जगावरील दृष्टिक्षेप
महिलांवरील अत्याचार
“ब्राझीलमध्ये स्त्रियांवर होणारे ६३ टक्के शारीरिक अत्याचार घरातच होतात; पण, त्यांपैकी केवळ एकतृतीअंश घटनांची तक्रार नोंदवली जाते,” असे ओ ग्लोबो वृत्तपत्र म्हणते. सदर वृत्तपत्र पुढे म्हणते: “खासकरून गरीब घराण्यातील स्त्रिया अशा अत्याचाराला बळी पडतात आणि याच स्त्रिया सहसा पोलिस चौकीत तक्रार नोंदवतात. पण, या आकडेवारीत सुखवस्तू घराण्यातील स्त्रियांचा समावेश जवळजवळ नसल्यासारखाच आहे.” या बाबतीत इतर देशांची स्थितीही काही वेगळी नाही. उदाहरणार्थ, युएस जस्टिस डिपार्टमेंटने प्रकाशित केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, “संयुक्त संस्थानातील निम्म्याअधिक स्त्रियांवर आयुष्यात कधी ना कधी शारीरिक हल्ला झाला आहे आणि पाचपैकी जवळजवळ एकीवर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला आहे,” असे रॉइटर्स न्यूज सर्व्हिसचे म्हणणे आहे. यु.एस. हेल्थ ॲण्ड ह्यूमन सर्व्हिसेसच्या सचीव डॉना शालाला म्हणतात: “या आकडेवारीत आपली स्वतःची बहीण, आई किंवा शेजारीण तरी असू शकते.”
“दुर्लक्षित सहायक”
जर्मन नियतकालिक स्यूकोलोजी हॉइट म्हणते, की रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना बरे करण्यात प्रमुख भूमिका पार पाडणारा एक घटक फार काळापासून दुर्लक्षित राहिला आहे आणि तो म्हणजे शेजारचा रुग्ण. एका अभ्यासातून निष्पन्न झाले, की कुणा समदुःख्याची साथ असणे बरे होण्याच्या प्रक्रियेत सहायक ठरते. शिवाय, रुग्णांना सहसा एकटेच राहायला आवडते अशी जी सर्वसामान्य धारणा आहे त्याच्या अगदी उलट केवळ काही मोजक्यांनाच म्हणजे फक्त ७ टक्के रुग्णांनाच एकटे राहायला आवडते. बहुतेकांना आपल्या खोलीत एकदोन रुग्ण असल्यास बरे वाटते. पण, ते कशाप्रकारचे लोक आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. एका आदर्श रुममेटने “सर्वात प्रथम मनमिळावू आणि सहनशील असले पाहिजे” असे सदर लेख म्हणतो. त्यांच्या महत्त्वानुसार पुढील वांच्छनीय गुण सूचिबद्ध केले होते: “समजूतदार, विनोदी, स्वच्छ, खुल्या मनाचा, मदत करणारा, काळजी करणारा, सुव्यवस्थित, मैत्रिपूर्ण, प्रामाणिक, नीटनेटका, संतुलित, सहनशील, समंजस, प्रेमळ, शांत, हुशार, लवचिक आणि सावध.”
मिच वादळाचे चांगले परिणाम
गेल्या वर्षी आलेल्या विध्वंसकारी मिच वादळात हजारो लोकांचे बळी जाऊन जवळजवळ १० लाख लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले असले तरीही वादळ शमल्यानंतर एक चांगला परिणामही उघडकीस आला. निकाराग्वा या राजधानी शहरापासून नैर्ऋत्येला सुमारे ९० किलोमीटरवर असलेल्या लीओन वीहोच्या अवशेषांचे उत्खनन करणाऱ्या पुराणवस्तूशास्त्रज्ञांना वादळाचा विशेष फायदा झाला; या वादळामुळे “नवीन भिंती, अस्थी आणि पुराणवस्तू भूगर्भातून वर आल्या” असा मेक्सिको शहराच्या एक्सेल्सिअर वृत्तपत्राचा अहवाल आहे. लीओन वीहो ऐतिहासिक अवशेष स्थळाचे संचालक रिगोबर्टो नाबार्रो यांनी खुलासा करताना म्हटले, की मिच वादळामुळे माती वाहून गेली आणि कित्येक वर्षांपासून ज्या एका विशिष्ट स्थळाचा शोध लावण्याचा निष्फळ प्रयत्न पुराणवस्तूशास्त्रज्ञ करत होते, ते त्यांना आयते गवसले. यात, एका ८ फूट उंच, ३० इंच रुंद आणि ३०० फूट लांब भिंतीचा शोध लागला. नाबार्रो यांच्या मते, “ज्याच्यासाठी पुराणवस्तूशास्त्रज्ञांना वर्षांनुवर्षे लागली असती तेच काम या वादळाने अवघ्या तीन दिवसांत करून दाखवले,” असे सदर वृत्तपत्रात म्हटले होते.
व्यायामाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम
हृदयासाठी आणि फुफ्फुसांसाठी व्यायाम चांगले असले तरी खूप व्यायामाच्या अतिरेकाने उतारवयात हाडे कमजोर होण्याची शक्यता आहे. लंडनच्या द गार्डियननुसार, व्यायामाचा मनुष्याच्या शरीरावर काय परिणाम होतो यावर चर्चा करणाऱ्या परिषदेत नेमके हेच सांगितले होते. याचा सर्वाधिक धोका असतो तो धावपटूंना आणि ‘अत्युच्च स्वरूपाची तंदुरुस्ती गाठणाऱ्या” लोकांना. एअरोबिकच्या किंवा नृत्याच्या वर्गांत वारंवार भाग घेणाऱ्या स्त्रियांना अधिक ताण सहन करण्याची शक्ती नसल्याने त्यांना सहज फ्रॅक्चर्स होतात आणि आयुष्याच्या उतरणीला लागल्यावर त्यांना ओस्टिओपोरोसिस हा रोग होण्याचा धोका असल्याचे म्हटले जाते. सदर लेखाने म्हटले की, “व्यायामपटूंना सावधगिरीचा असा एक सल्ला दिला गेला होता, की वयाच्या १८, १९ वर्षांपर्यंतच हाडे मजबूत केली जाऊ शकतात, कारण त्यानंतर हळूहळू ती कमजोर होऊ लागतात. हाडे मजबूत करण्यासाठी स्क्वॉश आणि टेनिस खेळ सगळ्यात चांगले.” लंडन अस्थी केंद्रातील प्रमुख, युनिव्हर्सिटी कॉलेजचे मायकल हॉर्टन यांनी व्यायाम आणि आरोग्य यांत योग्य संतुलन राखण्याचा सल्ला दिला. त्यानी म्हटले: “तरुणांनी खूप खूप व्यायाम करावे यावर सरकारचा भर असतो. यामुळे काही काळापर्यंत फायदा होईल पण पुढे ही पीढी आयुष्याची पन्नाशी गाठेल तेव्हा काय होईल याचा मात्र कुणीच विचार करत नाही.”
सर्दीपडशावर इलाज नाही?
तब्बल दहा वर्षे ८० लाख डॉलर खर्च करून केलेल्या संशोधनांनंतर ब्रिटनच्या सर्दी पडसे केंद्राने शेवटी आपले हात टेकले. सर्दीपडशाला २०० पेक्षा अधिक निरनिराळे विषाणू कारणीभूत असल्यामुळे यावर एकच इलाज शोधून काढणे हे “गोवर, कांजण्या, गालफुगी आणि जर्मन गोवर यांवर एकाच वेळी उपचार करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे,” असे युनिव्हर्सिटी ऑफ व्हेल्स, कार्डिफच्या केंद्राचे संचालक प्राध्यापक रोनाल्ड एकल्झ म्हणतात. “सर्व जीवाणूंचे उच्चाटन करू शकेल असा एकही उपाय असल्याचं मला दिसत नाही. मला वाटतं, या सर्दीपडशाविषयी उगाच चिंता करण्यापेक्षा त्यास जीवनाचा एक भाग समजून जगणे हाच त्यावरील सगळ्यात चांगला उपाय.”