बायबलचा दृष्टिकोन
देवाला तुमची किंमत आहे!
“आयुष्यात मला नेहमीच कमीपणा जाणवला आहे.” असे एका ख्रिस्ती स्त्रीने लिहिले. “माझं यहोवावर कितीही प्रेम असलं किंवा त्याची सेवा करायला मी कितीही प्रयत्न केले तरी मला नेहमी कुठंतरी कमी पडल्यासारखं वाटत राहतं.”
तुम्हाला कोणी असे ठाऊक आहे का ज्याला भयंकर अपुरेपणा किंवा कमीपणा वाटतो? की तुम्हालाच काही वेळा असे वाटते? असे वाटणे काही असामान्य गोष्ट नाही, अगदी देवाच्या विश्वासू उपासकांमध्येही. या ‘कठीण दिवसांत’ जीवनाच्या उतारचढावातून कोणीही चुकत नाही. ‘असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणे’ अशा “शेवटल्या काळी” सर्रासपणे दिसून येणाऱ्या वृत्तीच्या लोकांकडून अनेकांनी नको झाल्याची वागणूक आणि अत्याचार सहन केला आहे. (२ तीमथ्य ३:१-५) अशा वेदनामय अनुभवांच्या खोल भावनात्मक जखमा तशाच राहू शकतात आणि त्यामुळे भयंकर कमीपणा वाटू शकतो.
काही लोकांच्या स्वतःबद्दल फारच मोठ्या अपेक्षा असल्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. या अपेक्षा पूर्ण करू न शकल्यामुळे आपण कशाच्याच लायकीचे नाही ही भावना आणखीनच बळावते. कारण कोणतेही असले, तरी कमीपणाच्या भावनेशी झटत असलेल्यांना देव—किंवा दुसरा कोणीही त्यांच्यावर प्रेम करतो हे मान्य करणे कठीण वाटते. उलट, आपण अप्रियच आहोत असे त्यांना वाटू शकते.
परंतु, यहोवा देवाला तसे वाटत नाही! यहोवा आपल्याला त्याच्या वचनात त्याचा शत्रू, दियाबल सैतान याच्या ‘कुयुक्त्यांपासून’ सावध राहण्याचा इशारा देतो. (इफिसकर ६:११, सुबोध भाषांतर) आपण देवाची उपासना करण्याचे सोडून द्यावे म्हणून सैतान त्याच्या कुयुक्त्यांचा उपयोग करतो. त्यासाठी आपण काहीच कामाचे नाहीत, यहोवाला आपण कधीच प्रिय वाटणार नाही अशी भावना सैतान आपल्यामध्ये चेतवतो. पण सैतान “लबाड” आहे—इतकेच नव्हे तर, तो “लबाडीचा बाप आहे.” (योहान ८:४४) यास्तव आपण त्याच्या कुयुक्त्यांमध्ये फसू नये! बायबलमध्ये यहोवा स्वतः बोलतो आणि त्याच्या नजरेत आपण किती मोलाचे आहोत याची आपल्याला खात्री पटवतो.
आपल्या मूल्याबद्दल संतुलित दृष्टिकोन
निरुत्साहाचा आपल्यावर कोणता नकारात्मक प्रभाव पडू शकतो याची बायबल आपल्याला ताकीद देते. नीतिसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ति अल्प होय.” दीर्घकाळापर्यंत मनात राहिलेल्या नकारात्मक भावनांमुळे शक्ती कमी होत जाते आणि त्यामुळे कमकुवतपणा जाणवतो. याची सैतानाला पक्की खबर असते. शिवाय, आपले हृदय कमीपणाच्या भावनांनी भारावलेले असेल तर कठीण होऊन बसते. परंतु, सैतान अशा भावनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अधिकच तणाव निर्माण होतो.
म्हणून आपण किती मोलाचे आहोत असा स्वतःविषयी माफक, संतुलित दृष्टिकोन राखणे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने आर्जवले, “मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर . . . मर्यादेने स्वतःला माना.” (रोमकर १२:३) आणखी एक अनुवाद असा आहे: “मी तुम्हांतील प्रत्येकाला . . . इशारा देतो: स्वतःची योग्य किंमत ओळखून, स्वतःला त्याहून अधिक महत्त्व देऊ नका, तर आपली कार्यक्षमता सुज्ञतेने जोखून, . . . आपले मोल ठरविण्याचा प्रयत्न करा.” (सुबोध भाषांतर) अशातऱ्हेने शास्त्रवचन आपल्याला संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास उत्तेजन देते. एका बाजूला आपण अहंकारी होऊ नये तर दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या टोकालाही जाऊ नये कारण पौल असे सुचवतो की, समंजस मन असण्याकरता, थोडा न थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे. होय, ईश्वरी प्रेरणेने पौल हे दाखवतो की, यहोवाच्या नजरेत आपल्या प्रत्येकाला मूल्य आहे.
“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर” असे येशूने म्हटले तेव्हा त्याच्या शब्दांवरून स्व-मूल्याचा संतुलित अर्थही ध्वनित होतो. (मत्तय २२:३९) “स्वतःसारखी” हा शब्द दाखवून देतो की आपल्याला स्व-मूल्याची किंवा आत्म-सन्मानाची थोडीफार भावना तरी असलीच पाहिजे. हे खरे की आपण दोषी आहोत, आपल्या हातून चुका घडतात. पण आपण जेव्हा देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या हातून घडणाऱ्या चुकांबद्दल आपल्याला पस्तावा होतो व आपण त्याची माफी मागतो तेव्हा देखील आपण स्वतःला अगदीच कवडीमोल समजण्याची गरज नाही. स्वतःला दोष देणारे आपले मन उलटच सांगत असेल, पण लक्षात ठेवा, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे.” (१ योहान ३:२०) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपण स्वतःला ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यापेक्षा यहोवाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम निराळा आहे.
भग्न हृदये, अनुतप्त मने
स्तोत्रकर्त्या दावीदाने लिहिले: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) या वचनावर विवेचन मांडताना मॅथ्यू हेन्रीज कॉमेंटरी ऑन द होल बायबल असे म्हणते: “भग्नहृदयी आणि पश्चात्तापी प्रवृत्ती असणे अर्थात, पापामुळे नम्र होणे आणि स्वतःला कशाच्याच लायकीचे न समजणे; स्वतःला कमी लेखणे आणि स्वतःच्या योग्यतेचा भरवसा नसणे . . . ही लक्षणे नीतिमान लोकांचीच आहेत.”
“भग्नहृदयी” किंवा “अनुतप्त मनाच्या” लोकांना असे वाटेल की, यहोवा त्यांच्यापासून फार दूर आहे आणि ते क्षुद्र असल्यामुळे त्याचे त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही. पण हे खरे नाही. दावीदाचे शब्द आपल्याला याची खात्री देतात की, ‘स्वतःला कमी लेखणाऱ्यांना’ यहोवा त्यागत नाही. आपल्या कनवाळू देवाला ठाऊक आहे की, अशा वेळी आपल्याला त्याची जास्त गरज असते आणि तो आपल्या सन्निध असतो.
एक उदाहरण पाहा. काही वर्षांआधी एक माता अगदी लगबगीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला दवाखान्यात घेऊन आली कारण त्याला क्रूप नावाचा विकार झाला होता आणि तो गंभीर अवस्थेत होता. त्या मुलाची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी मुलाच्या आईला सांगितले की रात्रभर त्याला दवाखान्यातच ठेवावे लागेल. रात्री ती आई कोठे बसली असावी? रात्रभर ती त्याच्या उशाशी बसून राहिली. तिचा तो लहान मुलगा आजारी होता आणि ती त्याला या स्थितीत सोडून जाऊ शकत नव्हती. आपला प्रेमळ स्वर्गीय पिता, ज्याच्या प्रतिरूपात आपल्याला निर्माण केले गेले आहे त्याच्याकडून आपण निश्चितच याहून जास्त अपेक्षा करू शकतो. (उत्पत्ति १:२६; यशया ४९:१५) स्तोत्र ३४:१८ मधील हृदयस्पर्शी शब्द आपल्याला ही खात्री पटवतात की, आपण “भग्नहृदयी” असतो तेव्हा यहोवा एखाद्या प्रेमळ पालकाप्रमाणे आपल्या “सन्निध” असतो—सतत दक्ष, लक्षपूर्वक आणि मदतीला तयार असतो.—स्तोत्र १४७:१, ३.
“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे”
आपल्या पार्थिव सेवेच्या दरम्यान, येशूने यहोवाच्या विचारांविषयी आणि भावनांविषयी बराच खुलासा केला; शिवाय, आपल्या पार्थिव सेवकांबद्दल यहोवाला काय वाटते हे देखील त्याने सांगितले. पुष्कळ वेळा येशूने त्याच्या शिष्यांना ही खात्री पटवून दिली की, यहोवाच्या नजरेत ते मोलवान आहेत.—मत्तय ६:२६; १२:१२.
आपल्या प्रत्येक शिष्याचे व्यक्तिगत मोल किती असेल हे दाखवण्यासाठी येशूने दृष्टान्त देऊन असे म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९-३१) पहिल्या शतकातील येशूच्या श्रोत्यांकरता हे शब्द कोणता अर्थ राखून असतील याचा विचार करा.
स्पष्टतः, अन्नासाठी वापरण्यात येणाऱ्या पक्ष्यांपैकी चिमण्या या सर्वात स्वस्त होत्या. या लहान पक्ष्यांना पंख काढून बारीक काठ्यांवर अडकवून त्यांना कबाबसारखे भाजून काढण्यात येई. आपल्याला किती चिमण्या घेता येतील म्हणून बाजारामध्ये पैसे मोजणाऱ्या गरीब स्त्रियांना येशूने निश्चितच पाहिले होते. हे पक्षी इतके स्वस्त होते की, एका लहानशा दमडीला (शब्दशः एका असेरियोनसाठी अर्थात दोन रुपयांहून कमी किंमतीसाठी) दोन चिमण्या विकत घेता येऊ शकत होत्या.
येशूने हाच दृष्टान्त नंतर पुन्हा दिला—पण त्यात थोडासा फरक होता. लूक १२:६ नुसार येशू म्हणाला: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही?” विचार करा. फक्त एका दमडीत दोन चिमण्या. पण दोन दमड्या दिल्या तर चार नव्हे तर पाच चिमण्या. एक चिमणी फुकटात, जणू तिला काही किंमतच नव्हती. “तरी,” येशू म्हणाला “त्यांपैकी एकीचाहि [त्या फुकट दिलेल्या चिमणीचाही] देवाला विसर पडत नाही.” हा दृष्टान्त कसा लागू होतो ते सांगितल्यावर येशू शेवटी म्हणाला: “तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:७) येशूच्या श्रोत्यांना या शब्दांनी किती प्रोत्साहन मिळाले असावे!
येशूच्या या दिलासा देणाऱ्या दृष्टान्ताचे तात्पर्य तुम्हाला समजले का? अगदी लहान पक्षी देखील यहोवाच्या नजरेत मूल्यवान असले, तर त्याचे पार्थिव सेवक त्याला किती प्रिय असले पाहिजेत! यहोवाच्या नजरेत, आपल्यापैकी कोणीही गर्दीतला निव्वळ एक चेहरा नाही. आपण प्रत्येकजण यहोवाला इतके मोलाचे आहोत की, आपल्या बारीकसारीक तपशीलांचीही तो दखल घेतो—आपल्या डोक्यावरचे केससुद्धा मोजलेले आहेत.
अर्थात, आपण यहोवाची सेवा करण्याचे थांबवावे म्हणून सैतान त्याच्या “कुयुक्त्या” वापरत राहील—जसे की, कमीपणाच्या भावनांचा गैरफायदा घेणे. पण सैतानाला विजयी होऊ देऊ नका! सुरवातीला सांगितलेल्या ख्रिस्ती स्त्रीची आठवण करा. तिला टेहळणी बुरूज नियतकालिकातल्या एका लेखातून मदत मिळाली होती; सैतान आपल्या भावनांचा कसा फायदा उचलतो त्याविषयी त्यात इशारा दिला होता.a ती म्हणते: “माझ्या भावनांद्वारे सैतान मला निरुत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय हे माझ्या लक्षात कधी आलेच नाही. हे माहीत झाल्यामुळे मला या भावनांवर मात करायला प्रेरणा मिळते. आता आत्मविश्वासाने मी सैतानाच्या या हल्ल्यांना तोंड देऊ शकते.”
यहोवा “सर्व काही जाणतो.” (१ योहान ३:२०, पं.र.भा.) होय, आपण सध्या काय सहन करत आहोत हे तो जाणतो. त्याचप्रमाणे, गतकाळात आपण काय सहन केले आहे ज्यामुळे आपला आत्मसन्मान चिरडला गेला असेल ते देखील तो जाणतो. लक्षात ठेवा, यहोवाचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे! आपण स्वतःला कितीही अप्रिय किंवा कमी लेखत असलो, तरी यहोवाला त्याचा प्रत्येक सेवक मोलाचा वाटतो याची हमी तो आपल्याला देतो. आपण यहोवाच्या शब्दावर भरवसा ठेवू शकतो कारण देव सैतानाप्रमाणे नाही; देवाच्याने “असत्य बोलवतच नाही.”—तीत १:२, पं.र.भा.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूजच्या एप्रिल १, १९९५ अंकातील पृष्ठे १०-१५ वरील “तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!” हा लेख पाहा.
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
प्रेमळ पालकाप्रमाणे यहोवा दुःखी असलेल्यांच्या सन्निध असतो
[१३ पानांवरील चित्रं]
यहोवा छोट्याशा चिमणीला विसरत नाही, तर तो तुम्हाला कसा काय विसरेल?
[चित्राचे श्रेय]
Lydekker
Illustrated Natural History