वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ९/८ पृ. ५-११
  • दीर्घायुषी आणि निरोगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दीर्घायुषी आणि निरोगी
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अडथळे ओळखणे
  • ट्रॅक रेकॉर्डवर परिणाम करणाऱ्‍या सवयी
  • वातावरणामुळे फरक पडतो
  • उपलब्ध—स्वस्त पण अत्यंत गुणकारक वैद्यकीय निगा
  • क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा
    सावध राहा!—१९९९
  • विजय आणि दुर्दशा
    सावध राहा!—१९९८
  • जागतिक उपाय—शक्य आहे का?
    सावध राहा!—१९९८
  • युद्धाच्या बरोबरीचा जीवघेणा हल्ला
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ९/८ पृ. ५-११

दीर्घायुषी आणि निरोगी

कल्पना करा: आपले आयुष्य अडथळ्यांची एक लांब शर्यत आहे—अडथळ्यांवरून उड्या मारून पळण्याची शर्यत. सर्व धावपटू एकाच वेळी शर्यत सुरू करतात; पण उड्या मारताना अडथळ्यांवर अडखळून धावपटूंचा वेग कमी होतो आणि पुष्कळजण मधल्या मध्येच कोसळतात. शर्यत सोडून देतात.

अशाचप्रकारे, मानवी जीवनाची एक सुरवात असते आणि मार्गात उंचच उंच अडथळे असतात. आपल्या जीवनात माणसाला एका मागोमाग एक अडथळे पार करावे लागतात. अडथळे पार करता करता त्याची शक्‍ती देखील कमी होत जाते आणि शेवटी तो शर्यत सोडून देतो. जितके उंच अडथळे तितक्याच लवकर तो खाली पडतो किंवा मरतो. विकसित देशांमध्ये, ७५ वर्षांच्या आसपास माणूस कोसळतो. या कालावधीला मानवाची सरासरी आयुर्मर्यादा म्हणतात—बहुतेक धावपटू जितके अंतर पार करतात त्याच्या तुलनेत.a (पडताळा स्तोत्र ९०:१०.) परंतु काही लोक शर्यतीत जास्त काळापर्यंत टिकून राहतात आणि काही मोजके लोक तर जिला कमाल मानवी आयुर्मर्यादा म्हटले जाते तीसुद्धा अर्थात ११५ ते १२० वर्षे गाठतात—अशी ठळक बातम्यांमध्ये झळकणारी घटना क्वचितच घडते.

अडथळे ओळखणे

या शतकाच्या सुरवातीपेक्षा आता लोक जवळजवळ दुप्पट वर्षे या शर्यतीत टिकून राहू शकतात. का? कारण आयुष्याच्या शर्यतीतल्या अडथळ्यांची उंची मनुष्य कमी करू शकला आहे. पण हे अडथळे आहेत तरी काय? त्यांची उंची आणखी कमी करता येऊ शकते का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) एका आरोग्य तज्ज्ञाने म्हटले की, मानवाच्या जीवनावर परिणाम करणारे काही मुख्य अडथळे किंवा घटक म्हणजे सवयी, वातावरण आणि वैद्यकीय निगा.b यास्तव, सवयी, वातावरण आणि वैद्यकीय निगा जितकी उत्तम तितकेच लहान अडथळे असतात आणि आयुष्य दीर्घ असते. लोकांच्या परिस्थिती अगदीच भिन्‍न असल्या तरी जवळजवळ प्रत्येकजण—सिडनीतल्या बँक व्यस्थापकापासून साऊ पाऊलु येथील रस्त्यावरील विक्रेत्यापर्यंत प्रत्येकजण—आपल्या जीवनातले अडथळे कमी करण्यासाठी निश्‍चितच काही तरी करू शकतो. कसे?

ट्रॅक रेकॉर्डवर परिणाम करणाऱ्‍या सवयी

“उत्तम आरोग्य सवयी असलेले लोक फक्‍त जास्त जगतात एवढेच नव्हे, तर त्यांना लवकर असमर्थता येत नाही आणि आलीच तर तुलनात्मकपणे अगदी शेवटी शेवटी येते,” असे वृत्त द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन देते. तर खाण्याच्या, पिण्याच्या, झोपण्याच्या, धूम्रपानाच्या आणि व्यायामाच्या सवयी बदलल्याने पहिला अडथळा कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ, व्यायामाच्या सवयी पाहा.

शारीरिक व्यायामाच्या सवयी. सर्वसाधारण प्रकारच्या शारीरिक व्यायामाने पुष्कळ फायदा होऊ शकतो. (“व्यायाम—किती आणि कोणत्या प्रकारचा?” ही पेटी पाहा.) अभ्यासांवरून हे स्पष्ट झाले आहे की, घरातच साधेसोपे व्यायाम केल्याने वय झालेल्यांची त्याचप्रमाणे ‘वृद्धांमधील वृद्धांचीही’ शक्‍ती आणि उत्साह वाढायला मदत होते. उदाहरणार्थ, ७२ ते ९८ वर्षांच्या वृद्धांच्या वयोगटातील एका गटाला असे आढळले की, फक्‍त दहा आठवडे वेट लिफ्टींगचे काही व्यायाम केल्याने त्यांना भरभर चालता येत होते आणि अधिक सहजपणे पायऱ्‍या चढता येत होत्या. यात आश्‍चर्याचे काहीच नाही! कारण व्यायामानंतर परीक्षण केल्यावर, त्या लोकांचे स्नायू दुपटीने बळकट झाल्याचे निदर्शनास आले. जास्तकरून बैठी जीवनशैली जगणाऱ्‍या आणि ७० वर्षांपर्यंतच्या स्त्रियांचा आणखी एक गट आठवड्यातून दोनदा व्यायाम करत होता. एका वर्षानंतर, त्यांचे स्नायू त्याचप्रमाणे शक्‍ती, तोल आणि हाडांची घनता वाढली होती. “सुरवातीला आम्हाला वाटलं की, संधिबंध, कंडरा आणि स्नायूंना बरेच नुकसान पोहंचेल,” असे फिजिओलॉजिस्ट मिरियम नेल्सन म्हणाल्या ज्यांनी हे अभ्यास घेतले होते. “पण परिणाम उलटच दिसला, सगळेजण जास्त बळकट आणि सुदृढ झाले.”

म्हातारपण आणि व्यायाम यांसंबंधी घेतलेल्या कित्येक वैज्ञानिक अभ्यासांच्या परिणामांबद्दल एका पाठ्यपुस्तकात सारांशात असे म्हटले होते: “व्यायामाने म्हातारपणाची क्रिया मंदावते, आयुष्य वाढते आणि बहुतेक वेळा मृत्यूआधी जी असहाय स्थिती होते तिचा कालावधी देखील कमी होतो.”

मानसिक व्यायामाच्या सवयी. “एखादी गोष्ट वापरली नाही तर ती बिघडते” असे म्हणतात; आणि हे फक्‍त स्नायूंच्या बाबतीतच नव्हे तर बौद्धिक क्षमतेला देखील लागू होते. म्हातारपणात लोक थोड्याफार प्रमाणात विसराळू होत असले, तरी अमेरिकेच्या म्हातारपण राष्ट्रीय संस्थेने घेतलेल्या अभ्यासांवरून हे दिसून येते की, वय झालेल्या व्यक्‍तीचा मेंदू देखील म्हातारपणाच्या परिणामांना तोंड देण्याइतका लवचीक असतो. यास्तव, न्यूरोलॉजीचे प्राध्यापक, डॉ. अन्टोनियो आर. दामास्यो असा निष्कर्ष काढतात की, “वयोवृद्ध लोक फार अर्थपूर्ण आणि सुदृढ मानसिक जीवन जगू शकतात.” हे म्हातारे मेंदू लवचीक राहतात कसे?

मेंदूत १०,००० कोटी पेशी किंवा न्यूरॉन असतात आणि त्यांच्यामध्ये लाखो करोडो संयोग असतात. हे संयोग टेलिफोनच्या लाईनींप्रमाणे कार्य करतात ज्यामुळे न्यूरॉन्समध्ये “संवाद” चालू शकतो; परिणामस्वरूप, स्मरणशक्‍ती आणि अशा इतर अनेक गोष्टी निर्माण होतात. मेंदू म्हातारा होऊ लागतो तसे न्यूरॉन मरतात. (“नवीन दृष्टिकोनातून मेंदूतल्या पेशींवर एक नजर” ही पेटी पाहा.) तरीही, म्हातारे मेंदू न्यूरॉनचे नुकसान भरून काढू शकतात. एखादा न्यूरॉन निकामी होतो तेव्हा आजूबाजूचे न्यूरॉन लागलीच इतर न्यूरॉन्ससोबत नवीन संयोग जोडतात आणि अशाप्रकारे मेलेल्या न्यूरॉनची जबाबदारी उचलतात. अशातऱ्‍हेने, मेंदू अक्षरशः एका भागाच्या विशिष्ट कामाची जबाबदारी दुसऱ्‍या भागाला देत असतो. यास्तव, पुष्कळ वृद्ध लोक तरुणांसारखीच मानसिक कार्ये करतात. फक्‍त त्यासाठी मेंदूच्या वेगळ्या भागांचा उपयोग करतात. काही बाबतींमध्ये म्हातारा मेंदू, एका वृद्ध टेनिस खेळाडूसारखाच काम करतो; तरुण खेळाडूंना येत नसलेल्या युक्‍त्‌या वापरून तो वेगाची भरपाई करतो. तथापि, आपल्याहून तरुण असलेल्यांपेक्षा वेगळी तंत्रे उपयोगात आणूनही या ज्येष्ठ खेळाडूचा स्कोर जास्त असतो.

आपला स्कोर टिकवून ठेवण्यासाठी वृद्ध लोक काय करू शकतात? ७० आणि ८० वर्षांच्या वयोगटातील १,००० हून अधिक लोकांचा अभ्यास केल्यावर गेरोंटोलॉजीचे संशोधक डॉ. मॅरीलिन अल्बर्ट यांना असे आढळून आले की, कोणते वृद्ध लोक आपल्या बौद्धिक क्षमता टिकवून ठेवू शकतात ते ठरवणारा एक घटक आहे मानसिक व्यायाम. (“मन लवचीक ठेवणे” ही पेटी पाहा.) मानसिक व्यायामाने मेंदूच्या ‘टेलिफोन लाईन्स’ क्रियाशील राहतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, तज्ज्ञांच्या मते, “लोक निवृत्त झाल्यावर आरामात जीवन घालवण्याचा विचार करतात आणि जगात काय चाललंय हे जाणून घेण्याची इच्छा दाखवत नाहीत तेव्हा बौद्धिक क्षमतेचा ऱ्‍हास होऊ लागतो.”—मेंदूच्या आत (इंग्रजी).

त्यामुळे गेरोंटोलॉजिस्ट डॉ. जॅक रो म्हणतात की, “आपल्या नियंत्रणात किंवा हातात असलेल्या गोष्टींमुळे यशस्वी वृद्धापकाळाची शक्यता वाढते” ही आनंदाची गोष्ट आहे. शिवाय, चांगल्या सवयी लावायला अद्यापही उशीर झालेला नाही. एक संशोधक असे म्हणतात की, “बहुतेक आयुष्यात आरोग्य सवयी चांगल्या नसल्या आणि नंतरच्या वर्षांमध्ये त्या बदलल्या तरीही आरोग्यदायी जीवनशैलीचे थोडेफार फायदे तर मिळायलाच हवेत.”

वातावरणामुळे फरक पडतो

आज लंडनमध्ये जन्माला आलेल्या मुलीला जर मध्य युगातल्या लंडनमध्ये पाठवले तर तिची अपेक्षित आयुर्मर्यादा आज आहे त्यापेक्षा निम्म्याहून कमी असेल. हा फरक, शारीरिक अवस्थेत अचानक बदल झाल्यामुळे नव्हे तर वातावरण आणि वैद्यकीय निगा या दोन अडथळ्यांच्या उंचीत अचानक बदल झाल्याने होईल. सर्वप्रथम, वातावरणाचा विचार करा.

भौतिक वातावरण. गतकाळात, मानवाचे भौतिक वातावरण—उदाहरणार्थ, त्याचे घर—फार मोठा आरोग्य धोका होता. परंतु, अलीकडील दशकांमध्ये भौतिक वातावरणामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यात आले आहेत. सांडपाण्याची योग्य सोय, पिण्याचे शुद्ध पाणी आणि घरामध्ये कीटकांचे कमी प्रमाण यांमुळे मानवाचे वातावरण आणि त्याची प्रकृती सुधारली आहे व त्याचे आयुष्य वाढले आहे. परिणामस्वरूप, जगाच्या अनेक भागांमध्ये आज मनुष्य आयुष्याच्या शर्यतीत जास्त काळ टिकून राहू शकतो.c तथापि, घरात फक्‍त पाणी पुरवठ्याची उत्तम सोय केल्याने हा अडथळा कमी होत नाही. त्यासाठी चांगले सामाजिक आणि धार्मिक वातावरण ठेवणेही जरूरीचे आहे.

सामाजिक वातावरण. तुमचे सामाजिक वातावरण लोकांमुळे तयार झालेले असते—तुम्ही ज्यांच्यासोबत राहता, काम करता, जेवता, धार्मिक कार्यांत सहभागी होता आणि खेळता त्या लोकांमुळे. शुद्ध पाण्याचा पुरवठा असल्याने शारीरिक वातावरण सुधारते त्याचप्रमाणे सामाजिक वातावरण इष्ट सोबत्यांमुळे सुधारते—हा झाला एक महत्त्वाचा घटक. आपल्या सुखादुःखात, आशा-निराशांमध्ये इतरांनाही सामील केल्याने वातावरणीय अडथळा कमी केला जातो आणि त्यामुळे अधिक काळापर्यंत टिकून राहायला मदत मिळते.

पण याच्या उलटही घडू शकते. सहवास नसल्याने एकटेपणा जाणवू शकतो आणि सामाजिक मृत्यू संभावू शकतो. आपल्या भोवतालच्या लोकांकडून प्रेमाचे चार शब्द ऐकायला मिळाले नाहीत तर माणूस हळूहळू निर्जीव बनतो. वृद्धाश्रमात राहणाऱ्‍या एका वृद्ध स्त्रीने आपल्या एका परिचित व्यक्‍तीला असे लिहिले: “मी ८२ वर्षांची आहे आणि गेल्या १६ वर्षांपासून मी इथं वृद्धाश्रमात आहे; हे एकेक वर्ष एकेका युगासारखं होतं. इथं आमची खूप चांगली काळजी घेतली जाते पण तरीही एकटेपणा खायला उठतो.” खेदाची गोष्ट म्हणजे, अनेक वृद्ध लोकांची, खासकरून पाश्‍चात्त्य देशांमधील वृद्ध लोकांची हीच गत आहे. ते अशा समाजात राहतात जेथे त्यांना थारा दिला जातो पण त्यांची कदर केली जात नाही. परिणामस्वरूप, “विकसित देशांमध्ये वृद्ध लोकांना सतत धोका असतो तो एकाकीपणाचा,” असे म्हातारपण आंतरराष्ट्रीय संस्थेचे जेम्स कायेका म्हणतात.

हे खरे की, एकाकीपणाला कारणीभूत असलेल्या परिस्थिती आपल्याला काढून टाकता येणार नाहीत—जसे की, इच्छा नसताना घ्यावी लागलेली निवृत्ती, पूर्वीसारखा उत्साह न राहणे, जुन्या मित्रांपासून दूर व्हावे लागणे किंवा पती अथवा पत्नीचा मृत्यू—पण तरीही हा अडथळा बराचसा कमी करण्यासाठी तुम्ही अजूनही काही करू शकता. आधी हे समजून घ्या की, एकाकीपणाचे कारण म्हातारपण नाही; काही तरुण लोकांनासुद्धा एकाकीपणा जाणवतो. वृद्ध असणे हे समस्येचे कारण नाही—तर समाजापासून दूर होणे हे कारण आहे. तर मग, आपण एकटे पडणार नाही म्हणून काय करता येण्यासारखे आहे?

“लोकांना तुमचा सहवास आवडेल अशा तऱ्‍हेने वागा,” असे वृद्ध असलेली एक विधवा स्त्री म्हणते. “चिडखोर व्यक्‍तीसोबत राहायला कोणालाच आवडत नाही. मनमिळाऊ स्वभाव ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. पण त्या प्रयत्नाचं प्रतिफळही मिळतं. चांगल्या व्यक्‍तीला बदल्यात चांगुलपणाच मिळतो.” त्या पुढे म्हणतात: “मला तरुण तसंच प्रौढ लोकांशी बोलता यावं म्हणून मी माहिती देणाऱ्‍या पत्रिकांमधून चालू विषय जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि बातम्यांवरही लक्ष ठेवते.”

आणखी काही सल्ले: दुसऱ्‍या लोकांना आवडणाऱ्‍या गोष्टींमध्ये रस घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्‍न विचारा. होता होईल तितके उदार मनाचे असा. तुमच्याजवळ भौतिक वस्तू नसतील तर स्वतः मदत करायला तयार असा; देण्यामध्ये जास्त आनंद आहे. पत्रे लिहा. एखादा छंद जोपासा. लोकांच्या घरी जाण्याचे किंवा इतरांसोबत बाहेर कुठे जाण्याचे आमंत्रण मिळाले तर ते अवश्‍य स्वीकारा. आपल्या घरातले वातावरण प्रसन्‍न आणि बाहेरून येणाऱ्‍या लोकांना आवडेल असे ठेवा. गरजवंतांची मदत करण्यात पुढाकार घ्या.

धार्मिक वातावरण. धार्मिक कार्यांत सहभाग घेतल्याने वृद्ध लोकांना “जीवनामधील अर्थपूर्णता आणि महत्त्व” शोधण्यास त्याचप्रमाणे “आनंद,” “उपयोगीपणाची भावना,” “जीवनात अधिक समाधान” आणि “आपलेपणाची आणि सुरक्षिततेची भावना” अनुभवण्यास मदत मिळते असे अनेक पुराव्यांवरून सूचित होते. का? वृद्धापकाळ—म्हातारपणाच्या वास्तविकता (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “धार्मिक विश्‍वास लोकांना जीवनाचे तत्त्वज्ञान त्याचप्रमाणे सभोवतालचे जग समजून त्याबद्दल मत बनवण्यास मनोवृत्ती, मूल्ये आणि विश्‍वास देखील देऊ करतो.” त्या व्यतिरिक्‍त, धार्मिक कार्यहालचालींमुळे वृद्ध लोकांचा इतरांशी संपर्क येतो आणि त्यामुळे “सामाजिक दुराव्याची आणि एकाकीपणाची शक्यता कमी होते.”

लुईस आणि इव्हलिन—यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत सदस्य असलेल्या दोन ८० वर्षांच्या विधवा—यांना वरील अभ्यासांची प्रतीति मिळाली आहे. “आमच्या राज्य सभागृहातd मला लहानमोठ्या सगळ्यांशी बोलायला आवडतं,” असे लुईस म्हणतात. “सभा बोधकारक असतात. सभांनंतर सर्वांना भेटताना गंमतीजंमतीसुद्धा होतात. प्रसन्‍नतेचं वातावरण असतं.” इव्हलिन यांनासुद्धा धार्मिक कार्यहालचालींचा लाभ होतो. त्या म्हणतात, “माझ्या परिसरातल्या लोकांना मी बायबलमधले ज्ञान सांगायला जाते म्हणून मला एकटेपणा जाणवत नाही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. लोकांना जीवनातला खरा अर्थ शोधण्यात मदत करण्याचं काम अत्यंत समाधानकारक आहे.”

लुईस आणि इव्हलिन यांना आपल्या जीवनात उद्देश आहे हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे वाटणाऱ्‍या सुस्थितीच्या भावनेमुळे दुसरा अडथळा—वातावरण—कमी होतो आणि त्यांना शर्यतीत टिकून राहण्यास मदत मिळते.—पडताळा स्तोत्र ९२:१३, १४.

उपलब्ध—स्वस्त पण अत्यंत गुणकारक वैद्यकीय निगा

या शतकात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने तिसरा अडथळा, अर्थात वैद्यकीय निगा विलक्षणरित्या कमी झाला आहे—पण जागतिक प्रमाणावर नाही. जागतिक आरोग्य अहवाल १९९८ (इंग्रजी) यात म्हटल्यानुसार पुष्कळशा गरीब देशांमध्ये, “१९७५-१९९५ या सालांदरम्यान अपेक्षित आयुर्मर्यादा अक्षरशः घटली.” डब्ल्यूएचओच्या डायरेक्टर-जनरलने म्हटले की, “आज सर्वात कमी विकसित देशांमध्ये ४ पैकी ३ लोक पन्‍नाशी गाठण्याआधीच मरत आहेत—ही तब्बल ५० वर्षांआधीची जागतिक अपेक्षित आयुर्मर्यादा होती.”

तरीपण, गरीब देशांमध्ये अधिकाधिक तरुण त्याचप्रमाणे प्रौढ लोक उपलब्ध असलेल्या आणि परवडणाऱ्‍या आरोग्य निगेचा फायदा घेऊन हा अडथळा कमी करत आहेत. क्षयरोगाच्या (टीबी) उपचाराच्या नवीन पद्धतीचेच उदाहरण घ्या.

जगभरात, एड्‌स, मलेरिया आणि उष्णकटिबंधीय रोग यांमुळे मरणाऱ्‍या एकूण लोकांपेक्षा टीबीने जास्त लोक मरतात—दर दिवशी ८,००० लोक. टीबीच्या प्रत्येक १०० रुग्णांपैकी ९५ रुग्ण विकसनशील देशांमध्ये राहतात. सध्या सुमारे दोन कोटी लोकांना सक्रिय टीबी झालेला आहे आणि पुढील दहा वर्षांमध्ये सुमारे तीन कोटी लोक टीबीने कदाचित मरण पावतील—ही संख्या, बोलिव्हिया, कंबोडिया आणि मलावी या तिन्ही देशांच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे.

म्हणूनच, दवाखान्यात दाखल न होता किंवा उच्च तंत्रीय वैद्यकीय निगेविना सहा महिन्यांच्या आत टीबी बरा करण्याची पद्धत शोधून काढल्याची घोषणा डब्ल्यूएचओने १९९७ साली केली यात काही आश्‍चर्य नाही. टीबी उपचार निरीक्षक (इंग्रजी) या डब्ल्यूएचओच्या प्रकाशनाने असे म्हटले की, “श्रीमंत देशांमध्येच नव्हे तर गरिबातल्या गरीब देशांमध्येही टीबीच्या साथीचे उच्चाटन करण्याची गुणकारक साधने आणि पद्धती उपलब्ध आहेत.” या उपचारपद्धतीला डॉट्‌स असे म्हटले जाते—काहीजणांनी तिचे वर्णन “या दशकामध्ये आरोग्याच्या दृष्टीने झालेली सर्वात मोठी प्रगती” असे केले आहे.e

या उपचारपद्धतीचा खर्च, नेहमीच्या टीबी उपचारांपेक्षा बराच कमी असला, तरी परिणाम मात्र आशादायक आहे; विशेषतः विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्‍या लोकांकरता. “कोणत्याही इतर टीबी नियंत्रण उपचारपद्धतीने दीर्घकाळापर्यंत टीबी बरा करण्याचे इतके जास्त प्रमाण दिसून आलेले नाही,” असे डॉ. अराटा कोच्ची, डब्ल्यूएचओच्या जागतिक टीबी कार्यक्रमाचे संचालक म्हणतात. “डॉट्‌स उपचारपद्धतीमध्ये बरे करण्याचे प्रमाण ९५ टक्के इतके जास्त आहे, अगदी गरीब देशातही.” १९९७ सालाच्या अंतापर्यंत ८९ देशांमध्ये डॉट्‌स उपचारपद्धत सुरू करण्यात आली होती. आज तीच संख्या ९६ इतकी वाढली आहे. डब्ल्यूएचओ अशी आशा करते की, ही उपचारपद्धत कमीत कमी विकसनशील देशांमधील आणखी कित्येक कोट्यवधी लोकांपर्यंत पोहंचेल आणि त्यांना जीवनाच्या शर्यतीतला तिसरा अडथळा कमी करण्यासाठी मदत करता येईल.

सवयी बदलून, वातावरण आणि वैद्यकीय निगा सुधारून मानवाला आपली सरासरी आयुर्मर्यादा आणि अपेक्षित आयुर्मर्यादा वाढवता आली आहे यात शंका नाही. पण प्रश्‍न असा आहे की, भविष्यात कधी मानवाची कमाल आयुर्मर्यादा वाढवणे—कदाचित जीवनाची अंतहीन शर्यत धावणे शक्य होईल का?

[तळटीपा]

a “अपेक्षित आयुर्मर्यादा” आणि “सरासरी आयुर्मर्यादा” या दोन संज्ञा सहसा अदलूनबदलून वापरण्यात येत असल्या, तरी या दोन्हींमध्ये फरक आहे. एखादी व्यक्‍ती किती वर्षे जगण्याची अपेक्षा करू शकते ती आहे “अपेक्षित आयुर्मर्यादा” तर सरासरी किती वर्षे लोक प्रत्यक्ष जगतात ती आहे “सरासरी आयुर्मर्यादा.” यास्तव, अपेक्षित आयुर्मर्यादेचे अंदाज सरासरी आयुर्मर्यादेवर आधारित असतात.

b या परिवर्तनीय घटकांखेरीज मानवाला वारशात मिळालेली अपरिवर्तनीय जननिक रचना स्पष्टतः त्याच्या आरोग्यावर आणि आयुष्यमानावर परिणाम करते. याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

c साध्यासोप्या उपायांनी घरातले वातावरण कसे सुधारावे यावरील अधिक माहितीसाठी “स्वच्छतेच्या आव्हानाला तोंड देणे” आणि “कोणती गोष्ट तुमचे आरोग्य ठरवते—तुम्ही करू शकता त्या गोष्टी,” हे सप्टेंबर २२, १९८८ (इंग्रजी) आणि एप्रिल ८, १९९५ सावध राहा! अंक पाहा.

d यहोवाचे साक्षीदार ज्या ठिकाणी आपल्या साप्ताहिक सभा भरवतात त्या ठिकाणाला राज्य सभागृह म्हटले जाते. या सभांना कोणीही येऊ शकते, आणि तेथे कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही.

e DOTS (डॉट्‌स) हे डायरेक्टली ऑबसर्व्ड ट्रिटमेंट, शॉर्ट-कोर्स (अल्पवधीचा प्रत्यक्ष निरीक्षण उपचार) याचे संक्षिप्त रूप आहे. डॉट्‌स उपचारपद्धतीबद्दल अधिक माहिती करून घेण्यासाठी जून ८, १९९९, सावध राहा! नियतकालिकातल्या “क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा” हा लेख पाहा.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

व्यायाम—किती आणि कोणत्या प्रकारचा?

  “दररोज तीस मिनिटे सर्वसाधारण प्रकारचा व्यायाम करणे हे ध्येय चांगले आहे,” असे म्हातारपण राष्ट्रीय संस्था (एनआयए) म्हणते. पण ३० मिनिटांचा व्यायाम एक दमात करण्याची गरज नाही. तीन वेगवेगळ्या वेळी फक्‍त दहा-दहा मिनिटे व्यायाम केला आणि तोच व्यायाम सलग ३० मिनिटे केला तरीही तेच फायदे मिळतात. कोणत्या प्रकारचा व्यायाम करता येऊ शकतो? एनआयएची पुस्तिका, आराम नको: व्यायाम करा! (इंग्रजी) असा सल्ला देते: “लिफ्टने जाण्याऐवजी पायऱ्‍या चढणे किंवा गाडीने जाण्याऐवजी पायी जाणे अशा लहान सहान हालचालींचीही दररोजच्या ३० मिनिटांच्या व्यायामात भर पडू शकते. बागेतला पालापाचोळा गोळा करणे, शारीरिक व्यायाम होईल असे खेळ मुलांबरोबर खेळणे, बागकाम आणि घरकाम करूनही दररोजची ही ३० मिनिटे भरून काढता येतात.” अर्थात, कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.

[चित्र]

सर्वसाधारण शारीरिक कार्यहालचालींमुळे वृद्धांना शक्‍ती आणि ताकद मिळण्यास मदत होऊ शकते

[७ पानांवरील चौकट/चित्र]

मन लवचीक ठेवणे

हजारो वृद्ध लोकांचा वैज्ञानिक अभ्यास केल्यावर त्यामधून अशा पुष्कळ गोष्टी आढळल्या की ज्यामुळे वृद्ध मन लवचीक ठेवता येऊ शकते. त्यामध्ये, “वाचन, प्रवास, सांस्कृतिक घटना, शिक्षण, क्लब्स आणि व्यावसायिक संस्था यांमध्ये व्यस्त असणे” हे सर्व सामील होते. “होता होईल तितक्या वेगवेगळ्या गोष्टी करत राहा.” “कामात व्यस्त राहा. कधीच काम सोडू नका.” “टीव्ही बंद करा.” “कसला तरी कोर्स करा.” असे मानले जाते की, या कार्यहालचालींमुळे फक्‍त उत्साह वाढत नाही तर मेंदूत नवीन संयोगही निर्माण होतात.

[चित्र]

मानसिक व्यायामाने मन लवचीक ठेवण्यास मदत मिळते

[८ पानांवरील चौकट/चित्र]

वृद्धांकरता आरोग्यसंबंधी सल्ले

आरोग्य आणि मानवी सेवेच्या अमेरिकन विभागाची शाखा, म्हातारपण राष्ट्रीय संस्था अशी म्हणते की, पुढील माफक सल्ला अनुसरण्याद्वारे “निरोगी राहण्याची आणि दीर्घायुषी होण्याची शक्यता वाढवता येते”:

● संतुलित आहार घ्या, फळांचा आणि भाज्यांचा त्यात समावेश असावा.

● तुम्ही मद्यपान करत असल्यास, मर्यादेत करा.

● धूम्रपान करू नका. वेळ अजूनही गेलेली नाही.

● नियमितपणे व्यायाम करा. कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

● कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत संपर्क ठेवा.

● काम, खेळ आणि समाज यांच्यामध्ये स्वतःला क्रियाशील ठेवा.

● जीवनाबद्दल आशावादी असा.

● स्वतःला आनंद देणाऱ्‍या गोष्टी करा.

● नियमितपणे वैद्यकीय तपासणी करून घेत जा.

[९ पानांवरील चौकट]

नवीन दृष्टिकोनातून मेंदूतल्या पेशींवर एक नजर

मानसशास्त्र आणि न्यूरोलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. मॅरीलिन अल्बर्ट म्हणतात, “आम्हाला असं वाटायचं की, दररोज मेंदूच्या सगळ्या भागांतील पेशी नष्ट होतात. पण खरं तर तसं नाहीये—सुदृढ प्रकृतीचे लोक म्हातारे होतात तेव्हा थोड्याफार प्रमाणात पेशी नष्ट होतात हे खरं आहे पण हे इतक्या अचानक घडत नाही आणि मेंदूच्या निवडक भागांमध्येच हे नुकसान होते.” त्याचप्रमाणे, अलीकडील शोधांवरून हे सुचवले गेले आहे की, मानवांमध्ये मेंदूच्या पेशी नव्याने निर्माण होत नाहीत ही जुनी समजूत देखील चुकीचीच होती असे म्हटल्यास “ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही,” असे वृत्त नोव्हेंबर १९९८ च्या सायंटिफिक अमेरिकन यात दिले होते. न्यूरोसायंटिस्ट्‌स यांना मिळालेल्या पुराव्यानुसार, वृद्ध लोकांमध्येही “शेकडोंच्या प्रमाणात जादा चेताकोश निर्माण होतात.”

[११ पानांवरील चौकट]

वृद्ध तितके बुद्धिमान?

“वृद्धाच्या ठायी बुद्धी असते; दीर्घायु मनुष्याच्या ठायी समज असते, नाही का?” असा प्रश्‍न बायबल विचारते. (ईयोब १२:१२, NW) त्याचे उत्तर काय आहे? संशोधकांनी, “दूरदृष्टी, योग्य निर्णयशक्‍ती, दृष्टिकोन आणि विरोधात्मक मूल्यांची शहानिशा करून समस्येचे निरसन करण्याचे उत्तम उपाय शोधून काढण्याची क्षमता” यांसारखे गुण वृद्ध लोकांमध्ये कितपत असतात हे पाहण्यासाठी त्यांचा अभ्यास केला. यु.एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टनुसार त्या अभ्यासावरून हे दिसून येते की, “बुद्धीची क्षमता किंवा अधिक समंजस, सर्वोत्तम सल्ला देण्यात वृद्ध लोक तरुणांपेक्षा नेहमीच वरचढ ठरतात.” अभ्यासांवरून हेसुद्धा दिसून येते की, “वृद्धांना निर्णय घेण्यासाठी तरुणांपेक्षा जास्त वेळ लागत असला, तरी तो सहसा चांगला निर्णय असतो.” तर, बायबलचे ईयोब हे पुस्तक सुचवते की, वयोवृद्धपणा म्हणजे बुद्धिमत्ता.

[५ पानांवरील चित्र]

मानवी जीवन अडथळ्यांच्या शर्यतीसारखे आहे

[९ पानांवरील चित्र]

“लोकांना तुमचा सहवास आवडेल अशा तऱ्‍हेने वागा,” अशी एक विधवा म्हणते

[१० पानांवरील चित्रं]

“लोकांना जीवनातला खरा अर्थ शोधण्यात मदत करण्याचं काम अत्यंत समाधानकारक आहे.”—इव्हलिन

[१० पानांवरील चित्रं]

“आमच्या राज्य सभागृहात मला लहानमोठ्या सगळ्यांशी बोलायला आवडतं.”—लुईस

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा