आमच्या वाचकांचे मनोगत
पूल हाँडुरासमध्ये झालेल्या मिच वादळात जवळजवळ ८० टक्के पूल जमीनदोस्त झाले आणि काय योगायोग त्याचवेळी, “पूल नसते तर?” हा डिसेंबर ८, १९९८ चा अंक आमच्या हातात पडला. मी आणि माझे पती या पुलांवरून नेहमी ये-जा करायचो; तेव्हा आपल्यासाठी पूल किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही. या लक्षवेधक आणि समयोचित लेखासाठी आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. सदर लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे इथून पुढे पुलांना आम्ही कधीही कमी लेखणार नाही!
सी. एच., हाँडुरास
प्राण्यांशी क्रूरता “बायबलचा दृष्टिकोन: प्राण्यांशी क्रूरता—गैर आहे का?” (डिसेंबर ८, १९९८) हा लेख प्रकाशित करून तुम्ही किती चांगलं काम केलंय हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दाम हे पत्र लिहित आहे. प्राण्यांशी क्रूरतेने वागणं आणि खासकरून स्वतःला ख्रिश्चन म्हणवणाऱ्यांनी असं करणं देवाला वीट आणणारं आहे हे दाखवून तुम्ही खरंच मोठं काम केलं आहे असं मला वाटतं.
जे. एल. सी., संयुक्त संस्थाने
आईवडील नसलेले युवक “तरुण लोक विचारतात . . . मला आईवडील का नाहीत?” (डिसेंबर ८, १९९९) या लेखासाठी मी तुमचे मनस्वी आभारी आहे. मी आज ३९ वर्षांची आहे. मी अवघ्या ११ वर्षांची असताना आई वारली आणि त्यावेळी वडीलही आम्हाला वाऱ्यावर सोडून गेले. मी आणि माझ्या भावंडांनी जे वाईट दिवस काढले ते आजपर्यंत कुणीही समजू शकलं नाही. पण, आम्हाला समजून घेणारं कुणीतरी आहे असं आता मला वाटतं. त्याबद्दल तुमची आभारी आहे.
के. वाय., जपान
मी अवघ्या नऊ महिन्यांची असताना बाबा गेले आणि वयाचे १२ वे वर्ष पूर्ण करण्याआधीच आई देखील कायमची गेली. तुमचा लेख खरोखरच खूप सांत्वन देणारा होता; शिवाय, आईबाबांच्या सावलीविना जगणाऱ्यांच्या नेमक्या भावना त्यात शब्दांत व्यक्त केल्या होत्या. यहोवा आपल्या मृत प्रिय जनांना पुन्हा जिवंत करील याच्या केवळ जाणिवेनंही अर्धं दुःख नाहीसं होतं.
एम. एस. एस., ब्राझील
मी ४० वर्षांची आहे आणि हा लेख मी एकदा नव्हे, अनेकदा वाचला आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी मी एकटी पडले आणि म्हणूनच ज्या ज्या वेळी मी हा लेख वाचला त्या प्रत्येक वेळी सुरवातीपासून शेवटपर्यंत माझे डोळे भरून आले. आताही ज्या ज्या वेळी आईबाबांचा फोटो पाहतो त्या त्या वेळी माझ्या डोळ्यांत पाणी येतं. असे लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे.
जे. सी. वी., फ्रान्स
मला आईबाबांचा आसरा आहे, नाही असं नाही. पण मला एक प्रकारची मानसिक विकृती (बायपोलर) असल्यामुळे दुःखावर मात कशी करावी हे सांगणारे कोणतेही लेख मी मोठ्या आवडीनं वाचते. “तरुण लोक विचारतात . . ” यामध्ये तुम्ही जे खरोखर घडलेले अनुभव देता आणि बायबल आधारित सल्ला देता ते मला फार आवडतात हे मला सांगावंसं वाटतं.
एस. एच., कॅनडा
हात धुणे मी ११ वर्षांचा आहे; “हात धुवा आणि पुसा!” (डिसेंबर ८, १९९८) या लेखासाठी मला तुमचे आभार मानावेसे वाटतात. जेवायच्या आधी आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात धुतलेच पाहिजे हे मी त्यातून शिकलो. आमच्या गावात, संसर्गजन्य रोग अगदी सर्वसामान्य आहेत, तेव्हा हा लेख फारच उपयुक्त ठरला.
एम. एफ., इटली
महागडी चैनचंगळ नको “जगावरील दृष्टिक्षेप” या सदरात “मुलांना महागडी चैनचंगळ नको असते” (जानेवारी ८, १९९९) ही माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे. मी माझ्या मुलांपासून दूर राहते आणि तीन महिन्यातून केवळ एकदाच मी त्यांना भेटू शकते. आम्ही एकत्र येतो तेव्हा वेळ कसा घालवावा हेच मला कळत नव्हतं; मुलं कंटाळतील या भीतीनं मी खूप काही करण्याचं ठरवायचे. पण, मुलांना भेटण्याच्या आदल्याच दिवशी मला त्यावरील ही माहिती वाचायला मिळाली. खरंच, अगदी नेमक्या वेळी ही माहिती आली होती!
एम. वाय., जपान
साप “सापांविषयी सहसा असलेले गैरसमज” (नोव्हेंबर ८, १९९८) या लेखासाठी तुमचे मनस्वी आभारी आहे. त्यात दिलेल्या सात मुद्द्यांमुळे या मोहक प्राण्याविषयी सहसा होणारे गैरसमज दूर झाले.
आर. के., संयुक्त संस्थाने