आमच्या वाचकांचे मनोगत
भाजू नये म्हणून “जगावरील दृष्टिक्षेप” यातील “स्वयंपाक करताना दक्षता” हे सदर वाचून मी जरा काळजीतच पडले. (जानेवारी ८, १९९९) सदर लेखात, स्वयंपाक करताना स्टोव्हच्या पुढच्या बर्नरचा उपयोग करण्याचा सल्ला देणाऱ्या एका वार्तापत्राचा संदर्भ दिला होता. परंतु हा सल्ला, पालकांना सहसा दिल्या जाणाऱ्या सल्ल्याच्या अगदी उलट आहे; माझ्या तरी असे ऐकण्यात आले आहे, की पालकांनी नेहमी मागच्या बर्नरचा उपयोग करावा कारण तिथं सहसा मुलांचा हात पोहंचत नाही.
एम. बी., इंग्लंड
सुरक्षेसंबंधीची ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही दिलेला सल्ला खासकरून वयोवृद्ध स्त्रियांसाठी होता; कारण एखादी वस्तू घेण्यासाठी हात लांब करताना, पेटलेल्या स्टोव्हवर सैल बाह्या आल्यामुळे दुर्घटना झाल्याची उदाहरणे आहेत. ज्यांना लहान मुलं आहेत त्या स्त्रिया साहजिकच मुलांचा हात पोहंचू नये म्हणून मागच्या बर्नरवरच स्वयंपाक करतात.—संपादक
अंतरिक्षीय दुर्घटना? मी दहा वर्षांचा आहे आणि “बायबलचा दृष्टिकोन: एका अंतरिक्षीय दुर्घटनेत जगाचा नाश?” (जानेवारी ८, १९९९) हा लेख मी खूप आवडीनं वाचला. त्यातून एक गोष्ट मला समजली आणि ती म्हणजे, कोणत्याही अंतरिक्षीय दुर्घटनेत आपल्या या पृथ्वी ग्रहाचा नाश होणार नाही; कारण आपण एका बागेसमान पृथ्वीवर राहावं अशी आपल्याबद्दल यहोवा परमेश्वराची इच्छा आहे.
जे. पी., अमेरिका
धूम्रपान सोडून द्या! “आम्ही सवय मोडली—तुम्हीपण मोडू शकता!” (जानेवारी ८, १९९९) हा लेख माझ्यासाठी खासकरून अर्थपूर्ण होता. मी नुकतंच, धूम्रपान करणाऱ्या एका स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास संपवला आहे. आपल्या सर्व सभांना ती आवर्जून येते पण तिच्या या व्यसनामुळे तिच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण झाला आहे. अर्थात, धूम्रपानाची सवय कशी मोडावी हे सांगणारे इतर लेख मी तिला दिले आहेतच; पण, हा लेख अखेर तिची ही सवय मोडण्यास तिला साहाय्य करील अशी माझी आशा आहे.
ई. सी., अमेरिका
आईबाबांशिवाय “तरुण लोक विचारतात . . . आईबाबांशिवाय माझं कसं होणार?” (जानेवारी ८, १९९९) हा अतिशय सुंदर लेख लिहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आमच्यासारखी लहान मुलं आईबाबांना पोरकी होतात तेव्हा त्यांचं संरक्षण करण्यास यहोवा समर्थ आहे याची हा लेख वाचून मला खात्री पटली. माझे आईबाबा अजून जिवंत आहेत पण उद्या जर त्यांना काही झालं तर माझं कसं होईल याचा मी नेहमीच विचार करते. परंतु, या लेखात ओरास्योबद्दल वाचून मला खूप दिलासा मिळाला.
एम. जे., त्रिनिदाद
सात मुलांचं संगोपन “सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी” (फेब्रुवारी ८, १९९९) या लेखाबद्दल तुमचे आभार मानण्याचा मोह मी टाळू शकले नाही. तरुण मुलामुलींना वाढवणं, तेही विधवा असताना, ही काही साधीसोपी गोष्ट नाही; हे मी स्वतः अनुभवलं आहे. पण, हा लेख वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की कदाचित मीही हे यशस्वीपणे करू शकेन.
ए. आर., अमेरिका
आम्हीही सात भावंडं आहोत. अगदी अलीकडेपर्यंत आम्ही सर्व एकत्रितपणे यहोवाची सेवा करत होतो. पण, सहा महिन्यांपूर्वी माझी एक धाकटी बहीण बहिष्कृत झाली. मी पहिल्यांदा हा लेख पाहिला तेव्हा एका आनंदी कुटुंबाची कहाणी मला मुळीच वाचायची नव्हती. पण, त्या कुटुंबाचा हेवा न वाटता त्या लेखापासून मला लाभ व्हावा अशी प्रार्थना करून मी वाचायला सुरवात केली; आणि खरोखर मला फार फार उत्तेजन मिळालं. आमच्यासारखेच अनुभव असलेलं एक कुटुंब जगात आहे आणि यहोवाला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे ही गोष्ट त्यातून मला समजली. आपले अनुभव आम्हा सर्वांसाठी लिहिल्याबद्दल मी डिकमन दांपत्याचे आभार मानू इच्छिते. सदर लेखातून, माझ्या आईबाबांना आणि माझ्या धाकट्या भावंडांना बरंच उत्तेजन आणि दिलासा मिळाला असेल याची मला खात्री आहे.
डब्ल्यू. व्हाय., जपान
सिंह लहानपणापासूनच मला सिंहांचं विलक्षण आकर्षण असल्यामुळे “सिंह आफ्रिकेतील जंगलाचा राजा” (फेब्रुवारी ८, १९९९) हा लेख माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. हा लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. हे प्राणी अतिशय सुंदर आणि बहादूर असल्यामुळे मला त्यांचं फार अप्रूप वाटतं. एक दिवस मलाही ‘तरुण सिंहाबरोबर’ राहायला आवडेल.—यशया ११:६-९.
ई. ए. एस., ब्राझील