वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. १४-२३
  • कमिनियस—आधुनिक शिक्षणपद्धतीचे शिल्पकार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कमिनियस—आधुनिक शिक्षणपद्धतीचे शिल्पकार
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संगोपन आणि शिक्षण
  • ते हद्दपार का झाले
  • “मनांचे कसाईखाने”
  • नव्या शिक्षणपद्धतीचा उदय
  • जॉन कमिनियस यांची लिखाणे
  • त्यांची प्रेरणा?
  • कायमस्वरूपी वारसा
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२०००
  • शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उद्देशयुक्‍त शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • आणखी शिक्षण घेण्याबाबतीत योग्य निर्णय कसा घेता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. १४-२३

कमिनियस—आधुनिक शिक्षणपद्धतीचे शिल्पकार

झेक रिपब्लिकमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

स्वतः शिक्षक असल्यामुळे, जॉन कमिनियस यांना १७ व्या शतकातल्या शिक्षण व्यवस्थेतील उणिवा बऱ्‍यापैकी ठाऊक होत्या. हे खरे की, पूर्णपणे निर्दोष अशी शिक्षण व्यवस्था अद्याप झालेली नाही, पण १७ व्या शतकातली शिक्षण व्यवस्था अगदीच दारुण अवस्थेत होती.

पण नुसत्याच तक्रारी किंवा आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी कमिनियस यांनी स्वतः काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांनी काय केले आणि का? शिवाय, आधुनिक शिक्षण व्यवस्थेचे कुलपिता असलेल्या व्यक्‍तीकडून आणखी काय शिकण्याजोगे आहे?

संगोपन आणि शिक्षण

जॉन अमॉस कमिनियस (मूळ झेकमध्ये, यॅन आमॉस कॉमेनस्की) यांचा जन्म मार्च २८, १५९२ रोजी, मोरेव्हिया येथे झाला; या भागाला आज झेक रिपब्लिक या नावाने ओळखले जाते. पाच भावडांमध्ये ते सर्वात धाकटे होते आणि त्यांना भाऊ नव्हता; त्यांचे आईवडिल शेतकरी असून आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती बऱ्‍यापैकी होती.

त्याचे आईवडिल युनिटी ऑफ ब्रेदरेनचे (नंतर बोहेमियन ब्रेदरेन किंवा मोरेव्हियन चर्च या नावाने ओळखले गेलेले) सदस्य होते; १५ व्या शतकाच्या मध्यात वॉलडेन्सेस आणि पीटर केल्चिड्‌स्कीसारख्या इतर धर्मसुधारकांच्या प्रभावाखाली या धार्मिक गटाची सुरवात झाली होती. जर्मनीत आपले शिक्षण पूर्ण केल्यावर, कमिनियस आपल्या मायदेशी परतले. नंतर, वयाच्या २४ व्या वर्षी, त्यांना युनिटी ऑफ ब्रेदरेनचा पाळक म्हणून नेमण्यात आले.

ते हद्दपार का झाले

सन १६१८ मध्ये, प्रागच्या पूर्वेकडे सुमारे २४० किलोमीटर अंतरावर वसलेल्या फुल्नेक येथील एका लहानशा पॅरिशचे कमिनियस पादरी बनले. त्या वेळी, प्रोटेस्टंट धर्माविरुद्ध कॅथोलिक प्रतीधर्मसुधारणेची चळवळ युरोपमध्ये चांगलीच सक्रिय होती. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट लोकांमधील तणाव वाढत गेले आणि शेवटी तीस वर्षांची लढाई (१६१८-४८) सुरू झाली.

एक संपूर्ण दशक लढाई केल्यावर, रोमन कॅथोलिक धर्म हा मोरेव्हियातील एकमेव वैध धर्म असल्याचे जाहीर करण्यात आले. कमिनियस आणि उच्च श्रेणीतील इतर सदस्यांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले—कॅथोलिक धर्माचा स्वीकार किंवा देशांतर. कमिनयिस काही धर्मांतर करणार नव्हते म्हणून ते आपल्या कुटुंबाला बाहेरगावी, पोलंडमध्ये लेश्‍नॉ नावाच्या लहानशा गावात घेऊन आले; हे ठिकाण युनिटी ऑफ ब्रेदरेन चर्चचे प्रमुख केंद्रस्थान होते. अशाप्रकारे त्यांच्या हद्दपाराची सुरवात झाली आणि ४२ वर्षांपर्यंत ते हद्दपार होते. आपल्या मायदेशात ते पुन्हा कधीच जाणार नव्हते.

“मनांचे कसाईखाने”

कमिनियस यांना लेश्‍नॉ जिम्नेसियम येथे लॅटिन भाषा शिकवण्याचे काम मिळाले—महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रास्ताविक शिक्षणाची एक शाळा होती. पण काही काळातच त्यांना या प्रभावकारी नसलेल्या शिक्षणपद्धती अपुऱ्‍या वाटू लागल्या—त्या होत्याच तशा.

कमिनियस यांच्या दिवसातील शालेय व्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब होती. उदाहरणार्थ, फक्‍त पुरुषांना शिक्षण मिळण्याचा हक्क आहे असा समज होता परंतु गरीब घराण्यांतून येणाऱ्‍या मुलांना शिक्षणाचा हक्क नव्हता. वर्गात फक्‍त लॅटिन शब्द, वाक्य आणि वाक्यरचना मुलांच्या डोक्यात ठोसून भरल्या जायच्या. पण का? कारण मध्ययुगातील बहुतेक शाळा कॅथोलिक चर्चद्वारे चालवल्या जात आणि त्या चर्चेसमधील प्रार्थनाविधी लॅटिनमध्ये असत. त्यामुळे, पाळकांच्या पदासाठी सतत नवीन लोक मिळावेत म्हणून लॅटिन भाषा शिकवणे अत्यावश्‍यक होते.

शिवाय, शिकण्यासाठी विशिष्ट ध्येये ठेवण्याबाबत काहीच विचार केला जात नव्हता किंवा विद्यार्थ्यांना सुरवातीला सोप्या कल्पना आणि मग पुढे कठीण कल्पना शिकवल्या जातील अशाप्रकारे शिकवण्याच्या पद्धतीची रचना करण्यात आली नव्हती. शिस्त कडक होती, काहीवेळा तर क्रूर होती आणि नैतिक वातावरण अत्यंत वाईट होते.

म्हणूनच, स्कॉटिश शिक्षक सायमन लॉरी यांनी एकदा १७ व्या शतकातल्या शाळांचे वर्णन “पूर्णतः ध्येयहीन” आणि “कंटाळवाण्या” असे केले होते. कमिनियस तर याहून मार्मिक शब्दांत बोलले होते. ते शाळांना “मनांचे कसाईखाने” म्हणायचे.

नव्या शिक्षणपद्धतीचा उदय

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत मत व्यक्‍त करणारे कमिनियस हे काही एकटेच नव्हते. इंग्लंडमध्ये, फ्रान्सिस बेकन यांनी लॅटिनवर जोर दिला जात होता त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती आणि पुन्हा एकदा प्रकृतीचा अभ्यास केला जावा असे सुचवले होते. जर्मनीत, वॉल्फगँग रॉट्‌कं आणि योहान वॉलेनटीन ऑन्द्रीए त्याचप्रमाणे इतरांनीही सुधारणा करण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, यांपैकी कोणाच्याही विचारांना अधिकृतपणे पाठिंबा मिळू शकला नाही.

कमिनियस यांनी अशी एक पद्धत सुचवली ज्यामुळे शिक्षण कंटाळवाणे नव्हे तर आनंददायी बनले. त्यांनी आपल्या शैक्षणिक आराखड्याला पॉम्पेडिया अर्थात “सार्वत्रिक शिक्षण” असे नाव दिले. सर्वांना आवडेल अशी शिक्षणाची प्रगतीशील व्यवस्था स्थापन करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांचे असे म्हणणे होते, की मुलांना टप्प्याटप्प्याने शिकवले जावे; कठीण संकल्पनांकडे आपोआप नेणाऱ्‍या मूलभूत संकल्पना आधी शिकवाव्यात. शाळेच्या पहिल्या काही वर्षांमध्ये लॅटिनऐवजी मातृभाषेचा उपयोग केला जावा याचाही कमिनियस यांनी पुरस्कार केला.

शिक्षण हे केवळ पौगंडावस्थेपुरतेच असू नये तर एखाद्याच्या सबंध आयुष्यभर उपयोगी पडणारे असावे. कमिनियस यांनी लिहिले की, अभ्यास “संपूर्णतः अनुभविक, संपूर्णतः मनोरंजक असा असावा आणि शाळा जणू खेळ खेळण्यासारखी असावी, म्हणजेच, आपल्या सबंध आयुष्याच्या गीताचे मधुर प्रास्ताविक असावे.” फक्‍त मनाला प्रबोधण्याचे ध्येय नसावे तर संपूर्ण व्यक्‍तीला प्रबोधणे हे ध्येय असावे—त्यात नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण असावे असाही त्यांचा विश्‍वास होता.

जॉन कमिनियस यांची लिखाणे

शिक्षण क्षेत्रात १६३० मध्ये कमिनियस यांच्या पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन झाले, त्याचे नाव होते बालकपणाची शाळा (इंग्रजी).a घरी लहान मुलांना शिकवताना मातांना आणि आयांना मदत म्हणून या पुस्तकाची रचना करण्यात आली होती. यानंतर १६३१ मध्ये, भाषांचे फाटक उघडे (इंग्रजी) हे पुस्तक निघाले ज्यामुळे लॅटिन शिकवण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडली. त्यात दोन भाषांचे समांतर रकाने होते; एक झेक भाषेचा आणि एक लॅटिन भाषेचा. अशाप्रकारे, या दोन्ही भाषांची तुलना करणे सोपे पडत होते आणि त्यामुळे भाषा शिकणेसुद्धा सोपे झाले. त्यांच्या या अध्यापन साहाय्यग्रंथाची सुधारित आवृत्ती इतकी लोकप्रिय झाली की कालांतराने १६ भाषांमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले.

कमिनियस यांचे सर्वात प्रसिद्ध आणि कदाचित सर्वात सोपे साहित्य म्हणजे दृश्‍य जग (इंग्रजी) हे होते; लहान मुलांकरता असलेले हे सचित्र वाचन मार्गदर्शक होते. शिक्षणाच्या इतिहासात ही देखील फार मोठी प्रगती होती. एल्वुड कबरली हे २० व्या शतकातले शिक्षणाचे प्राध्यापक म्हणतात की, “युरोपमध्ये दीडशे वर्षांपर्यंत त्याच्या तोडीचे काहीच निघाले नाही; आणि जवळजवळ दोनशे वर्षांपर्यंत प्रास्ताविक पाठ्यपुस्तक म्हणून त्याचा उपयोग करण्यात आला होता.” खरे तर, आजकालच्या सचित्र पाठ्यपुस्तकांची एकंदर रचना अजूनही कमिनियस यांच्या साहित्यासारखीच असून त्यांमध्ये शिकवण्याची साधने म्हणून चित्रांचा उपयोग करण्यात आला आहे.

लवकरच कमिनियस यांच्या असामान्य कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. संपूर्ण युरोपमधील विद्वान त्यांना गुरू मानू लागले आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊ लागले. माग्नाल्या क्रिस्टी आमेरिकाना या पुस्तकानुसार, कमिनियस इतके प्रसिद्ध झाले की, १६५४ मध्ये त्यांना केंब्रिज, मॅसाच्यूसेट्‌स येथील हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्षपद भूषवण्याचे आमंत्रण मिळाले. परंतु, कमिनियस यांनी नकार दिला कारण त्यांना प्रसिद्धी, गौरव किंवा उच्च पद नको होते.

त्यांची प्रेरणा?

कमिनियस यांच्या जीवनचरित्राचे परीक्षण केल्यावर एक प्रश्‍न आल्याशिवाय राहात नाही, तो म्हणजे त्यांना कोठून प्रेरणा मिळाली असावी. कमिनियस यांच्या दृष्टीने शिक्षण ही मानवजातीला एकवटणारी शक्‍ती होती. सार्वत्रिक शिक्षणाने जागतिक शांती टिकवून ठेवण्यास मदत होईल असे त्यांचे ठाम मत होते.

कमिनियस यांनी ज्ञानाचा संबंध धार्मिकतेशी जोडला. ज्ञान संपादन केल्याने मानवजातीला सरतेशेवटी देवाकडे पोचण्याचा मार्ग मिळतो असा त्यांचा विश्‍वास होता. आणि कदाचित तोच त्यांचा प्रमुख हेतू असला असावा.

शिक्षणाविषयी कमिनियस यांची सूक्ष्मदृष्टी आजही मानली जाते. त्यांच्या पद्धतशीर शिक्षण पद्धतींचा, तसेच दृश्‍य साधनांचाही, जगभरात—उदाहरणार्थ, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित साहित्यात उपयोग केला जातो. व्यक्‍तिगत बायबल अभ्यास करतेवेळी किंवा कौटुंबिक बायबल अभ्यास करतेवेळी त्यांच्या पद्धतींचा उपयोग केल्याने आपल्या प्रत्येकालाही व्यक्‍तिगतरित्या त्यांचा फायदा होऊ शकतो. तो कसा?

“विद्यार्थ्यांच्या वयाला, ग्रहणशक्‍तीला झेपणार नाही आणि सद्य स्थितीला अनुचित असतील अशा गोष्टींचे ओझे त्यांच्यावर लादू नये,” असे कमिनियस यांनी लिहिले. म्हणून, तुमच्या मुलांना बायबलविषयी किंवा इतर कोणत्याही विषयाबद्दल शिकवत असताना, त्यांना योग्य असेल अशाचतऱ्‍हेने ते शिकवण्याचा प्रयत्न करा. औपचारिक प्रश्‍नोत्तराची पद्धत वापरण्याऐवजी, बायबलमधील व्यक्‍तींच्या कहाण्या त्यांना सांगणे किती उत्तम. कदाचित तुमच्या मुलांना बायबलमधील घटनांची चित्रे काढायला लावून किंवा बायबलची नाटके करण्याचे उत्तेजन देऊन त्यांना सामील करा. तुमच्या कल्पनाशक्‍तीचा वापर करा! तुमच्या या परिश्रमांचे चीज झाल्याचे तुम्हाला परिणामांवरून दिसेल.—नीतिसूत्रे २२:६.

त्याचप्रमाणे, टप्प्याटप्प्याने लहान मुलांना शिकवण्यासाठी खास रचलेल्या सचित्र साहित्याचा पूर्ण लाभ घ्या, जसे की, बायबल कथांचं माझं पुस्तक आणि तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे.b तसेच कोणत्याही वयोगटातील बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचा हा अनुभव “संपूर्णतः अनुभविक, संपूर्णतः मनोरंजक” व्हावा यासाठी तुम्ही पुढाकार घ्या.

कायमस्वरूपी वारसा

सन १६५६ मध्ये, लेश्‍नॉ नगराला आग लागली तेव्हा कमिनियस यांच्याजवळ असलेले सर्वकाही नष्ट झाले. परंतु, निदान दुसरी एक संपत्ती ते ठेवून गेले. शिक्षणाचा संक्षिप्त इतिहास (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “कमिनियस यांनी . . . शिकवण्यामधील शब्दांवरचे महत्त्व काढून वस्तूंवर घातले, आणि वैज्ञानिक ज्ञानाची शिकवण आणि उपयुक्‍त जागतिक माहितीवर आपल्या साहित्यात जास्त भर दिला.”

खरे तर, शिक्षणाचे रूपांतर शास्त्रामध्ये करण्याचे श्रेय कमिनियस यांना देता येऊ शकते. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमुळे वर्गाची संकल्पनाच पार बदलली. अमेरिकन शिक्षक निकलस बटलर म्हणाले: “शिक्षणशास्त्राच्या इतिहासात कमिनियस यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय व्यवस्थेच्या क्षेत्रातील संपूर्ण आधुनिक कार्यहालचालीची सुरवात त्यांनी केली आणि त्यावर त्यांचाच पगडा आहे.” यहोवाचे साक्षीदार, बायबलचे उत्सुक विद्यार्थी यांनी देखील आधुनिक शिक्षण व्यवस्थेच्या कुलपित्याचे आभार मानले पाहिजेत.

[तळटीपा]

a सन १६५७ मध्ये, कमिनियस यांनी ओपेरा डायडॅकटिका ओम्निया याचा भाग म्हणून झेक डायडॅकटिक हे लॅटिन भाषेत प्रकाशित केले. १८४९ सालापर्यंत तो वेगळा ग्रंथ म्हणून छापण्यात आला नव्हता.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित

[२३ पानांवरील चौकट/चित्रं]

जॉन कमिनियसची काही शिक्षण तत्त्वे

किती शिकवावे त्याविषयी: “शिक्षकाने स्वतःला जमेल तितके नव्हे तर विद्यार्थी ग्रहण करू शकेल इतकेच शिकवावे.”

शिकवण पद्धतींविषयी: “उत्तमरित्या शिकवणे म्हणजे एखाद्याला लवकर, मनोरंजक पद्धतीने आणि पूर्णपणे शिकायला मदत करणे.”

“कार्यक्षम शिक्षक तो [असतो] ज्याला आपल्या विद्यार्थ्यांचे अज्ञान सहनशीलतेने सहन करणे ठाऊक असते त्याचप्रमाणे ते अज्ञान प्रभावकारीपणे कसे दूर करावे तेही ठाऊक असते.”

“शेवटी, शिकवणे म्हणजे काय तर, गोष्टींचे निरनिराळे उद्देश, स्वरूप आणि उगम आणि यांमधील भिन्‍नता दर्शवणे. . . . म्हणून, जो ही भिन्‍नता उत्तमरीतीने समजावून सांगतो तो उत्तम शिक्षक.”

दोन गोष्टींमधील तार्किक संबंधाविषयी: “ज्यातून काही अर्थ निघत नाही, जे समजू शकत नाही किंवा त्याचे महत्त्वही कळत नाही आणि म्हणून ते लक्षातही ठेवता येऊ शकत नाही.”

“तपशील नसतात तेव्हा एखादी गोष्ट समजणे किंवा तिच्याविषयी काही ठरवणे अशक्य असते आणि ती गोष्ट लक्षात ठेवणेही तितकेच अशक्य असते.”

समजशक्‍तीविषयी: “कोणतीही गोष्ट समजून घेण्यात सहसा ती गोष्ट दुसऱ्‍या गोष्टीशी का आणि कशी संबंधित आहे आणि तिच्याशी साम्य असलेल्या इतर गोष्टींशी ती कशी व कितपत भिन्‍न आहे हे जाणून घेणे समाविष्ट असते.”

“असे म्हणतात की, एखादी गोष्ट काय आहे ते जाणून घेण्यासाठी ती एकदा वाचून घ्यावी; दुसऱ्‍यांदा समजून घेण्यासाठी वाचावी; तिसऱ्‍यांदा आपल्या लक्षात ठेवण्यासाठी वाचावी; आणि मग आपल्याला ती पक्की माहीत झाली आहे का हे तपासून पाहण्यासाठी चौथ्यांदा मनातल्या मनात ती म्हणावी; आणि हे अगदी खरे आहे.”

[चित्र]

“दृश्‍य जग,” १८८३ आवृत्तीमधील एक पृष्ठ

[१७ पानांवरील चित्र]

कमिनियस यांच्या शिकवण्याच्या तत्त्वांचा समावेश असलेली १७७५ मधील एक जर्मन वर्णमाला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा