वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ६/१ पृ. २५-२८
  • ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दृढ विश्‍वासाची का जरुरी आहे?
  • ‘बचावासाठी तयारी करा’
  • “प्रत्येकासमोर बचावात्मक राहा”
  • मदत उपलब्ध
  • विश्‍वासूपणा आशीर्वाद आणतो
  • थट्टेचा सामना मी कसा करू शकतो?
    सावध राहा!—१९९९
  • तरुणांनो—यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुमची मुले शाळेत दृढनिश्‍चयी असतात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ६/१ पृ. २५-२८

ख्रिस्ती तरुणांनो विश्‍वासात दृढ राहा

“प्रत्येकाने उपस्थित राहिलेच पाहिजे,” अशी घोषणा केली गेली. एका जपानी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थनेसाठी सभागृहात उपस्थित राहायचे होते. एक तरुण ख्रिश्‍चन विद्यार्थी त्या शालेय गीतातील काही विचारांना मान्यता देऊ शकत नव्हता. त्याने विचार केला, “मला माहीत आहे की, आता शालेय गीत वाजवले जाईल. पण मला त्यात अवघड असे काही नाही. नेहमीप्रमाणे मी मागे बसून राहीन.”

जेव्हा त्या यहोवाच्या तरुण साक्षीदाराने सभागृहात प्रवेश केला तेव्हा त्याला असे आढळून आले की, शाळेतील सर्व सदस्य मागच्या बाकांवर बसले आहेत. म्हणून त्याला पुढे बसावे लागले. जेव्हा शालेय गीत सुरु झाले तेव्हा इतर विद्यार्थी उठून उभे राहिले. परंतु तो आदरदर्शक रितीने बसून राहिला. शिक्षकांना या गोष्टीचा राग आला व धक्काबुक्की करीत त्याला उभे करण्याचा प्रयत्न करू लागले. तुम्ही स्वतःला या परिस्थितीत कल्पू शकता का? तुम्ही काय केले असते?

दृढ विश्‍वासाची का जरुरी आहे?

जर ख्रिश्‍चनांना त्यांच्या इच्छेवर सोपवले व पवित्र शास्त्र शिकवणीनुसार असणाऱ्‍या विवेकबुद्धीने जीवन जगण्यास परवानगी दिली तर उत्तमच होते. परंतु बहुधा ख्रिश्‍चनांना नेहमी दबावाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण या गोष्टीचे आम्हाला आश्‍चर्य वाटता कामा नये. कारण स्वतः देवाचा पुत्र येशू ख्रिस्त म्हणालाः “जर ते माझ्या पाठीस लागले आहेत तर ते तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) पूर्णतया छळवादाशिवाय यहोवाच्या सेवकांना विश्‍वासाबाबत इतरही परिक्षांना तोंड द्यावे लागते.

शाळेमध्ये येणाऱ्‍या परिक्षांना तोंड देण्यासाठी ख्रिश्‍चन तरुणांना भक्कम विश्‍वासाची गरज आहे. घाणेरडे शब्द वापरणाऱ्‍या वर्गमित्रांशी किंवा परमेश्‍वराचा अनादर होणाऱ्‍या परिस्थितीशी त्यांचा संबंध येऊ शकतो. राष्ट्रीयत्वाला महत्त्व देणे, क्लबमध्ये समाविष्ट होणे, शाळेचे राजकारण व अध्यात्मिकतेला हानीकारक ठरणाऱ्‍या इतर गोष्टी यांना ख्रिश्‍चन तरुणांना नेहमी तोंड द्यावे लागते. शिक्षकांकरवी किंवा वर्गमित्रांकरवी तरुण ख्रिश्‍चनांवर तडजोडीसाठी दबाव येण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या आशेचे योग्य संरक्षण होण्यासाठी धार्मिक तरुणांनी विश्‍वासासाठी यहोवाच्या आत्म्यावर अवलंबून राहिले पाहिजे.—मत्तय १०:१९, २०; गलतीकर ५:२२, २३.

‘बचावासाठी तयारी करा’

तरुण व प्रौढ ख्रिश्‍चनांसाठी प्रेषित पौलाचा सल्ला अगदी उचित असा आहे. तो म्हणतोः “तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) मग, असा बचाव करण्यास तयार होण्यासाठी काय करावे लागते? प्रथमतः ही वचने आम्हास काय शिकवतात हे आम्ही आधी जाणून घेतले पाहिजे. शाळेतील गोष्टी जशा की, राष्ट्रीयत्व, राजकारण, मादक पदार्थांचे सेवन, नैतिक आचरण या गोष्टींबद्दल निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जी ख्रिश्‍चन भूमिका घ्यावयाची आहे ती प्रथम समजावून घ्या व प्रामाणिकपणे तिच्यावर विश्‍वास ठेवा.

उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने सहकारी ख्रिश्‍चनांना सांगितलेः “फसू नका; कुसंगतीने नीती बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) तुम्ही याच्याबरोबर सहमत आहात का? पौलाने दर्शविल्याप्रमाणे मैत्रीच्या बाबतीत फसवणूक होणे अगदी सोपे आहे. ती व्यक्‍ति मनमोकळी व आवडणारी असू शकेल; परंतु यहोवाच्या तुमच्या सेवाकार्याच्या संबंधात मान्यता दाखवत नाही किंवा पवित्र शास्त्रातील वचनांवर विश्‍वास दर्शवीत नाही, तर ही कुसंगती ठरते का? कारण त्याच्या जीवनाची रचना वेगळ्याच तत्त्वांवर झालेली आहे व ज्या गोष्टी ख्रिश्‍चनांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतील त्याच त्याला क्षुल्लक वाटतील.

यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. येशू त्याच्या शिष्यांविषयी म्हणाला होताः “जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) ज्या जगाचा देव सैतान आहे त्या जगाचा भाग बनून राहणे व त्याच वेळी एक खरी ख्रिश्‍चन व्यक्‍ति बनणे अशक्य आहे. भ्रष्टाचार, धडपड यांनी अनेकांना झपाटलेल्या या जगापासून वेगळे होणे हे किती सुरक्षिततेचे आहे हे तुम्ही जाणून आहात का? जर आहात तर हे वेगळेपण जोपासणे का महत्त्वाचे आहे हे तुम्ही समजू शकाल. मग त्यामुळे शाळेच्या काही हालचालीमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकला नाही तरी.a

विश्‍वासात खंबीर राहणे व राज्याची आस्था आयुष्यात प्रथमस्थानी ठेवणे या विषयीचे उदाहरण एका तरुण ख्रिस्ती मुलीच्या बाबतीत आम्ही पाहू शकतो. (मत्तय ६:३३) तिच्या शैक्षणिकतेची तालीम ज्या दिवशी होणार होती त्याच दिवशी यहोवाच्या साक्षीदारांचे विभागीय संमेलनही होणार होते. तिने येथे उपस्थित राहण्याचे ठरवले. तिने सभ्य भाषेत ती तालमीच्या वेळी अनुपस्थित का राहणार आहे त्याबद्दल पत्र लिहून वर्ग सुरु होण्याआधी शिक्षकांना दिले. वर्ग संपल्यानंतर शिक्षकांनी तिला बाजूला बोलावले व ती तालमीला का उपस्थित राहू शकणार नाही त्या कारणांचे स्पष्टीकरण परत विचारले. ती मुलगी म्हणतेः “त्यांना पहायचे होते की, मी तेच शब्द वापरत आहे का, ते खरोखर मनापासून होते अथवा ते केवळ माझ्या आईचे शब्द होते. व त्या बाबतीतील माझे निश्‍चित मत पाहून त्यांनी मला विरोध केला नाही.”

“प्रत्येकासमोर बचावात्मक राहा”

ख्रिस्ती तरुणांना एक गोष्ट आढळून आली आहे की जर त्यांनी त्यांची भूमिका शाळेच्या संचालन मंडळाला व विद्यार्थ्यांना स्पष्ट केली तर एखादा प्रश्‍न उद्‌भवल्यास येणारा दबाव एवढा भारी नसतो. एक जपानी तरुणी सांगतेः “जेव्हा ती ११ वर्षांची होती तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी नाताळाच्या मेजवानीस हजर राहावे असे शाळेतर्फे सांगण्यात आले. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तिने भाग घ्यावा असा दबाव आणला. परंतु ती उपस्थित राहिली नाही. तिच्या अध्यापकांना तिची भूमिका समजली. का? कारण शाळा सुरु होण्याच्या वेळेसच ती साक्षीदार व तिच्या पालकांनी शिक्षकांची भेट घेतली होती व त्यांच्या ख्रिश्‍चनत्वाचे वेगवेगळे पैलू त्यांना समजावून दिले होते.

कार्यक्षेत्रात भाग घेताना काही तरुण ख्रिश्‍चनांना ही भीती वाटत असते की, त्यांचे शिक्षक किंवा वर्गमित्र भेटतील. तुम्हालाही तसेच वाटते का? तर मग तुम्हीच पुढाकार घेऊन तुमच्या वर्गमित्रांना तुम्ही हे घरोघरचे प्रचारकार्य करता व का करता हे का सांगत नाही? एक १४ वर्षांचा यहोवाचा साक्षीदार म्हणतोः “ख्रिश्‍चन म्हणून माझी जी भूमिका आहे ती शाळेतल्या सर्वांना परिचित अशी आहे. व ती त्यांना सुपरिचित असल्यामुळे घरोघरचे कार्य करताना जर कोणी वर्गमित्र भेटलाच तर मी गोंधळून जात नाही. बहुतेकदा ते ऐकतात व पवित्र शास्त्राधारीत प्रकाशनेही घेतात.” एक १२ वर्षांचा साक्षीदार म्हणतोः “क्षेत्रकार्य करताना वर्गमित्र भेटण्याची मी अपेक्षा ठेवतो. व त्या विचाराने घाबरुन न जाता असे घडले तर काय काय बोलायचे याची रंगीत तालीम करत असतो.” अशा रितीने त्याच्या विश्‍वासाबद्दलची योग्य ती कारणे दाखविण्यास तो तयार होतो.

पुष्कळ शाळांमध्ये शाळेनंतरच्या कार्यहालचाली तुमच्या इच्छेवर अवलंबून असतात. परंतु सहसा असे दिसते की, त्या वैयक्‍तिकांवर या हालचालींमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षक अथवा विद्यार्थ्यांकडून दबाव आणला जातो. एका २० वर्षीय ख्रिस्ती तरुणीने या दबावावर एक चांगला तोडगा शोधून काढला. ती म्हणतेः “विद्यालयात असताना मी साहाय्यक पायनियर म्हणून सेवा केली. सर्वांना माहीत होते की, माझ्या धार्मिक हालचालींमध्ये मी इतकी मग्न होते की मी इतर गोष्टींमध्ये भागचं घेऊ शकत नव्हते.” या साक्षीदार तरुणाच्या बहिणीनेही तो मार्ग अनुसरला. काही तरुण ख्रिस्ती साहाय्यक पायनियर म्हणून शाळा सुरु होतानाच सुरवात करतात व पूर्ण वेळेचे राज्य-घोषक होण्यासाठी शाळा संपता संपता नियमित पायनियर बनतात.

तुमच्या चांगल्या वर्तणुकीच्या व धैर्याने केलेल्या साक्षीकार्याच्या परिणामांकडे दुर्लक्ष करू नका. शांत राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विश्‍वासात खंबीर आहात हे आदरपूर्वक परंतु धैर्याने बोलून का दाखवत नाही? हीच गोष्ट एका इस्राएली मुलीबाबत घडली होती. ती बंदिवान म्हणून अरामाचा सेनापती नामान याच्या घरी गेली होती. (२ राजे ५:२-४) त्या तरुण मुलीने पुढाकार घेतल्यामुळे यहोवाच्या नावाचे गौरव झाले. तुमच्याकडूनही असा विश्‍वास दाखविण्याद्वारे देवाचे गौरव होऊ शकते व इतरांनीही त्याच्या नावाची स्तुती करणारे होण्यासाठी मदत होऊ शकते.

एक गोष्ट सत्य आहे की, आमच्या विश्‍वासाशी तडजोड करून आम्ही ख्रिस्ती राहू शकत नाही. येशू म्हणालाः “जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.” (मत्तय १०:३२, ३३) येशूचा अनुकारी या नात्याने विश्‍वासात दृढ राहणे ही एक गंभीर जबाबदारी आहे, हो की नाही?

मदत उपलब्ध

यहोवाचा साक्षीदार या नात्याने ठाम भूमिका स्वीकारताना तुम्हाला बळकट विश्‍वासाची जरुरी आहे व त्यासाठी तुम्ही सातत्याने पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिले पाहिजे व क्षेत्रकार्यात स्वतःला गुंतवले पाहिजे. तरीही तुम्हाला वाटत राहील की, कशाचा तरी अजूनही अभाव आहे तर तुम्ही काय करू शकता? प्रेषित याकोब म्हणालाः “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याकोब १:५) तुमच्या समस्यांबद्दल प्रार्थनेत तुम्ही यहोवा देवाशी बोला. तुमच्या विश्‍वासाची परिक्षा होते तेव्हा तो तुम्हाला शक्‍ती देतो.

ख्रिस्ती तरुण अजून काय करू शकतो? नीतीसूत्राचे पुस्तक सांगतेः “तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक; आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ लेखू नको.” (नीती. २३:२२) प्रेषित पौलानेही या सल्ल्याला दुजोरा दिला आहे. तो म्हणालाः “मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे.” (कलस्सैकर ३:२०) विश्‍वासात दृढ राहण्यासाठी ख्रिस्ती पालक तुम्हाला मदत करतील. त्यांच्या सूचनांकडे लक्ष द्या. वचनांचा अभ्यास करण्यासाठी व पवित्र शास्त्राधारीत प्रकाशनांमधून कल्पना, सल्ला व अनुभव समजण्यासाठी त्यांची मदत घ्या. तुमचे पालक व तुम्ही दोघेही याचा आनंद उपभोगू शकाल व घाबरटपणावर किंवा भीतीवर मात करण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल.—२ तीमथ्य १:७.

सभांद्वारे यहोवा देव ज्या तरतूदी पुरवितो त्याचा पुरेपुर लाभ उठवा. सभांसाठी चांगली तयारी करा. नियुक्‍त वडिलांबरोबर किंवा इतरांबरोबर ज्यांना तुमच्यापुढे उभ्या असलेल्या समस्येचा अनुभव आहे, त्यांच्याशी बोला. शलमोन म्हणालाः “ज्ञानी पुरुषाने ऐकावे; त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा.” (नीतीसूत्रे १:५) मग या प्रौढ लोकांपासून शिकत राहा. तसेच तुमच्यासारख्याच समस्यांना यशस्वीतेने सोडविणाऱ्‍या ख्रिश्‍चन तरुणांकडूनही तुम्ही शिकू शकता.

विश्‍वासूपणा आशीर्वाद आणतो

विश्‍वासात खंबीर राहिल्याने तुम्ही पौलाचा सल्ला लागू करून घेताः “तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” (१ करिंथकर १५:५८) तुमच्या समस्या यहोवाला माहीत आहेत व तो त्या समजू शकतो. ज्यांना अशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले त्यांना त्याने शक्‍ती पुरवली आहे, व तुम्हालाही तो शक्‍ती पुरवेल. तुम्ही देवावर अवलंबून राहिला तर तो तुम्हाला साहाय्य करील; कारण स्तोत्रकर्ता म्हणतोः “तू आपला भार यहोवावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतीमानाला तो कधीही ढळू देणार नाही.”—स्तोत्रसंहिता ५५:२२.

पेत्राने लिहिलेः “ते सद्‌भाव धरुन द्या. ह्‍यासाठी की तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्‍यांनी लज्जित व्हावे.” (१ पेत्र ३:१६) देवाचे नीतीमान कायदे व तत्त्वे यांच्याशी जर तुम्ही तडजोड केली नाही तर तुम्हाला चांगली विवेकबुद्धी आहे व ती असणे हा यहोवा देवाकडून मिळालेला आशीर्वादच आहे. याशिवाय जे विश्‍वासात दुबळे आहेत अशा तरुण ख्रिश्‍चनांपुढे तुम्ही एक उदाहरण होऊ शकता. (१ तीमथ्य ४:१५, १६) तुमची वर्तणूक विश्‍वासात दृढ होण्याचे प्रयत्न करण्यास त्यांना उत्तेजनपर अशी होईल व त्यामुळे परिक्षांना तोंड देणे त्यांना शक्य होईल.

तुमच्या ख्रिस्ती भूमिकेला प्राथमिक विरोध करणाऱ्‍यांनाही तुम्ही मदत करू शकता. आशेला उत्तेजन देणारे हे शब्द आठवाः “सकाळी आपले बी पेर. संध्याकाळीही आपला हात आवरु नको; कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील; हे तुला ठाऊक नसते.” (उपदेशक ११:६) तुमच्या विश्‍वासाच्या कृत्यांद्वारे पेरले गेलेल्या चांगल्या बीजाचे कोणते चांगले परिणाम दिसून येतील हे कोणास ठाऊक आहे?

जे भव्य आशीर्वाद तुम्ही गोळा करणार आहात त्यातील एक आहे यहोवा देवाबरोबरील मान्यतेची भूमिका. मग आपोआपच विश्‍वासात खंबीर राहिल्याने उद्‌भवणारा परिणाम आहे—सार्वकालिक जीवन. (योहान १७:३; पडताळा याकोब १:१२.) परिक्षांना तोंड देताना केलेल्या तडजोडीमुळे मिळणारा तात्पुरता दिलासा हा केव्हाही ते बक्षिस गमावू देण्याच्या पात्रतेचा नाही.

या लेखाच्या आरंभी उल्लेखिलेल्या तरुणाबद्दल काय? होय, त्याने त्या दिव्याला धीराने तोंड दिले. शाळेची सभा संपल्यावर त्याने चातुर्याने त्याची भूमिका शिक्षकांना विदित करण्याचा प्रयत्न केला. जरी त्याचे शब्द बहिऱ्‍या कानांवरच आदळत होते तरी त्याने यहोवाचे अंतःकरण आनंदित केले याचे समाधान त्याला मिळाले. (नीतीसूत्रे २७:११) शालेय जीवन संपेपर्यंत विश्‍वासाचे रक्षण करण्याचे काम त्याने सातत्याने चालू ठेवले. नंतर तो पायनियर बनला. तुमच्या धैर्ययुक्‍त विश्‍वासालाही असेच फळ मिळो व ते मिळेलच, पण तुम्ही विश्‍वासात खंबीर राहिल्याचे सिद्ध केले तरच.

[तळटीपा]

a या व पवित्र शास्त्रातील इतर तत्त्वांची चर्चा करण्यासाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारा प्रकाशित झालेले क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक पहा.

[२७ पानांवरील चौकट]

मदत उपलब्ध

▫ तुमच्या देवभिरु पालकांच्या सूज्ञतेकडे कान द्या.

▫ ख्रिस्ती मंडळीतील आध्यात्मिक तरतूदींचा फायदा घ्या.

▫ तुमच्यासारख्याच समस्यांना अनुभवणाऱ्‍या इतरांशी व नियुक्‍त वडीलांशी बोलत राहा.

▫ तुमच्यासारख्या अडथळ्यांना यशस्वीरितीने तोंड देणाऱ्‍या इतर तरुण ख्रिश्‍चनांशी बोलणी करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा