वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ७/८ पृ. १४-२०
  • जीवघेण्या वादळातून निभाव!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवघेण्या वादळातून निभाव!
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • हाँडुरासवर मिचचा हल्ला
  • एल साल्व्हादोरमध्ये मिचच्या क्रोधाचा आविष्कार
  • निकराग्वाला मिच वादळाची फक्‍त झलक
  • ग्वातेमालात खळबळाट
  • मिचचा परिणाम
सावध राहा!—१९९९
g99 ७/८ पृ. १४-२०

जीवघेण्या वादळातून निभाव!

मागच्या वर्षी मिच चक्री वादळाने माजवलेला धुमाकूळ संपूर्ण जगभराच्या वृत्तपत्रांमधील ठळक बातम्यांमध्ये झळकला. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांनी या जीवघेण्या वादळाने घेरलेल्या लोकांना मोठ्या बहादुरीने मदत केली त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. परंतु, खरा ख्रिस्ती विश्‍वास आणि बंधुत्व सर्वात प्रतिकूल परिस्थितींमध्येही कशाप्रकारे विजयी होऊ शकते हे पुढील अहवालाने लक्षणीयरित्या दाखवून दिले आहे.

सन १९९८, ऑक्टोबर २२ रोजी नैर्ऋत्य कॅरिबियन समुद्रात एक घातक चक्रीवादळ सुरू झाले. उष्णकटिबंधीय न्यूनदाबाच्या रूपात त्याचा प्रारंभ झाला. २४ तासांच्या आत, त्याचे रूपांतर उष्णकटिबंधीय चक्रीवादळात झाले होते आणि त्याला मिच हे नाव देण्यात आले; ते वादळ इतके भयंकर होते की त्याचे नाव घेताच लोकांच्या अंगावर काटा येतो. मिच वादळ उत्तरेकडे अधिक जोरदार होत सरकत गेले. ऑक्टोबर २६ पर्यंत त्याचे रूपांतर पाचव्या श्रेणीतल्या अतितीव्र वादळात झाले होते; ताशी २९० किलोमीटर वेगाने कित्येक तास वारे वाहत होते आणि ३२० किलोमीटर वेगाने झंझावाती वारे वाहत होते.

सुरवातीला, असे वाटले जणू मिचचा तडाखा जमायका आणि केमन द्वीपांना बसणार आहे. त्याउलट, हे घातक चक्रीवादळ पश्‍चिमेला वळून थेट बेलीझकडे, मध्य अमेरिकेच्या किनाऱ्‍याकडे सरकू लागले. पण हल्ला करण्याऐवजी मिच फक्‍त हाँडुरासच्या उत्तर किनाऱ्‍यावर घातकपणे घोंघावू लागले. मग अचानक मिच वादळाचे भयनाट्य सुरू झाले. ऑक्टोबर ३० रोजी मिचने हाँडुरासवर हल्ला चढवून पुष्कळ वित्त आणि जीवित हानी केली.

हाँडुरासवर मिचचा हल्ला

मुसळधार वृष्टीच्या रूपाने मिचने आपले अस्तित्व प्रकट केले. तेगुचीगाल्पात राहणारे पूर्ण वेळेचे सेवक, बिक्टर आब्लार तो प्रसंग आठवून सांगतात, “शनिवारी, ऑक्टोबर ३१ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास आम्हाला गर्जनेचा प्रचंड आवाज ऐकू आला. उठून पाहिलं तर, लहानशा ओढ्याने चवताळलेल्या नदीचे रूप धारण केले होते! तिच्या प्रवाहात दोन घरे वाहून गेली, आत अडकलेली घरातली माणसं किंचाळतच राहिली!” शहराच्या दुसऱ्‍या एका भागात, ३२ माणसे डोंगराची कड घसरल्याने मृत्यूमुखी पडली; त्यामधील ८ जण साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करत होते. परंतु, बाप्तिस्मा प्राप्त केलेला एकही साक्षीदार ठार झाला नाही.

हाँडुरास येथील अधिकाऱ्‍यांनी तत्काळ निर्वासन केंद्रे उभारून संकटग्रस्तांना मदत दिली. शिवाय, एक आंतरराष्ट्रीय बचाव गटही मदतीला धावून आला; या गटामध्ये बऱ्‍याच देशांचे लोक सामील होते. “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे,” या बायबलमधील शब्दांच्या अनुषंगाने यहोवाच्या साक्षीदारांनी देखील मदतकार्य जोराने सुरू केले. (गलतीकर ६:१०) तातडीच्या मदत कार्य समिती प्रस्थापित करण्यात आल्या. किनारपट्टीच्या नगरांमधील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन साक्षीदारांनी एक बचाव मोहीम सुरू केली.

एडगार्डो आकोस्टा नावाचे एक साक्षीदार आठवून सांगतात: “शनिवारी, ऑक्टोबर ३१ रोजी आम्ही एक होडी घेतली आणि पूरग्रस्त भागात गेलो. आम्ही दोन बांधवांनाa वाचवू शकलो, पण सगळ्या बांधवांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या होडीची गरज होती हे आम्हाला तेव्हा कळालं. म्हणून आम्ही एक मोठी बोट घेतली आणि पुन्हा रविवारी सकाळी त्याच भागात गेलो. शेवटी, आम्ही मंडळीतल्या प्रत्येक सदस्याला बाहेर काढलं, त्यासोबत शेजाऱ्‍यापाजाऱ्‍यांनाही वाचवलं—वाचवलेल्यांमध्ये एकूण १८९ जण होते.”

क्वान आल्वारादो यांनी ला हुंटा येथील लोकांना वाचवण्यात सहकार्य केले. ते आठवून सांगतात: “‘बचाव! आम्हाला वाचवा!’ असे लोक ओरडत होते. माझ्या आयुष्यात मी असा भयंकर प्रसंग पाहिलेला नाही. बांधव असे अडकून पडले होते की कोठूनच वाट नव्हती. पुष्कळजण छप्परांवर होते.” यातून वाचलेल्या मारिया बोनिया सांगतात: “आजूबाजूचं पाणी जणू समुद्रासारखंच वाटत होतं. आम्ही सगळेजण रडत होतो.” पण वाचवण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले. यातून वाचलेले आणखी एक गृहस्थ, अंबरटो आल्वारादो यांनी असे सांगितले: “बांधवांनी फक्‍त आम्हाला वाचवलं नाही, तर आम्हाला आसरा देखील दिला, अन्‍नपाण्याची व्यवस्था केली आणि कपडालत्तासुद्धा दिला.” अंबरटो पुढे आठवून सांगतात: “हे बचाव कार्य पाहणाऱ्‍या एका व्यक्‍तीने म्हटले की, त्यांच्या चर्चमधल्या कोणाही व्यक्‍तीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही—फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना वाचवले. त्यांना याची खात्री पटली आहे की, यहोवाचे साक्षीदारच खऱ्‍या धर्माचे आचरण करतात!”

ला लिमा नावाच्या एका नगरात काही साक्षीदार एका घरामध्ये अडकून पडले होते. आजूबाजूचे पाणी वर चढू लागले तेव्हा छप्पराला भोक पाडून ते सगळे छप्पराच्या तुळयांवर चढून बसले. गाबी नावाच्या एक साक्षीदार सांगतात: “काही दिवसांसाठी पुरेल इतकं अन्‍नपाणी आमच्याजवळ होतं. पण ते संपल्यावर एक बंधू आपला जीव धोक्यात घालून नारळ काढायला पाण्यात उतरले. तणाव कमी करण्यासाठी आम्ही राज्य गीते गात होतो.” क्वान हे सेवा सेवक सांगतात: “आम्ही वाचू असं आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणून आम्ही टेहळणी बुरूज या बायबलवर आधारित असलेल्या पत्रिकेचा अभ्यास करण्याचं ठरवलं. आमच्या सगळ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले कारण आम्हाला वाटलं की हाच आमचा शेवटचा अभ्यास. पण अभ्यास केल्यानंतर आम्हाला खूपच धीर आला.” आठ दिवस हे लोक तशाच अवस्थेत होते; शेवटी अधिकाऱ्‍यांनी त्यांना वाचवले.

सुखरूप बचावूनही पूरग्रस्तांनी बरेच काही गमावले होते. लिल्यन नावाच्या एक साक्षीदार असे सांगतात: “कपडे, घरातलं सामानसुमान आणि घरातल्या लोकांचे फोटो वगैरे सगळं काही गमावल्यावर खूप दुःख होतं. घरात सर्वत्र चिखल, कचरा होता. सापही निघाले; सगळा भयंकर प्रकार होता!” येथे देखील ख्रिस्ती बंधुत्वाने अमूल्य मदत देऊ केली. लिल्यन आठवतात, “बांधव लगेच मदतीला धावून आले. माझे पती साक्षीदार नाहीत; ते म्हणाले, ‘यांचं ऋण कसं फेडायचं?’ त्यावर एक बहीण मला म्हणाली, ‘माझे कसले आभार मानता. मी तुमचीच बहीण आहे!’”

एल साल्व्हादोरमध्ये मिचच्या क्रोधाचा आविष्कार

पश्‍चिमेकडे एल साल्व्हादोरच्या दिशेने येता येता, मिच वादळाचा जोर कमी झाला. पण तरीही ते घातकच होते. त्या वेळी एल साल्व्हादोर येथील यहोवाचे साक्षीदार “ईश्‍वरी जीवनाचा मार्ग” प्रांतीय अधिवेशनाची जोराने तयारी करण्यात दंग होते. त्यासाठी ४०,००० हून अधिक लोक अपेक्षित होते. पण मिच वादळ आपल्या दिशेने येत असलेले पाहून, या अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे बांधवांना येता येणार नाही असे वाटू लागले. नद्या दुथडी भरून वाहत होत्या आणि वाटेत येईल ते—पीक, महामार्ग, घरे—सगळे काही गिळंकृत करत होत्या. जंगलतोडीने आधीच कमकुवत झालेले पर्वत ढासळत होते.

चिलांगगेरा नगरातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत, नेल्सन फ्लोर्स हे अध्यक्षीय पर्यवेक्षक होते. शनिवार, ऑक्टोबर ३१ रोजी, त्यांनी सकाळी उठून पाहिले तर नदीच्या पलीकडे चिलांगगेरा नगर जेथे होते तेथे काहीच राहिलेले नव्हते! पाचशे घरे वाहून गेली होती! आपल्या आध्यात्मिक बांधवांच्या चिंतेने, स्वतःच्या सुरक्षेचा किंचित विचारही न करता नेल्सन यांनी पूर आलेल्या नदीत उडी टाकली. नेल्सन आठवून सांगतात, “मी दुसऱ्‍या टोकाला पोचलो तेव्हा मी कुठं उभा आहे तेच मला कळेना. मी जवळजवळ दररोज याच क्षेत्रात घरोघरचं प्रचार कार्य केलं होतं पण मला एकही ओळखीचं चिन्ह दिसत नव्हतं!”

चिलांगगेरामध्ये त्या रात्री सुमारे १५० लोक मरण पावले होते. यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या अनेक व्यक्‍ती होत्या. परंतु, एकही बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार मरण पावला नाही.

लागलीच बचाव कार्य सुरू झाले. या मदतीचे आयोजन करण्यात ज्यांनी सहकार्य केले होते ते आरीसतेदेस एस्त्रादा सांगतात: “आम्हाला चिलांगगेरामध्ये जाण्याची परवानगी नव्हती. पाण्याची पातळी अजूनही वाढतच होती! मी ते दृश्‍य कधीच विसरणार नाही; एका बाजूला लोक बचाव बचाव ओरडत होते आणि दुसरीकडे बचाव करणाऱ्‍या कार्यकर्त्यांना त्यांना त्या अवस्थेत सोडून स्वतःचा जीव मुठीत धरून पळ काढावा लागला.” पण, कालांतराने सर्व बांधवांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. राज्य सभागृहांना निर्वासित केंद्रे म्हणून उपयोगात आणले गेले. शिवाय, जखमी लोकांमध्ये आणि बेघर झालेल्या लोकांमध्ये कोणी साक्षीदार आहेत का हे शोधण्याकरता बांधवांना दवाखान्यांमध्ये, शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी देखील पाठवले गेले होते. स्थानिक मंडळ्या तातडीने आवश्‍यक ती साधनसामग्री पुरवत होत्या.

पण ही साधनसामग्री वाटप केंद्रांपर्यंत आणणे काही सोपे काम नव्हते. कॉरिंटो नावाच्या एका नगरातले बांधव आपल्या शेतातले उत्पन्‍न गाडीत भरून निघाले, तर पर्वताची कड घसरल्याने त्यांचा रस्ता बंद झाला. मग त्यांनी काय केले? त्यांनी रस्त्यावरची माती खणून बाजूला काढली! सुरवातीला, आजूबाजूच्या लोकांना त्यांचे हसू आले. पण हळूहळू त्यांनीही मदत करायला सुरवात केली आणि रस्ता मोकळा झाला. कॉरिंटोचे बांधव पोचले खरे, पण ते सगळे चिखलाने माखलेले होते; तरीही आपल्या परीने मदत केल्यामुळे त्यांना आनंद झाला होता.

वॉच टावर संस्थेच्या शाखा दप्तराला वाटप केंद्र बनवण्यात आले होते. तेथे काम करणाऱ्‍या हिल्बर्टो यांनी दान केलेले सामान पोचवण्यात मदत केली होती; ते म्हणाले: “हे सगळं इतकं विलक्षण होतं की काय सांगू! इतक्या गाड्या आल्या की पार्किंगच्या ठिकाणी आणि शाखेच्या समोरच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी स्वयंसेवक नेमावे लागले.” अंदाजे २५ टन कपडालत्ता आणि १० टन अन्‍नसामग्री दान करण्यात आली. १५ स्वयंसेवकांची मदत घेऊन कपडे वेगळे करायला आणि पोस्त करायला चक्क एक आठवडा लागला.

निकराग्वाला मिच वादळाची फक्‍त झलक

मिच वादळ निकराग्वाच्या किनाऱ्‍याच्या जवळून गेल्यामुळे तेथेही मुसळधार वृष्टी होऊन पुष्कळ विध्वंस झाला. हजारो घरे उद्‌ध्वस्त झाली आणि महामार्ग नष्ट झाले. पॉसॉल्टेगा या नगराजवळ डोंगराची कड घसरल्याने अख्खीच्या अख्खी गावे शिवाय २,००० हून अधिक लोकही मातीखाली पुरली गेली.

निकराग्वा येथील साक्षीदारांना या दुर्घटनेची खबर मिळताच त्यांनी बऱ्‍याच मोठ्या प्रमाणावर मदत कार्याची आयोजना केली. स्वयंसेवकांना आपल्या बांधवांना शोधण्याच्या कष्टदायक आणि धोकेदायक मोहीमेवर पाठवण्यात आले! लेओन (पॉसॉल्टेगाच्या दक्षिणेला असलेले नगर) आणि चिचिगाल्पा (उत्तरेला असलेले नगर) येथून साक्षीदारांचे दोन गट पॉसॉल्टेगाकडे निघाले; प्रत्येक बांधवाकडे साधनसामग्रींचे मोठे ओझे होते. तेथे पोचण्याचा कोणताच मार्ग नाही अशी मदत कार्य करणाऱ्‍या कार्यकर्त्यांनी आधीच सूचना दिली होती, पण बांधवांनी मात्र जाण्याचा निर्धारच केला होता.

सोमवारी, नोव्हेंबर २ रोजी, लेओन येथील बांधवांनी भल्या पहाटेच एका ट्रकमध्ये साधनसामग्री भरली आणि ते वाहून गेलेल्या एका पुलापर्यंत येऊन पोहंचले. ट्रकमधले सामान उतरवल्यावर बांधवांनी सायकल चालकांचे दोन गट तयार केले: एक गट पॉसॉल्टेगाला जायला निघाला आणि दुसरा टेलीका या पूरग्रस्त नगराला जायला निघाला. बांधवांनी जाण्याआधी प्रार्थना केली. त्यांपैकी एकाने असे म्हटले की, “प्रार्थना केल्यावर आम्हाला प्रचंड शक्‍ती मिळाल्यासारखी झाली.” शक्‍ती तर त्यांना हवीच होती. त्यांना मोठमोठाले खड्डे पार करायचे होते; काहीवेळा त्यांना मातीवरून घसरत जावे लागले तर काहीवेळा त्यांना सायकली खांद्यांवर उचलून घ्याव्या लागल्या. रस्त्यात ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे अडथळे निर्माण झाले होते. शिवाय, जिकडे तिकडे साठलेल्या पाण्यात प्रेते तरंगत असलेली भयानक दृश्‍येही त्यांना पाहावी लागली.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, लेओन आणि चिचिगाल्पा येथून सायकलींवर निघालेले बांधव जवळजवळ एकाच वेळी पॉसॉल्टेगाला येऊन पोचले! बचाव गटातील नर्यो लोपस हे आठवून सांगतात: “माझ्या सायकलीचे टायर जीर्ण झाले होते. मला वाटलं की फक्‍त एक किंवा दोन किलोमीटरपर्यंतच ही चालेल.” पण, सायकल कशीबशी टिकली. तेथून परतत असतानाच सायकलीचे दोन्ही टायर कामातून गेले. परंतु, तेथे मदत घेऊन पोचणाऱ्‍यांपैकी आपले बांधवच पहिले होते. त्यांना तेथील ख्रिस्ती बंधू-बहिणी भेटले तेव्हा त्यांना केवढा आनंद झाला! एका बहिणीने म्हटले, “आमच्या बांधवांनी आम्हाला इतका आधार दिला आणि आमची इतकी मदत केली म्हणून मी यहोवाची आणि आमच्या बांधवांची कृतज्ञ आहे. आमचे बांधव इतक्या लवकर मदत घेऊन पोचतील अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती.”

पूरग्रस्त शहरांमध्ये सायकलींनी जाण्याच्या मोहीमांपैकी ही पहिलीच मोहीम होती; आणि बहुतेक वेळा असे घडले की, सर्वात आधी आपले बांधवच मदत कार्य करायला पोहंचले होते. लारेनागा या नगरात तर चक्क १६ बांधव सायकलींवरून आले! त्यांचे हे प्रयत्न पाहून तेथील बांधवांना अश्रू आवरता आले नाहीत. काही वेळा सायकलींवरून येणाऱ्‍या या बांधवांना आपल्या पाठीवर २० किलो वजनाची साधनसामग्री घेऊन यावे लागले. एल ग्वायाबोच्या नगरात तर दोन बांधवांनी १०० हून अधिक किलो वजनाची साधनसामग्री वाहून नेली! आपल्या सायकलीवर होता होईल तितके सामान लादून एका बांधवाने यशया ४०:२९ या बायबलमधील वचनावर मनन करून सांत्वन मिळवले; तेथे म्हटले आहे: “[यहोवा] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.”

टोनाला नगरातल्या साक्षीदारांचा अन्‍नपुरवठा संपल्यावर त्यांनी जबाबदार बांधवांना हे कळवण्यास एका बांधवाला धाडले. संदेश घेऊन बांधव तेथे पोचला तेव्हा अन्‍नपुरवठा आधीच पाठवून दिल्याचे ऐकून त्याला आश्‍चर्य वाटले! तो घरी परतला तेव्हा त्याच्यासाठी जेवण तयार होते. मार्लन चाव्हारिआ यांनी चिनानदेगाच्या आसपासच्या पूरग्रस्त भागांमध्ये साधनसामग्री पुरवली होती; ते आठवून सांगतात: “एका नगरात ४४ साक्षीदारांची कुटुंबे होती. परंतु, एकूण ८० कुटुंबांना मदत मिळाली कारण बांधवांनी आपला अन्‍नपुरवठा इतरांसोबत वाटला.”

ही मदत कार्ये अधिकाऱ्‍यांच्या लक्षात आली. वामब्लानच्या नगर अध्यक्षांनी साक्षीदारांना पत्रात असे लिहिले: “तुमच्याकडून काही मदत मिळेल या हेतूने आम्ही तुम्हाला पत्र लिहीत आहोत. . . . येथे वामब्लानमध्ये तुम्ही तुमच्या बंधू-बहिणींना मदत दिली हे आम्ही पाहिले आहे आणि आमच्याकरताही तुम्हाला काही करता येईल का हे जाणण्यासाठी आम्ही हे पत्र लिहीत आहोत.” यहोवाच्या साक्षीदारांनी हे पत्र मिळताच तत्काळ अन्‍नपाणी, औषधे आणि कपडालत्ता पाठवून दिला.

ग्वातेमालात खळबळाट

हाँडुरास आणि एल साल्व्हादोर येथे धुमाकूळ घातल्यावर मिचने ग्वातेमालात खळबळ माजवली. ग्वातेमाला शहराच्या दक्षिणेला राहणाऱ्‍या सारा आगुस्टीन ही साक्षीदार स्त्री उसळत्या पाण्याच्या आवाजाने जागी झाली. ती ज्या खोऱ्‍यात राहत होती तेथे पाण्याचा मोठा लोट वाहत होता. सहसा, बायबलमधील सत्य सांगण्याकरता ती शेजारपाजारच्या लोकांच्या घरी जात असे. पण आता त्या सर्वांना उठवण्याकरता ती प्रत्येक दार ठोकत होती! थोड्याच वेळात डोंगराची एक कड घसरली आणि अनेक शेजाऱ्‍यांची घरे त्याखाली पुरली गेली. सारा, फावडे घेऊन लोकांना वाचवू लागली; तिने सात लहान मुलांना देखील मातीच्या ढिगाऱ्‍याखालून बाहेर काढले. सारा दाईचे काम करायची; या मुलांपैकी एकाच्या जन्माच्या वेळी ती हजर होती. पण विल्मा नावाची एक किशोरवयीन मुलगी मात्र मरण पावली. साराने अलीकडेच तिला बायबल साहित्य देऊ केले होते.

मिच वादळाचा क्रोध पुष्कळसा शमला होता तरी पावसाचा सपाटा चालूच असल्यामुळे पीकांचे, पुलांचे आणि घरांचे फार नुकसान झाले. म्हणून ग्वातेमाला येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक शाखा दप्तरात साधनसामग्रीचा भरपूर पुरवठा पाठवण्यात आला तेव्हा यातील काही वस्तूंचा अधिक फायदा हाँडुरासमधील बांधवांना होऊ शकेल असे ठरवण्यात आले. पुष्कळ पूल नष्ट झाल्याने आणि विमानतळावर पाणी भरल्याने ही साधनसामग्री समुद्रावाटे पाठवावी लागली. शाखा दप्तरातील फ्रेथ ब्रून हे बांधव सांगतात: “आम्ही फायबर ग्लासची आठ मीटर लांबीची एक बोट भाड्याने घेतली आणि सोबत टनभर औषधे आणि कपडालत्ता घेऊन निघालो. खवळलेल्या समुद्रातून भयानक प्रवास करून सरतेशेवटी आम्ही ओमोआ बंदरावर उतरलो; पूर्ण चिंब भिजलेल्या अवस्थेत.”

मिचचा परिणाम

आग्नेय मेक्सिकोत आल्यावर मिच शमणार असे भासले. पण मिचने शेवटचा प्रयत्न म्हणून ईशान्येकडे वाटचाल केली आणि अमेरिकेत दक्षिण फ्लोरिडाला तडाखा दिला. पण मिच लवकरच मालवले. अटलांटिकमध्ये गेल्यावर मिच वादळ झपाट्याने विरून गेले. नोव्हेंबर ५ तारखेपर्यंत उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या सर्व सूचना रद्द करण्यात आल्या.

काही तज्ज्ञांच्या मते, “गेल्या दोन शतकांमध्ये पश्‍चिम गोलार्धाला तडाखा बसलेल्या अतितीव्र चक्रीवादळांपैकी [मिच] सर्वात भयंकर होते!” मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या अंदाजे ११,००० इतकी होती; हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. ३० लाखांहून अधिक लोक बेघर झाले किंवा त्यांचे बरेच नुकसान झाले. हाँडुरासचे राष्ट्रपती कार्लोस फ्लोर्स फाकुसे यांनी खेद व्यक्‍त करत म्हटले: “गेल्या ५० वर्षांमध्ये आम्ही जे टप्प्याटप्प्याने उभारले होते ते सर्वकाही नष्ट झाले.”

मिच चक्रीवादळात अनेक यहोवाच्या साक्षीदारांची घरे उद्‌ध्वस्त झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यांपैकी पुष्कळांच्या बाबतीत असे घडले की, त्यांची घरे जेथे होती तेथे जमीनच राहिली नव्हती! तरीपण, यहोवाच्या साक्षीदारांनी अनेकांची घरे दुरुस्त करायला किंवा पुन्हा बांधून काढायला मदत दिली.

मिच या अतितीव्र चक्रीवादळासारख्या दुर्घटना आपल्याला याची आठवण करून देतात की आपण ‘शेवटल्या काळाच्या कठीण दिवसांत’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) देवाचे राज्य जेव्हा पृथ्वीवरील सत्ता आपल्या हाती घेईल केवळ तेव्हाच अशा दुर्घटनांपासून खरी सुरक्षा प्राप्त होईल. (मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३, ४) तरीही, मिच वादळात, एकाही यहोवाच्या साक्षीदाराचा प्राण गेला नाही त्यासाठी ते आभारी आहेत.b तेथील अधिकाऱ्‍यांनी घरे सोडून जाण्यासाठी दिलेले आदेश पाळल्याने आणि स्थानिक मंडळ्यांनी केलेल्या सुव्यवस्थेमुळे पुष्कळांचा जीव वाचला.

गेल्या काही महिन्यांमध्ये, वादळग्रस्त भागांतील यहोवाच्या साक्षीदारांनी पुन्हा आपल्या आध्यात्मिक कार्यहालचालींचा नित्यक्रम सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, एल साल्व्हादोर येथे मिचचा तडाखा बसल्यानंतर काही दिवसांनीच वादळग्रस्तांना प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून व्यवस्था करण्यात आली. वाहतुकीसाठी भाड्याने बस घेतल्या होत्या आणि लॉजवर राहण्याची सोय करण्यात आली होती. शिवाय, आजारी लोकांना उपस्थित राहता यावे म्हणून वैद्यकीय उपचार देण्याची सोय देखील केली गेली होती! अधिवेशन यशस्वीपणे पार पडले; अधिकतम उपस्थिती ४६,८५५ इतकी होती—अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने ही उपस्थिती जास्त होती. मिच चक्रीवादळात आपले घर त्याचप्रमाणे व्यापार गमावलेले एल साल्व्हादोर येथील बंधू होसे रिव्हेरा म्हणाले, “या दुर्घटनेमुळे आम्हाला धक्का बसला होता. पण आम्ही संमेलनाहून परतलो तेव्हा बांधवांचा पाहुणचार पाहून आमची मनःस्थिती खूपच बदलली होती.” अहवालांनुसार, या देशांमधल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमधली उपस्थिती नाट्यमयरितीने वाढली आहे—बाहेरच्यांनी आपल्या बांधवांचे मदत कार्य पाहिल्याचा हा परिणाम आहे.

पण याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या साक्षीदारांवरच पडला आहे. हाँडुरासमध्ये वादळातून वाचलेले कार्लोस म्हणतात: “असं मी कधीच अनुभवलं नव्हतं. माझ्या बांधवांचं प्रेम आणि जिव्हाळा मी स्वतः अनुभवलाय.” होय, मिच वादळाने केलेली नासधूस इतिहासजमा होईल, परंतु यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता इतरांकरता जे प्रेम दाखवले ते कधीही विसरले जाणार नाही.

[तळटीपा]

a यहोवाचे साक्षीदार एकमेकांना “बंधू” आणि “बहीण” असे संबोधतात.

b वादळ शमल्यानंतर, संसर्गजन्य रोग पसरले. निकराग्वातील एक साक्षीदार यामुळे मरण पावला.

[१९ पानांवरील चौकट/चित्र]

शेजारच्या भागातले साक्षीदार मदतीला धावून येतात

मिच वादळाचा तडाखा बेलीझवर बसणार असे वेधशाळेतून कळताच त्या राष्ट्राने सगळी तयारी केली. तेथील सरकाराने सर्व किनारपट्टीच्या आणि खालच्या भागांतल्या लोकांना घरेदारे सोडून जाण्याचा आदेश दिल्याबरोबर यहोवाचे साक्षीदार सुमारे ८० किलोमीटर आतल्या भागात असलेल्या बेलमॉपान या राजधानीत किंवा उंच ठिकाणच्या इतर शहरांमध्ये निघून गेले.

सुदैवाने, बेलीझला मिच चक्रीवादळाचा तडाखा बसला नाही. परंतु, हाँडुरास, निकराग्वा आणि ग्वातेमाला येथील बांधवांच्या दुर्दशेबद्दल ऐकल्यावर बेलीझमधल्या बांधवांनी अन्‍न, कपडालत्ता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पैसे दान दिले.

खरे तर, शेजारपाजारच्या राष्ट्रांतील बांधवांनी अशीच प्रतिक्रिया दाखवली. कोस्टा रिका येथील बांधवांनी अन्‍नपुरवठा, कपडालत्ता आणि औषधे यांच्या चार मोठाल्या पेट्या पाठवल्या. दान केलेल्या वस्तू जमा करून, वेगवेगळ्या करून त्या पॅकबंद करण्यासाठी पनामा येथील बांधवांनी चार केंद्रे बनवली. काही दिवसांतच २०,००० किलोहून अधिक साधनसामग्री गोळा करण्यात आली होती. साक्षीदार नसलेले एक गृहस्थ म्हणाले: “मला वाटलं की लष्करच मदत कार्य देण्यात पहिला नंबर आहे. पण आता मला कळलं की यहोवाच्या साक्षीदारांचा खरं तर पहिला नंबर आहे.” आता, या गृहस्थाला बायबलमधील सत्ये सांगायला साक्षीदार त्यांना नियमितपणे भेटी देतात.

वाहतुकीचा व्यापार असलेल्या एका बांधवाने, निकराग्वाला साधनसामग्री घेऊन जाण्यासाठी एक सेमीट्रेलर आणि एक ट्रकचालक (साक्षीदार नसलेला) देऊ केला. पनामा आणि कोस्टा रिका या दोन्ही ठिकाणच्या जकातीवर अधिकाऱ्‍यांनी तपासणी न करता या ट्रकला सीमांवरून जाऊ दिले. एका पेट्रोल पंपाने ट्रकच्या दोन्ही टाक्यांसाठी फुकट इंधन देऊ केले—हे इंधन निकराग्वाला जाऊन येण्यासाठी पुरेसे होते! निकराग्वामध्ये देखील जकात नाक्यांवर ट्रकमधल्या सामानाची पाहणी झाली नाही. ते म्हणाले, “यहोवाच्या साक्षीदारांचे आहे ना, मग तपासण्याची काही गरज नाही. त्या लोकांचा आम्हाला कधीच त्रास झालेला नाही.”

परंतु, हाँडुरासला रस्त्याने माल पोचवणे शक्य नव्हते. तरीही, हाँडुरन परराष्ट्रीय वकिलातीत काम करणाऱ्‍या एका बहिणीने वकिलातीतर्फे विमानाने हा माल फुकटात पोस्त करण्याची सोय केली! अशातऱ्‍हेने १०,००० हून अधिक किलोग्रॅमचा माल पोस्त करण्यात आला.

मनोवेधक गोष्ट म्हणजे, साक्षीदारांचे मदत कार्य पाहून साक्षीदार नसलेले काहीजण फारच प्रभावित झाले. काही कंपन्यांनी पुठ्ठ्यांचे बॉक्स, चिकटवण्याचे टेप आणि प्लास्टिक डबे यांसारख्या वस्तू दान दिल्या. इतरांनी पैसे दिले आणि खरेदीच्या किंमतीवर सूट देऊ केली. हाँडुरासला पाठवणार असलेला माल उतरवण्यात २० साक्षीदार स्वयंसेवक साहाय्य करत असलेले पाहून पनामा येथील विमानतळावरील कामगार विशेषतः फार प्रभावित झाले. यांपैकी काही कामगारांनी आपसांत देणगी गोळा केली; ती देण्यासाठी ते दुसऱ्‍या दिवशी आले होते.

[२० पानांवरील चौकट/चित्र]

मेक्सिकोतही मदतकार्य

मेक्सिकोत, मिच वादळामुळे फारसे नुकसान झाले नाही. पण या चक्रीवादळाचा तडाखा मध्य अमेरिकेला बसण्याच्या काही आठवड्यांआधी मात्र चिआपास राज्यात भयंकर पूर आला. सुमारे ३५० वसतींवर त्याचा परिणाम झाला; काही नगरं तर पूर्णतः गायबच झाले.

साहजिकच, पूर आल्यामुळे त्या भागातल्या यहोवाच्या साक्षीदारांसमोर अनेक अडीअडचणी आल्या. परंतु, तेथील मंडळीतल्या वडिलांनी तत्काळ पावले उचलल्यामुळे या वादळाचा परिणाम इतका जाणवला नाही. उदाहरणार्थ, एका लहानशा वसतीत वडिलजन मंडळीतल्या एक अन्‌ एक सदस्याला जाऊन भेटले आणि पाऊस असाच चालू राहिला तर त्यांनी राज्य सभागृहात आसरा घ्यावा असे सांगितले. त्या वसतीत, सभागृह सर्वात मजबूत इमारत होती असे वाटत होते. पहाटेच्या वेळी पूर आलेल्या दोन नदींचा शहराला तडाखा बसला! साक्षीदार—तसेच त्यांचे पुष्कळसे शेजारी—राज्य सभागृहाच्या छप्परावर चढल्यामुळे बचावले. परंतु, एकही साक्षीदार मरण पावला नाही.

तरीही, मेक्सिकोतल्या सुमारे १,००० साक्षीदारांना सरकारने पुरवलेल्या निवास केंद्रांमध्ये जावे लागले. सुमारे १५६ घरे जमीनदोस्त झाली होती आणि २४ घरांना नुकसान पोचले होते. शिवाय, सात राज्य सभागृहे संपूर्णतः नष्ट झाली होती.

त्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांच्या आणि त्यांच्या शेजाऱ्‍यांच्या गरजा पुरवण्यासाठी सहा मदत समित्या संघटित करण्यात आल्या. अन्‍नपुरवठा, कपडालत्ता, ब्लँकेट व इतर वस्तूंचे लगेचच वाटप करण्यात आले. किंबहुना, स्थानिक अधिकाऱ्‍यांना ज्यावेळी या मदत कार्याविषयी कळवण्यात आले तेव्हा ते म्हणाले: “लष्कर देखील इतक्या लवकर मदत देऊ शकले नाही.”

यहोवाचे साक्षीदार कित्येक वर्षांपासून प्रामाणिकतेसाठी ओळखले जातात आणि त्यामुळे बहुधा त्यांचा फायदा झाला आहे. उदाहरणार्थ, काही लोकांनी स्थानिक अधिकाऱ्‍यांकडे मदत मागितली तेव्हा त्यांच्यात कोणी यहोवाचे साक्षीदार आहेत का असे अधिकाऱ्‍यांनी त्यांना विचारले. त्यांनी होकार दिल्यावर अधिकारी म्हणाले: “मग, त्यांच्यापैकी कोणा एकाला आणा म्हणजे आम्ही त्याच्याजवळ पुरवठा देऊ!”

एक स्थानिक वडील थोडक्यात असे म्हणतात: “ही दुर्घटना झाली असतानाही बांधवांनी सकारात्मक मनोवृत्ती राखली. स्वतःचा जीव धोक्यात घालून जवळपासच्या ठिकाणांहून अनेक बांधव अन्‍नपुरवठा तसेच आम्हाला दृढ करण्यासाठी बायबलची प्रकाशने घेऊन आले. यहोवाचे आभार मानायला आमच्याजवळ भरपूर कारण आहे.”

[१४ पानांवरील नकाशा/चित्र]

मेक्सिको

ग्वातेमाला

बेलीझ

एल साल्व्हादोर

हाँडुरास

निकराग्वा

कोस्टा रिका

[१५ पानांवरील चित्र]

हाँडुरास

◼ ग्वासेरिके नदी

[१६ पानांवरील चित्र]

एल साल्व्हादोर

◼ चिलांगगेरा येथील मुख्य रस्ता

◼ होसे लेमूस आणि त्यांच्या मुली, शिवाय राज्य सभागृह सहीसलामत

◼ होसे एर्नानदेस, आपल्या उद्‌ध्वस्त झालेल्या घरासमोर

[१७ पानांवरील चित्र]

निकराग्वा

◼ सायकलींवरून टेलिकाला गेलेला सर्वप्रथम गट

◼ एल ग्वायाबो येथील साक्षीदारांना अन्‍नपुरवठा मिळाल्याचा आनंद झाला

[१८ पानांवरील चित्र]

निकराग्वा

◼ स्वयंसेवक, पहिली काही घरे पुन्हा बांधताना

◼ स्थानिक मंडळीतील साक्षीदारांनी अन्‍नपदार्थांच्या पिशव्या भरण्यात मदत केली

[१८ पानांवरील चित्र]

ग्वातेमाला

◼ साराने चिखलाखाली दबलेल्या सात मुलांचा जीव वाचवला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा