये जादूवर जास्त भर दिला जातो ही देखील चिंतेची एक बाब आहे. बहुतेकवेळा, खेळाडू जादूटोणा करणारे किंवा जादूगार बनू शकतात. अशा वेळी, जादूटोणाद्वारे अडथळ्यांवर किंवा शत्रूंवर मात करण्यात येते. अहवालानुसार, एका लोकप्रिय खेळात, “आद्य देवदूत किंवा दृष्टात्मिक राजकुमारांच्या भूमिकांसाठी खेळाडूंना देवदूत किंवा दुष्टात्म्यांचेही रूप धारण करता येते . . . शिवाय, पवित्र गोष्टींची विटंबना केली जात असल्यामुळे मुलांना ते मनोरंजक वाटते.” एका कम्प्युटर खेळामध्ये तर “सैतान” हा शब्द फक्त टाईप केल्यावर खेळाडू सर्वशक्तिमान बनतो.
काही ख्रिस्ती युवकांनी अशी कारणमीमांसा केली आहे की, रोल-प्लेइंग गेम्स खेळण्यात काही गैर नाही फक्त त्यांमध्ये जास्त वेळ खर्च करू नये. “तो फक्त खेळ आहे,” असे एक युवक म्हणाला. कदाचित असेल. पण देवाने इस्राएली लोकांना जादूटोणामध्ये कोणत्याही प्रकारे भाग घेऊ नये अशी ताकीद दिली होती. मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात असे स्पष्ट म्हटले होते की, “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछूं करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा [असा जो कोणी आहे त्याचा] परमेश्वराला वीट आहे.”—अनुवाद १८:१०-१२.
तर मग, जादूटोणाचे समर्थन करणारा कोणताही खेळ खेळणे सुज्ञपणाचे असेल का? जादूची शक्ती असलेल्यांची भूमिका घेणे म्हणजे ‘सैतानाच्या गहन गोष्टी’ माहीत करून घेण्यासारखे होणार नाही का? (प्रकटीकरण २:२४) एक तरुण म्हणतो: “मी एकदा दिवसभर रोल-प्लेइंग गेम खेळलो, त्यानंतर मला घराबाहेर जायला भीती वाटू लागली. कुणीतरी माझ्यावर हल्ला करील असं मला वाटत होतं.” मनात अशी भीती निर्माण करणारी कोणतीही गोष्ट हितकर असू शकते का?
इतर कारणे
“काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” असे १ करिंथकर ७:२९ म्हणते. रोल-प्लेइंग गेम्समध्ये जाणारा वेळ ही आणखी एक मोठ्या चिंतेची बाब आहे. यांतील काही खेळांसाठी कित्येक तास, दिवस किंवा आठवडेही लागतात. एवढेच नव्हे तर, काहीवेळा एखाद्या व्यक्तीला एखादी भूमिका इतकी आवडू लागेल किंवा तिचे असे व्यसन लागेल की, बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम महत्त्वाच्या वाटू लागतील. “एक राऊंड पूर्ण झाला की पुढचा राऊंड आणखी कठीण असावा आणि जास्त वास्तविक वाटावा असं मला वाटायचं,” असे एक तरुण कबूल करतो. “मला या खेळाचं व्यसनच लागलं होतं.” अशा व्यसनाचा शालेय अभ्यासांवर आणि आध्यात्मिक कार्यहालचालींवर कसा परिणाम पडत असावा?—इफिसकर ५:१५-१७.
जपानमधील एक तरुण आठवून सांगतो: “पुढच्या वेळी कसं खेळायचं हाच विचार मी करत बसायचो. शाळेत आणि सभांमध्येसुद्धा खेळाचाच विचार. खेळाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तर मी एकदमच मागे पडलो होतो.” लेखाच्या सुरवातीला उल्लेखिलेला ख्रिस्टॉफ सांगतो की, तो “भलत्याच धुंदीत असायचा; जणू या जगातच नव्हता.” ‘हसण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो’ हे खरे, पण आध्यात्मिक कार्यहालचालींसाठी काहीच जागा उरणार नाही असे मनोरंजन करावे का?—उपदेशक ३:४.
शिवाय, हा खेळ कोणत्या प्रवृत्तीला चालना देतो त्याचाही विचार करा. फ्रान्समधील एका पत्रिकेने रोल-प्लेइंग गेम्सचे या शब्दांमध्ये वर्णन केले: “रक्त गोठवणारे आणि जगाविषयी तुमची संकल्पनाच बदलून टाकणारे खालच्या दर्जेचे, अहितकर आणि विकृत अनुभवांचे भरमसाट मनोरंजन.” अशी ही प्रवृत्ती, “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे” असावे या बायबलमधील सल्ल्याच्या सुसंगतेत आहे का? (१ करिंथकर १४:२०) शेवटी, ख्रिस्टॉफने हा निष्कर्ष काढला की, तो जे खेळ खेळत होता ते “ख्रिस्ती नीतिमूल्यांच्या एकवाक्यतेत नव्हते.” तो पुढे म्हणतो: “एकीकडे प्रचार करायचा, सभांना जायचं आणि ख्रिस्ती प्रेम वगैरेंसारख्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आणि दुसरीकडे ख्रिस्ती धर्माला मुळीच शोभत नसलेली भूमिका वठवायची? माझ्या तर्काला हे पटतच नव्हतं.”
भ्रम की वास्तविकता?
पुष्कळसे युवक वास्तविकतेपासून पळ काढण्यासाठी या खेळांकडे आकर्षित होतात. परंतु, काल्पनिक विश्वात बुडून जाणे हितकर आहे का? फ्रेंच समाजशास्त्रज्ञ लोरॉन ट्रेमेल असे म्हणतात: “या काल्पनिक विश्वाच्या सर्व नियमांमध्ये निपुण होता येते आणि तेथे स्वतःची खरी भूमिका किंवा आवडेल ती भूमिका करता येते. पण, अनिश्चिततेचे वर्चस्व असलेले खरे विश्व . . . हुबेहूब दिसणाऱ्या परंतु फार वास्तविक भासणाऱ्या या विश्वांपेक्षा एकदम भिन्न आहे.” मानसिक आरोग्य तज्ज्ञ एटी बुझिन पुढे असे म्हणतात: “खेळताना, युवकांना वाटते की ते धोक्यांचा सामना करत आहेत, ते जग बदलत आहेत पण वास्तविक पाहता, खरोखरच्या जीवनातील धोक्यांचा ते सामना करत नसतात. ते समाज आणि समाजाच्या मर्यादांपासून पळ काढत असतात.”
पण या पळ काढण्याच्या वृत्तीमुळे सरतेशेवटी निराशाच हाती लागते, कारण खेळानंतर जीवनातल्या वास्तविकता अनुभवायला मिळतात. या वास्तविकतांपासून पळ काढता येत नाही. सत्य हे आहे की, काल्पनिक भूमिकेत माणूस कितीही यशस्वी असला किंवा धाडसी असला तरी वास्तविक जीवनातले अपयश भरून काढता येत नाही किंवा सामान्यपणा बदलता येत नाही. जीवनातल्या वास्तविकतांना समोरासमोर तोंड देणे यातच खरी बहादुरी आहे. वास्तविक जीवनातल्या परिस्थितींचा सामना करून तुमच्या समजशक्तीला उजाळा द्या. (इब्री लोकांस ५:१४) समस्यांचा सामना करण्यासाठी मदतदायी ठरणारे आध्यात्मिक गुण विकसित करा. (गलतीकर ५:२२, २३) असे करणे, कोणताही खेळ खेळण्यापेक्षा खूप समाधानकारक आणि फलदायी आहे.
याचा अर्थ, रोल-प्लेइंगचे सर्वच खेळ हानीकारक आहेत असे नाही. बायबल काळातल्या लहान मुलांच्या खेळांमध्येही थोडीफार काल्पनिकता आणि भूमिका वठवणे सामील होते; हे स्वतः येशूने पाहिले होते. (लूक ७:३२) येशूने हानीकारक नसलेल्या मनोरंजनाची कधीच टीका केली नाही. तथापि, आपल्या पालकांसोबत ख्रिस्ती युवकांनी “प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत” राहावे. (इफिसकर ५:१०) एखादा खेळ निवडताना स्वतःला विचारा, ‘यामध्ये “देहाची कर्मे” दिसून येतात का? यामुळे देवासोबतच्या माझ्या नातेसंबंधात काही अडथळा येईल का?’ (गलतीकर ५:१९-२१) हा सर्व साधकबाधक विचार केल्यावर, रोल-प्लेइंग गेम्सविषयी तुम्हाला सुज्ञपणाने निर्णय घेता येईल.
[तळटीपा]
a पाहा सावध राहा! (इंग्रजी) मार्च २२, १९८२, पृष्ठे २६-७.
[१५ पानांवरील चित्रं]
काही रोल-प्लेइंग गेम्स कोणत्या प्रवृत्तीला चालना देतात?