वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ६/८ पृ. १०-१३
  • “मुलं कोवळी आहेत”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मुलं कोवळी आहेत”
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उच्च तत्त्वे
  • आधुनिक वास्तविकता
  • खरे उत्तर
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुमच्या मुलांना बहरू द्या
    सावध राहा!—१९९७
  • “मुलं यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ६/८ पृ. १०-१३

“मुलं कोवळी आहेत”

‘मुलं कोवळी आहेत; मुलाबाळांना झेपेल अशा गतीनं सावकाश प्रवास करीत मी येतो.’—अनेक मुलांचा पिता, याकोब, सा.यु.पू. १८ वे शतक.

लहान मुलांना गैरवागणूक देण्याचा प्रकार काही नवीन नाही. प्राचीन संस्कृती—जसे की, ॲझ्टेक, कनानी, इंका आणि फिनिशियन संस्कृती—लहान मुलांचे बळी चढवण्याच्या प्रघातासाठी कुविख्यात आहेत. कारथेज (सध्या उत्तर आफ्रिकेतले ट्यूनिस हे उपनगर) या फिनिशियन शहराच्या उत्खननाच्या वेळी प्रकट झाल्याप्रमाणे, सा.यु.पू. पाचव्या आणि तिसऱ्‍या शतकांदरम्यान चक्क २०,००० मुलांना बआल देवताला आणि टॉनिट देवीला अर्पिण्यात आले होते! कारथेज नगराच्या भरभराटीच्या काळात, त्याची लोकसंख्या केवळ २,५०,००० होती हे लक्षात घेतले तर बळी दिलेल्या मुलांची संख्या अधिकच धक्केदायक वाटते.

परंतु, एक प्राचीन समाज मात्र ह्‍या लोकांपेक्षा भिन्‍न होता. मुलांना अशी क्रूर वागणूक देणाऱ्‍या शेजाऱ्‍यांसोबत राहत असतानाही, इस्राएल राष्ट्र मात्र लहान मुलांशी व्यवहार करण्याबाबत त्यांच्यापेक्षा एकदम निराळे होते. त्या राष्ट्राचा पूर्वज, याकोब याने चांगले उदाहरण मांडले होते. उत्पत्ति या बायबलमधील पुस्तकानुसार, आपल्या मायदेशी परतत असताना, लहान मुलांना काहीच त्रास होणार नाही अशा तऱ्‍हेने याकोबाने आपल्या सबंध काफल्याच्या प्रवासाची व्यवस्था केली. “मुलं कोवळी आहेत,” तो म्हणाला. त्या वेळी त्याची मुले साधारण ५ ते १४ वर्षांच्या वयोगटातली होती. (उत्पत्ति ३३:१३, १४, मराठी कॉमन लँग्वेज) त्याचे वंशज असलेल्या इस्राएली लोकांनीही लहान मुलांच्या गरजा आणि त्यांची प्रतिष्ठा यांच्याप्रती तितकाच आदर दर्शवला.

निश्‍चितच, बायबल काळातील मुलांकडे पुष्कळ काही करण्याजोगे होते. मोठे होत असताना मुलांना वडिलांकडून शेती करण्याविषयी, किंवा सुतारकामासारखा एखादा व्यापार शिकण्याविषयी व्यावहारिक प्रशिक्षण दिले जात असे. (उत्पत्ति ३७:२; १ शमुवेल १६:११) घरी, मुलींना प्रौढपणी उपयोगी पडतील अशा घरगुती कामांचे प्रशिक्षण आपल्या आईकडून मिळायचे. याकोबाची पत्नी राहेल ही लहान असताना मेंढरे चारीत असे. (उत्पत्ति २९:६-९) तरुण मुली कापणीच्या वेळी शेतांमध्ये आणि द्राक्षाच्या मळ्यांमध्ये काम करत असत. (रूथ २:५-९; गीतरत्न १:६)a असले हे काम सहसा पालकांच्या प्रेमळ देखरेखीखाली केले जायचे आणि त्यासोबत मुलांना शिकवलेही जायचे.

त्याच वेळी, इस्राएलमधील लहान मुले करमणूक आणि मनोरंजनही करत होते. संदेष्ट्या जखऱ्‍याने, ‘गर्दी करून नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणाऱ्‍या मुलामुलींचा’ उल्लेख केला. (जखऱ्‍या ८:५) शिवाय, येशू ख्रिस्ताने बाजारात बसून पावा वाजवणाऱ्‍या व नाचणाऱ्‍या लहान मुलांचा उल्लेख केला. (मत्तय ११:१६, १७) लहान मुलांना अशा आदराची वागणूक का दिली जात होती?

उच्च तत्त्वे

इस्राएली लोक देवाच्या नियमांचे पालन करत होते तोपर्यंत त्यांनी आपल्या मुलांवर अत्याचार किंवा त्यांचे शोषण कधीच केले नाही. (यिर्मया ७:३१ सोबत अनुवाद १८:१० पडताळा.) आपल्या मुलामुलींना त्यांनी ‘परमेश्‍वराकडील धन,’ “देणगी” असे मानले. (स्तोत्र १२७:३-५) एका पालकाने तर आपल्या मुलांना ‘मेजासभोवती असलेली जैतुनाची रोपे’ म्हटले—आणि त्या शेतीप्रधान समाजाला जैतुनांची झाडे अत्यंत मौल्यवान होती! (स्तोत्र १२८:३-६) इतिहासकार अल्फ्रेड एडरशाइम निरीक्षण करतात की, मुलगा आणि मुलगी यासाठी असलेल्या शब्दांव्यतिरिक्‍त प्राचीन इब्री भाषेत मुलांकरता नऊ शब्द होते; विकासातील प्रत्येक अवस्थेसाठी एक वेगळा शब्द होता. ते शेवटी असे म्हणतात: “मुलाच्या जीवनातील प्रत्येक अवस्थेसाठी वर्णनात्मक नाव देण्याइतके ज्यांनी लहान मुलांचे बारकाईने निरीक्षण केले त्यांना नक्कीच आपली मुले फार प्रिय असतील.”

प्राचीन ख्रिश्‍चनांच्या काळात, पालकांनी आपल्या मुलांना आदराने आणि सन्मानाने वागवावे असे त्यांना आर्जवण्यात आले होते. इतर लोकांच्या मुलांसोबत वागताना येशूने उत्तम उदाहरण राखले. त्याच्या पार्थिव सेवेच्या शेवटाच्या सुमारास एके प्रसंगी, लोक त्याच्याजवळ आपल्या लहान मुलांना आणू लागले. येशूला वेळ नसल्यामुळे लोकांनी त्याला त्रास देऊ नये असा विचार करून शिष्यांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण येशूने आपल्या शिष्यांना दटावले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका.” येशूने ‘त्यांना कवटाळलेही.’ त्याला मुलांची कदर वाटायची आणि तो त्यांना चांगली वागणूक देण्यालायक समजायचा यात काहीच प्रश्‍न नाही.—मार्क १०:१४, १६; लूक १८:१५-१७.

नंतर, प्रेषित पौलाने वडिलांना असे म्हटले: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सैकर ३:२१) या आज्ञेनुसार, त्या काळातले तसेच सध्याचे ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना कधीच अशा हानीकारक परिस्थितींमधील कामाचे बळी होऊ देणार नाहीत. त्यांना याची जाणीव आहे की, मुलांची शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रेमळ, काळजीपूर्वक आणि सुरक्षित वातावरणाची आवश्‍यकता आहे. पालकांचे खरे प्रेम स्पष्ट दिसून आले पाहिजे. यामध्ये, शारीरिकरित्या क्षीणवणाऱ्‍या परिस्थितींमध्ये काम करण्यापासून आपल्या मुलांचे संरक्षण करणे याचाही समावेश होतो.

आधुनिक वास्तविकता

आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांमध्ये’ जगत आहोत हे खरे आहे. (२ तीमथ्य ३:१-५) हलाखीच्या परिस्थितींमुळे, अनेक देशांमध्ये ख्रिस्ती कुटुंबांना देखील आपल्या मुलांना कामावर पाठवावे लागत असेल. आधी सांगितल्यानुसार, मुलांसाठी हितकर आणि बोधक असणारे काम करण्यात काही गैर नाही. असले काम, आवश्‍यक शालेय शिक्षण, संतुलित करमणूक आणि जरूरीचा विश्राम यांमध्ये काही खंड न पाडता मुलाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, नैतिक किंवा सामाजिक विकासासाठी पोषक किंवा वृद्धी करणारे ठरू शकते.

निःसंशये, ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना गुलामांसारखी वागणूक देणाऱ्‍या क्रूर, असंवेदनशील किंवा दुष्ट हेतूच्या मालकांपाशी कामाला न पाठवता आपल्या स्वतःच्या प्रेमळ देखरेखीखाली काम करू देतील. या पालकांनी ही खात्री करून घ्यावी की, त्यांची मुले करत असलेल्या कोणत्याही कामामुळे त्यांच्यावर शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचार होणार नाही. शिवाय, त्यांना आपली मुले स्वतःजवळ असलेली आवडतील. अशातऱ्‍हेने बायबलनुसार ते आध्यात्मिक शिक्षकाची आपली भूमिकाही पार पाडू शकतात: “तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर [देवाची वचने] बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७.

शिवाय, ख्रिस्ती व्यक्‍तीने सहानुभूतीने, प्रेमाने आणि दयाळूपणे वागावे असे म्हटले आहे. (१ पेत्र ३:८) तिने “सर्वांचे . . . बरे करावे” असे तिला उत्तेजन देण्यात आले आहे. (गलतीकर ६:१०) सर्वसाधारणपणे, लोकांशी वागताना असे ईश्‍वरी गुण दाखवायचे आहेत, तर मग स्वतःच्या मुलांशी वागताना हे गुण कितीतरी जास्त पटीने दाखवायला हवेत! “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा” या सुवर्ण नियमानुसार, ख्रिस्ती इतरांच्या मुलांचे शोषण कधीच करणार नाहीत, मग ते सहख्रिस्ती असोत अगर नसोत. (मत्तय ७:१२) शिवाय, ख्रिस्ती कायदे-कानून पाळणारे नागरिक असल्यामुळे, त्यांच्यासाठी काम करणाऱ्‍या लोकांच्या वयोमर्यादेविषयी कोणत्याही सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये याची त्यांनी दक्षता घ्यावी.—रोमकर १३:१.

खरे उत्तर

भवितव्याविषयी काय? मुले त्याचप्रमाणे प्रौढांकरता पुढे सुकाळ आहे. बायबलमध्ये ज्याला “स्वर्गाचे राज्य” म्हटले आहे ते भावी जगव्याप्त सरकार, बालमजुरीच्या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय आहे याची खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खात्री आहे. (मत्तय ३:२) देव-भिरू लोकांनी अनेक शतकांपासून यासाठी प्रार्थना केली आहे; त्यांनी म्हटले आहे: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.

हे राज्य, बालमजुरीला कारणीभूत ठरणाऱ्‍या परिस्थिती देखील काढून टाकेल. ते दारिद्र्‌य काढून टाकेल. “भूमीने आपला उपज दिला; देव, आमचा देव, आम्हाला आशीर्वाद देवो.” (स्तोत्र ६७:६) देवाचे राज्य याची खात्री करील की, सर्वांना ईश्‍वरी गुणांवर आधारित उचित शिक्षण प्राप्त होईल. “[देवाची] न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात.”—यशया २६:९.

विषमतेला कारणीभूत ठरणाऱ्‍या आर्थिक व्यवस्थांना देवाचे सरकार काढून टाकील. त्या वेळी, जात, समाज, वय किंवा लिंग हे भेदभाव राहणार नाहीत कारण त्या सरकारात प्रेमाचा नियम अंमलात आणला जाईल; त्यात या नियमाचा समावेशही असेल: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) अशा नीतिमान जागतिक सरकाराखाली, बालमजुरीच्या समस्येचे पूर्णतः उच्चाटन केले जाईल!

[तळटीपा]

a यामुळे, स्त्रिया कुटुंबातल्या दुय्यम सदस्य आहेत आणि फक्‍त घरातली कामे किंवा शेतातली कामे करण्याच्या लायकीच्या त्या आहेत म्हणून त्यांना कमी लेखले जात नव्हते. नीतिसूत्रेमधील ‘सद्‌गुणी स्त्रीचे’ वर्णन दाखवते की, घर सांभाळणे इतकेच एका विवाहित स्त्रीचे काम नव्हते, तर स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे, फलदायी शेत तयार करणे आणि लहान व्यापार चालवणे हे देखील ती करू शकत होती.—नीतिसूत्रे ३१:१०, १६, १८, २४.

[१२ पानांवरील चौकट]

कुंटणखान्याच्या बाईंने मुलींना मुक्‍त केले

कॅरिबियनमधील एका द्वीपात, सिसिल्याb तब्बल १५ वर्षे कुंटणखाने चालवत होती. एका वेळी ती १२ ते १५ मुली विकत घ्यायची; त्यांच्यातल्या बहुतेक मुली १८ वर्षांखालील असायच्या. या मुलींच्या घरच्या लोकांनी घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात या मुलींना त्यांच्या मर्जीविरुद्ध तेथे ठेवण्यात यायचे. सिसिल्या त्यांचे कर्ज फेडायची आणि मुलींना कामाला लावायची. त्यांच्या कमाईतून ती त्यांचे खाणे-पिणे, राहणे वगैरेचा खर्च भागवायची आणि त्यांच्या खरेदीच्या किंमतीमधील थोडीफार रक्कमसुद्धा बाजूला काढून ठेवायची. आपली सुटका करून घ्यायला त्यांना कितीतरी वर्षे लागायची. त्यांच्यावर नजर ठेवायला एक माणूस सोबत असल्याशिवाय या मुलींना घराबाहेर जाऊ दिले जायचे नाही.

सिसिल्याला विशेषतः एक घटना चांगली आठवते. एका वेश्‍येची आई दर आठवडी काही सामान घ्यायला यायची—तिच्या मुलीने “काम” करून कमावलेले सामान घ्यायला. त्या मुलीला एक मुलगा होता. तिला काही कर्ज फेडता येईना आणि आपली कधी सुटका होईल असे तिला वाटत नव्हते. शेवटी एके दिवशी तिने आत्महत्या केली आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली ज्यामध्ये आपल्या मुलाची काळजी बाईंनी घ्यावी असे म्हटले होते. सिसिल्याने आपल्या चार मुलांसह या मुलालाही वाढवले.

सिसिल्याची एक मुलगी यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनरींसोबत बायबलचा अभ्यास करू लागली. सिसिल्यालाही अभ्यासात भाग घेण्यासाठी उत्तेजन देण्यात आले, पण सुरवातीला तिने नकार दिला कारण तिला लिहायला वाचायला येत नव्हते. परंतु हळूहळू, बायबलमधील चर्चा ऐकून देवाची प्रीती आणि सहनशीलता काय आहे हे तिला समजले आणि त्याच्या क्षमेचे मूल्य तिने जाणले. (यशया ४३:२५) स्वतः बायबल शिकण्याची इच्छा असल्यामुळे तिने लागलीच लिहायला वाचायला शिकण्यास सुरवात केली. तिचे बायबलचे ज्ञान वाढत गेले तसे, देवाच्या उच्च नैतिक दर्जांचे पालन करण्याची गरज तिने ओळखली.

एके दिवशी, तिने सर्व मुलींना म्हटले, तुम्हाला मी मुक्‍त करते, तुम्ही जाऊ शकता! हे ऐकून मुली चक्रावून गेल्या. त्या करीत असलेले काम यहोवाला मुळीच आवडत नाही असे तिने त्यांना समजावून सांगितले. कोणत्याच मुलीने आपले कर्ज तिला चुकते केले नाही. परंतु, दोन मुली तिच्यासोबत राहू लागल्या. आणखी एक मुलगी कालांतराने बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार बनली. सिसिल्या गेल्या ११ वर्षांपासून पूर्ण-वेळ बायबल शिकवण्याचे काम करून इतर लोकांना देवाचा अनादर करणाऱ्‍या गोष्टींपासून मुक्‍त होण्यास मदत करत आहे.

[तळटीप]

b तिचे हे खरे नाव नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा