वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ७/८ पृ. २१-२३
  • थट्टेचा सामना मी कसा करू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • थट्टेचा सामना मी कसा करू शकतो?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • टर उडवण्याचे कारण
  • कसे उत्तर द्यावे?
  • निर्भीडपणे बोला
  • पारखलेला विश्‍वास—अतूट विश्‍वास
  • ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तरुणांनो—यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
  • देवाबद्दल का बोलावे?
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ७/८ पृ. २१-२३

तरुण लोक विचारतात . . .

थट्टेचा सामना मी कसा करू शकतो?

ज्यांचे वागणेबोलणे किंवा पेहराव इतर युवकांपेक्षा वेगळा असतो असे युवक कदाचित क्रूर थट्टेचे शिकार असतील. ख्रिस्ती युवकांचे वागणेबोलणे सहसा इतर युवकांपेक्षा वेगळे असल्यामुळे तेही याला अपवाद नाहीत. आपल्या खऱ्‍या अनुयायांविषयी ख्रिस्ताने असे म्हटले नव्हते का की, “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील?”—योहान १५:२०.

यहोवाचे साक्षीदार असलेल्या युवकांवर याचा कसा परिणाम होतो? यांच्यापैकी काहींची टर उडवली जाते किंवा इतर काहींची टीका केली जाते; का? कारण विशिष्ट सणवार साजरे करण्यात ते सहभाग घेत नाहीत किंवा ध्वज वंदन करत नाहीत. कित्येकांना तर मादक पदार्थ सेवन न केल्याबद्दल, प्रामाणिक असल्याबद्दल आणि बायबलच्या नैतिक दर्जांनुरूप जीवन व्यतीत केल्याबद्दलही छळले जाते.

पण, यात नवल करण्यासारखे असे काही नाही. खरे तर, प्रेषित पेत्राने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुम्ही [परराष्ट्रीयांबरोबर] धावत नाही यावरून आश्‍चर्य करून ते तुमची निंदा करितात.” (१ पेत्र ४:४) इतर अनुवाद म्हणतात: “ते तुम्हाला नावे ठेवतात” (नॉक्स भाषांतर) किंवा, “ते तुमचा अपमान करतात.”—टुडेज इंग्लिश व्हर्शन.

तुमच्या धार्मिक विश्‍वासांमुळे कधी तुमची थट्टा करण्यात आली आहे का? असल्यास, हवालदिल होऊ नका. कारण इतर अनेकांना देखील असाच अनुभव आला आहे! तुमच्या धार्मिक विश्‍वासासाठी तुमची टर उडवली जाते तेव्हा तुम्ही खच्चून जाल हे मान्य; पण, यावर मात करणे शक्य आहे हे जाणून तुम्हाला आनंद होईल.

टर उडवण्याचे कारण

ज्यांचे धार्मिक विश्‍वास किंवा आचरण इतरांपेक्षा निराळे असते अशांची काही लोक खिल्ली का उडवतात? याचे कारण धाकदपटशा करणाऱ्‍यांप्रमाणेच थट्टा करणाऱ्‍या लोकांमध्ये देखील असुरक्षिततेची भावना असते. चारचौघांवर आपली छाप पाडण्यासाठी ते कदाचित तुमची टिंगलटवाळी करतील. पण, तेच जर ते एकटे असले तर उघडउघड तुमची टीका करण्यास त्यांना इतकी उत्सुकता नसेल.

पण, पेत्राने लिहिले त्याप्रमाणे काही थट्टेखोरांना ‘आश्‍चर्य वाटते.’ होय, तुमचे वागणेबोलणे समजण्यास त्यांना खरोखरच अवघड जात असेल. उदाहरणार्थ, तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्यास तुम्ही विशिष्ट सणवार साजरे करत नाही हे त्यांना खरेच विचित्र वाटेल. किंवा मग निग्रही विरोधकांकडून त्यांना यहोवाच्या साक्षीदारांविषयी चुकीची माहितीही मिळालेली असेल.

कारण कोणतेही असो, आपल्यावर उपरोधिक शब्दांचा भडिमार होतो तेव्हा बायबलच्या पुढील नीतिसूत्राची सत्यता तुम्हाला जाणवेल: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” (नीतिसूत्रे १२:१८) पण, हे नेहमी ध्यानात असू द्या, की ते तुमच्याविषयी असे भाष्य करतात त्याचा अर्थ ते तुमचा द्वेष करतात असे नाही. सहसा, बायबलचे नीतिसूत्र म्हणते त्याप्रमाणे ते खरे तर ‘अविचाराने बोलत’ असतात.

पण, तरी आपली टर उडवली जाते तेव्हा मनाला लागते, मन अगदी घायाळ होऊन जाते. इतके की, अपमानकारक शब्दांचा मारा चुकविण्यासाठी आपल्या धार्मिक विश्‍वासाचा त्याग करण्याचा मोहही आपल्याला अनावर होऊ शकतो. तर मग, आपल्या धार्मिक विश्‍वासांसाठी उठता-बसता तुमची थट्टा केली जाते तेव्हा तुम्ही काय करावे?

कसे उत्तर द्यावे?

प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला की, “तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) आपल्या धार्मिक विश्‍वासाचे समर्थन करण्यासाठी अचूक ज्ञान संपादन करण्याची तसेच आपल्या विश्‍वासाची कारणे समजून घेण्याची गरज आहे.

पण त्याच वेळी, आपले धार्मिक विश्‍वास “भीडस्तपणाने” किंवा द बायबल इन बेसिक इंग्लिश या अनुवादानुसार “अहंकाराविना” इतरांना सांगण्याचेही जरूरीचे आहे. केवळ बायबलविषयी आणि त्याच्या शिकवणुकींविषयी तुम्हाला ज्ञान आहे म्हणून आपण स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजता कामा नये. उलट, प्रेषित पौलासारखी मनोवृत्ती विकसित करण्याचा आपला प्रयत्न असावा; आपल्या सेवेविषयी तो म्हणाला: ‘अधिक लोक मिळविण्यासाठी मी आपणाला सर्वांचा दास केले आहे.’—१ करिंथकर ९:१९.

आपल्या धार्मिक विश्‍वासाचे समर्थन करण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तर धीर सोडू नका. कारण इतर अनेक साक्षीदार युवकांनाही असेच वाटले आहे. उदाहरणार्थ, जमाल काय म्हणतो ते लक्षात घ्या. “प्राथमिक शाळेत असताना मी सणवार का साजरे करत नाही, ध्वज वंदन का करत नाही किंवा मी घरोघर जाऊन प्रचार का करतो याचं स्पष्टीकरण कसं द्यावं हेच मला कळत नव्हतं.” मग यात जमालला कोणी मदत केली? तो म्हणतो: “माझे बाबा मला सतत मदत करत राहिले; शेवटी या सर्व गोष्टींचं स्वतः स्पष्टीकरण देण्यास मी शिकलो आणि यामुळे बराच फरक पडला.” इतरांना आपले धार्मिक विश्‍वास सांगण्यात तुम्हाला काही अडचण वाटत असल्यास तुम्ही तुमच्या आईवडिलांची किंवा ख्रिस्ती मंडळीतील एखाद्या प्रौढ व्यक्‍तीची मदत घेऊन देवाचे ज्ञान पूर्णपणे संपादन करू शकता.—इफिसकर ३:१७-१९.

यहोवाची साक्षीदार असलेली १६ वर्षांची एक युवती म्हणते वैयक्‍तिक बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमामुळेच शाळेत आपल्या धार्मिक विश्‍वासांचे समर्थन करण्याचे धैर्य तिला एकवटता आले. ती म्हणते: “पूर्वी, मी एक यहोवाची साक्षीदार आहे म्हणून वर्गातली मुलं मला चिडवायची तेव्हा काय बोलावं कळत नसे. पण आता, पूर्ण-वेळेची सुवार्तिक असल्यामुळे मी बायबलचा पूर्वीपेक्षा जास्त अभ्यास करते आणि त्यामुळे मी त्यांना उत्तर देऊ शकते. शिवाय, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या मासिकांतील प्रत्येक अंक वाचत असल्यामुळे माझ्या धार्मिक विश्‍वासांबद्दल शाळेतील मित्रमैत्रिणींशी मी बोलू शकते.”

अर्थात, हरएक परिस्थिती सारखीच नसते. निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळ्या प्रकारे उत्तर देण्याची गरज आहे. पण, एखाद्याचे उपरोधिक बोल तुम्हाला सहन होत नाहीत तेव्हा “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” करणे चुकीचे आहे. (रोमकर १२:१७-२१) एखादे अपमानकारक उत्तर मग वरवरून ते कितीही विनोदी वाटत असले तरी त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे होईल; म्हणजे आणखीन थट्टा करण्याला वाव मिळेल. तेव्हा, अशा अपमानकारक शब्दांकडे दुर्लक्ष करणेच सगळ्यात चांगले असे काहींना वाटले आहे.

काही वेळा, उदाहरणार्थ, केवळ गंमत करण्याच्या उद्देशाने आपल्याला काही बोलले जाते तेव्हा त्याचे वाईट वाटून घेण्याऐवजी ते हसण्यावारी नेणे कदाचित समंजसपणाचे ठरेल. (उपदेशक ७:९) आपल्यावर थट्टामस्करीचा काहीएक परिणाम होत नाही हे एखाद्याला कळते तेव्हा अशा प्रकारे छळण्याचे तो कदाचित सोडून देईल.—नीतिसूत्रे २४:२९; १ पेत्र २:२३.

निर्भीडपणे बोला

परंतु, असेही काही प्रसंग असतील जेव्हा आपले धार्मिक विश्‍वास काय आहेत याचे थोडक्यात पण तितक्याच चाणाक्षपणे स्पष्टीकरण देणे शक्य असेल. एका १३ वर्षांच्या मुलीने हे अजमावून पाहिले आणि त्याचे उत्तम परिणाम तिला दिसून आले. ती म्हणते, “एकदा मी क्लासला चालले होते; अचानक विद्यार्थ्यांचा एक घोळका यहोवाच्या साक्षीदारांची खिल्ली उडवू लागला. मला खरं तर फाडफाड बोलावंसं वाटलं; पण ते लोक माझी मजा करत तिथून निघून गेले. त्यांच्यातली केवळ एकच मुलगी थांबली. जेमी नावाची ती मुलगी माझ्याकडे आली आणि तिच्यापाशी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकताa हे पुस्तक असल्याचं तिनं मला सांगितलं. ती म्हणाली, तिनं ते बरंचसं वाचलं होतं आणि आमच्या धार्मिक विश्‍वासांबद्दल आणखीन जाणून घेण्यास ती उत्सुक होती. मी जेमीबरोबर बायबलचा अभ्यास करू लागले.” यामुळे यहोवाची साक्षीदार असलेल्या या युवतीला इतके प्रोत्साहन मिळाले की ती इतर युवकांशीही आपल्या विश्‍वासाबद्दल बोलू लागली. ती म्हणते, “माझ्यासोबत शिकणाऱ्‍या आणि आस्था दाखवणाऱ्‍या चार विद्यार्थ्यांना मी न चुकता भेटी देते आणि माझी खात्री आहे, की ते लवकरच बायबलचा अभ्यास सुरू करतील.”

काही वर्षांपूर्वी लायबेरिया या आफ्रिकन देशात राहणाऱ्‍या विद्यार्थ्याला असाच अनुभव आला. समाजशास्त्राच्या तासात अगदी आदरपूर्वक त्याने सांगितले, की यहोवाचा साक्षीदार असल्यामुळे त्याचा उत्क्रांतीवर नाही तर निर्मितीवर विश्‍वास आहे. सुरवातीला विद्यार्थ्यांनी त्याची खूप टीका केली. पण, शिक्षकाने त्याला सबंध वर्गाला त्याचा धार्मिक विश्‍वास स्पष्ट करून सांगायला लावा; त्यानंतर, जीवन—ते येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने?b (इंग्रजी) हे पुस्तक शिक्षकाने घेतले.

पुस्तक वाचल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगितले: “हे पुस्तक अप्रतिम आहे. निर्मितीविषयी मी आजवर वाचलेले हे सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक पुस्तक आहे.” शिक्षकाने पुढे म्हटले, की पुढच्या दोन सहामाहीपर्यंत पाठ्य-पुस्तकांसोबतच निर्मिती पुस्तकाचाही उपयोग करण्याचा त्यांचा विचार आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्याकडून या पुस्तकाची एकेक प्रत घ्यावी. अशाप्रकारे कित्येक पुस्तकांचे वाटप झाले आणि यहोवाच्या साक्षीदारांविषयी असलेले अनेक विद्यार्थ्यांचे गैरसमज दूर झाले.

पारखलेला विश्‍वास—अतूट विश्‍वास

काही वेळा, बायबलवर आधारित तुमची जी भूमिका आहे तिचा अवलंब न करणाऱ्‍या आणि ती समजून न घेणाऱ्‍या असंख्य लोकांचा विचार करून तुम्ही कदाचित हतबल होऊन जाल. (पडताळा स्तोत्र ३:१, २.) तेव्हा, ज्यांची धार्मिक मते आणि विश्‍वास तुमच्यासारखी आहेत अशांची मैत्री करणे सुज्ञतेचे ठरेल. (नीतिसूत्रे २७:१७) पण, तुमच्या शाळेत किंवा तुम्ही राहता तिथे असे युवक नसतील तर काय केले जाऊ शकते?

अशावेळी, यहोवा देव हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र असून तो तुमच्या पाठिशी राहू शकतो याचा कधीही विसर पडू देऊ नका. गेल्या हजारो वर्षांपासून तो स्वतः देखील दियाबल सैतानाची थट्टा सहन करत आला आहे. तेव्हा, तुम्ही तुमच्या धार्मिक विश्‍वासाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहता तेव्हा यहोवाचे मन आनंदित होते. असे केल्याने, ‘त्याची निंदा [“थट्टा,” NW] करणाऱ्‍या सैतानाला उत्तर देण्याची’ संधी त्याला लाभते.—नीतिसूत्रे २७:११.

तर मग, तुमच्या धार्मिक विश्‍वासाची पदोपदी परीक्षा होईल असेच धरून चाला. (२ तीमथ्य ३:१२) पण, तरीसुद्धा प्रेषित पेत्र आपल्याला असे आश्‍वासन देतो, की तुमचा पारखलेला विश्‍वास हा “नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान” आहे. (१ पेत्र १:७) यास्तव, तुमच्या धार्मिक विश्‍वासाबद्दल तुमची थट्टा केली जाते तेव्हा असे समजा, की तुमचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी तसेच सहनशीलता दाखवण्यासाठी चालून आलेली ही एक संधी आहे. प्रेषित पौलाने लिहिले की, “धीराने अनुग्रह प्राप्त होतो.” (रोमकर ५:३-५; NW) होय, यहोवाचा अनुग्रह प्राप्त करण्याची मनीषाच आपल्या धार्मिक विश्‍वासांसाठी आपली थट्टा केली जाते तेव्हा तिचा सामना करण्यास एक जबरदस्त प्रेरणा ठरते!

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित

[२२ पानांवरील चित्र]

तुम्ही तुमच्या विश्‍वासाखातर बोलू शकता का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा