देवाच्या जवळ या
आपली दखल घेणारा व आपल्याला मौल्यवान लेखणारा
“आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते.” असे म्हणून, बायबल हे कबूल करते की मनुष्याचे मन, किंवा हृदय कधीकधी त्याला स्वतःविषयी खूपच टीकात्मक भूमिका घेण्यास प्रवृत्त करू शकते. इतकेच काय तर, देवाने आपल्यावर प्रेम करावे व आपली काळजी घ्यावी इतकी आपली लायकी नाही असेही ते वारंवार आपल्याला वाटायला लावू शकते. पण बायबल आपल्याला हे आश्वासन देते: “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” (१ योहान ३:१९, २०) हो, आपणही स्वतःला ओळखत नाही तितक्या चांगल्याप्रकारे देव आपल्याला ओळखतो. आपण स्वतःकडे ज्या दृष्टिकोनाने पाहतो, त्यापेक्षा देवाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा असू शकतो. आणि खरे पाहिल्यास, यहोवा देवाचा दृष्टिकोनच सर्वात महत्त्वाचा आहे. तर मग, त्याच्या नजरेत आपले मोल काय आहे? या प्रश्नाचे उत्तर येशूने दोन वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगात आणलेल्या एका हृदयस्पर्शी उदाहरणात सापडते.
एके प्रसंगी येशूने म्हटले, की “दोन चिमण्या दमडीला विकतात.” (मत्तय १०:२९, ३१) लूक १२:६, ७ यानुसार, येशूने असेही म्हटले: “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. . . . भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” या साध्याशाच पण अतिशय बोलक्या उदाहरणातून, यहोवा आपल्या प्रत्येक उपासकाकडे कशा दृष्टिकोनाने बघतो हे आपल्याला समजते.
येशू पृथ्वीवर होता त्या काळात, आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या पक्ष्यांपैकी चिमण्या सर्वात स्वस्त होत्या. येशूने पुष्कळदा गरीब बायकांना, कदाचित त्याच्या स्वतःच्या आईलाही, बाजारात हे इवलेसे पक्षी आपल्या कुटुंबाकरता विकत घेताना नक्कीच पाहिले असेल. येशूने उल्लेख केलेल्या एका नाण्याचे मोल आजच्या चलनात पाच पैशांपेक्षाही कमी आहे. अशा एका नाण्याच्या मोबदल्यात त्याकाळी दोन चिमण्या मिळत. हे पक्षी इतके स्वस्त होते की तुम्ही जर दोन नाणी दिलीत तर तुम्हाला चार नव्हे तर पाच चिमण्या मिळायच्या. एक जास्तीची चिमणी फुकट दिली जायची.
या उदाहरणाचे स्पष्टीकरण देताना येशूने म्हटले, की एकाही चिमणीचा कधी “देवाला विसर पडत नाही” आणि “पित्यावाचून त्यांतून एकहि भूमीवर पडणार नाही.” (मत्तय १०:२९) दुखापत झाल्यामुळे एखादी चिमणी जमिनीवर पडते किंवा दाणापाणी शोधण्यासाठी जमिनीवर बसते, त्या प्रत्येकवेळी यहोवा तिची दखल घेतो. आपले कदाचित या पक्ष्यांकडे लक्षही जाणार नाही, पण यहोवाने ज्याअर्थी त्यांना निर्माण केले आहे त्याअर्थी तो त्यांची दखलही नक्कीच घेतो. किंबहुना, सजीव वस्तूंपैकी असल्यामुळे तो त्यांना मौल्यवान लेखतो. येशूला या उदाहरणातून काय सांगायचे होते हे तुमच्या लक्षात आले का?
लोकांना शिकवताना, येशू बरेचदा दोन गोष्टींची तुलना करत असे. एखादा साधासा मुद्दा सांगून, त्यावरून एखाद्या जास्त महत्त्वाच्या विषयासंबंधी निष्कर्ष काढण्यास तो आपल्या श्रोत्यांना मदत करत असे. उदाहरणार्थ, येशूने असेही म्हटले: “कावळ्यांचा विचार करा; ते पेरीत नाहीत व कापणीहि करीत नाहीत; त्यांस कणगी नाही व कोठारहि नाही; तरी देव त्यांचे पोषण करितो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहा!” (लूक १२:२४) आता येशूच्या उदाहरणातील कळीचा मुद्दा स्पष्ट होतो: जर यहोवा या चिमुकल्या पक्षांची काळजी घेतो, तर मग त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व त्याची उपासना करणाऱ्या मानवांची तो किती जास्त काळजी घेईल!
येशूने जे सांगितले त्यानुसार, देवाने आपली दखल घ्यावी किंवा आपली काळजी करावी इतकी आपली लायकी नाही असा आपण कधीही विचार करू नये. कारण “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे.” जे आपण स्वतःमध्ये पाहू शकत नाही, ते आपला निर्माणकर्ता पाहू शकतो या विचाराने किती दिलासा मिळतो, नाही का? (w०८ ४/१)
[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]
Sparrows: © ARCO/D. Usher/age fotostock