वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ९/८ पृ. २५-२७
  • तरुणांना धर्माचे कितपत आकर्षण आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांना धर्माचे कितपत आकर्षण आहे?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाह्‍य देखावे
  • जवळून पाहिल्यास . . .
  • धर्मांचा बुफे
  • धर्म तरुणांच्या शोधात
  • उत्तरांच्या शोधात तरुण
  • समाधानकारक उत्तरे
  • धार्मिक मूल्यांची काय स्थिती आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तरुणांनो, यहोवाला शोभेल असे चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • जीवनात आशेला आणि प्रेमाला पालवी फुटते तेव्हा
    सावध राहा!—१९९८
  • देवाबद्दल का बोलावे?
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ९/८ पृ. २५-२७

तरुणांना धर्माचे कितपत आकर्षण आहे?

फ्रान्समधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

सात लाख पन्‍नास हजार तरुण प्रेक्षकांच्या साक्षीने त्या संध्याकाळी, एक अत्यानंदाचा सोहळा सुरू झाला. ध्वज फडकावत, गाणी गात आणि टाळ्यांचा गडगडाट करत ते आपला आनंद व्यक्‍त करत होते. लेसर किरणे आणि आतशबाजी यांमुळे सारा परिसर लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाला होता; वेगवेगळी वाद्ये वाजवणारे कलाकार प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच वाढवत होते. एखाद्या “प्रचंड मोठ्या अत्याधुनिक डिस्को क्लबला” शोभणारे हे सारे वातावरण होते. शेवटी, सर्वजण जिच्या प्रतिक्षेत होते ती व्यक्‍ती टाळ्यांच्या कडकडाटात आणि प्रचंड जल्लोषात स्टेजवर आली.

हे एखाद्या पॉपस्टारच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्‍याच्या पहिल्या प्रयोगाचे तर वर्णन नाही? नाही. ही एक धार्मिक सभा होती. पॅरिस येथे आयोजित करण्यात आलेली कॅथलिक वर्ल्ड यूथ डेज नावाची सभा, आणि ती व्यक्‍ती होती पोप जॉन पॉल दुसरे!

अशाप्रकारच्या धार्मिक सोहळ्यांमध्ये युवकांचा उत्साही सहभाग पाहून काहींना कदाचित नवल वाटेल. पण अलीकडे, प्रसारमाध्यमे युवकांमध्ये धार्मिक पुनरुज्जीवन होत असल्याचे सांगू लागले आहेत.

बाह्‍य देखावे

वरवर पाहिल्यास, धार्मिक संस्थांना चांगले दिवस आले आहेत असे भासेल. एकंदर युरोपियन तरुणांपैकी जवळजवळ ६८ टक्के तरुण एखाद्या धर्माचे अनुयायी असल्याचे सांगतात; आयर्लंडमध्ये हीच संख्या ९० टक्क्यांहून जास्त आहे. भूतपूर्व सोव्हिएत संघातील प्रजासत्ताक राज्य असणाऱ्‍या अर्मेनियात एकेकाळी धर्माला कालबाह्‍य समजले जात होते, पण पूर्वी रिकाम्या असणाऱ्‍या तेथील चर्चेसमध्ये आज लोकांची गर्दी असते. याविषयी एक पाळक म्हणाले: “तरुण पिढीला धर्माविषयी वाटणारे हे आकर्षण पाहून मला तर आश्‍चर्य वाटते.”

वेगवेगळ्या धार्मिक पंथांत आणि अलौकिक तत्त्वज्ञानावर आधारित असणाऱ्‍या गटांत तरुण लोकांच्या वाढत्या सहभागाविषयी कित्येक देशांतील प्रसारमाध्यमांनी वृत्ते प्रसिद्ध केली आहेत. सुरवातीला वर्णन केलेल्या धार्मिक सभेसारखे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले आहेत. पण या वरकरणी देखाव्याच्या आत डोकावून पाहिल्यास कोणते चित्र दिसते?

जवळून पाहिल्यास . . .

जवळून पाहिल्यास असे दिसून येते की १९६७ साली, देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या फ्रेंच युवकांची संख्या ८१ टक्के होती, पण १९९७ साली मात्र ही संख्या निम्म्याहून कमी झालेली होती. व्यक्‍तिमत्त्व असलेल्या देवावर ज्यांचा विश्‍वास आहे, असे सबंध युरोपात केवळ २८ टक्के तरुण आहेत. त्यामुळे एकूण युरोपियन तरुणांपैकी फक्‍त १२ टक्के तरुणांनाच प्रार्थना करण्याची सवय आहे हे फारसे आश्‍चर्याचे नाही. धर्माविषयी तरुणांनी व्यक्‍त केलेल्या त्यांच्या मतांतून हे कसे स्पष्ट होते?

डेन्मार्कमध्ये ९० टक्के तरुण आपण राष्ट्रीय ख्रिस्ती धर्माचे अनुयायी असल्याचे सांगतात. फक्‍त ३ टक्के स्वतःला सक्रिय सभासद म्हणवतात. ला क्रवॉ नावाच्या एका कॅथलिक दैनिकाने १९९७ साली फ्रान्समध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आले की फ्रेंच तरुणांपैकी ७० टक्के तरुण त्यांच्या जीवनात धर्माला जागाच नाही असे कबूल करतात. त्यांच्यापैकी तीन चतुर्थांश तरुण धर्माच्या शिकवणुकींपेक्षा स्वतःच्या अनुभवाला जास्त महत्त्व देतात. इतरही बऱ्‍याच युरोपियन देशांत हीच परिस्थिती आहे.

तरुण लोक चर्चेसकडे असे पाठ का फिरवत आहेत? त्यांच्यापैकी पुष्कळांना सर्वसामान्य धर्म भरवसालायक वाटत नाहीत. उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये अधिकांश युवकांच्या मते जगातील भेदभावासाठी धर्मच जबाबदार आहेत. शिवाय, स्पेनमध्ये राहणाऱ्‍या १५ वर्षीय ज्युडिथ या कॅथलिक मुलीला वाटते तसेच पुष्कळ तरुणांनाही वाटते. ती म्हणते: “नैतिकतेविषयी चर्चचे विचार मला पटत नाहीत.” तसेच तायवानच्या २० वर्षीय जोसफच्या मते धर्म “फारच रूढीवादी” असतात. पण जर या अधिकांश तरुणांना स्वतःच्या धर्माच्या शिकवणी पटत नाहीत, तर मग ते कशावर विश्‍वास ठेवतात?

धर्मांचा बुफे

बुफे पद्धतीने जेवताना जसे आपल्या आवडीचे पदार्थ घेता येतात, तसेच आजकालचे तरुण आपल्या आवडीचे धार्मिक विश्‍वास निवडून घेत आहेत. एका नियतकालिकाने याला धार्मिक “बुफे” असे नाव दिले. तर दुसऱ्‍या एका कॅथलिक मॅगझीनने याला “धार्मिक विन्डो शॉपिंग” (धर्माची खरेदी) म्हटले. पूर्वी जुनाट समजल्या जाणाऱ्‍या कल्पना आता लोकांना रुचू लागल्या आहेत. म्हणूनच तर युरोपमध्ये, मंत्रसिद्ध ताईतांवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या तरुणांची संख्या जवळजवळ ३३ टक्के, ज्योतिषी खरे भविष्यकथन करू शकतात असा विश्‍वास करणाऱ्‍यांची ४० टक्के आणि ग्रहताऱ्‍यांचा माणसांच्या जीवनातल्या घडामोडींवर प्रभाव असतो असा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांची संख्या २७ टक्के आहे. पुनर्जन्मासारख्या कल्पना आता कितीतरी युरोपियन तरुणांनी आपल्या धर्मिक विश्‍वासांत सामावून घेतल्या आहेत.

शिवाय आज इतके निरनिराळे धार्मिक विश्‍वास अस्तित्वात आहेत, की तरुण लोक आपापल्या अभिरुचीप्रमाणे हे विश्‍वास निवडू शकतात. कोणत्यातरी एकाच धर्मात सत्य असू शकते असे फार कमी तरुणांना वाटते. आपल्या आवडीनुसार निवडता येत असल्यामुळे अलीकडे वेगवेगळ्या धार्मिक समजुतींत फारसा फरकही दिसून येत नाही. त्यामुळे समाजशास्त्रज्ञ आता पारंपरिक धार्मिक तत्त्व “हळूहळू लोप पावत आहेत” किंवा “नाहीसे होत आहेत” असे म्हणतात. अशा या आध्यात्मिक परिस्थितीला पारंपरिक धर्मांची काय प्रतिक्रिया आहे?

धर्म तरुणांच्या शोधात

तरुणांना कसे आकर्षित करावे हा धर्मांपुढे एक यक्षप्रश्‍न आहे. एका फ्रेंच पाळकाने कॅथलिक वर्ल्ड यूथ डेज या पॅरिसमध्ये संपन्‍न झालेल्या कार्यक्रमातली गर्दी पाहून म्हटले: “हे इतके तरुण येतात कुठून? माझ्या चर्चेसमध्ये तर तरुणच नाहीत. निदान मला तरी कधी दिसत नाहीत.” तरुणांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे आणि त्यांचे हे आकर्षण कमी होऊ नये, म्हणून कॅथलिक चर्च आता आपली संदेश प्रस्तुत करण्याची पद्धत आणि आपली प्रतिमाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे.

ल फीगारो या फ्रेंच दैनिकाच्या शब्दांत, “चर्चने आपली स्टाईल बदललीय!” पॅरिसमध्ये १२ व्या वर्ल्ड यूथ डेज कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी चर्चने अशा एजेन्सीजवर सोपवली ज्या सहसा रॉक कॉन्सट्‌र्सच्या आयोजनाचे काम पाहतात. १०० देशांतून आलेल्या तरुण मंडळीची करमणूक करण्यासाठी कमीतकमी ३०० शो आयोजित करण्यात आले; पाळकांसाठी खास डिझायनर कपडे तयार करून घेण्यात आले होते.

आजकालच्या तरुणांच्या विचारांसंबंधी तितकीशी माहिती नसल्यामुळे, पण त्याच वेळेस त्यांच्याशी जुळवून घेण्याची गरज आहे हे ओळखल्यामुळे बऱ्‍याच धर्मांत सर्व धर्मांची मिसळ झाली आहे. या धोरणावर आपले विचार व्यक्‍त करताना, वर्ल्ड यूथ डेज फेस्टिव्हलचे आयोजन करणारे पाळक, मीशल ड्यूबो यांनी म्हटले: “बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकाने ख्रिस्ताला विश्‍वासू राहावे, असे अर्थातच मलाही वाटते. पण नाहीही राहिले तरीसुद्धा चर्चचे दरवाजे त्यांच्यासाठी खुलेच राहतील.”

उत्तरांच्या शोधात तरुण

पॅरिसमधील धार्मिक सभेला युवकांच्या मोठ्या उपस्थितीविषयी वर्णन करताना, आजचे तरुण खरोखरच समाधानकारक उत्तरांच्या शोधात आहेत या बाबीवर एका वृत्तपत्राने विशेष जोर दिला; ते म्हणते की फेस्टिव्हलला उपस्थित राहिलेले तरुण “विश्‍वासाने नव्हे तर विश्‍वासासाठी आक्रोश” करीत होते. कॅथलिक चर्चने त्यांच्या या हाकेला साद दिली का?

या भव्यदिव्य धार्मिक फेस्टिव्हल्सचे आकर्षक आवरण काढून आत डोकावले, किंवा एका वृत्तपत्राच्या शब्दांत या “दृष्टिभ्रमाकडे” निरखून पाहिले तर केवळ काय दिसते? ल मॉन्ड या फ्रेंच वृत्तपत्राने सांगितल्याप्रमाणे वरवरचा दिखावा सोडल्यास आत सगळेच “पोकळ” असते.

अन्‍नपदार्थ सुरेख सजवून वाढणे महत्त्वाचे असले तरीसुद्धा अन्‍न हे मुळातच पोषक असले पाहिजे. जीवनाच्या अर्थासंबंधी तरुण लोकांच्या प्रश्‍नांना आध्यात्मिकरित्या पोषक उत्तरे मिळणे आवश्‍यक आहे. पण युवकांना जी अवास्तविक उत्तरे दिली जातात ती त्यांचे समाधान करू शकत नाहीत.

अशाप्रकारच्या पोकळ धार्मिक सभा मग आजकालच्या युवकांवर कायमची छाप पाडतात का? डान्येल अरव्यो-लेझे या फ्रेंच समाजशास्त्रज्ञांच्या मते: “अशा नेत्रदीपक कार्यक्रमांतून दीर्घ पल्ल्याचे सामाजिक लाभ होण्याची फार कमी शक्यता असते.” तर मग, तरुणांना त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे कोठे सापडतील?

समाधानकारक उत्तरे

ल प्वाँ या फ्रेंच मासिकाने तरुणांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्यांविषयी १९९७ साली एक लेख प्रकाशित केला होता. जीवनाच्या अर्थासंबंधी प्रश्‍न सर्वसामान्यपणे बऱ्‍याच तरुणांना भेडसावतात, पण त्यासोबतच त्यांना गुन्हेगारी आणि हिंसाचार यांनाही तोंड द्यावे लागते. या परिस्थितीतून बाहेर निघण्याची काही आशा आहे का? सदर लेखात सांगितले होते: “डेव्हिड नावाचा तरुण ३० वर्षांचा झाला तेव्हा मद्यपान, अंमली पदार्थ आणि हिंसाचार यांमुळे आपल्या शरीराला झालेले दुष्परिणाम पाहून अस्वस्थ झाला. नव्याने जीवन सुरू करण्यासंबंधी त्याला असलेल्या शंकांचे उत्तर घेऊन यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी आले. त्याने अभ्यास केला. जीवनात बदल केला. जुगारासाठी घेतलेले सर्व कर्ज आणि जुगारात त्याने ज्यांना फसवले होते अशांना, एवढेच काय आपल्याला फसवण्यात आले होते हे ज्यांना माहीतही नव्हते अशांना देखील त्याने सर्व पैसे भरून दिले. आता तो धूम्रपान किंवा मद्यपान करत नाही आणि कधीच कोणत्या भांडणतंट्यातही पडत नाही.”

यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केलेल्या इतर तरुणांविषयी या लेखात पुढे म्हटले होते, “त्यांना त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सापडली आहेत.” एका साक्षीदार तरुणाने अगदी सोप्या शब्दांत हे व्यक्‍त केले: “बायबल दोन हजार वर्षांपासून सत्य सांगत आले आहे, मग मी मार्गदर्शनासाठी आणखी कोठे का जावे?”

देवाच्या वचनात युवकांसाठी एक संदेश आहे. यातील व्यवहार्य मार्गदर्शन त्यांना आजकालच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यात साहाय्य करते, शिवाय त्यांना शांती सलोख्याचे भविष्य येईल यावर विश्‍वास ठेवण्यासाठीही ठोस आधार मिळतो. जगाचे चित्र पदोपदी बदलत चालले आहे, पण बायबलमधील आशा स्थैर्य आणि सांत्वना देणारा ‘स्थिर आणि अढळ असा जिवाचा नांगर’ आहे. (इब्री लोकांस ६:१९) यहोवाच्या साक्षीदारांसोबत वैयक्‍तिक बायबल अभ्यास केल्यावर लाखो तरुणांच्या जीवनाला एक खरा अर्थ लाभला आहे. बायबल एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनात कसे बदल घडवून आणते आणि हे बदल केवळ वरकरणी नसतात हे त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे. बायबलची उत्तरे स्वीकारल्यामुळे खऱ्‍या धर्माचा शोध सार्थक झाल्याचे तरुणांना आढळून येते.

[२५ पानांवरील चित्र]

पॅरिसमधील धार्मिक फेस्टिव्हलने खेचलेली हजारो तरुणांची गर्दी

[२६ पानांवरील चित्र]

पॅरिसमधील वर्ल्ड यूथ डेज—खरे धार्मिक पुनरुज्जीवन?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा