वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ८/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काळाच्या उदरात गडप होणाऱ्‍या भाषा
  • वाहन चालवताना राग आवरणे
  • हारवलेले हास्य
  • जागतिक निरक्षरतेचे वाढते प्रमाण
  • इ.स. २००० वर्षाचे खुळ
  • यान्से नदीचे रौद्ररुप पालटणे
  • दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली?
  • हवामान क्षतीचे उच्चांक
  • तणावग्रस्त कुटुंबे
  • तुम्हाला निवड करण्याचा हक्क आहे
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • गर्भपात—कोणत्या किमतीला?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-४ (gbr8-4)
  • विश्‍वासास आव्हान देणाऱ्‍या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ८/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

काळाच्या उदरात गडप होणाऱ्‍या भाषा

मारी स्मिथ जोन्स म्हणतात: “मी माझ्या मुलांना आमची मातृभाषा शिकवली नाही याचा आता मला पस्तावा होतोय.” त्या आपल्या समाजातील अलास्काची ईयाक भाषा बोलणाऱ्‍या शेवटच्या व्यक्‍ती आहेत. जगभरात बोलल्या जाणाऱ्‍या अंदाजे ६,००० पैकी ४० ते ५० टक्के भाषा पुढील शतकापर्यंत लुप्त होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशात जिथे एकेकाळी २५० भाषा बोलल्या जात होत्या तिथे आता मोजून २० भाषा बोलल्या जातात. याचे कारण का? न्यूजवीक नियतकालिकानुसार, “इंग्रजी भाषेच्या आणि त्यासारख्या इतर ‘प्रमुख’ भाषांच्या प्रसारामुळे बऱ्‍याचशा भाषा काळाच्या उदरात गडप होत चालल्या आहेत.” यास दुजोरा देत, युनेस्कोद्वारे प्रकाशित ॲट्‌लस ऑफ द वल्ड्‌र्स लँग्वेजस इन डेंजर ऑफ डिसअपिअरिंगचे संपादक, प्राध्यापक स्टीफन वूर्म म्हणतात: “लोकांचे असे एक सर्वसामान्य मत आहे, की जास्त प्रचलित नसलेल्या ‘लहान’ भाषांना आता महत्त्व न राहिल्यामुळे त्यांचे विस्मरण झालेलेच बरे.”

वाहन चालवताना राग आवरणे

कार-रेसिंगमध्ये नाव कमावलेल्या एका व्यक्‍तीने फ्लीट मेन्टेनेन्स ॲण्ड सेफ्टी रिपोर्ट नियतकालिकाशी बोलताना असा सल्ला दिला, की “भयंकर रागात गाडी चालवण्याच्या बाबीला क्षुल्लक लेखले जाऊ नये.” वाहन चालवताना डोके शांत ठेवल्याने आणि रागाला चेतविणारी परिस्थिती टाळल्याने रस्त्यातील बरेचसे धोके टाळता येण्यासारखे आहेत. त्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्‍यांनी पुढील काही गोष्टी सुचवल्या आहेत:

◼ रस्त्यावर आपल्याशिवाय इतरही लोक वाहन चालवतात याचे भान ठेवून गाडी चालवा.

◼ रागाने पेटून उठलेल्या वाहन चालकाला सुरक्षितपणे टाळता आल्यास तसे करा.

◼ एखाद्या वाहन चालकाचा पिच्छा पुरवून किंवा ओव्हर्टेक करण्याचा प्रयत्न करून त्याला कधीच आव्हान करू नये.

◼ धमकी देणाऱ्‍या हावभावांना त्याच पद्धतीने प्रतिसाद देऊ नका आणि चुकीचा अर्थ देतील असे हावभाव टाळा.

◼ भडकलेल्या वाहन चालकांच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याचे टाळा.

◼ गाडी थांबवून कोणाही वाहन चालकाला धमकी देऊ नका.

हारवलेले हास्य

अलीकडेच स्वित्झरलँडमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय हास्यविनोद परिषदेने सादर केलेल्या माहितीनुसार पन्‍नाशीच्या दशकातील आर्थिक मंदीच्या काळात सर्वसामान्य मनुष्य दिवसाकाठी १८ मिनिटे हसायचा; पण, सध्याच्या समृद्ध दशकात मात्र मनुष्य दिवसाला फक्‍त ६ मिनिटे हसतो. याचे कारण काय? यावर खुलासा करताना लंडनचे सन्डे टाईम्स वृत्तपत्र म्हणते: “तज्ज्ञांच्या मते पैसा, करिअर आणि स्वार्थासाठी सतत धडपड चालू असल्यामुळे हे घडते; आणि यावरून, पैसे देऊन सुख विकत घेता येत नाही हेच खरे.” म्हणूनच, लेखक मायकल आरगाइल शेवटी म्हणतात: “जे लोक पैशाला देव मानतात ते जास्त समाधानी नसतात शिवाय त्यांचे मानसिक आरोग्यही खालावत जाते. कदाचित, पैशामुळे मिळणारे सुखसमाधान उथळ आणि क्षणभंगुर असते हे त्याचे कारण असावे.”

जागतिक निरक्षरतेचे वाढते प्रमाण

द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रानुसार, “जगातल्या ५.९ अब्ज लोकांपैकी जवळजवळ एक षष्ठांश लोकांना लिहितावाचता येत नाही.” आणि निरक्षरतेची ही समस्या पुढे आणखीन बिकट होण्याची दाट शक्यता आहे असे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंडचा (युनिसेफ) अंदाज आहे. याचे कारण, जगातल्या सगळ्यात गरीब राष्ट्रांत ४ पैकी ३ मुलांना शाळा काय हेच माहीत नसते. शिवाय, हल्लीच्या वांशिक संघर्षांनी केवळ आर्थिक समस्याच निर्माण केल्या नाहीत; तर, मुलांना शिक्षणापासून वंचितही ठेवले आहे. या युद्धांनी शिक्षणसंस्था तर नष्ट केल्याच केल्या पण त्यासोबतच युद्धांमुळे पाठ्यपुस्तकांऐवजी अनेकानेक मुलांच्या हातात बंदुका थमावल्या जातात. निरक्षरतेमुळे सामाजिक समस्या वाढतात यात शंका नाही. द स्टेट ऑफ वल्ड्‌र्स चिल्ड्रन १९९९ हा युनिसेफचा अहवाल म्हणतो, की निरक्षरता आणि जनन प्रमाण या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी थेट संबंध आहे. उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील एका देशात, “निरक्षर मातांना सरासरी ६.५ मुले तर माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण झालेल्या मातांना २.५ मुले आहेत” असे टाईम्सचे म्हणणे आहे.

इ.स. २००० वर्षाचे खुळ

नॅन्डो टाईम्सच्या अहवालानुसार, “इ.स. २००० वर्षावरून निर्माण होणाऱ्‍या” संभाव्य अराजकतेला तोंड देता यावे म्हणून “टेम्पल माउन्टची सुरक्षा व्यवस्था आणखीन वाढवण्यासाठी [इस्राएली] सरकारने १.२ कोटी डॉलर इतकी रक्कम मंजूर केली आहे.” यहुदी मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी यहुदी आणि धर्मवेडे “ख्रिस्ती” लोक टेम्पल माउन्टवरील मशीदी पाडतील की काय अशी भयशंका पोलिसांना वाटते. काही “ख्रिस्ती” पंथांचे म्हणणे आहे, की असे केल्याने जगाचा अंत आणि ख्रिस्ताचे दुसरे आगमन लवकरात लवकर होईल. सदर अहवालानुसार, मुस्लिम लोक ज्यास अल-हरम-अल-शरीफ म्हणतात ते टेम्पल माउंट “मध्यपूर्व संघर्षातले सगळ्यात वादग्रस्त ठिकाण असल्याचे समजले जाते.” सन १९६७ च्या मध्यपूर्व लढाईत इस्राएलने जॉर्डनकडून हस्तगत केलेल्या प्राचीन यरुशलेमच्या तटबंदी शहरात टेम्पल माउंट वसलेले आहे. ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या अपेक्षेत कितीतरी ‘ख्रिश्‍चनांनी’ आताच माउन्ट ऑफ ऑलिव्हवर जागा भाड्याने घेतली आहे.

यान्से नदीचे रौद्ररुप पालटणे

चीनच्या यान्से नदीवरील द थ्री गॉर्जस धरणाचे बांधकाम पूर्ण झाले, की ते जगातले सर्वात मोठे जलविद्युत केंद्र होईल. या धरणाची उंची ६०७ फूट, विस्तार १.४ किलोमीटर इतका असेल आणि या धरणामुळे १ कोटी ८२ लाख किलोवॅट शक्‍तीची निर्मिती हाईल. पण, जलविद्युत शक्‍तीची निर्मिती करणे हा या धरण बांधण्यामागचा एकमेव उद्देश नाही. यान्से नदीला वारंवार येणाऱ्‍या पुराचे प्रमाण कमी करणे हा या धरण बांधण्यामागचा हेतू आहे. सन १९९४ मध्ये सुरू झालेले हे बांधकाम २००९ साली पूर्ण होईल असे म्हटले जाते. या प्रकल्पासाठी एकूण १९ कोटी २० लाख घन मीटर साध्या आणि खडकाळ जमिनीचे उत्खनन करून त्यात ३ कोटी घन मीटर काँक्रीटची भर घालावी लागेल; त्यासोबतच जवळजवळ २० लाख टन स्टीलचा वापर केला जाईल. “पण, यात सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे तो या प्रकल्पाच्या जवळपास राहणाऱ्‍या ११ लाख लोकांच्या पुनर्वसनाचा,” असे चायना टुडे म्हणते.

दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांवरून, मागच्या १० वर्षांच्या काळात दम्याच्या केसेस आणि त्यावरील उपचारखर्च या दोन्ही गोष्टींत ४० टक्के वाढ झाल्याचे सूचित होते. या वाढीचे कारण काय? अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशिएन्सच्या सदस्यांचे म्हणणे आहे, की हल्ली घरामध्ये प्राणी पाळण्याच्या प्रमाणात एकाएकी लक्षणीय वाढ झाल्यामुळे तसेच खेळत्या हवेचा अभाव असलेल्या कोंदट, गजबजलेल्या घरांमध्ये राहण्याच्या पद्धतीमुळे दम्याच्या रोगात वाढ होत आहे. दम्याचे झटके अनेक कारणांमुळे येऊ शकतात जसे की, “प्राण्यांची त्वचा, त्याची लोकरयुक्‍त कातडी आणि पिस, धुळीतले किडे, बुरशी, सिगारेटचा धूर, पुष्परेणू, पर्यावरणातील प्रदूषण आणि उग्र वास,” असे टोरन्टो स्टारचे म्हणणे आहे. पण, यांपैकी अलर्जीचे सगळ्यात सर्वसामान्य कारण म्हणजे मांजरीचे केस. सदर वृत्तपत्राने म्हटले, की दम्यामुळे ओढवणारे बरेचसे मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत; त्यामुळे दम्याचा हा रोग आता एक चिंताजनक विषय बनला आहे. कॅनडामध्ये सध्या जवळजवळ १ कोटी ५० लाख लोकांना दमा आहे तर दर वर्षी या रोगामुळे सुमारे ५०० लोक मृत्युमुखी पडतात.

हवामान क्षतीचे उच्चांक

सन १९९८ च्या पहिल्या ११ महिन्यांच्या काळात हवामाननिगडित दुर्घटनांमुळे जगभरात कधी नव्हे इतके म्हणजे ८९ कोटी डॉलरचे नुकसान झाले. हे नुकसान, “१९८० च्या संबंध दशकात झालेल्या ५५ कोटी डॉलर नुकसानाच्या तुलनेत खूप होते,” असा असोशिएटेड प्रेसचा अहवाल म्हणतो. सदर अहवाल पुढे म्हणतो की, चलनवाढीमुळे आलेला फरक लक्षात घेतला तरीसुद्धा १९८० दशकात झालेले ८२ कोटी ७ लाख डॉलरचे नुकसान, १९९८ च्या पहिल्या ११ महिन्यांत झालेल्या नुकसानाच्या तुलनेत कमी आहे. वादळ, पूर, आग, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक दुर्घटनांत वित्तहानीसोबतच अंदाजे ३२,००० लोकांची जिवितहानी झाली आहे. वर्ल्डवॉच इंस्टिट्यूटचे सेथ डन यांच्या मते, “अशा नैसर्गिक दुर्घटनांसाठी अप्रत्यक्षपणे खरं तर मनुष्यच जबाबदार आहे.” ते कसे काय? डन यांच्या म्हणण्यानुसार एकेकाळी ज्या ठिकाणी ‘पावसाचे पाणी शोषून घेणारी’ झाडेझुडपे आणि ओलसर जमिनीचे प्रदेश होते ते जंगलतोडीमुळे ओसाड झाले आहेत; परिणामस्वरूप या समस्येत आणखीनच भर पडली आहे.

तणावग्रस्त कुटुंबे

अलीकडे केलेल्या एका कनेडियन सर्वेक्षणात शेवटी असे निदर्शनास आले, की पन्‍नासएक वर्षापूर्वीच्या म्हणजे दुसऱ्‍या महायुद्धानंतरच्या कुटुंबाच्या तुलनेत हल्लीच्या कुटुंबावर अधिक आर्थिक आणि भावनिक तणाव आहे. नॅशनल पोस्ट वृत्तपत्राच्या अहवालानुसार घटस्फोट आणि मोडकळीस येणारी कुटुंबे ही कुटुंबाच्या तणावाची सर्वात प्रमुख कारणे आहेत. त्या खालोखाल असणारी इतर प्रमुख कारणे म्हणजे, “हल्लीचे पालक तास न्‌ तास कष्ट करतात, नोकरी हातून जाण्याच्या भीतीखाली ते सतत वावरत असतात, त्यांना भरमसाट कर भरावे लागतात आणि मुलांच्या संगोपनासाठी ते जे कष्ट करतात त्याबद्दल मुलांना काहीएक कदर नसते.” आणि हा ताण एक-पालक कुटुंबात सर्वाधिक प्रमाणात असल्याचे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांनी कबूल केले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा