वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. १८-१९
  • मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विचारात घेण्याजोगी तत्त्वे
  • पैसे देणारा
  • मी पैसे उधार घ्यावेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • मी माझ्या भावाकडून कर्ज घ्यावे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • प्रामाणिक असणे याचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. १८-१९

बायबलचा दृष्टिकोन

मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे

“दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही; नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो.”—स्तोत्र ३७:२१.

“उसने घेणारा असू नये किंवा देणारा; कारण बहुधा कर्जही बुडते आणि मैत्रीही.” असे इंग्रजी नाटककार विल्यम शेकस्पीयर यांनी प्राचीन काळातल्या बोधवचनाची पुनरुक्‍ती करत म्हटले. मानवी नात्यामध्ये, उसने घेणे किंवा देण्यासारखे फार कमी घटक आहेत ज्यांमुळे नाती बिघडतात. सर्वकाही नीट योजलेले असताना आणि प्रामाणिक हेतू असतानाही अपेक्षेप्रमाणे सगळेच घडते असे नाही.—उपदेशक ९:११, १२.

अशा काही परिस्थिती उद्‌भवू शकतात ज्यामुळे उसने घेणाऱ्‍याला आपले कर्ज फेडणे कठीण जाऊ शकते किंवा अशक्य होऊ शकते. किंवा, उसने देणाऱ्‍या व्यक्‍तीला दिलेल्या पैशांची अचानक गरज भासू शकते. असे काही घडते तेव्हा, शेकस्पीयरने सांगितल्याप्रमाणे, मैत्री आणि नाती बिघडू शकतात.

अर्थात, योग्य कारणांमुळे एखादी व्यक्‍ती पैसे उसने घेत असावी. गंभीर अपघात किंवा नोकरी गमावल्याने निर्माण झालेल्या आर्थिक तंगीमुळे तोच एक पर्याय त्याला दिसत असावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी गरजवंतांना मदत करावी असे बायबल उत्तेजन देते. (नीतिसूत्रे ३:२७) यामध्ये पैसे उसने देणेही सामील असू शकते. परंतु, पैसे उसने देणाऱ्‍या किंवा घेणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी आपल्या जबाबदारींबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगावा?

विचारात घेण्याजोगी तत्त्वे

बायबल काही आर्थिक विषयांवरील मार्गदर्शक पुस्तक नव्हे. उसने घेणे किंवा देणे यातील सर्व तपशीलांची त्यात चर्चा केलेली नाही. व्याज घ्यावे किंवा नाही आणि घेतले तर किती घ्यावे हे सर्व त्यात गोवलेल्या व्यक्‍तींवर अवलंबून आहे.a परंतु, बायबलमध्ये उसने घेणाऱ्‍या किंवा देणाऱ्‍या व्यक्‍तींची मनोवृत्ती आणि वर्तणूक ज्या तत्त्वांनुसार असली पाहिजे ती स्पष्ट, प्रेमळ तत्त्वे जरूर दिली आहेत.

आता घेणाऱ्‍याला कोणती तत्त्वे लागू होतात ती पाहा. “एकमेकांवर प्रीती करणे ह्‍याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका” असे प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना आर्जवले. (रोमकर १३:८) पौलाने येथे नमूद केलेले तत्त्व, अनेक प्रसंगांना लागू होणारे असले तरी त्याचा हा सल्ला कर्जबाजारी न होण्याबाबतीत सावधानतेचा इशारा म्हणून निश्‍चितच घेतला जाऊ शकतो. काहीवेळा, दुसऱ्‍यांकडून पैसे उसने घेण्याऐवजी तंगीत राहणे उत्तम असते. का? नीतिसूत्रे २२:७ म्हणते की, “ऋणको धनकोचा दास होतो.” पैसे परत करेपर्यंत पैसे घेणाऱ्‍याने हे लक्षात ठेवावे की त्याच्यावर एक जबाबदारी आहे. तत्त्वानुसार तसे पाहिले, तर त्याच्या मालमत्तेवर संपूर्णतः त्याचा हक्क नसतो. मान्य केलेल्या अटींनुसार कर्ज फेडण्याला त्याने जीवनात प्राधान्य द्यावे नाहीतर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

उदाहरणार्थ, कर्ज न फेडल्याने कालांतराने उसने पैसे देणाऱ्‍याला राग येऊ शकतो. उसने पैसे घेणारा जर कपडे खरेदी करत असेल, बाहेर हॉटेलात जेवत असेल किंवा सुटीला जात असेल तर उसने पैसे देणारा त्याच्यावर शंका करू लागेल. त्याला अधिकच राग येऊ शकतो. त्यांच्यात आणि त्यांच्या कुटुंबांमध्येही बेबनाव होऊ शकतो किंवा नाती अधिकच बिघडू शकतात. पैसे उसने घेणारा आपल्या वचनाला धरून राहिला नाही तर त्याचे असेच दुःखद परिणाम घडू शकतात.—मत्तय ५:३७.

पण, पैसे उसने घेणाऱ्‍याला अचानक आपल्या हाताबाहेर असलेल्या एखाद्या परिस्थितीमुळे दिलेले वचन पूर्ण करता आले नाही तर काय? त्यामुळे कर्ज माफ होईल का? जरूरी नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो की, नीतिमान व्यक्‍ती “आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चे अहित झाले तरी ती मोडीत नाही.” (स्तोत्र १५:४) अशा प्रसंगी, उसने पैसे घेतलेल्याने, पैसे देणाऱ्‍याला तत्काळ आपली परिस्थिती समजावून सांगणे हे विचारपूर्वक आणि सुज्ञतेचे असेल. मग, ते एखादी पर्यायी उपाययोजना करू शकतात. यामुळे शांती टिकून राहील आणि यहोवा देवही संतुष्ट होईल.—स्तोत्र १३३:१; २ करिंथकर १३:११.

खरे पाहिले तर, एखादी व्यक्‍ती ज्या तऱ्‍हेने कर्ज फेडते त्यावरून तिच्या स्वभावाविषयी पुष्कळ काही समजते. कर्ज फेडण्याबाबतीत एखादी व्यक्‍ती बेपर्वा असली, तर दुसऱ्‍यांबद्दल तिला चिंता नाही हे प्रकट होते. खरे तर, अशा मनोवृत्तीची व्यक्‍ती स्वार्थीपणा दर्शवत असते—नेहमी स्वतःच्या अपेक्षांना किंवा इच्छांना प्राधान्य देत असते. (फिलिप्पैकर २:४) जो ख्रिस्ती मुद्दामहून आणि जाणूनबुजून कर्ज फेडायला नकार देतो तो देवासमोरील आपले स्थान धोक्यात आणतो आणि त्याच्या कृतींवरून त्याचे लोभी, दुष्ट हृदय आहे हे सूचित होते.—स्तोत्र ३७:२१.

पैसे देणारा

उसने पैसे घेणाऱ्‍यावर बरीच जबाबदारी येत असली, तरी पैसे देणाऱ्‍यालाही काही तत्त्वे लागू होतात. बायबल दर्शवते की, गरजवंतांना मदत करण्याची क्षमता आपल्याजवळ असली तर आपण मदत केली पाहिजे. (याकोब २:१४-१६) पण याचा अर्थ, पैसे उसने देणे हे कर्तव्यच आहे असे काही नाही—पैसे मागणारा एक आध्यात्मिक बांधव असला तरीही. “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो,” असे बायबल म्हणते.—नीतिसूत्रे २२:३.

पैसे उसने देण्यात किंवा घेण्यात असलेले धोके ठाऊक असल्याने आणि समजून घेतल्याने, कोणी पैसे मागितले तर सुज्ञ व्यक्‍ती त्यावर नीट विचार करील. पैशांची केलेली मागणी योग्य आहे का? पैसे मागणाऱ्‍या व्यक्‍तीने यावर नीट विचार केला आहे का? पैसे मागणारी व्यक्‍ती पद्धतशीर आहे का आणि तिच्याविषयी इतरांचे चांगले मत आहे का? कराराच्या अटी नमूद केलेल्या दस्ताऐवजावर ती सही करायला तयार आहे का? (पडताळा यिर्मया ३२:८-१४.) पैसे परत करायला ती खरोखर तयार आहे का?

पण यावरून असे सूचित केले जात नाही की, एका ख्रिश्‍चनाने आर्थिक अडचणीत सापडणाऱ्‍या व्यक्‍तीला नकार द्यावा. एखाद्या ख्रिश्‍चनाची दुसऱ्‍यांप्रती असलेली व्यक्‍तिगत कर्तव्ये चांगले व्यापारी व्यवहार ठेवण्यापर्यंतच मर्यादित नाहीत. “मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?” असे प्रेषित योहान विचारतो. होय, ख्रिश्‍चनांनी “आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने . . . प्रीति” प्रदर्शित करावी.—१ योहान ३:१७, १८.

काहीवेळा असे होऊ शकेल की, गरजू असलेल्या आपल्या बांधवाला पैसे उसने न देता, त्याऐवजी कदाचित एखादी भेटवस्तू द्यायला किंवा दुसऱ्‍या प्रकारे मदत करायला एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला अधिक पसंत पडेल. अशाच तऱ्‍हेने, पैसे उसने घेण्याबाबत अडचणी निर्माण होतात तेव्हा पैसे देणारा कदाचित दया दाखवेल. तो कदाचित उसने पैसे घेतलेल्या व्यक्‍तीची बदललेली परिस्थिती लक्षात घेईल आणि पैसे परत देण्याचा अवधी वाढवेल, पैसे कमी करेल किंवा कर्ज पूर्णपणे माफही करेल. हे व्यक्‍तिगत निर्णय आहेत आणि प्रत्येक व्यक्‍तीने ते स्वतः घ्यावेत.

ख्रिश्‍चनांनी लक्षात ठेवावे की, देव सर्वकाही पाहत आहे आणि आपण जसे वागू आणि आपल्या मालमत्तेचा उपयोग जसा करू त्यानुसार तो आपल्याला जबाबदार ठरवेल. (इब्री लोकांस ४:१३) ‘आपण जे काही करतो ते सर्व प्रीतीने करावे’ हा बायबलचा सल्ला, मित्रांमध्ये आपापसांत पैसे उसने देण्याला किंवा घेण्याला निश्‍चितच लागू होतो.—१ करिंथकर १६:१४.

[तळटीपा]

a व्याज घेण्याबाबतीत अतिरिक्‍त माहितीसाठी, ऑक्टोबर १५, १९९१ चा टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंक, पृष्ठे २५-८ पाहा.

[१८ पानांवरील चित्र]

“सराफ आणि त्याची पत्नी” (१५१४), चित्रकार—क्वेन्टिन मॅसिस

[चित्राचे श्रेय]

Scala/Art Resource, NY

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा